News Flash

‘जिंदगी दा कल चालू होने वाली है’..

उद्या उठल्यावर नवे कोरे करकरीत चोवीस तास आपल्या हातात असणार.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

खरंच वाटत नाही, आता आयुष्यात ८० वर्षे ओलांडलीत. हा प्रवास अगदी आनंदमय झालाय. हवे तेव्हा, हवे तसे मजेत, रमत गमत हिंडलोय. फ्रान्समधले आणि पंजाबमधील म्हातारे रात्रीची बैठक संपवून उठताना म्हणतात, ‘जिंदगी दा कल चालू होने वाली है’.. आजवर जे पाहिले, भोगले ते तर सारे आता स्वप्नासारखे आहे. उद्या उठल्यावर नवे कोरे करकरीत चोवीस तास आपल्या हातात असणार. ज्याला चोवीस तास कमी पडतात, तो तरुण, ज्याला चोवीस तास खायला उठतात तो म्हातारा! म्हणजे मी तरुण आहे..

खरं सांगतो, आयुष्याची ८० वर्षे ओलांडली हे खरेच वाटत नाही.  लहानपणी ‘हॅप्पी बर्थडे टू यू’ हा प्रकार शाळेत काय घरीसुद्धा नव्हता. मी व माझे मित्र वाढत होतो. पानात टाकलंय ते निमूटपणे खायचं, उठताना ताट चकाचक करून ठेवायचे. संध्याकाळी क्रीडांगणावर दमेपर्यंत खेळायचे. खेळताना लागलं तर ते घरी अजिबात कळू द्यायचे नाही. आणि प्रगतिपुस्तकावर सही घेताना महिन्यातून एकदा वडिलांच्यासमोर मान खाली घालून उभे राहायचे!

त्यात आमचे घर फारच ग्रेट होते. ‘त्यातही मोठा मजा असतो यार’ हे पु.लं.च्या काकाजीचे वाक्य. लहानपणीच या घराने नकळत मनावर ठसवले. आम्ही सात भाऊ, तीन बहिणी. आजच्या मुलांचा विश्वासही बसणार नाही; एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले! त्यात आमच्या घरात आणखी एक अद्भुत गोष्ट होती हे आता जाणवते. माझे वडील कोकणात खेडय़ात राहून कष्टाने शिकले. सातारला नामांकित फौजदारी वकील झाले. पुरते दत्तभक्त. सकाळी माळावरील दत्ताचे दर्शन. वर्षांतून दोनदा घरी आणि एकदा गाणगापूरला जाऊन दत्तचरित्राचे पारायण. मात्र, माझी आई कोल्हापूरची. तिचे शिक्षण फक्त मराठी चौथीपर्यंत. पण चौथीच्या परीक्षेत ती कोल्हापूर संस्थानात पहिली आली होती. तिच्यावरचे संस्कार शाहू महाराजांचे. शंभर वर्षांपूर्वी ही बाई कुंकू न लावता आणि मंगळसूत्र न घालता सातारला वावरायची. घरी हळदीकुंकू, मंगळागौर, सत्यनारायण असले काही नाही. तिने अंगावर कधी सोने घातले नाही. त्यामुळे आमच्या बहिणींच्या अंगावर पण सोने नव्हते. मुलींच्या अंगावर सोने असावे हे आम्हाला त्यांच्या लग्नानंतर कळले.

यात मी वर अद्भुत म्हटली, ती गोष्ट ही की, एवढे टोकाचे मतभेद असताना आमच्या आईवडिलांच्यात भांडणे व्हावयास हवीत, पण नाही. त्यांचे अगदी गुळपीठ होते. आमचे जेवण झाले, की चुलीसमोर गुलुगुलू गोष्टी करत तासभर तरी जेवण करत बोलत बसत. लहानपणीच नकळत एक संस्कार मनावर वज्रलेप झाला. धर्म व अध्यात्म खऱ्या अर्थाने समजलेला माणूस धर्म अध्यात्म न मानणाऱ्या माणसांच्या विचाराचा आदर करतो आणि खरा पुरोगामी परिवर्तनवादी माणूसपण असेच वागतो.

