दत्तात्रय पाडेकर

एका विशिष्ट वळणावर माझी कलेविषयीची विचारधारा निश्चित होत गेली. कलाजगत, आजूबाजूचं कलेचं वातावरण डोळसपणे पाहत होतो, निरीक्षण करीत होतो, विचार करीत होतो. अभिजात, सौंदर्यपूर्ण, कलात्मक, आव्हानात्मक, आनंददायी अशा कलेचा शोध घेत राहिलो. माझे पेन्टिंगचे काम सतत चालू होते. प्रत्येक वेळेला नावीन्याचा शोध घेत राहिलो आणि अनेक प्रदर्शनांमधून मला पारितोषिके मिळत गेली. कोणताही चित्रप्रकार असो, त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवायचे – असा माझा स्वभाव घडत गेला. त्यातूनच राष्ट्रपतींच्या हस्ते सलग तीन वर्षे ‘कॅलिग्राफर आणि डिझायनर’ म्हणून राष्ट्रीय पारितोषिके मिळाली..

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

लहानपणापासूनच मला चित्रकलेची प्रचंड आवड होती. पाटीवर अक्षरं गिरविण्यापेक्षा चित्र काढण्यातच मी रंगून जात असे. हे चित्र काढण्याचं वेड माझ्यामध्ये कुठून कसं आलं हे मला काही सांगता येत नाही. पण ही निसर्गदत्त देणगी असावी, असं मला वाटतं.

माझा जन्म अशिक्षित, गरीब, शेतकरी कुटुंबात झाला. एकत्र कुटुंबात वाढलो. संतवाडी, आळेसारख्या छोटय़ा खेडय़ात, निसर्गरम्य परिसरात बालपण गेलं. दोन्ही बाजूंनी मोठमोठे डोंगर, दऱ्या, ओढे, पायथ्याशी मळा. बैल, गुरं, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा हे घरचं पशुधन. सारं जीवन त्यांच्याभोवती फिरणारं. मोटा, नांगर, बैलगाडी ही खेडय़ातील संस्कृती होती. खेडय़ातील भोवतालचा निसर्ग, अनुभवलेले बालपण हेच पुढे माझ्या चित्रांचे विषय झाले. आम्हा सर्व भावंडांना बैलगाडी, घुंगुरमाळा, मोटेची ललकारी साद घालायची. त्यामुळे शाळेपेक्षा मळाच खूप आवडायचा. पण माझ्यामध्ये सर्वाना जरा जास्त हुशारी दिसली असावी. त्यामुळे शिकण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि माझी रवानगी गुजरातमध्ये झाली. गुजरातमध्ये बिलीमोरा येथे मराठी शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्या शाळेतील एकमेव गुरुजी दामोदर कृष्णाजी जोशी हे उत्तम कलावंत आणि आदर्श असे शिक्षक मला लाभले. शाईच्या दौतीमध्ये बोरू बुडवून सुंदर आणि वळणदार अक्षरं काढायला त्यांनीच शिकविले. पुढे जे.जे.मध्ये गेल्यानंतर कळलं की यालाच ‘कॅलिग्राफी’ म्हणतात. शाळेतील पाठय़पुस्तकं मला खूप आवडायची, त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यातील सुंदर चित्रं. ती चित्रं होती प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांची. ती चित्रं कुणी काढलेली आहे ते त्या वेळेला कळायचं नाही. पण ती चित्रं मात्र बालमनावर खोल ठसा उमटवून गेली आणि चित्रांबाबत एक वेगळ्या प्रकारची अभिरुची निर्माण झाली.

