15 August 2020

News Flash

जगण्याची लढाई

दिवसच असे भेदरलेले आणि भयचकित करणारे होते. मोठा भाऊ कॉलेजच्या पहिल्या वर्षांत होता.

(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

जगण्यात मातीचा स्पर्श नसणाऱ्यांना रचण्याचे भोंगळ तत्त्वज्ञान उभे करून स्वत:चे अड्डे निर्माण करावयाचे असतात. हे उमगल्यापासून सर्वापासून दूर राहणेच पसंत केले. शेवटी आपल्याकडून जे काही थोडेफार लिहून होईल तेच आपले असते. बाकी सर्व फिजूल. जगण्याची लढाई लढता लढता श्रेयस-प्रेयसाचा विचार करायला सवडच मिळाली नाही. जेवढी उसंत लाभली तेवढय़ात पांढऱ्यावरचे काळे केले. अजून मनात साचलेले बरेच काही जसेच्या तसे आहे..

भोवताल इतक्या चित्रविचित्र माणसांनी आणि आप्तेष्टांनी गजबजलेले होते की, आपण या पसाऱ्यात जिवंत राहू, अशी शक्यताही वाटत नव्हती. मनात सतत चित्रविचित्र विचार. घराच्या तुळईवर चार-पाच वर्षांनंतरची लिहिलेली एक तारीख. ती असायची पुढे करावयाच्या आत्महत्येची. तुळई कसली मांगराचा वासा होता तो. तारीख निघून जायची आणि मी पुन्हा पुढची तारीख ठरवून टाकायचो. अशा किती तरी तारखा तुळई ऊर्फ वाशाने वाचल्या, पुसून टाकल्या; पण आत्महत्या मात्र करता आली नाही..

दिवसच असे भेदरलेले आणि भयचकित करणारे होते. मोठा भाऊ कॉलेजच्या पहिल्या वर्षांत होता. तो भलतीसलती पुस्तके आणून घरभर पसरायचा. त्या वेळी आम्ही दोघे खुनाचा कट रचत होतो. त्यासाठी लागणारी हत्यारे घरातल्या माणसांना दिसणार नाहीत अशा ठिकाणी दररोज पाजळून ठेवायचो. संधी सापडली की दोघे मिळून एक-दोन खून निश्चित करणार होतो. डोकं सतत त्या विचारानं भिरभिरलेले असायचे. सतत डोळ्यांत रक्त उतरलेलं. लक्षच लागायचं नाही कशात. भाऊ तर फक्त बंदूक मिळावी म्हणून कॉलेजच्या एनसीसीत सामील झालेला. ती वेळ साधली असती तर निश्चित आम्ही दोघांनी एक-दोन खून सहजी केले असते. तेही कोणा परक्याचा नव्हे तर बापाच्या बापाचा आणि आमच्या चुलत्याचा. त्या दोघांनी आमचे जगणे नकोसे करून सोडले होते.

चार गावांत जमीनजुमला. खातंपितं घर. दाबजोर पसाअडका. लहानपणी माझ्या घुंचीला (टकुचं) सोन्याची शिसफुलं होती, असं आई सांगायची. अचानक म्हाताऱ्याने आईवडिलांना अंगावरच्या कपडय़ानिशी घराच्या बाहेर काढलं. असं काय झालं होतं कुणास ठाऊक. वाटणीला चार भांडीसुद्धा दिली नाहीत. चार गावाला असणाऱ्या जमिनीतील वराभर जमीनसुद्धा कसायला दिली नाही. तीन दगडांची चूल मांडून आईने शेजाऱ्यांकडून मागून आणलेल्या गाडग्यावर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि बक्कळ जमीनजुमला असणारे आम्ही डोंगराच्या कडेला खोपाट बांधून जगण्यासाठी जागा निर्माण केली. वडील मिळेल त्याच्यात मजुरीला जायचे. अशाही परिस्थितीत आईने दुसऱ्याचा बांध बघितला नाही. मात्र कोणाकोणाची जमीन भागहिश्शाने घ्यायची आणि तितकीच पिकवायची. वडिलांची मजुरी आणि आईचा रयतावा यात आम्ही जगत असताना आमचा म्हातारा आणि चुलता हजार कलागती करून आम्हाला जगणं असह्य़ करून सोडायचे.