आईवडिलांनी आम्हाला हवे तसे वाढायला दिले. हे करा, ते करा, असले काही अजिबात नाही. सर्वात थोरला भाऊ देवदत्त. मॅट्रिकच्या परीक्षेत तो मुंबई प्रांतात पहिला आला होता. त्यावेळी मुंबई प्रांतात कराची, कारवार, अहमदाबाद होते. पण म्हणून आम्ही अभ्यास करावा, असे आम्हाला आईवडिलांनी चुकूनही सांगितले नाही. मी आणि माझ्या मागचा

नरेंद्र(दाभोलकर). शाळेत असताना वरच्या वर्गात गेला, की घातला एवढाच आमचा प्रश्न होता! पण घरी त्याचे काहीही नाही. आईवडिलांनी आम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली होती. तुम्हाला हवे तेवढे हव्या त्या विषयात शिकवणे ही आमची जबाबदारी. मात्र, तुमचे लग्न ही आमची जबाबदारी नाही. करायचं तर करा. करायचं त्याच्याशी करा. करायचं नसलं, तर करू नका. माझी आई सांगायची, ‘मला दहा मुलं आहेत. एकासारखे दुसरे नाही आणि माणसासारखे एकही नाही.’ या अशा घरात मी वाढलो. सारेच भाऊबहीण खूप खूप हुशार होते आणि खूप खूप शिकले. त्यामुळे नकळत नंतर मीही अभ्यासाकडे वळलो. बी.एस्सी.पर्यंत सारा गोंधळ. मग मात्र, एम.एस्सी.च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात प्रथम श्रेणीत पहिला आलो.

शाळेत असताना आलटून-पालटून संघ व सेवादल असा प्रवास होत राहिला. या देशातच राहावयाचे, परदेशात जायचे नाही हा विचार या दोघांनीही मनावर कोरला. संशोधन करायचे ही उर्मी संशोधन म्हणजे काय हे माहीत नसताना सुद्धा मनात होती. त्यामुळे आयुष्यभर भारतात राहून फक्त औद्योगिक क्षेत्रात संशोधन केले. संशोधन क्षेत्रात काम करायला भारतात तीन पर्याय होते. बहुराष्ट्रीय कंपनीचे संशोधन केंद्र, खासगी उद्योगधंद्याचे संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय प्रयोग शाळा. ‘सिबा’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अत्याधुनिक संशोधन केंद्रात काम केल्यावर लक्षात आले, एका टप्प्यावर हे संशोधन परदेशात नेतात. आपल्या देशाला काही फायदा  नाही. कोटा येथे ‘सर पदमपद रिसर्च सेंटर’ हा खासगी क्षेत्रातले जे.के. सिंथेटिक्सचे अत्याधुनिक संशोधन केंद्र होते. तेथे काम केल्यावर लक्षात आले, यांना संशोधन नकोय- संशोधनावर प्रचंड खर्च केलाय, असे खोटे दाखवून त्यावर मिळणारी आयकरातील सूट हवी आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळेत जाण्याचा तर प्रश्नच नव्हता, अबीद हुसेन कमिटीचा अहवाल सांगत होता. तेथील वातावरण सुधारता येणार नाही, एवढे बिघडलेले आहे.

त्यावेळी दिल्लीतील ‘श्रीराम इन्स्टिटय़ूट फॉर इंडस्ट्रीयल रिसर्च’ ही संस्था समोर आली. लाला श्रीराम यांनी स्वातंत्र्यानंतर लगेच ही प्रयोगशाळा स्थापन केली होती. मात्र, संशोधन संस्था स्थापन करताना त्यांनी सांगितले, ‘या देशातील शास्त्रज्ञ फार प्रतिभावान आहेत. पण ते आळशी आहेत. मी त्यांना पगार देणार नाही. त्यांना एक अद्ययावत प्रयोगशाळा देतो. तेथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना सरकारकडून वा कुठल्याही उद्योगधंद्याकडून अनुदान घेता येणार नाही. मात्र, उद्योगधंद्यांच्या तांत्रिक अडचणी समजावून घेऊन त्या सोडवून त्यांनी मानधन घ्यावे. जमले तर नवे पदार्थ बनवून त्यांची पेटंटस् घेऊन ती विकून पैसे मिळवावेत. या सर्वातून मग शास्त्रज्ञांनी हवा तेवढा पगार घ्यावा.’ मी तेथे विभाग प्रमुख आणि नंतर संस्थाप्रमुख म्हणून २५ वर्षे काम केले.

वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करताना खूप मजा आली. आम्ही अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टी केल्या. १९९७ मध्ये आमच्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव होता. आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली. बक्षीस एक लाख रुपये. भारतातील असा एकही प्लास्टिक दाखवा ज्याच्या निर्मितीत आमच्या संशोधन संस्थेच्या संशोधनाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष योगदान नाही. या संस्थेत केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी – ‘हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन’ ही डाऊ केमिकल्सची जागतिक मक्तेदारी होती. त्यांच्या पेटंटचा चक्रव्यूह भेदून ते कुणालाच कधी बनवता येणार नाही, यावर ‘एनसाक्लोपेडिया ऑफ पॉलिमर टेक्नॉलॉजी’मध्ये भरभरून लिहिलेले आहे. आम्ही ते आव्हान स्वीकारले. त्यांच्या पेटंटस्ना कात्रजचा घाट दाखवून आम्ही चक्क४० पेटंटस् फाईल केली. ‘बिनील केमिकल’ आणि ‘आयसीआयसीआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसाला ५ टन ‘हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन’ बनवणारा प्रकल्प गुजरातमध्ये अंकलेश्वर येथे कार्यरत झाला.

१९९० च्या सुमारास भारताने आपला पहिला उपग्रह अंतराळात सोडला. डॉ. वसंतराव गोवारीकर त्यावेळी अंतरिक्ष विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आमच्या संस्थेला त्यात सामिल करून घेतले. अतीप्रचंड तापमानात विघटित न होणारे प्लास्टिक आम्ही बनवत होतो. त्यावर्षी ‘फिकी’ने (म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री) यांनी अत्युत्कृष्ट संशोधनाचे बक्षीस भारताचा अंतरिक्ष विभाग आणि आमची संशोधन संस्था यांना संयुक्तपणे दिले. त्यानंतर अणुशक्ती विभागाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील खासगी क्षेत्रातले औषधी पद्धतीचे र्निजतुकीकरण करणारे पहिले १० लाख क्युरि क्षमतेचे संयत्र आम्ही आमच्या संशोधन संस्थेत बसवले.

भारताच्या अंटाक्र्टिका मोहिमेत माझी संस्था आणि मी अचानक ओढले गेलो. तिसऱ्या मोहिमेच्या वेळी आपण तिथे ‘दक्षिण गंगोत्री’ ही इमारत उभारली होती. अंटाक्र्टिकात दगड-माती नाही. म्हणजे ती इमारत लाकडी हवी. खरं तर ती भारतातील सुतारांनी वा सीएसआयआरच्या रुरकीच्या बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटने उभारायला हवी. पण नाही, आपण ती परदेशातून वारेमाप पैसे देऊन खरेदी केली. ते असो. इमारत लाकडी. आता अंटाक्र्टिकात इमारतीला आग लागली, तर विझवायला पाणी नाही. बर्फ काही खणून टाकता येणार नाही. त्यातून वारा झंझावाती. म्हणजे सबंध इमारत काही क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार. म्हणजे इमारत विकत घेताना अग्निप्रतिबंधक लाकडापासून बनवायला हवी होती. आपण तसे काही केले नव्हते. मग लाकूड अग्निप्रतिबंधक करणारे रंग ‘एशियन पेंटस्’ आणि ‘ब्लंडेल इवोमाईट’ या मान्यवर कंपन्यांनी दिले. पण अंटाक्र्टिकेच्या तपमानात त्यांचा जेलीसारखा पदार्थ बनला. म्हणजे आता अंटाक्र्टिकेत जाऊन देता येईल, असा नवा अग्निप्रतिबंधक रंग बनवणे गरजेचे होते. राष्ट्रीय प्रयोगशाळांनी असमर्थता व्यक्त केल्याने ती मोहीम चालविणारा विभाग आमच्याकडे आला. आम्ही तसा रंग बनवला. रंग बनवून नेता येणार नव्हता. तीन पदार्थ एका रासायनिक प्रक्रियेत एकत्र आणून रंग बनवत असतानाच तो द्यावा लागणार होता. त्याला ‘इन सीटू पॉलिमरायजेशन’ म्हणतात. आम्ही तसा रंग बनवला. मी स्वत:च अंटाक्र्टिकाला जाऊन रंगरंगोटी करून परत आलो. बोटीचा प्रवास जातानाचा एक महिना, येतानाचा एक महिना, तेथील मुक्काम दोन महिने अशी ही चार महिन्यांची मोहीम.

