15 August 2020

News Flash

मी शि. द. फडणीस

आमचं एकत्र कुटुंब. माझे काका हेच कुटुंब प्रमुख. भोजेतच ते जमिनीचे काम पाहात होते.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रातील आणि जगभरातील अनेक हास्य चित्रकारांची चित्रं मला प्रेरणा देणारी वाटली. मला ती अतिशय आवडली. मात्र त्यांच्यापैकी कुणाहीसारखं मला व्हायचं नाही, मला

शि. द. फडणीसच व्हायचं आहे, अशी माझी धारणा होती. तुमची शैली म्हणजेच तुमच्या चित्रकलेचा चेहरा. कुणाचंही अनुकरण केलं नाही की तो आपोआप तुम्हाला मिळतो.

‘‘फडणीस, तुम्ही चित्रकलेकडं कसं वळलात.’’ या नेहमीच्या प्रश्नाला आजही माझ्याकडं समर्पक उत्तर नाही. चित्रकलेचा वारसा म्हणाल तर तो घरातही नव्हता. निपाणीजवळ भोज या छोटय़ा खेडेगावात आमचं घर व जमीन होती. आमचं एकत्र कुटुंब. माझे काका हेच कुटुंब प्रमुख. भोजेतच ते जमिनीचे काम पाहात होते. शिक्षणासाठी आम्ही भावंडं कोल्हापुरात राहत होतो. मला चित्रकलेची विलक्षण आवड होती. मॅट्रिक झाल्यावर काकांना मी पत्रातून कळविलं, ‘मला मुंबईला चित्रकलेचंच शिक्षण घ्यायचं आहे. ते जर मिळणार नसेल तर मला कोणत्याच कॉलेजात जायचं नाही.’ भवितव्य अज्ञात असलेला हा टोकाचा निर्णय मी कशाच्या आधारावर घेतला याचं आता नवल वाटतं.

एखाद्या कलेचा ध्यास असणं म्हणजे काय याचा तो अनुभव होता. भावंडांत मी सर्वात लहान. माझे मोठे भाऊ एम.ए. एम.एस्सी. अशा सर्वमान्य मार्गानं कॉलेजमधून शिक्षण घेत होते. माझ्यातला कलावंत समजलेला माझा मोठा भाऊ म्हणजे बापू. भोजेतल्या काकांशी बापूचा काय संवाद झाला हे आजही मला माहीत नाही. मात्र त्याच्याच पुढाकारानं लगेच मुंबईच्या ख्यातनाम अशा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये मी दाखल झालो. जाणत्यांच्या सूचनेनुसार जे.जे.तील कमर्शिअल आर्टच्या विभागात मी कोर्स चालू केला. आजची अप्लाइड आर्ट! चित्रकलेचे शिक्षण लाभावं आणि भाकरीचीही सोय व्हावी ही या विभागाची खासियत. शिक्षण पूर्ण झाल्यावर देशी वा बहुराष्ट्रीय जाहिरात कंपनीतील नोकरी हे अनेकांचं त्यावेळी स्वप्न असे. मलाही तसंच वाटे. शिक्षण चालू असतानाच विविध व्यंगचित्रे पाहाण्यात आली होती. मनोहर, किलरेस्कर, हंस, मोहिनी, वसंत अशा अनेक मराठी मासिकांत माझीही चित्रे प्रकाशित झाली. थोडक्यात, चित्रकलेच्या वाटेवरच हास्यचित्र भेटलं. एक छंद म्हणूनच मी त्याकडे पाहत होतो. नंतर हे सोडून द्यायच्या विचारात असताना ‘हंस प्रकाशन’चे संस्थापक-संपादक अनंत अंतरकर यांचा परिचय झाला. माझ्या व्यंगचित्रांविषयी त्यांना खूपच आस्था होती. मी कुठेही असो; मुंबई, कोल्हापूर तरी तिथे पत्राने पाठपुरावा करायचे. कोणतंही वलय नसलेला मी एक चित्रकार विद्यार्थी. पण माझ्यात एक व्यंगचित्रकार लपलेला आहे हे त्यांना दिसलं. मला नाही. १९५२ मध्ये ‘मोहिनी’साठी बहुरंगी विनोदी मुखपृष्ठ मी चितारलं. दिवाळी अंकावर व्यंगचित्र ही त्यावेळी कुणालाही पटणारी गोष्ट नव्हती. पण माझ्या चित्रावर वाचकांनी पसंतीची मोहोर उमटवली. अनेक प्रकाशक, वृत्तपत्रं, कलासंस्था यांनी या चित्रावर पसंतीचे प्रकाशझोत टाकले. या उत्साहात अंतरकरांनी प्रस्ताव ठेवला, ‘यापुढे ‘मोहिनी’वर दरमहा विनोदी मुखपृष्ठ तुम्ही द्यावं. आम्ही पुण्याला स्थलांतर करतो आहोत. सहकार्य सुकर होण्यासाठी तुम्हीही कोल्हापूरहून पुण्याला या. निदान काही दिवस तरी तात्पुरते या. मग पाहू.’ मी ‘हो’ म्हणालो व तो ‘तात्पुरता’ मुक्काम आजपर्यंत चालू आहे.

