ना. धों. महानोर

लोकगीताची, लोकसंस्कृतीची लय जी कवितेत उतरली ती वेगळी, नवी वाटल्यामुळं असेल कदाचित. माझं महाराष्ट्रभर कौतुक झालं. तीनही पिढय़ांमधले लेखक, कवी, कलावंत माझ्याशी स्नेहभावानं जोडले गेले. त्यांनी खूप प्रेम दिलं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. मी जगलो, तेच लिहीत गेलो.. पण अनेक क्षेत्रांत चांगलं थोडं, पण नको तेवढं प्रदूषण – झटपट मोठं होण्याचे संपत्तीचे व खुर्चीचे मार्ग व विचारांची घसरण, यामुळे मी खूप अस्वस्थ होऊन, सुन्न होऊन शून्यात जातो..

16th April Panchang rashi bhavishya these zodiac signs Wishes will be fulfilled Aries to Min signs Daily marathi horoscope
१६ एप्रिल पंचांग: इच्छा होतील पूर्ण, हातात येतील नवीन अधिकार; वाचा मेष ते मीन राशींचा कसा असेल मंगळवार ?
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
Surya Grahan 2024
गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीआधी ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात सोन्यासारखं चमकू शकतं भाग्य
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

पळसखेडे. औरंगाबाद जिल्ह्य़ातलं- मराठवाडय़ातलं जळगाव जिल्ह्य़ातल्या सरहद्दीवरलं एकशेदहा किलोमीटर जिल्ह्य़ापासून लांब असलेलं लहानसं खेडं. पळसखेडला १६ सप्टेंबर १९४२ ला माझा जन्म झाला. त्या वेळी गावाची लोकसंख्या जवळपास सातशे होती. दूरस्थ खेडं.  कुठल्याही सुखसोयीपासून तुटलेलं. शाळा नसलेलं हे लहान खेडं. अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पाच किलोमीटर अंतरावर! परिसर सगळा लहान दगड-टेकडय़ांचा. हलकी बरड जमीन. बंजारा, भिल्लं, मुस्लीम, महादेव कोळी, मेवाती अशा अनेक लहान-लहान जाती-जमातींतला आदिवासी तांडय़ांचा-खेडय़ांचा परिसर!

आई-वडील अशिक्षित. (धाकटी आई, थोरली आई) जमीनदारांकडे शेतीत मजुरी करणारे, नंतर पाच एकर जमीन विकत घेतली. आई-बाबा मजुराचे शेतकरी झाले. पळसखेडला एका धाबलीच्या लहानशा खोलीत पहिली ते चौथी शिकलो. तीस-पस्तीस विद्यार्थी. दोन शिक्षक. मी चौथी पास झाल्याचं मास्तरांनी घरी सांगितलं. थोडय़ा अंतरावरच्या शेंदुर्णी या गावी शिकायला पाठविलं. गुरुजींकडे कुठे-कुठे कसं तरी राहाणं- शिकणं- ते बालपण याबाबत आता  सारं सांगणं कठीण. अकरावीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. जळगावला महाविद्यालयात एक वर्ष काढलं, फारच सुंदर! पैसे नाहीत. दुष्काळ-नापिकी आणि कौटुंबिक नको तेवढी गुंतागुंत. मी दुसऱ्या वर्षी महाविद्यालय सोडून पुन्हा पळसखेडच्या शेतीत आलो, वय वर्षे अठरा. आई-बाबांसोबत प्रचंड कष्ट करीत गेलो. कितीही वाईट दिवस-परिस्थिती असली तरी पुस्तकांचं गाठोडं, छंद यांची जिवापाड जपणूक केली. आजही पंचवीसशे लोकवस्तीच्या खेडय़ात आनंदानं तिथेच आहे.

