प्रेमानंद गज्वी chaturang@expressindia.com

‘‘मी का लिहितो? मी लिहितो मला पडलेला प्रश्न समजून घेण्यासाठी. लेखक म्हणून छळत राहणारी वेदना.. या वेदनांची विविध रूपं.. ‘कुणाचे ओझे’, ‘एकी एके शून्य’, ‘अभयारण्यातील ससा’, ‘देवनवरी’, ‘बेरीज वजाबाकी’, ‘गाहान’, ‘उतारा’ अशा एकांकिकांमधून हृदयीची जखम होऊन स्रवत राहतात. आणि या जखमा चिघळून ‘देवनवरी’ एकांकिकेचं ‘देवनवरी’, ‘एकी एके शून्य’चं  ‘वांझ माती’ आणि ‘गाहान’चं ‘तन-माजोरी’ आपलं एकांकिकेचं रूप बदलून नाटकं म्हणून सिद्ध होतात.. मला जर कुणी विचारलं की तुझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता? तर मी म्हणेन, माझी नाटकं कालबाह्य़ ठरतील तो! म्हणजे माणूसकीशून्य प्रथा बंद होतील तो!’’

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

नाव, काय, कुठे, कशासाठी प्रसिद्ध असा एक प्रश्न शाळेत विचारला जाई, बहुधा भूगोलाच्या प्रश्न पत्रिकेत. या प्रश्नाची आठवण होण्याचं कारण आहे मी.. प्रेमानंद गज्वी! नाव- प्रेमानंद गज्वी, काय- व्यक्ती, कुठे – महाराष्ट्र, कशासाठी प्रसिद्ध – लेखक; असं हे उत्तर. पण हे कसं घडलं? असा एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो; खुद्द माझ्याही.

एका खेडेगावात जन्मलेलं लेकरू.. जन्म आजोळी पिंपळगाव (जि. चंद्रपूर) आणि बालपण कारगाव (जि. नागपूर). आईचं नाव अंजना नि वडिलांचं शंकर.. आई न शिकलेली. वडील चौथी पास. माझं प्राथमिक शिक्षण कारगावला. हायस्कूलचं उमरेड नि कॉलेज नागपूरचं मॉरिस. इन्टर पास होत नाही तोच नोकरीचा कॉल आला नि ‘पोस्ट अँड टेलिग्राफ’च्या पत्र छटाई (आर.एम.एस.)च्या ट्रेनिंगसाठी बडोद्यास प्रयाण. तीन महिने ट्रेनिंग घेऊन मुंबईत प्रवेश. या काळात माझ्या अंगी काही गुण होते. सिनेमाच्या चालीवर गाणी रचत असे. भजनी मंडळात गाणी गात असे. कव्वालीचे सामनेही केले. शाळेत ‘गड आला पण सिंह गेला,’ या एकांकिकेत तानाजीची भूमिका केली. ‘उमाजी नाईक’ या नाटकात ‘काळोजी’ या खलपुरुषाची भूमिका केली. आणखी एक नाटक हायस्कूलमध्ये असताना ‘जे का रंजले गांजले’मध्येही भूमिका केली. या काळात दंडार, तमाशाचे कार्यक्रम बघणे आलेच. माझे वडील दंडार हा कलाप्रकार सादर करायचे. हे कलागुण त्यांचा वारसा म्हणता येईल.

पण मी लेखक होईन असं काही मनात नव्हतं. मी गायक वा अभिनेता वगैरे होईन असं काहीसं वाटत होतं. आणि त्यासाठी मी प्रयत्नशीलही होतो. म्हणजे मुंबईत आल्यावर रामकृष्ण गाडगीळ, भास्कर सोनावणे, सुरेश पाथरकर, अप्पा पुराणिक आणि मी. आम्ही मिळून ‘नाटय़ सहकार’ नावाचा नाटय़ग्रुप केला होता. यातून ‘साहित्याचा कारखाना’, ‘करायला गेलो एक’ अशा नाटय़कृतीही सादर केल्या. मी एक गुजराती नाटक ‘भद्रंभद्र’मध्ये कामही केलं होतं. नि प्रयोगाचं मानधन रुपये पाच मिळालं होतं. ते वर्ष १९६९. त्याच काळात गोविंद म्हशिलकर या प्रख्यात कव्वाल गायकाकडे कव्वालीचे धडेही गिरवत होतो.