म्हातारा सात गावचा इनामदार. त्याचे पूर्वज कधी काळी इचलकरंजीकरांच्या दरबारात पराक्रम गाजवलेले म्हणून या सात गावच्या जमिनी इनाम मिळालेल्या होत्या. म्हाताऱ्याचा गावात वट असल्यामुळे सगळे पंचही त्याचीच भाषा बोलायचे आणि आम्हाला दरवर्षी वराभर शेतही कसायला मिळायचे नाही. आईची प्रचंड तगमग; मात्र कोणासमोर हात पसरायची नाही. तिला माहेरचा भरभक्कम पाठिंबा होता. शेवटी भांडून अर्धा एकर जमीन तिने म्हाताऱ्याकडून मिळवली. त्या अर्धा एकरात पीक कापणीला आलं की, म्हातारं दांडगावा करून कापून न्यायचा प्रयत्न करायचा आणि आमच्या मारामाऱ्या सुरू. आम्ही चार भावंडं. बहीण सगळ्यात मोठी. बघता बघता ती वयात आली आणि स्थळांचा शोध सुरू झाला. लग्न जमत यायचं. म्हातारा आणि चुलता ते लग्न मोडून टाकायचे. आई घायकुतीला यायची. वडिलांचा चेहरा अगतिक व्हायचा. बहिणीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागायच्या. हे सहन करणं केवळ असह्य़ होतं. अशा वेळी खुनाशिवाय दुसरे सुचणार तरी काय? भाऊ या सगळ्याला प्रचंड वैतागला होता. त्यामुळेच म्हाताऱ्याला आणि चुलत्याला उडवायचे हा बेत नक्की होता. हा बेत तडीस गेला नाही, अन्यथा मी तुरुंगामध्ये अनुभव लिहीत बसलो असतो. भावाचे आणि माझे चलनवलन आजोळच्या आजोबांनी ओळखले आणि आमचे दोघांचे बोचके आजोळच्या घरात येऊन पडले. शिकावं असं वाटत नव्हतं. डोक्यात फक्त घुमणारी भाऊबंदकी;. पण या साऱ्याला महात्मा फुले विद्या मंदिर, अत्याळ या शाळेने सावरले. तेथेच पुस्तकांचे घबाड सापडले आणि जगण्याचे वळणच बदलले.

आमच्या सात पिढय़ांत कोणी शिकलेले नव्हते. घोडे पाळा, दांडपट्टा फिरवा आणि दांडगाई करत फिरा हा आमचा वारसा. अशात कोणी शिकताहेत हा भलताच कौतुकाचा विषय. आम्ही शिकतो आहोत याचाही राग म्हाताऱ्याला यायचा आणि तो आमचे शिक्षण बंद पाडायला अतोनात कलागती करायचा; पण आजोळच्या आजोबांनी त्याचे सावटही आमच्यावर पडू दिले नाहीत, म्हणून मोठा भाऊ पदव्युत्तर शिक्षण घेऊन इंग्रजीचा प्राध्यापक झाला. कॉलेजच्या मासिकात तो कथा लिहायचा. वाचायचाही चिक्कार. त्यामुळेच मला अक्षरांचा लळा लागला. त्या वेळी गडिहग्लजच्या सार्वजनिक वाचनालयात

दादा सबनीस नावाचे सद्गृहस्थ मंथन नावाची भित्तिपत्रिका चालवायचे. मी लिहिलेलं मोडकंतोडकं भाऊ दादा सबनीसांकडे द्यायचा. एकदा दादा सबनीसांनी ‘बेंदर’ नावाची माझी कविता त्या भित्तिपत्रिकेत लावली. येथून पुढं बरंच काही तरी माझं मीच लिहायला लागलो. मला स्वत:ला व्यक्त करण्याचा मार्ग सापडला आणि या साऱ्यातून आम्ही बाहेर पडलो. पुस्तकं जोडीला आली. बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भावकीच्या कोशातून बाहेर पडून शिक्षणाला सुरुवात झाली.