अजिंठा डोंगराच्या वरच्या परिसरात अन्वी या लहानशा खेडय़ात दादासाहेब माणिकराव अन्वीकर, कुमार असे प्रतिभावंत शेतकरी भेटले. त्यांचं चकित व्हावं असं कर्तृत्व बघायला मुख्यमंत्री, दिल्लीतले मंत्री, कृषी विद्यापीठातील अनेक अभ्यासक तिथे नेहमी येत असत. या पहिल्या हरितक्रांतीचे ते एक सक्षम शेतकरी शिलेदार होते. कविता व शेतीचं प्रेम या दोन्ही मुळे दादांशी स्नेह अधिक वाढला. दादांनी विहीर पाणी-स्प्रिंकलर, हायब्रीड बियाणं, फळबागा व शेतीशास्त्र प्रत्यक्ष माझ्या खेडय़ात, घरी येऊन शिकवलं. अख्खं गाव व जवळपासची खेडी यांच्याही शेतीत हे करावं म्हणून धडपड केली. ती फलद्रूप झाली.

१९७८ – ८४ मला महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपालनियुक्त आमदार म्हणून घेतलं गेलं. त्यावेळी शरदराव पवार मुख्यमंत्री होते. अतिशय जाणत्या, अनेक क्षेत्रांतल्या जाणकार आमदारांची, मंत्र्यांची भाषणं व कार्य पाहून मी भारावून गेलो. ते सगळं आत्मसात करीत गेलो. खूप मोठी अभ्यासू- प्रेम करणारी राजकारण, समाजकारणातली मंडळी भेटली. मीही प्रत्यक्ष भाग घेऊ लागलो. राज्यकर्त्यांच्या सहकार्यानं ‘पाणी अडवा, जिरवा’ – जलसंधारण पाणी व्यवस्थापन, फळबागा ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान हे सगळं अर्धा तास, एक तास चर्चा, ठराव या आयुधांनी मी सभागृहात मांडलं. ते पारित झालं. शासनमान्यता मिळवून हा शेतीचा नवा फलदायी विचार मी महाराष्ट्रभर जिल्ह्य़ात, तालुक्यात जाऊन रुजवीत गेलो. हजारो शेतकऱ्यांचे हात हाती आले आणि आशीर्वादसुद्धा मिळाले. आधी स्वत: केलं तरच विश्वास बसणार म्हणून १९ जुलै १९८४ ला चर्चा ठराव विधान परिषदेत मांडल्यावर  पळसखेडात प्रत्यक्ष काम करण्याची शासनाची परवानगी मिळाली. गावच्या तीन हजार एकरांत जमीन सपाटीकरण, मृदसंधारण, तीन साठवण तलाव, तीन नाल्यांवर शिवारभर पंचवीस सिमेंटचे बांध (पाणी अडवा, जिरवा), पंचवीस मातीचे दगडांचे बांध. एकशे पंचवीस एकर गायरान जमिनीवर सामाजिक वनीकरणाची वनश्री. ठिबक सिंचन, शेततळी, नदीकिनारी बांबू, कडुनिंब; कोरडवाहू फळबागा उभ्या केल्या. शासनाच्या सगळ्या योजना अनुदानित किंवा त्याशिवायही गावात उभ्या केल्या. कोरडवाहू संकरित पिकांची निवड नियोजन करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेताहेत. ऐंशी विहिरी होत्या त्या ठिकाणी विहिरी, कूपनलिका मिळून आता पाचशे आहेत. आजही मार्च-एप्रिलपर्यंत पाणी पुरतं, यापेक्षा काय हवं?

१९९०-९५ ला पुन्हा विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलो. या योजना पुन्हा भक्कम केल्या. नव्या योजना शेती-पाणी यासाठी उभ्या केल्या. शरदराव पवार यांच्यामुळे दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यात मी प्रत्येकी पाच दिवस शेती अभ्यासाला गेलो होतो. तिथलं व उत्तरेतलं चांगलं जे घेता येईल ते घेऊन महाराष्ट्र शासनाला दिलं. आमचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांनी त्यांच्या परीनं ते स्वीकारलं. महाराष्ट्रात निसर्गानं जागा निर्माण करून दिल्या, तिथेच मोठी धरणं व्हावीत, त्याची गरज होती,परंतु ती वेळेत पूर्ण न झाल्याने पन्नास टक्के आजही अर्धवट अवस्थेत पडून आहेत. जी झाली त्यातही पाण्यापेक्षा गाळच  भरून आहे. वारंवार येणाऱ्या तीव्र दुष्काळाची होरपळ, बिकट पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आदी ‘पाणी’संबंधातल्या सर्व  योजना केंद्र आणि राज्याचा मोठा निधी  घेऊन त्याचं कालबद्ध नियोजन ऐरणीवर आणून केलं तरच महाराष्ट्रातला  शेतकरी जिवंत राहू शकेल.