काळ पुढे सरकत होता. वर्तमानपत्रातून प्रासंगिक लेख लिहू लागलो होतो. अगदी वाचकांचा पत्रव्यवहारही. आणि एक दिवस चक्क कथा लिहिली आणि एका दैनिकाला पाठवून दिली. आश्चर्य असे की, ती रविवारच्या आवृत्तीत प्रसिद्ध झाली. कथेचं नाव ‘भिती’. ‘अरे, म्हणजे आपल्याला हे जमते!’ कथा साधीच होती. प्रेमकथा, कदाचित वयाला साजेशी. ही कथा वाचून एक कवीमित्र प्रल्हाद चेंदवणकर म्हणाला होता, ‘‘तू स्वत:ला दलित साहित्यिक मानतोस की नाही?’’ मी ‘‘नाही.’’ म्हणालो होतो. तो काळ होता १९७३ चा; दलित पँथरचा, ‘गोलपीठा’चा, नामदेव ढसाळ, राजा ढाले या क्रांतीविचारी तरुणांचा. पण मी यात कुठेच नव्हतो. हे सगळे माझ्या परिचयाचे, पण यांच्यासोबत मी नव्हतो. उलट ‘हुंडाविरोधी चळवळ’ अशा एका सर्वसमावेशक संघटनेची स्थापना केली होती. त्यातून लग्नात निदर्शने केली. वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या आणि थेट बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं होतं. प्रबोधकारांनी हुंडय़ासंबंधी केलेल्या कामाची माहिती दिली आणि सोबत काम करण्याची ऑफर, पण मी तिथंही गेलो नाही. उलट कथा लिहीत राहिलो. ‘श्री दीपलक्ष्मी’, ‘अनुराधा’ अशा मासिकांतून कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. एक दिवस एक मित्र म्हणाला, ‘तू कथा लिहितोस ठीक आहे. गूढकथा तुला मुळीच जमणार नाही.’ आणि मग आव्हान स्वीकारत; आठ-दहा गूढकथा लिहिल्या. अगदी गूढकथेचा लौकिक असणारं मासिक ‘नवल’पर्यंत प्रवास केला होता. हळूच कविता करू लागलो. पहिली कविता ‘अनुराधा’ मासिकात (१९७४) प्रसिद्ध झाली. हे सारे माझे प्रयत्न एकाकीच चालले होते. लिहून झालं की थेट नियतकालिकांना पाठवत होतो. पाठवलेलं सगळंच छापलं जाई असं नाही. साभार परत येई. पण परत आलेलं दुसऱ्या अंकांना पाठवत राही आणि ते छापून येई. माझ्या कविता-कथालेखनविश्वात माझा मी खूश होतो. माझ्यातच खूश होतो. एक दिवस एक मित्र म्हणाला, ‘‘अरे, काय त्या आलतूफालतू कथा लिहितोस. एखादी एकांकिका लिही की!’’ .. माझ्या कथांना ‘आलतूफालतू’ म्हणतो म्हणजे.. राग येणं स्वाभाविकच होतं. पुढे माझ्यातील रागाला न जुमानता तो म्हणाला, ‘‘आपल्या ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ची एकांकिका स्पर्धा येतेय पुढच्या महिन्यात. लिही. विषय कुठलाही चालेल. मी सादर करीन स्पर्धेत.’’

दोन दिवसांत लिहिली एकांकिका, ‘घोटभर पाणी.’ दिली मित्राला. मित्रानं एकांकिका वाचली परत केली. आवडली नसावी असं समजून मीही शांत बसलो. पण बी.पी.टी.तला एक सहकारी विजय मोंडकर यानं ती एकांकिका माझ्याकडे मागितली. त्या वेळी ‘निनाद’ नावाचा एक नाटय़ग्रुप बी.पी.टी.तील कर्मचारी चालवीत असत. ‘निनाद’नं ती ‘उदय कला केंद्रा’च्या एकांकिका स्पर्धेत रघुनाथ मिरगळ आणि शाम परुळेकर या कलावंतांना घेऊन सादर केली. एकांकिकेला कोणताही पुरस्कार मिळाला नाही पण रघुनाथ मिरगळला अभिनयाचं तिसरं नि लेखनासाठी असलेलं एकमेव पारितोषिक मला मिळालं.