मुळातच स्वभाव उचापतीखोर. त्यामुळे एकाच वेळी अनेक धंदे. कधी शाहिराबरोबर, तर कधी तमाशाच्या फडात. गावोगावच्या कबड्डी टीममध्ये, तेही फक्त उनाडक्या करत. गावभर बोंबाबोंब करत हिंडायचं. आजोळचे लोक म्हणायचे, गेला वंशावळीतल्या गुणावर. अशातच कॉलेजात असताना प्राध्यापक बन्ने आणि अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी देवदासी चळवळीचे बीज डोक्यात घुसवले. दिवसभर कामधंदा सोडून जोगतिणींची घरं फिरणं, त्यांची मोजदाद करणं. मोर्चा असला की बेंबीच्या देठापासून घोषणा देणं. परिषदा असल्या की, जाजमं उचलणं असले सगळे उद्योग. अशात अधूनमधून एखादी कविता, बारीकशी गोष्ट लिहून व्हायची. कॉलेजातल्या कोटीभास्कर बाई आस्थापूर्वक लिहिलेली गोष्ट अथवा कविता दैनिकांच्या रविवार पुरवणीला छापायला पाठवायच्या. ते छापूनही यायचे; पण त्याचे फारसे कौतुक कधी वाटले नाही. देवदासी चळवळीत जाजमं उचलता उचलता बायकांच्या करुण कहाण्या मनात घर करत गेल्या. ‘चौंडकं’ ही कादंबरी लिहिली. अनिल मेहतांच्या समोर बाड ठेवलं, तर त्यांनी चक्क सातशे पन्नास रुपये रोख देऊन वहीत करार करून घेतला. ‘चौंडकं’ छापण्याआधीच कवितासंग्रह आला. साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं. पुण्यातून तो प्रकाशित झाला. ‘चौंडकं’ पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. लोक वाचायचे. काय काय म्हणायचे; पण मला मात्र त्याचं फारसं कौतुक कधी वाटलं नाही. आमच्या भागातले शिवाजीराव सावंत मोठे लेखक. कधी तरी भेटायचे. म्हणायचे, ‘सोड रे चळवळ बिळवळ. फक्त लिही. तुझ्याकडे लिहिण्याचे अंग आहे.’ मी मोठय़ाने हसायचो. ते पुन्हा बरंच काय काय सांगायचे. फार डोक्यात घुसायचं नाही; पण त्यांना मी लिहावं असं सतत वाटत असायचं. एम. ए. झाल्या झाल्या मौनी विद्यापीठातील लोक प्राध्यापक होण्याचं निमंत्रण घेऊन आले. त्यात गुरुवर्य विजय निंबाळकर यांनी भलताच आग्रह धरला आणि गारगोटीत आलो. तर तिथे सगळं विंचवाचं खानदान. निपाणीच्या तंबाखू आंदोलनाचे ते दिवस. अशात डॉ. आनंद वास्कर भेटले. जिवाभावाचे मित्र झाले. देवदासी चळवळीची चर्चा सर्वदूर पसरलेली. डॉ. आनंद वास्कर यांनी पहिल्यांदा देवदासीच्या जटेला हात घातला. जट यशस्वी सोडवली आणि आमचं ‘जटमुक्ती’चं आंदोलन सुरू झालं. कॉलेज सुटलं की, रोज नवं गाव. नवी जटवाली मुलगी. जट सोडवणं. प्रबोधनपर व्याख्यान देणं. रात्री-अपरात्री पुन्हा गारगोटीत परत. असा सगळा झिंग आणणारा प्रवास. अशात अनेक जोगते (हिजडे) मित्र झाले. जिल्हाभर त्यांची मोजदाद सुरू झाली. पाचपन्नास हिजडे जिवाभावाचे मित्र झाले. त्यांचं हादरवून टाकणारं जीवन आणि जिवाचा थरकाप उडविणाऱ्या त्यांच्या जीवनकहाण्या. त्या काळात मेंदूला नवंच भगदाड पडलं. हिजडय़ांची संघटना, जोगतिणींचे मोच्रे, रात्रभर जागून काहीबाही लिहिणं, अशात मौनी विद्यापीठाचं ढासळतेपण आणि डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्वप्नांचा चुराडा या साऱ्या गदारोळात दिवस वाऱ्यासारखे उडून गेले.