हे काम जिथे झालं ते अनुभवच मी सांगतो आहे. पळसखेडला शेती-पाणी हेच महत्त्वाचं झालं. अत्यंत कमी खर्चात, शासन योजनांमधूनच नियोजनबद्धरित्या केल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आज येथील जवळपास पंधराशे एकर जमीन दुबार पिकं, फळझाडांची आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग व माझ्यावरचा विश्वास फक्त खरा. मी नाममात्र!

माझी कविता, चित्रपटगीतं, कथा, कादंबरी, ललित लेखनासंबंधी गेल्या पन्नास वर्षांत मी अनेकदा बोललो-लिहिलेलं आहे. माझी कविता व एकूण मराठी कवितेसंबंधी मी खूप व्यासपीठीय कार्यक्रम सर्वत्र केले. त्यासंबंधी इथे लिहिणं पुन:पुन्हा होईल म्हणून त्यासंबंधी कमी लिहितोय.. लेखक-कवी-रसिक यांना ते माहीत आहे. साहित्यापेक्षा माझं पहिलं प्रेम शेती आहे. त्यानंतर साहित्य! माझ्याबरोबरच इतरांचं साहित्यही तेवढंच महत्त्वाचं मी मानतो. मात्र अनेक क्षेत्रांत चांगलं थोडं, पण नको तेवढं प्रदूषण – झटपट मोठं होण्याचे, संपत्तीचे व खुर्चीचे मार्ग व विचारांची घसरण, या सर्वामुळे मी खूप अस्वस्थ होऊन, सुन्न होऊन शून्यात जातो; पण त्यासाठी बोलायलाच हवं, लिहायलाच हवं म्हणून स्पष्ट लिहितो-बोलतो.. ‘विधिमंडळातून’ व ‘या शेताने लळा लाविला’ ही माझी पुस्तकं जरूर वाचावी, अशी विनंती.

आज मनाला ओरबाडून टाकणारं, मला खूपच त्रासदायक ठरणारं असं खूप काही आहे. कृषीप्रधान देशात- वेगवेगळ्या राज्यांतली शेती मोडली जात असेल तर त्यावर नक्कीच पक्के उपाय आहेत. जलयुक्त अभियान हे त्यातलं मुख्य. शासनानं ते हाती घेतलं. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही उपाय नवे सुचविले. दोन वर्षे चांगलं चाललेलं काम अलीकडे खूप खंडित झालं, मंद झालं आणि चुकीच्या गोष्टींमध्ये ते बरबटलं. तरी नाना पाटेकर, मकरंद अनारसपुरे, आमिर खान, सत्यजीत भटकळ, सयाजी शिंदे, त्यांचे मित्र, शांतीलाल मुथा व इतर संस्था यात मन:पूर्वक व अथक काम करताहेत.

शेतमालाला भाव दुप्पट करतो- असं शासन म्हणतं. प्रत्यक्षात शासन यंत्रणा व व्यापारी त्यापेक्षा फारच कमी कृषिमूल्य देतात. सगळ्यात मोठी ही फरफट आहे. २०२२ पर्यंत शेतीचं, देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, हा विनोद वाचून तर मी थक्क झालो. ज्याला हा खंडप्राय देश-भूगोल, बदलता निसर्ग माहीत आहे ते हे ऐकून हसतात, सुन्न होतात. दहा वर्षांसाठीचं पक्कं पुरोगामी शेतीचं धोरण ठरवा, प्रत्यक्ष राबवा. बस्स!