‘घोटभर पाणी’.. (लेखन २० डिसेंबर १९७७) तो काळ होता बाबा आढावांच्या, ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीचा. तो काळ होता, ‘संपूर्ण क्रांती’चा नारा देणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीचा. १९७५ची आणीबाणी येऊन गेलेली. या सगळ्या गोष्टींचा एक विलक्षण ताण ‘घोटभर पाणी’त अलगद उतरला. हो, हे माझं मीच म्हणतो. बाबा आढावांच्या त्या चळवळीनं फरक पडला नाही. दलितांवरचे अन्याय कमी न होता वाढले. ‘संपूर्ण क्रांती’चं वांझोटेपण तेव्हाच दिसत होतं.

दोन तरुण ग्रामीण जीवनाचा शोध घेण्यासाठी गावाकडे निघतात. उन्हाळ्याचे दिवस. तरुण आणि रस्त्यात भेटलेला म्हातारा, दलित आणि गावचा पाटील, गावचा पाटील आणि पत्रकार, मुख्यमंत्री आणि भ्रष्ट दलित नेता, अन्यायानं पिचलेले दोन दलित असे विविध प्रसंग.. प्रसंग कसले दर वेळी उभं राहिलेलं जीवनद्वंद्व! दोन पात्रांतून साकारत राहिलेलं.. गरगरत मेंदूत उभं राहतं महाडचं चवदार तळं, अडीच हजार वर्षांपूर्वीचा रोहिणी नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न.. बघता बघता ‘घोटभर पाणी’चं भांडंभर पाणी झालं. एक वेगळं समाधान देणारं आणि त्याच वेळी गावातील दलिताला साधं पिण्याचं पाणीही मिळू नये ही खंतावणारी गोष्ट. इंग्रजीसह (शांता गोखले यांनी ‘घोटभर पाणी’चं ‘अ सीप ऑफ वॉटर’ या नावाने भाषांतर केलं) चौदा भाषांत गेलं, पण उनाच्या दलितांना नग्न करून मारलं जाण्याची घटना आजही घडते आणि हा देश माणसांचा नाही हे मत दृढ होतं. किती काळ चालत राहणार हा जीवनसंघर्ष!

सवर्ण हिंदू जातीच्या मारोतीच्या देवळात आजही हिंदू मातंग नवरदेव देवदर्शनास जातो तर कोण धुलाई होते. लेखक म्हणून छळत राहणारी वेदना.. या वेदनांची विविध रूपं.. ‘कुणाचे ओझे’, ‘एकी एके शून्य’, ‘अभयारण्यातील ससा’, ‘देवनवरी’, ‘बेरीज वजाबाकी’, ‘गाहान’, ‘उतारा’ अशा एकांकिकांमधून हृदयीची जखम होऊन स्रवत राहतात. आणि या जखमा चिघळून ‘देवनवरी’ एकांकिकेचं ‘देवनवरी’, ‘एकी एके शून्य’चं ‘वांझ माती’ आणि ‘गाहान’चं ‘तन-माजोरी’ आपलं एकांकिकेचं रूप बदलून नाटकं म्हणून सिद्ध होतात.

देवदासी प्रश्नावरची एकांकिका आणि नाटकं दोन्ही गाजली. समाज तोच.. हिंदू जात धर्मी. खालच्या मानल्या गेलेल्या हिंदू जातीनं मुलगीच सोडावी देवीला पण सवर्ण हिंदू जातीला गाई, बैल, रेडा सोडण्याची मुभा. एकांकिकेत जे येऊ शकलं नव्हतं ते नाटकात मांडता आलं. एक सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक सत्य म्हणून ते येणं गरजेचं होतं. या नाटकाला ‘महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आणि नाटककार विजय तेंडुलकरांचा आशीर्वादही. तेंडुलकर म्हणाले होते, ‘‘प्रेमानंद, तू काय केलंस हे तुला माहीत नाही. तू एक नवा शब्द दिलास मराठी भाषेला, ‘देवनवरी’. या देवदासींचं केवढं शोषण होतं. देवीच्या नावाखाली थेट वेश्येचं जिणं जगावं लागतं या देवमुलींना. आणि तरीही १९९५ मध्ये एक विलक्षण घटना घडली. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात पाच स्त्रियांनी ‘देवदासी’ होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मन सुन्न झालं होतं. आणि ‘देवनवरी’च्या दुसऱ्या आवृत्तीत जाहीर केलं होतं, ‘‘मला जर कुणी विचारलं की तुझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता? तर मी म्हणेन, माझी नाटकं कालबाह्य़ ठरतील तो! म्हणजे माणुसकीशून्य प्रथा बंद होतील तो!’’