त्या काळात दक्षिण महाराष्ट्रात साहित्य संमेलनाचे पीक जोरात आलेलं. गावोगाव भरणारी साहित्य संमेलनं. त्यातून मिरवणारे कवी, लेखक. त्यांचं मिजासखोर वागणं आणि आर्थिक उलाढाली या साऱ्यामुळे साहित्यातल्या व्यासपीठांचा तिरस्कार मनात सतत साचत गेला. पीएच.डी.साठी विद्यापीठात हेलपाटे सुरू केले. तर सात-आठ वर्ष कोणी दारात उभंच करून घेतलं नाही. सततचा अपमान आणि आपल्याला कोणी स्वीकारत नाही यामुळे दुखावलेल्या मनात ईष्र्या वाढत गेली. करायचीच पीएच.डी. असा चंग बांधला. अशातच चळवळीने नवनवी वळणं घ्यायला सुरुवात केली. नेतृत्वाचे वाद पराकोटीस गेले. आगीत तेल ओतणारे चिक्कार. कधी कधी एकमेकाची जात काढणंही सुरू झालं. त्यामुळे चळवळीतून निराशाच पदरी पडली. उद्विग्न, उदास, नराश्यग्रस्त मन. अशा काळात ‘भंडारभोग’ लिहून झाली. शिक्षणाच्या क्षेत्रात बाजारू वृत्तीने पाय रोवायला सुरुवात केली. डॉ. जे.पी. नाईकांची ग्रामीण शिक्षणाची संकल्पना पायदळी तुडवली जाऊ लागली. या सगळ्या धुमश्चक्रीत आमची आत्महत्येची तारीख कधीच पुसून गेली.

रोज नवा संघर्ष, रोज नवा प्रश्न. अशातच वेगवेगळ्या माणसांचे हेवेदावे, राग, लोभ, ईष्र्या, द्वेष या साऱ्यांनी मनाचे सांदिकोपरे आक्रसून गेले. एक काहीच न घडणारा काळ. निर्वात पोकळी. नराश्यग्रस्त मन. चळवळीतून बाजूस व्हावं हा निर्णय. आतल्या आत भयंकर घुसमट. अशातच गारगोटी हे गाव सोडून टाकायचं या निर्णयाला येऊन पोहोचलो. त्याच वेळी विद्यापीठाच्या मराठी विभागात जागा निघाली. अर्ज केला तर मुलाखतीआधीच कळली ती मला येऊ द्यायचं नाही यासाठीची मोच्रेबांधणी. तत्कालीन विभागातील सर्व विद्वान यासाठी एकजुटीने कार्यरत. तरीही मुलाखतीत निवड झाली आणि सगळे हैराण झाले. नियुक्तीपत्र मिळू द्यायचं नाही, यासाठी पुन्हा मोच्रेबांधणी सुरू झाली. त्यात मात्र सारे जण यशस्वी झाले. आपल्याला नियुक्तीपत्र मिळालं नाही याचं फारसं दु:ख झालं नाही, पण आपण विभागात येऊ नये यासाठी सर्व ज्ञानी, विद्वान कसे काय एकवटले? हा प्रश्न छळतच राहिला. अशातच डॉ. आनंद वास्कर यांचं हृदयविकाराने निधन झालं आणि जगण्याची दरडच कोसळली. मन सरभर झालं. लिहिणं, वाचणं यातून लक्ष उडालं. एका अंधाऱ्या गुहेचा प्रवास. पण अशा वेळीही धीर देणारी माणसं होती. अशातच पुणे विद्यापीठाची जाहिरात वाचनात आली. ठरवलं, हा जिल्हा सोडायचा. अर्ज केला. मुलाखती झाल्या. निवड झाली. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर त्या वेळी विभागप्रमुख होते. म्हटलं, आता मनासारखं काही तरी लिहिता-वाचता येईल. नवं काही करता येईल. निराशेचं मळभ दूर होईल. बोचकं पुण्यात नेऊन टाकलं. दरम्यान कोत्तापल्ले सर कुलगुरू म्हणून औरंगाबादला गेले आणि मी एकटाच कान्टांच्या (कीटक) जाळ्यात सापडलो. हरहुन्नरी विद्यार्थी भेटले पण त्याच वेळी रक्तपिपासू कान्टांनी डसणं सुरू केलं. शहर अंगावर यायला लागलं. रक्तशोषक जमातींचं घाणेरडं उग्र रूप उदास करत गेलं. याच वेळी ‘सृजन आनंद’च्या लीला पाटील विद्यापीठात आल्या. मी पुण्यात आल्याचं त्यांना बिलकूल रुचलं नव्हतं. विद्यापीठाच्या परिसरात फिरत असताना त्या म्हणाला, ‘अरे, राजन गवस, पुणे हे वाचताना मला कसं तरीच वाटते. त्यापेक्षा राजन गवस, कोल्हापूर हे कसं वाटतं बघ. एकदम छान. तू पुणं सोडायला हवंस,’ असं त्या सहज बोलून गेल्या. आधीच मेंदूचा भुगा झालेला. त्यात लीलाताईंचं हे म्हणणं. विचित्र घालमेल सुरू झाली. कैक दिवस त्या घालमेलीत गेले आणि जिवापाड माया लावणाऱ्या कैक मुलांचा आग्रह टाळून पुणं सोडण्याचा निर्णय घेतला. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’. गारगोटीचा झडीचा पाऊस. चक्रावून टाकणाऱ्या अंधारगुहा आणि भेदरवून टाकणारं जंगल नाच.