शेतात दिवसभर काम करायचं. रात्री कंदिलाच्या मिणमिण प्रकाशात पुस्तकं वाचायची. अनेक कवींच्या कविता गुणगुणताना अखेर माझ्याही ओठांवर माझे शब्द आले. त्याची कविता झाली. पुन:पुन्हा लिहीत गेलो. पुस्तक होईल, रसिक, साहित्यिक शाबासकी देतील, असं थोडंही वाटत नव्हतं. आपला छंद-नाद मी जोपासला. १९६२ ला माझ्यासारखेच तरुण नवे कवी चंद्रकांत पाटील भेटले. अनेक गोष्टींचं साम्य म्हणून घट्ट मैत्री जुळली ती आजवर तशीच, पंचावन्न वर्षांची! त्याचं माझं साहित्यावर विशेषत: कवितेवर निस्सीम  प्रेम. महाराष्ट्रभर आम्ही कवितेच्या प्रेमापोटी भटकत गेलो. अनेक साहित्यिक कवींना भेटून आमचं भरण करीत गेलो. हैदराबादच्या अ.भा. साहित्य संमेलनात ‘पुन्हा कविता’ हा नव्या नामवंत कवींचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रसिद्ध केला. खिशात शंभर रुपये नव्हते. तरीही हे झालं. १९६६ला ‘पॉप्युलर प्रकाशन’चे रामदास भटकळ माझी कवितेची वही घेऊन गेले – त्या ‘रानातल्या कविता’ संग्रहाचं मोठं स्वागत झालं. रसिकांची पत्रं आली. खूप दीर्घ असं त्यावर लिहिलं गेलं. पुरस्कार इत्यादी सर्व झालं. प्रकाशनापेक्षाही आजवर रामदास भटकळ यांनी आपुलकी व मैत्रीची जोड दिली. त्यांच्यासोबत अनेक साहित्यिकांशी जवळीक झाली.  पळसखेड इथल्या शेती- पीकपाणी – झाडं-फळझाडं आणि ज्वारी-बाजरी-कापूस, बोरी, आंबा, मोसंबी, सीताफळ, केळी- दांडातलं झुळझुळ शुभ्र पाणी- शेती माऊलीचं स्वर्गवत बहरणं – त्या मातीचा दरवळ आणि दरवर्षीचं रूपखणी सौंदर्य, दुष्काळात सगळं निष्पर्ण होणं, शेतीझाडं – खेडी माणसं छिन्नविच्छिन्न होणं हे जे पाहिलं, प्रत्यक्ष जगलो त्यांचं गणगोत झालो. ते कवितेत उभं राहिलं..