पाचवीपासून पुढे तेथे मराठी शाळाच नसल्यामुळे मी गुजराती माध्यमाच्या शाळेत दाखल झालो. तेथे मला भिखुभाई पटेल नावाचे एक उत्तम कलावंत चित्रशिक्षक लाभले. चित्रकलेच्या सर्व विषयांत ते निपुण होते. गुजरातचे कलागुरू रविशंकर रावळ यांचे ते शिष्य. त्यांनी मला चित्रकलेचं उत्तम संस्कार आणि कलादृष्टी दिली. त्यांनी माझ्यातला दडलेला चित्रकार शेधला होता. अमृता शेरगिल, रसिकलाल परीख, सोमालाल शाह, वासुदेव स्मार्त – अशा अनेक चित्रकारांच्या भारतीय शैलीच्या वेगळेपणाची ओळख शालेय वयात करून दिली. ‘कुमार’ या गुजराती चित्रकलेच्या मासिकातून चित्रकार माधव सातवळेकर, शंकर पळशीकर यांचीही ओळख झाली होती. ‘स्केचिंग’ हे शाळेपासूनच त्यांनी मला शिकविलं मी दहावी इयत्तेत असताना मला ‘गुजरात राज्य ललित कला अकादमी’चं पारितोषिक मिळालं. ते घेण्यासाठी त्यांच्या खर्चाने ते मला अहमदाबादला घेऊन गेले. तेथे मला थोर चित्रकार रविशंकर रावळ यांच्या घरी ते मला मुद्दाम घेऊन गेले. चित्रकाराचं घर (स्टुडिओ) काय असते ते तेथे अनुभवले. मुंबईचे ज्येष्ठ चित्रकार जगन्नाथ अहिवासी यांच्या हस्ते मला ते पारितोषिक मिळालं. काहीही अभ्यास न करता मी चांगल्या मार्काने पास होत असलो तरी माझं सर्व लक्ष चित्रं काढण्यातच होतं. कारण मला त्यातच खरा आनंद मिळत होता. ११ वी एस.एस.सी.मध्ये मी भिखुभाईंच्या सांगण्यावरून चित्रकला हा विषय घेतला होता अािण एस.एस.सी. बोर्डामध्ये मी चित्रकला विषयात गुजरात राज्यात पहिला आलो आणि मला त्या वेळेस (१९६७) एस.एस.सी. बोर्डाचं १०० रुपयांचं पारितोषिक मिळालं.

शालेय जीवनापासूनच मला नकळत अभिजात कलेचे धडे मिळत गेले आणि कलेची एक वेगळी अभिरुची निर्माण झाली. कलात्मक चित्रंच मला आवडायची. गुळगुळीत, घोटीव किंवा स्प्रेफिनिश चित्रं मला कधीच भावली नाही. एस.एस.सी नंतर पुढे उच्चकलेचं शिक्षण असतं याची मला काहीही कल्पना नव्हती. माझे चित्र शिक्षक भिखुभाई मला अमलसाड येथील कला महाविद्यालयात डी.टी.सी. (ड्रॉइंग टीचर सर्टीफिकेट हा अभ्यासक्रम करण्यासाठी घेऊन गेले आणि तेथील प्राचार्य जशुभाई नायक यांच्याकडे सोपवलं. ते पण उत्तम चित्रकार, कलाशिक्षक होते. ते जे.जे.चे धोंड सरांचे विद्यार्थी. तत्त्वनिष्ठ, गांधीवादी विचारसरणीच्या जशुभाईंकडून चित्रकलेबरोबर उत्तम समृद्ध जीवन जगण्याचे धडेही मिळाले. जशुभाईंनी एका वर्षांच्या कालावधीत अभिजात कलेच्या खूप गोष्टी शिकविल्या आणि चित्रकलेचा पाया मजबूत केला. तेथे मी ‘डी.टी.सी. आणि ‘एलिमेंटरी ड्रॉइंग एन्ड पेंटिंग’ या दोन्ही परीक्षा एकाच वर्षांत गुजरात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. भिखुभाई आणि जशुभाई दोघांनीही मला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचा सल्ला दिला आणि मी मुंबईत आलो.