तसे सांगण्यासारखे खूप आहे. शंभर एक पेटंट्स, काही संशोधन निबंध, तीस एक विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन आणि जागतिक स्तरावरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तीन व्यावसायिक संघांनी बहाल केलेली फेलोशिप ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरिअल्स’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ रबर अ‍ॅन्ड प्लॅस्टिक’ आणि ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ या देशात संशोधन क्षेत्राने फारसे काही केले नाही, तरी अंधारात चाचपडत मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला याचा आनंद आहे. या अनुभवावर ‘भारतातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ नवनिर्माते की झारीतील शुक्राचार्य’ हा लेख मी ‘अंतर्नाद’ मासिकात लिहिला.

औद्योगिक संशोधनाबरोबरच मी शोधपत्रकारिता पण केली. शास्त्रज्ञ आणि शोधपत्रिका करणारा पत्रकार यांच्या मूलभूत प्रेरणा आणि स्वधर्म एकच असतो. औद्योगिक क्षेत्रातील शास्त्रज्ञ एखाद्या पदार्थाची रचना समजावून घेतो, ती रचना थोडी बदलून तो पदार्थ अधिक उपयुक्त व स्वस्त होईल का हे पाहतो. शोधपत्रकार नेमके हेच करतो.

माझ्या तीन शोधयात्रा मला महत्त्वाच्या वाटतात. देवराळाची रूपकुंवरची सती समजावी, म्हणून मी खूप भटकलो. खूप वाचले, अनेकांना भेटलो. तो लेख ‘ना डावं, ना उजवं’ या ‘अक्षर प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आहे. नर्मदा प्रकल्प पुढे आला. नर्मदेच्या खोऱ्यात दोन समृद्ध पंजाब उभे करीन, ही प्रकल्पाची प्रतिज्ञा होती. मात्र, हा प्रकल्प भारताला रसातळाला नेतोय, असे सांगत त्याला विरोध करत भारतात व भारताबाहेर जगभर सशक्त चळवळी उभ्या राहत होत्या. हे सारे नक्की काय आहे, ते समजावे म्हणून मी चार महिन्यांची बिनपगारी रजा काढली. स्वत:च्या पैशाने, पायी, बैलगाडीतून, बसने, मोटारने, विमानाने भारतभर अथक भटकलो. एन.टी.रामाराव, ज्योती बसू, नर्मदा प्राधिकरणाचे प्रमुख, गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय जलमंत्री, जलसचिव, महेंद्रसिंह तिखात, शरद जोशी, सुंदरलाल बहुगुणा आणि जमतील तेवढय़ा बाबा आमटे आणि मेधा पाटकर यांच्या मुलाखती घेतल्या. ग्रंथालयात स्वत:ला कोंडून भरपूर वाचन आणि अभ्यास केला. माझ्या शोधयात्रेवरचे माझे पुस्तक ‘माते नर्मदे’ ‘राजहंस प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आणि मी कार्यकर्त्यांच्या हिटलिस्टवर गेलो. मात्र परिस्थिती अचानक बदलली. पुस्तक दुर्गा भागवतांच्या हातात आले. त्यांनी त्यावर परीक्षण लिहिले. त्यांनी लिहिले, ‘माझा भ्रमनिरास झालाय. आजवर माझी सहानुभूती आंदोलकांकडे होती. आता मी प्रकल्पाच्या बाजूची आहे.’ फोन करून

डॉ. श्रीराम लागूंनी मी ‘कन्व्हर्ट’ झालोय म्हणून कळवले आणि निळू फुलेंनी तर सविस्तर पत्र पाठवून पुस्तकाचे कौतुक करत मी आता प्रकल्पाच्या बाजूने झालोय, म्हणून कळवले. प्रकाशक आणि लेखक यांनी कोणताही प्रयत्न न करता काही महिन्यात या पुस्तकाची हिंदी, इंग्रजी, गुजराती आवृत्ती बाहेर आली. दुसऱ्या कुठल्याच मराठी पुस्तकाबाबत यापूर्वी असे काही घडले नव्हते.