मुंबई सोडून मी कोल्हापूरला आलो होतो. एप्रिल १९५३ मध्ये पुण्यात आलो. आल्या आल्याच अनेक प्रकाशकांकडून पुस्तकांच्या मुखपृष्ठांची कामं मला मिळत गेली. जाहिरात क्षेत्रातील व कंपन्यांची कामेही चालू झाली. १९५२ चं ‘मोहिनी’वरचं मुखपृष्ठ दिशा देणारं ठरलं होतं. नंतर माझी बहुरंगी विनोदी मुखपृष्ठ खूपच लोकप्रिय झाली. मुखपृष्ठ चित्रांची वाढती मागणी पुरी करणं मला शक्य झालं नाही. त्यामुळे असं झालं की, साधारण १९६०-६२ च्या सुमारास काही भुरटय़ा प्रकाशकांनी माझ्या प्रकाशित चित्रांचे ठसे (ब्लॉक्स) अवैध मार्गाने मिळवले आणि मुखपृष्ठं छापलीसुद्धा. त्यावेळी चित्रांच्या कॉपीराईटचे हक्क म्हणजे काय इत्यादी माहिती मला तज्ज्ञांकडून मिळवावी लागली. साहित्य, संगीत, चित्र इत्यादी सर्व कलांना कॉपीराईटच्या कायद्यानं समांतर संरक्षण आहे व याला जागतिक मान्यता आहे. मी नवीन काहीच केलं नाही. फक्त त्याचा पाठपुरावा केला. प्रथम थोडा मनस्ताप झाला. पण नंतर ही हक्काची जाणीव सर्वच संपादक, प्रकाशक आणि या क्षेत्रामध्ये स्वीकारली गेली. अनेक चित्रकारांना आज त्याचा लाभ होतोय. ते तसं माझ्यापाशी बोलूनही दाखवतात.

अजून एक काम माझ्या हातून झालं. ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनामुळे दुसरा एक प्रश्न समोर आला. ‘करमणूक कर’. संगीत, नाटक, तमाशा इत्यादी अनेक प्रकारांना ‘करमणूक कर’ माफ होता. पण चित्रप्रदर्शनांना नव्हता. हा अन्याय आणि त्रुटी दूर करण्यासाठी अनेक मान्यवर, कलासंस्था, यांच्याशी मी संपर्क साधला. पत्रे-भेटी झाल्या. १९६६ ते ७२ ही सहा वर्षे मी शासनाकडे याचा पाठपुरावा केला. अखेर असा कर माफ केल्याचे मला शासनाकडून पत्र आले. ते माझ्या संग्रही आहे. २९ जुलै २०१८ ला मी वयाची त्र्याण्णव वर्षे पूर्ण केली. माझ्या कार्यक्षेत्राचे टप्पे, वळणं पाहिली तर असं वाटतं की ‘चित्रकला’ हीच एक वाट मी निर्धारानं आणि प्रेमानं निवडली. जसे प्रश्न समोर आले, तशी त्यांची उत्तरं शोधत पुढे चाललो. प्रत्येक टप्प्यावर माझ्यातल्या चित्रकलेला मी जपायचो.