मी का लिहितो? मी लिहितो मला पडलेला प्रश्न समजून घेण्यासाठी. १९८३ हे वर्ष. वेठबिगार समस्या भारतभर तीव्र होती. पण ‘एकही वेठबिगार नाही’, असं सरकारनं जाहीर केलं होतं. मी वेठबिगार समस्येचा शोध घेऊ लागलो आणि हळूहळू समस्या स्पष्ट होऊ लागली. आधी एकांकिका नि मग तिचंच नाटक केलं. नाटक का करावं लागलं तर माणसाला गुलाम करणारी वृत्ती नष्ट केली तरच वेठबिगार समस्या संपू शकते हे जाणवल्यामुळं. ‘माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव झाली की तो बंड करून उठतो.’ हे ‘तन-माजोरी’ या नाटकाचं घोषवाक्य.

एका खेडेगावातला मुलगा म्हणजे मी, नोकरीसाठी मुंबईत येतो, ही मुंबई मला आपलासा करते नि त्याच वेळी मीही मुंबईला. ‘तन-माजोरी’ विलक्षण गाजले ते त्यातल्या मालक-मजूर संघर्षांमुळं. माझा मित्र रवींद्र भावे लंडनच्या भूमीवर या नाटकाचा प्रयोग साकार करतो. या प्रयोगाचं दिग्दर्शन केलं होतं विक्रम गोखले यांनी. विक्रम गोखले उत्तम अभिनेते आहेत, पण त्यांच्यात एक उत्तम दिग्दर्शकही दडलेला आहे. केवळ माईमचा वापर करून प्रयोग सिद्ध केला होता. या वेळी ‘तन-माजोरी’च्या पुस्तकाचं प्रकाशनही लंडनला झालं नि मला दर्शन घडलं लंडनचं. लंडनच्या महाराष्ट्र मंडळानं हा प्रयोग आमंत्रित केला होता. कारगाव ते लंडन व्हाया मुंबई असं कौतुक झालं होतं माझं.. पण मालक-मजूर संघर्ष तर आजही तसाच आहे. मालक रोज श्रीमंत होतो. देशातला पैसा घेऊन पसार होतो नि मजूर काम बुडालं म्हणून आत्महत्या करतो. हे पूर्वजन्माचं फलित नव्हे तर माणसानं माणसाला गुलाम करणाऱ्या वृत्तीचं फलित होय. हे समाजापर्यंत पोचलं की नाही, समाजात काही बदल होईल का माहीत नाही पण मला एक समाधान.. मी वेठबिगारीचा प्रश्न समजून घेतला.