लिहिण्याचा हा सिलसीला अनेक अंगांनी सुरू राहिला. ‘सत्यकथा’, ‘मनोहर’, ‘मौज’ आणि ‘कवितारती’ असा कवितांचा प्रवास सुरू होता. ‘छाया’ हा कवितासंग्रह निघाला. ‘ढगामधून गडगडत’ हे बालगीतांचे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’ने काढले. त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. ‘राजहंस’ने प्रसिद्ध केलेले ‘विज्ञानेश्वरी’ हे पुस्तक भारतीय ज्ञानपीठाने हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये लिहिले. शोधपत्रकारितेवरील ‘बखर राजधानीची’, ‘दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत’ ‘ना डावे, ना उजवे’ ही पुस्तके अनुक्रमे ‘राजहंस’, ‘मनोविकास’ ‘अक्षर प्रकाशन’ने प्रसिद्ध केली.

नानाजी देशमुखांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे पद नाकारले. जनता दलाचे सरचिटणीसपद सोडले. राजकारण संन्यास घेतला आणि गोंडा प्रकल्प सुरू केला. त्याचवेळी केमुर पर्वताच्या दक्षिणेकडे विनोबाजींच्या शंभर ग्रामदानी खेडय़ांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम आकार घेत होता. हे सारे आहे, तरी काय ते पाहावे, म्हणून मी पुन्हा बिनपगारी रजा टाकली. गोंडा प्रकल्प आणि गोविंदपूर आश्रम येथे ठिय्या ठोकून कार्यकर्त्यांचे विचार समजावून घेतले. भोवतालच्या खेडय़ांत हिंडून ग्रामस्थांशी संवाद साधला. नंतर नानाजी आणि गोविंदपूर आश्रमाचे सर्वेसर्वा प्रेमभाई यांच्याबरोबर प्रदीर्घ बैठका केल्या. या शोधयात्रेवर आधारित माझे पुस्तक ‘प्रकाशवाटा’ राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्याला महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार पण मिळाला. मात्र, महत्त्वाचे म्हणजे मी संघपरिवारातला नसताना नानाजी माझे जवळचे मित्र झाले. चित्रकूट प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी प्रदीर्घ चर्चा केली.

सध्या मी विवेकानंदमय आहे. आयुष्यातील हे सर्वात मोठे आनंदपर्व. मी अगदी नकळत विवेकानंदांच्याकडे ओढला गेलो. ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाच्या वेळी मी नानाजी देशमुख आणि गोविंदभाई यांच्या एकत्रित बैठका केल्या होत्या. त्या दोघांनी अस्वस्थ करणारी एक गोष्ट सांगितली होती. ते दोघेही म्हणाले होते, ‘आम्ही हे उपक्रम सुरू केले. या देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी, पण आता जाणवतंय, आपल्याला या देशासमोरचा खरा प्रश्नच समजलेला नाही. काही वेळा वाटते दारिद्रय़ हा प्रश्न आहे. कधी वाटते अज्ञान आणि अंधश्रद्धा हा प्रश्न आहे. मग वाटते जातीयता आणि धर्माधता हे खरे प्रश्न आहेत. पण आता जाणवतंय तसे काही नाही. या देशासमोरचा एकमेव खरा प्रश्न वेगळा आहे. तो आपणाला हुलकावणी देतोय, समजलेला नाही.’ नानाजी आणि प्रेमभाई यांच्या उंचीची आणि तळागाळात काम करण्यात आयुष्य काढलेली माणसे असे काही सांगतात ते अस्वस्थ करणारे होते. नंतर एकदा वाचन करताना, विवेकानंदांचे एक पत्र हातात पडले. पत्राची तारीख २० ऑगस्ट १८९३. म्हणजे विवेकानंदांचे वय तीस वर्षे. सर्वधर्म परिषदेला अजून तीन आठवडे. आमंत्रण नसताना तेथे आलेत म्हणून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. आपण ते आमंत्रण मिळवून परिषद जिंकू हा आत्मविश्वास त्यांच्या मनात आहे, ही गोष्ट वेगळी. पण त्या दिवशी त्या पत्रात ते आपला शिष्य अळसिंगा पेरुमलला लिहितात, ‘मी ठामपणे सांगतोय. माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचे औषध मला समजले आहे.’ विवेकानंद समजावून घेत गेलो आणि लक्षात आले. त्यांची अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत प्रतिमा जनमानसात निर्माण करण्यात आलेली आहे. विसाव्या शतकातील हा सर्वात मोठा दार्शनिक. आपल्या देशासमोरील आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची मांडणी करत आणि त्यांची उत्तरे सांगत हा महानायक उभा आहे. त्यांनी अंधश्रद्धेवर घणाघाती कोरडे ओढलेत. त्यांनी हिंदू धर्मातील रूढी परंपरा यांच्यावर कडवट टीका केली आहे. इस्लामचा गौरव केलाय. मात्र, त्याच वेळी माणसाला माणूस बनवतो तो धर्म आणि एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि एक धर्म नाकारलात तर सारे धर्म नाकारावे लागतील आणि त्याच वेळी कोणताही धर्म न मानणारी पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे असतात, हे ओळखावे लागेल असे सांगितले. जेथे वेद नाही, बायबल नाही आणि कुराणही नाही, अशा जागी आपणाला मानवजातीला घेऊन जायचेय आणि हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय.