चित्रकलेतून मी हास्यचित्राकडे वळलो. प्रथम मी ही वाट गांभीर्याने घेतलीच नाही. मनोरंजनाच्या पलीकडे यात काय असणार? एक चित्रकार म्हणून सृजनात्मक कामाचं असं कोणतं आव्हान इथे असणार? हास्यचित्र या माध्यमात मी विविध प्रकार हाताळू लागलो तेव्हा उमजलं की हे प्रकरण दिसतं तेवढं बाळबोध आणि उथळ नाही. त्याच्या खोलीचा अंतच लागत नाही. प्रथम आणि आजही मला विचारलं जातं की मी व्यंगचित्राचं शिक्षण कुणाकडून घेतलं? कोणत्या कला महाविद्यालयात? अशा शिक्षणाची अद्याप तरी कोणत्याही कला महाविद्यालयात सोय नाही. माझ्या ‘फडणीस गॅलरी’ या पुस्तकाच्या प्रारंभी एक चित्र आहे. नारळीच्या झाडाची शिडी करून एक युवक वर चढतो आहे. स्वयं शिक्षणातून आपली शिडी आपण बनवायची आणि वर चढायचं. महाराष्ट्रातील आणि जगभरातील अनेक हास्य चित्रकारांची चित्रं मला प्रेरणा देणारी वाटली. मला ती अतिशय आवडली. मात्र त्यांच्यापैकी कुणाहीसारखं मला व्हायचं नाही, मला शि. द. फडणीसच व्हायचं आहे, अशी माझी धारणा होती. तुमची शैली म्हणजेच तुमच्या चित्रकलेचा चेहरा. कुणाचंही अनुकरण केलं नाही की तो आपोआप तुम्हाला मिळतो.

उत्तम व्यंगचित्रकार होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे. तुमच्या भोवतालच्या जगाचं निरीक्षण, विनोदबुद्धी आणि चित्रकलेची भाषा. व्यंगचित्रकार होण्यासाठी प्रथम चित्रकलेचं शिक्षण हवं. व्यंगचित्र ही एक भाषा आहे. ती भाषा तुम्हाला शिकता आली की व्यंगचित्रांच्या अनेक वाटा, प्रकार, तुम्ही हाताळू शकता. अनेक प्रकार मी हाताळले. निखळ आनंद देणारी हास्यचित्रं आणि शब्दविरहित चित्रं, भाषा आणि देश यांच्या सीमा सहज ओलांडतात. याची प्रचीती अनेकदा मला आली. पुस्तकं, प्रदर्शनं इत्यादी माध्यमांतून माझी अनेक चित्रं भारतात आणि परदेशात प्रसिद्ध झाली.

सगळीकडचा प्रतिसाद विलक्षण आनंद देणारा होता. कॅनडा, जर्मनीमध्येही चित्रं प्रकाशित झाली. १९९७ मध्ये एक परदेश प्रवास झाला. न्यूयॉर्क, लंडनसह सात शहरात आमचे चित्रहास (डेमो आणि स्लाईड शो) आणि प्रदर्शनाचे कार्यक्रम झाले. वेगळा अनुभव म्हणून मी राजकीय टीका चित्रंही केली. काही दैनिक, तसंच ‘माणूस’, ‘सोबत’ या साप्ताहिकांतून ती प्रकाशित झाली. हे क्षेत्रही महत्त्वाचं आणि आव्हानात्मक आहे. पण मला स्वत:ला त्यात रस वाटला नाही. तिथं चित्रकारापेक्षा पत्रकार व्हावं लागतं. म्हणून ही वाट मी सोडून दिली.