जे. जे.च्या आवारात दोन कला महाविद्यालयं एक ‘फाइन आर्ट’ आणि दुसरं ‘अप्लाइड आर्ट’ किंवा ‘कमर्शियल आर्ट’. फाइन आर्टविषयी मला माहीत होतं पण ‘अल्पाइड आर्ट’विषयी मला काहीच कल्पना नव्हती. चित्रकलेत नवीन काही तरी शिकता येईल या उत्सुकतेपोटी मी सर ज. जी. उपायोजित कलामहाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे मी प्रत्येक शिक्षकाकडून काही ना काही शिकत गेलो. मुख्य उल्लेख करावासा वाटतो ते चित्रकार व्ही. एस. गुर्जर, वसंत सवाई, मनोहर जोशी आणि रवी परांजपे सर. या चित्रकारांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. या सर्व चित्रकारांमध्ये एक समान सूत्र होतं. ते म्हणजे अप्रतिम, सशक्त, सुंदर रेखांकन. ती सर्वात मोठी ताकद आहे. रेखांकनाचा पाया मजबूत असेल आणि सौंदर्यसृष्टी असेल तर चित्रकलेतला कोणताही विषय सहज सुंदर करू शकतो अशी माझी पक्की धारणा झाली. कलेची कोणतीही गोष्ट मुळापासून समजून घेऊन शिकण्याची सवय जडली. चित्रकलेच्या सर्व विषयांत आपण प्रावीण्य मिळविलं पाहिजे, अशी भावना माझ्या मनात होती. त्याप्रमाणे मी प्रयत्न करीत गेलो आणि खूप गोष्टी सहजसाध्य होत गेल्या. प्रत्येक वर्षी माझा पहिला नंबर येत गेला. ‘फ्रीशिप’ आणि ‘स्कॉलरशिप’मुळे शिक्षण घेणं मला सोप्प झालं. उपयोजित कला, ‘फाइन आर्ट’ डिप्लोमा, ‘आर्ट मास्टर’ -या सर्व परीक्षा मी प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो.

कॉलेज संपल्यानंतर लगेच माझी सर. जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयात असिस्टंट लेक्चरर म्हणून नेमणूक झाली आणि माझा कलेचा प्रवास सुरू झाला. मी शिकवत होतो आणि शिकतही होतो. मी उपयोजित कला विभागात शिकवत होतो पण माझा ओढा सतत अभिजात कलेचाच राहिला. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग, मुद्राचित्र (प्रिंट मेकिंग) आणि शिल्पकला हे दोन-दोन वर्षे (हॉबी क्लास) शिकलो. जे.जे.च्या भिंती खूप काही शिकवत होत्या. भिंतीवरील चित्रांचं निरीक्षण करण्यात, शिकण्यात खूप आनंद वाटत होता. भोंसुले, त्रिंदाद, पळशीकर, देऊसकर, आचरेकर, हळदणकर, गुर्जर, लँगहॅमर, पद्मशाली आणि फ्रेडरिक जॉर्ज स्वाईश (न्यूड ड्रॉइंग) या कलवंतांची जे. जे. तील चित्रं आजही पाहताना त्यात हरवून जातो ही त्या चित्रांची ताकद आहे. पुस्तकांमधूनही अनेक चित्रकारांचा अभ्यास करता आला. ‘अमेरिकन इलस्ट्रेटर्स’च्या पुस्तकातील अनेक चित्रकारांच्या कामामुळे मी खूप प्रभावित झालो. यातील प्रत्येक चित्रकाराची रेषा, शैली वेगळी आणि प्रभावी होती. ती सर्व बोधचित्रं माझ्या दृष्टीने अभिजात कलाकृती होत्या कारण त्या चित्रांचा उच्च, कलात्मक दर्जा.