या समाधानाचं सुंदर मधुर रसाळ फळ म्हणजे ‘किरवंत’ नाटक.  माणूस मरतो, त्याला स्वर्गात परमशांती लाभावी म्हणून मृत माणसावर सर्व धार्मिक विधी करणारा माणूसच जर विधी संपताच अस्पर्श ठरत असेल तर? हा कुठला विधी आणि असा विधी सांगणारा हा कोणता धर्म! धर्म असा असतो? होय, धर्म असाही असतो. जन्मानं श्रेष्ठ – महाब्राह्मण ठरवणारा आणि तोच माणूस अंत्येष्टी संस्कार संपताच अधम ठरवणारा धर्म.. ‘किरवंत’ लिहिण्यापूर्वी मी मालाडच्या स्मशानभूमीत काम करणाऱ्या अशोक जोशींची मुलाखत घेतली होती. त्या वेळी ते मला अगदी स्वच्छ शब्दात म्हणाले होते, ‘‘गज्वी, देव नाही, धर्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, स्वर्ग नाही, नरक नाही आणि हे ब्राह्मणांना चांगलं ठाऊक आहे.’’ ‘‘तर मग तुम्ही हे लोकांना सांगत का नाही?’’ यावर जोशींचं म्हणणं होतं, ‘‘कसं सांगणार? यावरच तर माझं पोट अवलंबून आहे.’’ अशोक जोशींनी दिलेली माहिती सत्य आहे की नाही याचा शोध घेत कोंकणातील सावंतवाडीला गेलो. प्रश्नांच्या आतील तिढे समजून घेण्यासाठी. ‘किरवंत’ १९८१ ला लिहिलं. मराठीत नव्हे तर भारतीय साहित्यातही स्मशानकर्मे करणाऱ्या किरवंतांची व्यथा आणि वेदना कुणी मांडली नाही. पण नाटकाचे प्रयोग होताच गज्वींनी खोटंच लिहिलं. ब्राह्मणात असं काहीही नाही म्हणून टीका झाली. आणि आंबेडकरवाद्यांनी तर, ‘‘बघा बाबासाहेब, तुमची लेकरं आपल्या समाजाची दुखणी मांडण्याचं सोडून ब्राह्मणांची मांडत सुटलेत,’’ अशी टीका केली. आणि आश्चर्य म्हणजे मी जेव्हा ‘जय जय रघुवीर समर्थ!’ हे नाटक लिहिलं तर ब्राह्मण म्हणू लागले, ‘‘तू ब्राह्मणांवर कशाला लिहितोस? तुला तुझा समाज नाही का?’’ न राहवून मी माझ्यातल्या लेखकालाच प्रश्न केला, ‘‘अरे मूर्खा, तुझा समाज कोणता?’’ मी रोज माझा समाज शोधत फिरतो आहे. मी माझी माणसं शोधत फिरतो आहे आणि बापडी तीही, त्यांच्या हितचिंतक मिळाल्यागत आपल्या मनातील व्यथा-कष्ट-त्रास-आनंद-दु:ख सगळं सांगतात.

मराठी रंगभूमीच्या सद्य:स्थितीविषयी भाष्य करणारं नाटक, ‘रंगयात्री’, कला आणि कलावंतांमधील नात्यांची चिकित्सा करणारं नाटक, ‘नूर मोहम्मद साठे’- प्रियकर-प्रेयसी, त्यांचे आई-वडील, आणि समाज- त्यामधील बंध उलगडून सांगणारं नाटक. ‘काळोखाची लेक’, व्यावसायिक रंगभूमीवर येताना ‘शुद्ध बीजापोटी’ होऊन साकारतं. धरणग्रस्तांचे प्रश्न घेऊन येणारं नाटक, ‘व्याकरण’ ‘डॅम इट अनू गोरे’ म्हणत व्यावसायिक रंगमंचावर अवतरतं. ‘अभिजात जंतू’ असं एक थेट राजकीय नाटक.. प्रत्येक नाटक आपली स्वत:ची एक समस्या घेऊन मला भेटायला येतं. आपल्या व्यथा, वेदना सांगतं नि मीही आत्मीयतेनं त्यांना समजून घेतो. आणि म्हणून सिद्धार्थाची यशोधरा तो बुद्धत्व प्राप्त करून महालात तिला भेटायला येतो तेव्हा प्रश्नांवर प्रश्न विचारते, अगदी, ‘‘तू बुद्ध झालास म्हणजे काय झालास?’’ प्रश्न विचारण्याची मुक्त मोकळीक इथं असते म्हणून का ही व्यक्तिमत्त्वं माझ्या मेंदूत ठाण मांडून बसतात? की व्यक्तींच्या रूपानं मला छळणारे प्रश्न मलाच उत्तरं मागतात आणि उत्तरं असतात माझ्याजवळ की उत्तरांचेच प्रश्न होतात?