तिसरा प्रकार-संवाद साधणारी, शैक्षणिक बोधचित्रे. व्यंगचित्राची आणखी एक क्षमता इथे लक्षात आली. क्लिष्ट विषय सोपा करणं, रंजक करणं, अमूर्त संकल्पनांचं आकलन चित्ररूपातून देता येणं, प्रत्यक्षात याचं रेखाटन, त्यांचे दृष्टान्त चित्रातून शोधणं मोठं आव्हानात्मक असे. याच प्रकारातून अनेक गंभीर विषयाचे लेख आणि पुस्तकं मी सचित्र केली. बँक, फार्मा इंडस्ट्री, कारखाने यांचे प्रचार साहित्य, तसेच आरोग्य, व्यवस्थापन, कायदा, तत्त्वज्ञान असे सर्व विषय मी हास्यचित्रातून मांडले. गणित, विशेषत: मुलांसाठी सचित्र गणित या कामामध्ये तर मी खूपच गुंतलो होतो.

१९७६ च्या सुमारास महाराष्ट्र शासनाच्या पाठय़पुस्तक मंडळाकडून एक प्रस्ताव आला होता. त्यानुसार इयत्ता पहिली ते चौथी या प्राथमिक शाळेतील मुलांसाठी गणिताची पुस्तकं सचित्र करायचा. गणितज्ज्ञ प्रा. मनोहर राईलकर त्या वेळी गणित समितीत होते. त्यांच्याच सूचनेवरून हे काम माझ्याकडे आलं. इयत्ता पहिलीचं पुस्तक सर्वात महत्त्वाचं. गणिताच्या अमूर्त संकल्पना त्या निरक्षर वयातल्या मुलांपर्यंत पोचवायच्या होत्या. १९७६ ते ९७ या काळात आवृत्तीनुसार तीन गणित समित्या झाल्या. या सर्वाबरोबर काम करताना शिक्षक, पालक, विद्यार्थी, गणित समिती, सल्लागार मंडळे व शासकीय यंत्रणा. अशा सर्वानी माझी ‘परीक्षा’ घेतली. इयत्ता पहिलीच्या ‘परीक्षा’ तीनदा दिल्या आणि उत्तीर्णही झालो. आठ भाषेत सर्व स्तरांतील लाखो मुलांपर्यंत माझी गणितावरची सचित्र पुस्तके पोचली. तुलनेनं हे काम काहींना मौलिक व महत्त्वाचं वाटतं. वरील शैक्षणिक स्वरूपातील माझं काम त्या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोचतं. बहुतेक रसिक वाचकांना माझी ललित साहित्यातील चित्रं माहीत आहेत. विशेषत: विनोदी साहित्य. कोल्हटकर, गडकरी, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, द.मा.मिरासदार, दिलीप प्रभावळकर इत्यादी अनेकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे- सुमारे पाचशे, तसेच इतर चाळीस एक पुस्तके संपूर्ण सचित्र केलेली आहेत. पु. भा. भावे, महादेवशास्त्री जोशी यांसारख्या गंभीर विषयातील लेखकांचे साहित्यही सचित्र केले. सावरकरांचे ‘काळे पाणी’ त्यापैकीच!