लोकगीताची लोकसंस्कृतीची लय जी कवितेत उतरली ती खूपच वेगळी नवी वाटल्यामुळं असेल कदाचित. माझं महाराष्ट्रभर कौतुक झालं. महाराष्ट्रातले तीनही पिढय़ांमधले ख्यातनाम लेखक, कवी, कलावंत माझ्याशी स्नेहभावानं जोडले गेले. त्यांनी खूप जिव्हाळा-प्रेम दिलं. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी जगलो, तेच लिहीत गेलो. या सगळ्या प्रेमी साहित्यिकमित्रांची संख्या शंभरपेक्षाही अधिक आहे. त्यांची किती कशी नावं लिहिणार. त्यांच्यासंबंधी माझ्या मनात आदरभाव, कृतज्ञता खूप खूप आहे. ‘ऐसी कळवळ्याची जाती’, ‘रानगंधाचं गारूड’ (मला या मंडळींची आलेली निवडक पत्रं) चाळलं तरी ते कळू शकतं. समकालीन  मित्र खूप, त्यांची जवळीकही खूप. तरीही चंद्रकांत पाटील या मित्रामुळे अनेक साहित्य, कलासंस्कृतीमधले चांगले उद्योग आम्ही आत्मीय भावनेनं केले. मी केलं त्यात न्यून ते वगळून चंद्रकांतनं सोबत केली. अनेक मित्रांसाठी त्यानं मन:पूर्वक सर्व काही केलं. तरीही त्याची कविता-समीक्षा-भाषांतरं हे अफाट काम तो कसं करतोय ते आजही कळत नाही. दोघांचीही सुखापेक्षा दु:खानं घागर भरलेली. अशा आपत्तीमध्ये अनेक जवळचेही दूर गेले. चंद्रकांत साहित्यासोबतच घरातही सोबत आहे. डिसेंबर १९७४ इचलकरंजीच्या अ.भा. साहित्य संमेलनात सर्व क्षेत्रांतल्या जाणत्या माणसांची लेखक कवी-रसिकांची गर्दी होती. माझ्या कविता वाचनाला त्या ठिकाणी रसिकांनी भक्कम दाद दिली. मी महाराष्ट्राचा कवी झालो. तिथेच अनेक थोर लेखक, कवींच्या भेटी-स्नेह जडला. यशवंतराव चव्हाणसाहेब तिथेच भेटले. अतिशय दिलखुलास, भरभरून आनंदानं ‘रानातल्या कविता’ त्यांनी वाचल्या. पत्रव्यवहार सुरू झाला. माझी शेती, कुटुंब, कुटुंबातली नको तेवढी गुंतागुंत, ताणतणाव, आर्थिक ओढाताण यासंबंधी त्यांनी अनेक ठिकाणांमधून माहिती करून घेतली. मला आधार दिला. १९७५ लाच माझ्या कुटुंबाचा विस्फोट झाला असता – पुढे गेला. माझ्या वडिलांचं १९७७ ला निधन झालं. मी पार हबकून गेलो. मार्ग सापडेना. ३० ऑगस्ट १९७७ रोजी चव्हाणसाहेब व सोबत दहा मंत्री असे  पळसखेडला सकाळी १० वाजता आले ते थेट दुपारी ४ वाजताच परत गेले. धाकटी आई, थोरली आई, चौघे भाऊ-बहिणी यांचं सांत्वन करून खूप काही अडचणी समजून घेतल्या. नक्कीच पुढे आणखी चांगले दिवस येतील, मी सोबतीला आहे, असा विश्वास दिला. गणगोत, गावातले लोक यांच्याशीही संवाद साधला- ‘फक्त या कवीला जपा’ म्हणाले.  मी विधान परिषदेत कलावंतांचा प्रतिनिधी होतो.  शासनात भक्कम काम करतोय हे पाहून त्यांना आनंद होता. चव्हाणसाहेबांनंतर सर्वपक्षीय राजकीय नेते, ज्येष्ठ व तरुण नामवंत साहित्यिक, चित्रपट, गीत-संगीत क्षेत्रातले कलावंत व रसिक यांच्या येण्याजाण्यामुळे पळसखेडचं रूप बदललं.

त्याच काळात ‘जैत रे जैत’, ‘आजोळची गाणी’ थेट शहरांत, खेडय़ाखेडय़ांत पोचली. ‘रानातल्या कविता’ व इतर पुस्तकांची भारतीय भाषांमध्ये व इंग्रजी, हिंदीत भाषांतरं झाली. पुस्तकाची रॉयल्टी अल्प मिळते मात्र साहित्य अकादमीसह राज्याचे, संस्थांचे पुरस्कार, सन्मान पैसे जोडून मिळाले. माझ्या उजाड शेतीत विहिरी-मळे उभे करण्यासाठी मी सगळा पैसा शेतीत टाकला. शेतकरी मित्रांना दिला. ‘शेतीइतकं पवित्र सुंदर सेवाभावी दुसरं नाही’ हे थोरांचे वाक्य सांगताना मला वेडा म्हणायचे ते थांबले.