भारताचा अभ्युदय करायचा असेल, तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे, तर समन्वय हवा आणि तो कसा करावा हे त्यांनी सांगितले. या देशातील धर्मातरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारांमुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. दलितांच्याबद्दल आपल्या मनात जी कणव आणि सहानुभूती आहे तीच या धर्मातरित बांधवांच्याबाबत हवी, धर्म बदलूनही जात संपलेली नाही, हे त्यांनी सांगितले. मुसलमान द्वेष मनातून काढायचा असेल, तर मुसलमान राजवट वाईट होती, हे आपल्या मनातून काढून टाका, म्हणून सांगितले. त्यांनी सांगितले, ‘कोणतीही राजवट पूर्णपणे वाईट वा पूर्णपणे चांगली नसते. मुसलमान राजवटीचे योगदान हे की गरिबांची व दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपले. मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होते. त्याचा अंशमात्रसुद्धा पुणे आणि लाहोरच्या दरबारात दिसत नाही.’ – त्याच वेळी या देशात समन्वयाची एक प्रक्रिया सुरू झाली आहे. हिंदू धर्म इस्लामकडून व्यवहारातील समता शिकतोय आणि वेदातील उदारमतवादाचा प्रभाव पडून भारतातील इस्लाम सहिष्णू बनलाय. जगभराच्या इस्लामहून तो वेगळा आहे, हे त्यांनी सांगितले.

हे सारेच दर्शन विलक्षण आहे. विवेकानंदांची खरी ओळख करून द्यावी, म्हणून मी ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे पुस्तक लिहिले. ‘मनोविकास प्रकाशना’ने ते प्रसिद्ध केले. त्याची दहावी आवृत्ती आता प्रसिद्ध होते आहे. खरे विवेकानंद समजावेत म्हणून मी सध्या महाराष्ट्रभर फक्त विवेकानंदांच्यावर भाषणे देत हिंडतो. महिन्याला दोन भाषणे. सर्व जिल्हे आणि तालुके पालथे घातलेत- महत्त्वाचे हे की ही भाषणे देतो म्हणून सरकारने मला ‘कमांडो प्रोटेक्शन’ दिलंय!