चित्रांचं साहित्यात स्थान काय? तसंच व्यंगचित्राचं चित्रकलेत स्थान काय? याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा, संभ्रम आणि अपसमज आहेत. तुलनेनं अलीकडची पिढी अधिक जिज्ञासू आणि समजदार आहे. हास्यचित्राविषयी पूर्वी गमतीनं म्हणायचे, ‘व्यंगचित्र’? ‘एकदम सोप्पं! सरळ चित्र काढायला सुरुवात करा. जमलं तर चित्र, नाही जमलं तर व्यंगचित्र नक्कीच होणार.’ हा विनोद सोडून द्या. पण त्यातील सृजनाचा भाग महत्त्वाचा असतो हे अनेकांना माहीत नसतं. कष्ट हाताला पडतात म्हणजे कारागिरी क्राफ्ट एवढंच नसतं. स्वतंत्र हास्यचित्र हे पेंटिंग, साहित्य, कविता या अंगाने प्रवास करतं. बीजरूपानं विषय सुचला- अंतर्मनाला दिसला की अनेक पर्याय सुचत जातात. अबोध मनातले हे पर्याय मग स्केच बुकात उतरतात आणि कल्पना आकार घेते. हे सर्व कसं घडतं? याचा काही फॉम्र्युला? कोणत्याही कलेबाबत सांगत येत नाही. म्हणून तर तो शोध घ्यायचा असतो.

जेव्हा कल्पना सुचते त्यावेळी तिला फक्त अस्तित्व असतं. स्वत:ला प्रकटण्यासाठी ती भाषा निवडते. ती भाषा असेल शब्द, चित्र, सूर, शिल्प, नृत्य इत्यादी. शब्दशक्तीचं महत्त्व आहेच. सर्व क्षेत्रांशी संवाद हे त्यांचं सर्वमान्य बलस्थान. शब्दाच्या सर्व तरल छटा ओळखून जेव्हा एखादा माणूस कलात्मक पातळीवर लिहितो, तेव्हा तो लेखक झालेलाच असतो. कवीही झालेला असतो. माणसाचा प्रत्येक अनुभव शब्दातून मांडता येणार नाही. शब्द संवादालाही मर्यादा आहे. साहित्य हे संस्कृतीचा एक भाग आहे. फारच थोडय़ा लेखकांना ललितकलांचं भान असतं.

सर्व ललित कलांमधूनच पूर्ण संस्कृतीचं दर्शन होतं. ललित कलांचं नातं मोठं मोहक आहे. आनंददायी आहे. शब्द थांबतात तेव्हा चित्र पुढं येतं. चित्राला अवकाश हवा वाटतो तेव्हा ते थ्रीडीमध्ये जातं व शिल्प होतं. शिल्पात चैतन्य येतं तेव्हा नृत्याचं गतिमान आकार फिरत राहतात. ते ताल व सूर शोधतात. संगीतानं मन भरून जातं. हे सर्व जेव्हा मिळतं तेव्हा सकल संस्कृतीचं चित्र पूर्ण होतं.

कोणतीही व्यक्ती संपूर्ण निर्दोष, आदर्श अशी दैवी गुणसंपन्न आढळणं अशक्यच. कुठे तरी आचारविचारातील त्रुटी, विसंगती आढळते. हेच व्यंगचित्रांचे विषय ठरतात. मग ते राजकीय असो अगर निखळ आनंद देणारे. जेव्हा जेव्हा माणूस तारतम्यापासून दूर जातो, तेव्हा हास्यचित्र त्यावर प्रकाश टाकतं. हास्यचित्राचं नातं शहाणपणाशी आहे. विद्वत्तेशी नाही. हास्यचित्रं ही उपयोजित कला आहे. लोककला आहे. लोकांशी संवाद हे त्याचं प्रमुख प्रयोजन आहे. उपयोजित कला आणि स्वानंद सुखाय जन्माला येणारी पेंटिंग्ज यांचं स्वरूप इथंच वेगळं होतं. चित्रकार दीनानाथ दलाल, राजा रवि वर्मा यांची कला लोकांशी संवाद करते. अमूर्त चित्रे, वास्तववादी चित्रे अशा विभागून टाकणाऱ्या सीमारेषाही अनेकदा मिसळलेल्या दिसतील. चित्रकार धुरंधर, बेंद्रे, हुसेन आणि पिकासोनेसुद्धा अनेकदा उपयोजित चित्रकला पेश केली आहे. सामान्य रसिकांना विविध चित्रप्रकारांची ओळख करून देणारी ही चित्रे म्हणजे रसिक आणि कलावंतांना जोडणारे सेतू आहेत. इतर कलांबाबतसुद्धा तुम्हाला हे अनुभवता येतं. बालगंधर्व आणि लता मंगेशकर यांच्या उपयोजित संगीतामुळेच तर लाखो रसिकांच्या घराघरात संगीत पोचलं. कला आणि त्यातले पंथ, वाटा कितीही असल्या तरी अभिजात आणि अस्सल कलात्मक गुण कुठं आहे, याचं भान सामान्य रसिकांनाही असतं आणि तिथंच भरभरून दाद मिळते.