आपली कला लोकांसमोर यायला हवी ही सुप्त इच्छा प्रत्येक कलावंताला असते. तशी संधी मला ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या प्रकाशन संस्थेत ‘इलस्ट्रेटर’ म्हणून मिळाली. मी जे. जे.मधील अध्यापनाचं काम सोडून ‘टाइम्स’मध्ये इलस्ट्रेटर म्हणून रुजू झालो. मला माझ्या आवडीचं काम मिळालं. लँगहॅमर, पी.जी. सिरुर, मारिओ मिरांडा, प्रभाशंकर कवडी, रवि परांजपे, वसंत सवाई, शंतनु माळी यांच्यासारख्या मातब्बर चित्रकारांची कारकीर्द डोळ्यासमोर होती. मी येथे इलस्ट्रेशनमध्ये अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. स्क्रीन, स्क्रेपर बोर्ड, फोटोग्राम, प्रिन्टस्सारख्या विविध माध्यमांचा वापर इलस्ट्रेशनमध्ये केला. अल्पावधित लोकांना माझं काम चांगल्या प्रकारे माहीत झालं. मला माझ्या आवडीचं भरपूर काम करायला मिळालं आणि चित्रनिर्मितीचा खूप आनंद घेता आला. यथावकाश विचारधारा न पटल्यामुळे मी नोकरी  सोडली आणि अभिजात कलेमध्ये माझा मुक्त वावर सुरू झाला.

या विशिष्ट वळणावर माझी कलेविषयीची विचारधारा निश्चित होत गेली. माझ्या मनाने कलेविषयी कोणत्याही गोष्टींचा आंधळेपणाने कधीच स्वीकार केला नाही. कलाजगत, आजूबाजूचं कलेचं वातावरण डोळसपणे पाहत होतो, निरीक्षण करीत होतो, विचार करीत होतो. अभिजात, सौंदर्यपूर्ण, कलात्मक, आव्हानात्मक, आनंददायी अशा कलेचा शोध घेत राहिलो. माझं पेंन्टिंगचं काम सतत चालू होतं. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन यांसारख्या अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कला प्रदर्शनांमध्ये भाग घेत होतो. प्रत्येक वेळेला नावीन्याचा शोध घेत राहिलो आणि अनेक प्रदर्शनांमधून मला पारितोषिकं मिळत गेली. माझा उत्साह दुणावत गेला. एक प्रकारे कला प्रदर्शनाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं व्यसनच जडलं. कोणताही चित्रप्रकार असो, त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवायचं – असा माझा स्वभाव घडत गेला. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, रेखांकन, मुद्राचित्र, शिल्पकला, बोधचित्र, पोस्टर, कॅलेन्डर, कॅम्पेन, कॅलिग्राफी – या सर्व विषयांमध्ये अनेक पारितोषिकं मिळाली. राष्ट्रपतींच्या हस्ते सलग तीन वर्ष ‘कॅलिग्राफर आणि डिझायनर’ म्हणून राष्ट्रीय पारितोषिकं मिळाली.

सगळीकडे कलेच्या वातावरणात गडबड, गोंधळ, कोलाहल दिसत होता. कोणालाही शांतपणे विचार करावासा वाटत नव्हता. आजचे कलाप्रवाह पाहताना जाणवतं की, हे सर्व दिशाहीन वाहवत जात आहे. आपल्याकडे साधारण १९६०-७० च्या दशकानंतर आधुनिक कलेचे वारे वाहू लागले, नव्हे तर मोठी वावटळच आली आणि सारा पाला-पाचोळा वर गेला आणि भिरभिरत राहिला. अगम्य, अतक्र्य, दुबरेध, सौंदर्यहीन – अशा प्रकारची चित्रं मला नेहमी कलाहीन वाटत राहिली. माझ्या दृष्टीने ‘समकालीन कला’ ही अल्पकालीन कला किंवा ‘कंटेम्पररी आर्ट’ ही ‘टेंपररी आर्ट’ झाली. तसेच एखादा फोटो घेऊन फोटोसारखं हुबेहूब, गुळगुळीत चित्र करणं हेही ना कधी कलात्मक वाटलं, ना आव्हानात्मक. अशी चित्रं मला कधी भावलीच नाही. एखाद्या कलाकृतीचा दृश्यानुभव किंवा आस्वाद शब्दात मांडणं कधी कधी कठीण होतं.