शरदराव पवार यांचं १९७४ ला माझं पुस्तक वाचल्यावर पत्र आलं होतं, १९७५ ला प्रत्यक्ष भेट झाली. मुख्य विषय साहित्यापेक्षा शेती-पाणी असा होता. १९७८-८४ या काळात व १९९०-९५ या काळात त्यांनी मला विधान परिषदेवर घेतलं. एखाद्या प्रश्नापेक्षा साहित्य-कला क्षेत्राविषयी तसेच शेतीपाणी, सामाजिक क्षेत्रातल्या विषयाला धरून  एक – दोन तास चर्चा घडवून आणली. भाषणापेक्षा आकडेवारी, सप्रमाण मुद्दे  यावर भर द्यायला सांगितलं. जलसंधारण, शंभर टक्के सबसिडीच्या फळबागा, सामाजिक वनीकरण, नवं तंत्रज्ञान यासोबतच विश्वकोश – साहित्य संस्कृती मंडळातही खूप काही केलं.

पु.ल. देशपांडे कला अकादमीचा माझा ठराव मंजूर केला. मुंबईत प्रभादेवीला कला अकादमी छान उभी आहे. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ नवलेखक योजना, ग्रंथालयं यासोबतच व्ही. शांताराम, शाम बेनेगल, विजया मेहता, पुरुषोत्तम दारव्हेकर आणि मी अशी त्याच क्षेत्रातल्या मंडळींची सांस्कृतिक खात्यात संपूर्ण अधिकार देऊन नेमणूक केली. खूप महत्त्वाचे निर्णय झाले. १९९० ला संगीत क्षेत्रातल्या प्रतिभावंतांना बळ मिळावं, सन्मान व्हावा म्हणून ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आम्ही जाहीर केला.

आमूलाग्र असे शेतीचे- पाण्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचे निर्णय या सोबतच साहित्य- कलासंस्कृतीचे भाषेचे, स्त्रियांसाठीचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाच्या नामविस्ताराचे निर्णय घेतले. खूप सांगता येईल. जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९९०ला केली. सात भक्कम व सगळ्या विषयांना हात घालणारी संपन्न संमेलनं देशात-परदेशात उभी केली. त्या संस्थेत त्यांनी मला उपाध्यक्ष केलेलं होतं. मला खूप नवं, वेगळं करायला मिळालं. यात खूप मोठा वाटा चांगल्या सहकाऱ्याचा आहे. बृहन महाराष्ट्राचं ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका यांचं ४ जुलै १९८७ ला न्यू जर्सीला फार मोठं साहित्य संमेलन भरलं. त्यात मी पाहुणा होतो. पाच हजार रसिकांच्या उपस्थितीत न्यू जर्सीत ते साजरं झालं. तिथले रसिक माझ्या कवितेच्या प्रेमात पडले.

पळसखेडे आणि वाकोद दोन्ही गावांतलं अंतर फक्त दोन किलोमीटर. एकसंध नांदणारी, एकरूप खेडी. जैन उद्योग समूहाचे पद्मश्री भंवरलालभाऊ जैन वाकोदचे. मी पळसखेडचा. आम्ही एकत्र येऊन खूप शेतीच्या योजना उभ्या करताना थकून जायचो. पीव्हीसी पाइपचा छोटा कारखाना टप्प्याच्या फेडीनं भाऊंनी विकत घेतला. त्या पीव्हीसी पाइपनं आयुष्य बदलून टाकलं. त्याला जोड ठिबक सिंचन नवतंत्रज्ञानाची. नुसतं पाणी बचत नाही तर एकरी उत्पादन वाढविणारी क्रांतिकारी जादूगिरी. भाऊंनी फळबागा, कोरडीची पिकं, कापूस, कांदा, फळ प्रक्रिया उद्योग अशा अनेक गोष्टी नुसत्या हाती न घेता शेतकऱ्यांच्या हाती दिल्या. मी पन्नास र्वष या संस्थेच्या भाऊंच्या उभारणीच्या कार्यात साधा मित्र- सवंगडी म्हणून उभा आहे. पण ‘जैन हिल्स’ च्या प्रत्येक दगडमातीत, हिरवेपणाच्या उभारणीत सोबत नामदेव उभा आहे, असं भाऊ  माझ्या एका सत्कारात बोलले, हा त्यांचा मोठेपणा आहे. १९९१ ला  माझ्या कुटुंबाचं विघटन झालं. ते नको त्या पद्धतीनं झालं. मी, माझं कुटुंब अंधाऱ्या वाटेनं एकटे निघालो. भाऊंनी थोपविलं. दोन दिवस सगळ्यांशी बोलून ते संपवलं. तरीही मेंदूवर – शरीरावर प्रचंड परिणाम; मी मृत्यूच्या दारात- जसलोकमध्ये. परत आलो. हे रसिकांचेच आशीर्वाद!