राजकीय टीका चित्रांपासून मी दूर आहे. तरीही माझी काही मुखपृष्ठे वादाचा विषय झाली आहेत. कुणाला तरी बोचणारी झाली. राजकीय आणि सामाजिक टीकाचित्रांनी तर अलीकडे अनेकदा आंदोलनाचं रूप घेतलं आहे. शब्दापेक्षा चित्रातली टीका अधिक प्रखर आणि वेगवान असेल काय? व्यंगचित्र ही लोकशाहीची भाषा आहे. त्यातला आशय खिलाडूवृत्तीनं कसा स्वीकारावा अशा निकोप विचारांच्या शिक्षणाची गरज नव्यानं उद्भवली आहे. अर्थात, खऱ्या अर्थाने विचारी, समंजस माणसं त्याच्यावरील टीकासुद्धा उमदेपणानं घेतात.

‘हसरी गॅलरी’ या माझ्या चित्र प्रदर्शनाचा जन्म सहज अनुभवातून झाला. माझ्या बहुरंगी मुखपृष्ठाच्या प्रकाशित चित्रांच्या कात्रणांचा अल्बम माझ्या स्टुडिओत ठेवलेला असे. माझे उद्योजक मित्र- अ‍ॅसमेक होजियरीचे रत्नाकर असगेकर. त्यांच्याबरोबर त्यांची मित्रमंडळी स्टुडिओत आली की हा अल्बम घेऊन यथेच्छ हसत असत. मग असगेकरांनीच प्रस्ताव ठेवला, ‘फडणीस, ही चित्रे प्रकाशित झाली तरी ती संपत नाहीत. पुन्हा पुन्हा पाहण्याचा आनंदही संपत नाही. मूळ चित्राचं आपण प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईत भरवायचं. तयारीला लागा. बाकीचं मी पाहतो.’ फेब्रुवारी १९६५ मध्ये त्या गॅलरीत तीनच दिवस प्रदर्शन भरलं. मला कशाचाच भरवसा नव्हता. माझ्या अंदाजाला धक्का देत रसिकांनी तिन्ही दिवस तुडुंब गर्दीत त्याचा आस्वाद घेतला.