मी कविता केल्या. त्यांचा ‘एकतारी’ हा कवितासंग्रह खूपच उशिरा म्हणजे मी कविता लिहायचं थांबल्यावर २०१० मध्ये प्रसिद्ध झाला. कथासंग्रह दोन प्रकाशित झाले, एक गूढकथासंग्रह ‘लागण’ १९८० मध्ये प्रसिद्ध झाला आणि ‘ढीवर डोंगा’ २००९ ला. माझ्या या लेखनाची दखल अजिबात घेतली गेली नाही. तीच गोष्ट ‘जागर’ या माझ्या पहिल्या कादंबरीची.  मी २०१६ मध्ये ‘हवे पंख नवे!’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारी मुक्तछंदात्मक कादंबरी लिहिली. कादंबरीला समीक्षक प्रा. हरिश्चंद्र थोरातांनी गौरविले, पण हवी तशी दखल मात्र घेतली गेली नाही. नाटय़ेतर वाङ्मय जेही मी लिहिलं ते खरंच दखल घेण्याजोगं नाही की ठरवून दुर्लक्ष.. जे असेल ते, मी चिंता करीत बसत नाही. लेखनाचं कौतुक, दखल हा आनंदाचा भाग पण मुळात मी लिहितो तेच मुळी मला व्यक्त करण्यासाठी.

बहुतेक नाटकांची दखल घेतली गेली, पण ‘एकी एके शून्य’ या एकांकिकेची नि त्यावरून लिहिलेल्या ‘वांझ माती’ या नाटकाची भट्टीच कुठं तरी बिघडली असं जाणवत राहतं. पण ते सारंच मागं पडलं आहे. हे सारंच श्रेयस-प्रेयसच्या विचारकक्षेवर गेल्याचं जाणवतं. आणि नाटककार म्हणून जे यश हाताशी आहे ते नाटय़विषयातील निवडीत अधिक असावं असं वाटतं. बहुतेक नाटय़विषयक अस्पर्श असेच आहेत. ‘गांधी-आंबेडकर’ हे नाटक. वाटत नाही कुणी लिहिण्याची हिम्मत दाखविली असती. गांधी काय-आंबेडकर काय; दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्व. गांधीजींना स्वतंत्र आणि

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र समजून घेण्यात प्रचंड वेळ गेला. आठ वर्षे. शिवाय दोघांनाही एकत्रितपणे समजून घेणं महाकठीण. त्यांच्या भेटीही तीन, पण संघर्षांचा काळ १९३१ ते १९४८. गांधीजी आणि आंबेडकर मला आता खुणावू लागले होते. संघर्षांला तयार होते. माझ्या मन, मेंदूत संघर्षांच्या ठिणग्या उडत होत्या, पण नाटक म्हणून सिद्ध होण्याचं कोणतंच चिन्ह दिसेना. गांधी-आंबेडकरांच्या संदर्भात माझ्या मनात प्रश्न हजार, पण ते मी विचारायचे म्हणजे नावीन्य नव्हतं. माझ्या मनात शंका हजार म्हणून मी दशावतारातील शंकासुर घेतला मदतीला; शंकासुर म्हणून पण माझं नाटय़गणित सुटेना. आणि अचानक विदूषक मला खुणावू लागला. ‘रंगयात्री’विषयी चिंतन चालू असताना मी शेक्सपिअर अभ्यासत होतो. त्याचा उपयोग असा झाला. ‘गांधी-आंबेडकर’ नाटक लिहिण्याचा मार्ग खुला झाला, विदूषक भेटला म्हणून.

गांधी-आंबेडकर भारतीय जनतेसमोरची भव्य व्यक्तिमत्त्वं. ते जे बोलले तेच माझ्या नाटकाचा प्राण ठरणार होतं. जबाबदारी मोठी होती. ते जे बोलले नाही ते नाटकात आणणं धोक्याचं होतं. मी कोणताही धोका पत्करला नाही. ते जे बोलले तेच शब्द संवाद झाले. नाटक लिहून झालं. पहिलं वाचन ‘कलावैभव’च्या ऑफिसात वामन केंद्रेंसाठी केलं. नाटक आवडल्याचं सांगितलं. करू, असंही ते म्हणाले. पण नाटकात एकही दोष राहू नये म्हणून मी मान्यवरांसमोर ते वाचू लागलो. ४९ नाटय़वाचनं केली मी. त्यात पुष्पा भावे, नलिनी पंडित, कमलाकर नाडकर्णी, निखिल वागळे होते. आणि हळूहळू माझं नाटक रंगमंचावर येणारच नाही असे प्रयत्न सुरू झाले. मी नाटकात गांधीजींवर अन्याय केलाय अशी कुजबुज सुरू झाली. पण गांधीजींवर काय अन्याय केलाय? त्यातलं खोटं काय हे त्या मंडळींनी आजवर कधीच सांगितलं नाही. माझं हे नाटक रंगमंचावर येत नाही हे बहुधा चेतन दातारच्या कानी गेलं असावं. चेतन हा नवीन होता पण कल्पक होता. त्यानं हे नाटक सत्यदेव दुबेंकडे वाचायला दिलं. गोविंद निहलानींच्या घरी ते वाचलं. दुबेंनी अभिप्राय दिला, ‘‘इस के आगे नाटक कभी मत लिखना। तू हमेशा के लिए अमर हो गया!’’ आणि नंतर ते नाटक चेतन दातार यांनी केलं. लता नार्वेकर निर्मात्या होत्या. मंगेश भिडे गांधीजी तर किशोर कदम