आजच्या या ‘प्रचार’ माध्यमांच्या आणि इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी तपासून पाहणं अनिवार्य झालं आहे. कारण प्रत्येक गोष्ट ‘अर्थ’कारणाशी जोडली गेली. ‘कला’ बाजूला राहिली आणि ‘बाजार’ सुरू झाला. कला समीक्षक, गॅलरीवाले, चित्रविक्रेते, कलासंग्राहक, चित्रलिलाव करणाऱ्या संस्था, गुंतवणूक करणारा खरीददार – या सर्वाचा केंद्रबिंदू केवळ पैसाच झाला आणि कला ही परिघाबाहेर गेली. व्यक्तिपूजा आणि पैसा या पायी कागदावर मारलेल्या रेघोटय़ाही कलाकृती ठरू लागल्या. यामुळे अभिजात कलेला ना प्रोत्साहन मिळाले, ना कलेचा फायदा झाला, ना कलावंताचा.

या सर्व गोंधळात ‘कला कोणाला समजते’ हा मूळ प्रश्न मला नेहमी सतावत राहिला. वर उल्लेख केलेल्या आर्थिक कलाव्यवहारासंबंधीच्या सर्व घटकांचा, कला समजण्याशी किंवा कलेचा आस्वाद घेण्याशी, दुरान्वयेही काही संबंध असेल असं मला वाटत नाही. (टाटासारखा सन्माननीय अपवाद वगळता.)

चित्रकला म्हणजे केवळ व्यक्त होणं हा विचार मला कधी पटलाच नाही. व्यक्त होताना त्यात सौंदर्य, कलात्मकता असायला हवी असा विचार मनात दृढ होत गेला. मी अनुभवलेलं खेडय़ातील जीवन, संस्कृती, निसर्ग, पशू-पक्षी, त्यातील सौंदर्य, लालित्य आणि चित्र या माध्यमासाठी योग्य असे विषय मी निवडले.

निसर्गचित्रं, बहर, स्लीपिंग ब्युटी, मंथन, आठवडय़ाचा बाजार, द्वंद्व, बहरलेली पायवाट, प्रतिबिंब, भारवाही, वाळवंटाचं गाणं – अशा विविध विषयांवर मी चित्रमालिका केल्या. तैलरंग, जलरंग, पोस्टर कलर, अ‍ॅक्रेलिक कलर, पेन्सिल, कॉन्टे, माऊंटबोर्ड, ज्यूट, सील्कचं कापड अशा विविध माध्यमांचा विषयानुरूप उपयोग केला. चित्राची शैली ढोबळ मानाने वास्तवदर्शी असली तरी त्यात अमर्याद शक्यता आहे हेही लक्षात आले. प्रत्येक वेळी माझा चित्रनिर्मितीचा आनंद सुखावणारा असतो. प्रत्येक प्रदर्शनाच्या वेळी नवीन काय घडणार आहे याची माझी मलाच उत्सुकता असते. विषय सुचतात आणि चित्रं घडत जातात – हा माझ्यासाठी एक सुखद, आनंददायी प्रवास असतो.

१९८१ मध्ये माझं पहिलं चित्र प्रदर्शन निसर्गचित्रांचं केलं होतं आणि त्या प्रदर्शनाचं उद्घाटन शंकर पळशीकर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. निसर्गचित्रांची शैली वास्तवदर्शी असली तरी पोस्टर रंगाचे रंगलेपन हे पारंपरिक शैलीने न करता ते तैलरंगाच्या माध्यमाप्रमाणे वापरलं होतं.