सर्व वृत्तपत्रे, आकाशवाणी यांनीही तेवढय़ाच उत्साहानं स्वागत केलं. मग प्रदर्शनाची यात्राच सुरू झाली. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे, दिल्ली, बंगळूरु इत्यादी शहरांत आम्ही पोचलो. जिथं प्रदर्शन नेणं सोयीचं नव्हतं, तिथं चित्रांच्या स्लाइड्स आणि प्रात्यक्षिके यातून मी चित्रे सादर केली. प्रकाश, गती, ध्वनि- थ्रीडी अशी नवी माध्यमे शोधली. डेमोसाठी घडीचा बोर्ड, स्पंज ब्रश. हॉलचे रूपांतर आर्ट गॅलरीत करण्यासाठी पोर्टेबल पार्टिशनचा सेट हे सर्व उभारण्यासाठी जरूर ते तंत्रज्ञान मला वापरावे लागले. थोडक्यात- कुंचला, लेखणी आणि स्क्रू ड्रायव्हर ही हत्यारे मी त्यावेळी आणि नंतरही बाळगून असे. चित्र प्रदर्शनात पाच क्विंटल सामग्री असलेली ही ‘हसरी गॅलरी’ची सर्कस देशात अनेक ठिकाणी नेली. त्यातली दगदग, आनंद, यश भरपूर मिळवलं. मात्र एक दौरा आम्हाला सोडून द्यावा लागला. मध्य प्रदेशातील इंदूर, ग्वाल्हेर आणि भोपाळ या तीन शहरांचा प्रदर्शन दौरा. तयारी सुरू झाली. इंदूर, ग्वाल्हेरची कलादालने आरक्षित केली. भोपाळबाबत विचार चालू होता. तेथील भारतभवन या संस्थेच्या आम्ही संपर्कात होतो. तेथील कला व सांस्कृतिक क्षेत्रातील एका मान्यवर व्यक्तीची भेट झाली तर काम सुकर होणार होतं. पण त्यावेळी ती व्यक्ती परगावी होती. ‘एक दिवस थांबा व त्यांना भेटा’ असा त्या संस्थेचा सल्ला होता. मी व शकुंतला त्यावेळी ग्वाल्हेरला डॉ. शरद आपटे यांच्याकडे होतो. भोपाळ प्रदर्शनाचा विचार डोक्यात घोळत असतानाच मी शकुनला म्हणालो, ‘हे भोपाळ प्रदर्शन नकोच.’ असं त्यावेळी का वाटलं याचं उत्तर आजही माझ्याकडे नाही. मग आमचा ग्वाल्हेर ते पुणे व्हाया भोपाळ असा परतीचा रेल्वे प्रवास सुरू झाला. सकाळी जळगाव स्टेशन आलं. स्टेशनवरच्या सर्व वृत्तपत्रांतून पहिल्या पानावर जाड टाइपात भोपाळ वायू दुर्घटनेची बातमी. विषारी वायूच्या स्फोटानं झालेला नरसंहार व हाहाकाराचा वृत्तान्त. रात्री आमची ट्रेन दुर्घटनेच्या सुमारास भोपाळ स्टेशनवरूनच पुढे गेली होती. आम्ही पुण्यास पोचलो. त्या विषारी वायूचा अंशत: परिणाम आम्हावर झाला. आजाराचं स्वरूपही वेगळंच होतं. नाइलाजाने त्या अस्वस्थ अवस्थेत आम्ही इंदूर व ग्वाल्हेरची प्रदर्शने रद्द केली. स्फोटापूर्वीच ‘भोपाळ नको’ हा अंतर्मनातला निर्णय त्यावेळी कुणी दिला? कोण तो आमचा अज्ञात हितचिंतक? डिसेंबर १९८४ मधला हा अनुभव. पण ती प्रश्नचिन्हे आजही तशीच आहेत.

‘हसरी गॅलरी’ या आमच्या प्रदर्शनात अभिप्रायासह काही सूचनाही असायच्या. त्यापैकीच एक. ‘आम्हाला हे प्रदर्शन खूपच आवडले. ते घरी घेऊन जायची सोय करा. यातील चित्रांचा संग्रह पुस्तकरूपाने काढावा इ.’

त्यामुळे पुस्तकांची योजना पुढे आली. १९६९ मध्ये ‘हसरी गॅलरी’ प्रकाशित झाली. नंतर ‘मिस्किल गॅलरी’. मुलांसाठी ‘पेंटिंग फॉर चिल्ड्रेन’, ‘रेषाटन’ हे आत्मवृत्त. अनेकांच्या सूचनांनुसार देशातील इतर प्रांतात व परदेशात ही चित्रे पोचावी म्हणून ‘फडणीस गॅलरी’ हा संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित झाला. हे पुस्तक इंग्रजीत. मोठा आकार- बहुरंगी- डीलक्स स्वरूपात ज्योत्स्ना प्रकाशननं प्रकाशित केला आहे. आता आवृत्ती संपलीय. पण नवीन आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