डॉ. आंबेडकर आणि विदूषकाच्या भूमिकेत भक्ती बर्वे-इनामदार. अपेक्षेप्रमाणे; खूप जण माझ्यावर रागावले होते. पण मी निर्धास्त होतो. तरी महाबळेश्वरला साहित्य संमेलनात, माझी प्रकट मुलाखत होत असताना एक प्रश्न विचारला गेला होताच ‘‘तुम्ही ‘गांधी- आंबेडकर’ नाटकात कुणाच्या बाजूचे? गांधीजींच्या की आंबेडकरांच्या?’’ माझं उत्तर होतं, ‘‘ना मी गांधीजींच्या बाजूचा ना मी आंबेडकरांच्या बाजूचा. मी प्रश्नांच्या बाजूचा.’’

मान्यवर अभिनेते नाना पाटेकर, उदय म्हैसकर असलेले नाटक, ‘तन-माजोरी’,

डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी असलेलं नाटक ‘किरवंत’, भक्ती बर्वे-इनामदार अभिनित ‘गांधी-आंबेडकर’, डॉ. गिरीश ओक अभिनित ‘शुद्ध बीजापोटी’ किंवा शीतल क्षीरसागर अभिनित ‘डॅम इट अनू गोरे’ ही नाटकं व्यावसायिक रंगमंचावर आली, आणली गेली त्या सर्व निर्मात्यांना धन्यवाद. काही स्पर्धेत झाली. त्या रंगकर्मीचेही आभार. नाटक पाहिल्यावर कुणी टीका केली. कुणी चोख रागावले. त्रासही दिला. झाला. आणि तरीही मी मला गवसलेलं सत्य मांडलं पाहिजे म्हणून कार्यरत राहिलो.

‘छावणी’ हे माझं नवं नाटक.. भारत देश-माझा देश. स्वातंत्र्य मिळालं. सत्तर वर्ष झाली. पण सामान्य माणूस सुखी झाला का? नाही. पण कुणी सामान्य माणसाला न्याय मिळवून देणार असेल. सामाजिक समता आणि आर्थिक विषमतेतील दरी मिटवून टाकणार असेल.. असं नाटक भारतीय राज्य घटनेविरुद्ध कसं ठरतं? भारतीय संविधानानं शब्द दिला होता नं.. पाळला का शब्द संविधानातला? नाही नं? आणि हे सत्य समोर ठेवलं तर लेखकच देशद्रोही? पंधरा महिने सेन्सॉरमध्ये अडवून ठेवणारं नाटक? प्रयोगाची परवानगी कोर्टाकडून घ्यावी, असं सांगणार लेखकाला? मानसिक छळ करणार? ‘गांधी-आंबेडकर’ या नाटकासाठीही ६० कट्स सुचवले गेले होते. दर वेळी सेन्सॉर बोर्ड असं का वागतं? लेखकानं सत्य सांगूच नये? माझं ‘छावणी’ हे नाटक रंगमंचावर येईल की नाही माहीत नाही. ते नाटय़वाचनाच्या माध्यमातून किंवा नाटकाचं पुस्तक प्रकाशित करून लोकांना सांगावं लागेल. आणि मी ते करेन. करावंच लागेल.

मी का लिहितो? मी लिहितो मला पडलेला प्रश्न समजून घेण्यासाठी. मला प्रश्न पडत राहतील नि मी लिहीत राहीन. काय श्रेयस – काय प्रेयस या प्रश्नांचा विचार न करता; मला सर्वोत्तम मिळेपर्यंत!