माझे जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध झाले, ते मित्रांमुळे. आणि ते मला आपोआप मिळत गेले. माझी पुस्तके वाचून माझा पत्ता शोधत दुर्गा भागवतांनी मला पहिले पत्र पाठवले. मग आमचा पत्रांचा सिलसिला सुरू झाला. मी तिला प्रिय दुर्गा म्हणून एकेरीत पत्र लिहायचो आणि ती मला ‘बंडू’ या माझ्या टोपण नावाने. या पत्रमैत्रीवर अंजली कीर्तने यांनी त्यांच्या दोन पुस्तकांत एक एक प्रकरण लिहिलंय. तीच गोष्ट विजय तेंडुलकरांची. माझे ‘बखर राजधानीची’ हे पुस्तक वाचून माझा पत्ता शोधत तेंडुलकरांनी पत्र लिहिले. त्यांनी लिहिले ‘या पुस्तकाने मी हेलावून गेलोय. या पुस्तकाच्या प्रती विकत घेऊन मी वाटणार आहे.’ मग माझी आणि तेंडुलकरांची मैत्री. शंभरएक पत्रे, ‘पत्रातले तेंडुलकर’ हा माझा त्यांच्यावरील लेख ‘बापमाणूस’ म्हणून निखिल वागळेंनी जे पुस्तक काढलंय त्यात आहे. असेच एकदा संध्याकाळी विंदा करंदीकर अचानक घरी आले. बरोबर होते सौ. व श्री. गो.पु.देशपांडे, सौ.व श्री. निशिकांत मिरजकर. विंदांचे कवितावाचन पहाटेपर्यंत सुरू राहिले. त्यांनी त्यांची कोणतीही कविता म्हणण्याच्याआधी मला पाठ असलेली ती कविता मी म्हणून दाखवत होतो. त्यांनी माझ्या कविताप्रेमाला मनापासून दाद दिली. ते मित्र झाले. माझा भविष्यावर अजिबात विश्वास नाही. पण ‘कालनिर्णय’मुळे ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर फार जवळ आले. माझा देव या संकल्पनेवर विश्वास नाही. पण त्यांच्या घरी अनंत चतुर्थीच्या पूजेनंतर जी पंगत बसायची, त्यात पहिले पान त्यांचे, मग माझे, नंतर ओळीने त्यांची तीन मुले जयराज, जयानंद व जयेंद्र. विश्वास बसू नये अशी आणखी एक गोष्ट. मधू लिमये, नानाजी देशमुख, बलराज मधोक. तीन परस्परविरोधी विचारधारा सांगणारे आणि आचरणात आणणारे तीन महानायक. मी या तिघांच्याही फार जवळ गेलो. मनमोकळ्या, खेळकर वैचारिक चर्चा करायला तिघांनीही भरभरून वेळ दिला. मधू लिमये व नानाजी देशमुख यांच्यामधील गोपनीय पत्रव्यवहार पोचवण्याचे काम त्या दोघांनीही मला दिले.

खरंच वाटत नाही. आता आयुष्यात ८० वर्षे ओलांडलीत. हा प्रवास अगदी आनंदमय झालाय. हवे तेव्हा, हवे तसे मजेत, रमत गमत हिंडलोय. फ्रान्समधले (त्यांच्या शब्दांत)आणि पंजाबमधील म्हातारे रात्रीची बैठक संपवून उठताना म्हणतात, ‘जिंदगी दा कल चालू होने वाली है’.. आजवर जे पाहिले, भोगले ते तर सारे आता स्वप्नासारखे आहे. उद्या उठल्यावर नवे कोरे करकरीत चोवीस तास आपल्या हातात असणार. ज्याला चोवीस तास कमी पडतात, तो तरुण, ज्याला चोवीस तास खायला उठतात तो म्हातारा! म्हणजे मी तरुण आहे.

you live only but once, but if you live properly once is enough!.’यावर माझा विश्वास आहे. म्हणजे माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. पण माझा विश्वास नसला आणि तो असला तर तो थोडाच चुकणारे!  आपल्या आकाशगंगेत चाळीस हजार कोटी सूर्य आहेत आणि विश्वात अशा पन्नास हजार कोटी आकाशगंगा आहेत. त्यांचे सूर्य, त्या सूर्याचे ग्रह, नुसती धमाल असणार – संशोधन आणि शोधपत्रकारिता करायला सगळीकडे भरपूर वाव असेलच की!

dabholkard@dataone.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:01 am

Web Title: article about author dattaprasad dabholkar life journey
Next Stories
1 अजून शोध चालूच
2 ‘‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे’’
3 मी शि. द. फडणीस
Just Now!
X