माझ्या इतर पुस्तकांच्याही अनेक आवृत्त्यांच्या प्रकाशनामुळे वाचकांचा प्रतिसाद, अभिप्राय पोचलाय. सार्वजनिक कला संस्थांतर्फे महाराष्ट्र व देशात अनेक पुरस्कारांनी माझ्या चित्रांचा गौरव मी अनुभवला. पैकी तीन पुरस्कार महाराष्ट्राबाहेरून मिळाले. त्याचे मोल वेगळेच आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्ट्सतर्फे भारतीय स्तरावरील व्यंगचित्रकलेतील योगदानाबद्दल जून २००१ मध्ये बंगळूरु येथे, ‘कार्टून वॉच’ मासिक, रायपूरतर्फे जीवन गौरव पुरस्कार वर्ष २०१४ व अलीकडेच- कॉमिक्स- ओ-ग्राफिक्स प्रकाशनातर्फे पुरस्कार- कोलकाता- एप्रिल २०१६ मध्ये. याच दिवशी कार्टूनिस्ट्स कंबाईनतर्फेही मला पुरस्कार दिला तो मुंबईमध्ये.

चित्रहास (स्लाइड शो), प्रदर्शने हे उपक्रम असले की हे सर्व माझे एकटय़ाचे नसते. माझ्या सर्व परिवाराचा तो कार्यक्रम असतो. पत्नी शकुंतला, मुली- लीना, रूपा, जावई- अनिल, विकास, नातवंडे, मित्र, रसिक असा सारा गोतावळा त्यात अडकलेला असतो. अलीकडे मी म्हणतो, पुष्कळ प्रदर्शनं झाली. पुरे आता. मात्र मुलींचा उत्साह व हट्टही असा असतो की त्या प्रदर्शन ठरवतात आणि यशस्वीही करतात. लीना तर माझ्या चित्रांची पहिली समीक्षक असते. धाकटी मुलगी रूपा देवधर चित्रकार आहे.

नातू चिन्मयने तर माझं एक चित्र अ‍ॅनिमेशन फॉर्ममध्ये आणलंय. रूपाचा, कॉम्प्युटर ग्राफिक्स ई-मेल अशा माध्यमातून माझ्या कामात सहभाग असतो. मी व माझी चित्रं या अत्याधुनिक माध्यमांतून सर्वदूर पोचवण्याचा या सर्वाचा प्रयत्न असतो. त्यामुळेच माझ्या सर्व कामांचं स्कॅनिंग व डिजिटायझेशन झालं आहे. मीही कॉम्प्युटरमध्ये थोडा फार साक्षर झालो आहे.

या माझ्या उपक्रमात पत्नी- शकुंतलाचा सहभाग किती असावा? एका प्रकाशकांना तर तो एका पुस्तकाचा ऐवज वाटला व त्यांनी- सुरेश एजन्सीनं ‘मी आणि हसरी गॅलरी’ हे तिचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. स्वत:च्या लेखन गुणावर लेखिका ‘शकुंतला फडणीस’ ही स्वतंत्र ओळख तिनं निर्माण केलीय. माझ्या दृष्टीनं तिची ओळख आणखी वेगळी. माझं खाणं-पिणं, काम, विश्रांती, व्यक्तिगत सुविधा पाहणारी, सार्वजनिक उपक्रमात- प्रदर्शने, स्लाईड शो, पत्रकार परिषद, संवादाची गरज असेल त्यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजीतून सतत संपर्क ठेवणारी ती अनेक भूमिकेत वावरते. थोडक्यात, त्यावेळी ती पु.लं.ची ‘नारायण’ असते. म्हणून तर माझं स्वास्थ्य व यश माझ्याबरोबर आहे.

sd_phadnis@yahoo.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2018 12:45 am

Web Title: article about cartoons artist shi d phadnis
Next Stories
1 डॉक्टरकी नव्हेच व्रत!
2 जगण्याची लढाई
3 आणि ‘विज्ञान लेखक’ झालो..
Just Now!
X