पुन्हा दोन-तीन वर्षांनी पळसखेडच्या शेतीत. नवे पंख, नवा आत्मविश्वास घेऊन नवनिर्माण केलं. माझ्या मनासारखं राहून गेलेलं लिहून झालं. भाऊ दोन वर्षांपूर्वी अकस्मात निघून गेले. त्यांचा मोठा मुलगा अशोकभाऊ आणि कुटुंबीयांनी थोडंही अंतर दिलं नाही. परवाच्या माझ्या जटिल बायपास सर्जरीत संपूर्ण लक्ष घालून शरीरानं, मनानं पुन्हा उभं केलं. पाणी व्यवस्थापन, फळबागा, फळ प्रक्रिया, साहित्य- संस्कृती क्षेत्रातील भरीव व्यासपीठ व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘गांधी रीसर्च फाऊंडेशन’ जगभर फिरून उभं करताहेत, यात माझ्या परीनं मी त्यांच्यासोबत आहे. माझी कविता, माझी गाणी, चित्रपट एकशे पंचवीसपेक्षा अधिक, चांगल्या संस्थांचे, शासनाचे ‘पद्मश्री’सह पुरस्कार, थोरामोठय़ांशी जवळचे संबंध हे महत्त्वाचे असले तरी ते बाजूला ठेवून मी महाराष्ट्रात साहित्यासाठी, साहित्य अकादमी दिल्ली, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र दिल्ली, सामाजिक कृतज्ञता निधी, आणखी खूप सेवाभावी संस्थांमध्ये स्वत:ला ओढून घेतलं.

सर्व क्षेत्रांतल्या अनेकांसाठी काम करण्याची धडपड मला सतत ऊर्जा देत राहिली. समाजाचे आपण देणं लागतो या भावनेनं जेवढं जमेल तेवढं केलं.  मी केलं यापेक्षा अनेक अशा सहकारी-प्रेमी मंडळींमुळे हे घडलं. मात्र यात घर, संसार याकडे खूप दुर्लक्ष केलं. मी त्याच पळसखेडला आजही अनेक सुविधा नसताना जिवाभावानं शेतीत उभा आहे. मी आयुष्यभर साधनाच केली. यश मिळत गेलं. मी कुणाचं काही हिरावून घेतलं नाही. कुणाला त्रास होईल असं वागलो नाही. जे जवळ आहे ते देतच राहिलो. नकळत चूक झाली असली तर नम्रपणानं सुधारली, माफी मागितली. विकृत, नको तशी वाईट पत्रं येत गेली. खूनखराबीचा कट दोनदा रचला गेला, विडा दिला, शेतावरल्या घरी. घर नेस्तनाबूत करायला आले. कुणी वाचवलं देव जाणे! मी, आम्ही ते माहीत असूनही कधी त्यांच्यावर रागावलो नाही. कटुता ठेवली नाही. प्रत्येक वेळी मनातलं झटकून टाकलं. कवितेनं भरभरून खूप आनंद दिला. मराठी कविता आजही ओठांवर मला वेढून आहे. प्रेम, निसर्ग याइतकं जगात सुंदर मोठं काही नाही. ते शब्दांमध्ये, गीतांमध्ये गुंफत गेलो. चांगली कविता लिहिणं सोपं नाही. आयुष्यभर शब्दांशी खेळ मांडून आहे. ‘कविता’ या लहान अक्षराने जादूगिरी केली, आयुष्य सुंदर केलं.

डोळे गच्च अंधारून, तेंव्हा माझे रान, रानातली झाडे मला फुले अंथरून.

skmahanor@gmail.com