माझ्या तैलचित्रांचं प्रदर्शन, २००४ मध्ये लंडन येथील ‘बिरला मिलेनियम आर्ट गॅलरी’मध्ये भरलं होतं. परदेशात- तेही लंडनसारख्या कलासंपन्न शहरात प्रदर्शन करणं, हा आनंददायी अनुभव होता. प्रदर्शनाच्या निमित्ताने दीड महिना लंडन येथील वास्तव्यात सर्व कलासंग्रहालये पुन:पुन्हा पाहिली. मूळ चित्रं पाहण्यात, अभ्यासण्यात वेगळा आनंद आहे. तसंच पॅरिस, फ्लॉरेन्स येथील जगप्रसिद्ध कलासंग्रहालय मनसोक्त पाहण्याची संधी मिळाली आणि माझी कलादृष्टी समृद्ध होत गेली. तसंच सर्व प्रदर्शनांमधील कलारसिकांचा प्रतिसादही सुखावणारा, स्फूर्तिदायक आणि मनाला नवीन उभारी देणारा असतो. पुढच्या प्रदर्शनासाठी आणखी काही तरी नावीन्यपूर्ण, सुंदर, भव्य-दिव्य करायची ऊर्जा मिळत राहाते. असं असलं तरी माझं फार समाधान होत नाही. कारण माझ्यासमोर उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या अजरामर कलाकृती असतात. त्या दर्जाचं काम व्हावं असं मनोमन वाटत राहातं. ‘हाऊ डीड यू पेंट दॅट?’ आणि ‘१०० वेज् टू पेन्ट पीपल ’ (व्हॉल्युम २) या चित्रकलेच्या आंतरराष्ट्रीय पुस्तकात माझा समावेश होता. तसेच ‘द वर्ल्ड एन्सायक्लोपिडीया ऑफ कॅलिग्राफी’ या न्यू यॉर्कहून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथामध्ये माझ्या देवनागरी आणि गुजराती कॅलिग्राफीच्या दहा पानांचा सहभाग होता. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या कामाची घेतली गेलेली दखल मला प्रोत्साहित करून गेली.

आजही चित्र काढण्याची ऊर्मी, आस, आवड तशीच आहे. मी माझ्या आवडीप्रमाणे चित्र काढण्यात रंगून जातो आणि त्यात चित्रनिर्मितीचा आनंद असतो. तोच आनंद इतरांना मिळावा अशी इच्छा असते. माझ्यासाठी तेच प्रेयस आहे.

आता इंटरनेटमुळे जगातल्या उच्च दर्जाच्या असंख्य कलाकृती सहज पाहता येतात. अल्फ्रेड स्टीवन्स, एडवीन लॉर्डवीक्स, आल्मा टाडेमा, कार्नेलु बाबा, वॉटर हाऊस, नीकोलाय फेचीन, फॉच्युनी, सोरोल्ला, अ‍ॅन्ड्र वाईथ, आल्वारो.. – अगणित. आपण शोधत जातो आणि नवनवीन सापडत जातात. अनेकदा कलावंत माहीत नसतो परंतु कलाकृती पाहून आपण थक्क होतो. मला तो अखंड वाहणारा प्रेरणास्रोत वाटतो. उत्तम अभिजात कलाकृती कधीही कालबाह्य़ होत नाही असं मला वाटतं.

आपल्या आवडीचं संगीत ऐकताना आपण त्यात तल्लीन होतो, हरवून जातो. त्याच प्रमाणे उच्च दर्जाची चित्रं – शिल्पं पाहताना आपण त्यात हरवून जातो, तल्लीन होतो, अंतर्मुख होतो आणि परमानंदाची अनुभूती येते. पुन:पुन्हा ती पाहाविशी वाटतात आणि पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. चित्रशिल्पाची ही कलात्मक भाषा देश, जात, धर्म, पंथ या पलीकडे वैश्विक वाटते. माझ्या दृष्टीने हे श्रेयस होय!

dattatrayapadekar3@gmail.com

chaturang@expressindia.com