अशातच काहीबाही लिहिणं. काहीबाही मिळणं. हे सारं सुरूच होतं. मिळण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. मिळाल्याचं काही कौतुकही वाटलं नाही. ज्या दिवशी जे मिळालं त्यादिवशीच विसरून गेलो. अशातच पुन्हा नवनव्या लेखनाचं आणि चळवळीचं वळवळणं डोक्यात सुरू झालं. कृषिजनसमूहाच्या जगण्याचं अंतरंग नव्याने मांडलं पाहिजे, असं वाटू लागलं. कृषिजनसंस्कृतीचं साहित्य या संदर्भातील जुळवाजुळव सुरू केली. आजतागायत ती सुरूच आहे. सर्व लोक उंच आवाजात म्हणताहेत, महाराष्ट्रात आता खेडी उरलीच कुठे? सर्वत्र नागरीकरण झालं आहे. असं बरंच काही. पण या साऱ्यांना आजचं खेडं माहीत आहे का, असा प्रश्न सतत मनात नकळत उगवत असतो. शेतीसंवेदन हे श्रमाशी जोडलं असल्यामुळे जोपर्यंत शेती आहे, अन्नधान्य शेतातच पिकवावं लागतं आहे तोपर्यंत कृषिजनसमूह अस्तित्वात असणार आहे. आणि त्याचं संवेदन नागर संवेदनेपेक्षा वेगळंच असणार आहे. याबाबतची मांडणी ठिकठिकाणी करत गेलो. नवंच काय काय डोक्यात उलगडणं सुरू झालं. साहित्यातल्या मान्यवर कळपांपासून सततच स्वत:ला वेगळं ठेवलं. तर ते आमचाच कळप आहे असं जोरजोराने ओरडू लागले. कळप ही आम्हा कोणाचीच गरज नाही. ज्यांची आहे तेच गावोगाव अड्डे निर्माण करून खेडय़ापाडय़ातल्या लिहिणाऱ्यांची अतोनात चेष्टा करत आहेत. कधी कधी कीव येते बिचाऱ्यांची. जगण्यात मातीचा स्पर्श नसणाऱ्यांना रचण्याचं भोंगळ तत्त्वज्ञान उभं करून स्वत:चे अड्डे निर्माण करावयाचे असतात. हे उमगल्यापासून सर्वापासून दूर राहणंच पसंत केलं. शेवटी आपल्याकडून जे काही थोडंफार लिहून होईल तेच आपलं असतं. बाकी सर्व फिजूल!

अशातही अनेक जण जिवाभावाचे वाटले. त्यांच्याशी कोणतंच अंतर न राखता मत्री केली. पण ज्यांचं काहीच पटलं नाही त्यांना अंगावर घेण्यात कधीच भीती वाटली नाही. कोणी आपल्याला आपलं म्हणावं असं कधीच वाटलं नाही. एकटय़ानं जगता जगता डगमगायची वेळही आली नाही. जगण्याच्या लढाईत बघता बघता बरेच दिवस निघून गेले. काठय़ाकुऱ्हाडींचं विस्मरण कधीच झालं. म्हातारा मरून गेला. चुलता वाकून आला. सारं विस्मरणात गेलं. पुस्तकं सोबत राहिली. जगण्याची लढाई लढता लढता श्रेयस-प्रेयसाचा विचार करायला सवडच मिळाली नाही. जेवढी उसंत लाभली तेवढय़ात पांढऱ्यावरचं काळं केलं. अजून मनात साचलेलं बरंच काही जसंच्या तसं आहे. ते प्रत्यक्षात उतरलं तर मग श्रेयस-प्रेयसाचा विचार कधी तरी करता येईल. सवडीने..

rajan.gavas@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2018 1:01 am

Web Title: author rajan gavas express in article about his struggle period in life
Next Stories
1 आणि ‘विज्ञान लेखक’ झालो..
2 जगलो, तेच लिहीत गेलो
3 नावीन्याचा अविरत शोध
Just Now!
X