15 August 2020

News Flash

डॉक्टरकी नव्हेच व्रत!

बाबांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बर्मा फ्रंटवर डॉक्टर म्हणूनही काम केलं होतं

डॉ. रवी बापट

माझ्या आवडत्या लेखकाप्रमाणे- आचार्य अत्र्यांच्या तत्त्वाप्रमाणे मी आनंदानं जगलो. जिथं डोकावून पाहावंसं वाटलं, तिथं डोकावलो, वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात हात घालावासा वाटला तर मी झरा झालो, उंच डोंगरावर जावंसं वाटलं मी तो डोंगरच झालो, माझ्या प्रत्येक रुग्णाबरोबर मी तो तो आजार भोगला, त्याची वेदना माझी मानली व दु:खातून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एक विचारसरणी मानतो, मानवतेच्या कल्याणाची!

आयुष्यभर मी डॉक्टरकीचा व्यवसाय केला. व्यवसाय कसला, ते व्रतच स्वीकारलेलं मी! आला रुग्ण की बरा कर आणि त्याला जगायला पाठवून दे, एवढंच मी केलं. सर्वाचं आरोग्य उत्तम असावं, ज्यानं त्यानं आनंदानं जगावं, ज्याचा जसा स्वभाव तसा तो जगावा इतकी माफक अपेक्षा मी आयुष्याकडून ठेवली आणि आयुष्यानं ती पुरवलीही.

आमच्या आडनावावरून कोणाला वाटावं की आम्ही रत्नागिरी किं वा पुण्याचे असू. पण तसं नव्हतं. आम्ही बापट हे होशंगाबाद जिल्ह्य़ातील हरद्याचे बापट! भाषावार प्रांतरचना होण्यापूर्वीच्या मध्य प्रांतातले. महाकोशल, छत्तीसगड, विदर्भातील आठ जिल्हे मिळून हा भाग बनला होता. आमचं कुटुंब छानपैकी पसरलेलं होतं. आमचे आजोबा रेल्वेत नोकरी करत, पण त्यांचा छंद होता वैद्यकीचा. त्यांना वैद्यकीचं उत्तम ज्ञान होतं. माझ्या बाबांनी एम. बी. बी. एस. केलं आणि सरकारी नोकरी करण्याचं ठरवलं. हा खूप मोठा निर्णय होता त्यांचा. या निर्णयाचाच नंतर माझ्यावर सकारात्मक परिणाम झाला. (मी व्रत म्हणूनच सरकारी रुग्णालयात के. ई. एम. मध्ये नोकरी केली, यामागे बाबांचा हा निर्णय असावा.)

बाबांची पहिली पोिस्टग झाली ती दुर्गला, दुसरी पोस्टिंग झाली ती वध्र्याला. त्या वास्तव्यात माझा जन्म झाला. बाबांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बर्मा फ्रंटवर डॉक्टर म्हणूनही काम केलं होतं. त्यामुळे ते फारसे घरात नसत. त्यामुळे आम्हा भांवडांची, मी व प्रकाश, आमची गाठ आईबरोबर असे. माझी आईही डॉक्टर होती. त्या काळात ती एम. बी. बी. एस. झाली होती. तीही बाबांबरोबर बदलीमुळे या गावातून त्या गावात जात असे. जिथं जाई तिथं ती लोकप्रियता मिळवे. एकतर तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता, त्या काळात स्त्री-डॉक्टर फार कमी होत्या. तिची फी अतिशय कमी होती. सुरुवातीला ती दोन रुपये घेत असे, नंतर तिनं ती वाढवून पाच रुपये केली. पण ज्या रुग्णांना तीही परवडत नसे, ते तिला काही ना काही फळ-फळावळ किंवा गुळाची ढेप असं काही आणून देत. कित्येक वेळा रुग्णांना औषध घ्यायला पैसे नसत, तर आई स्वत:जवळचे पैसे त्यांना देत असे. त्या काळात, म्हणजे पन्नास-साठच्या दशकात आईने अशिक्षित स्त्रियांना  संततीनियमनाच्या साधनांविषयी जागृत केलं होतं. ती पुण्या-मुंबईस कधी गेली की बाजारातून घाऊक भावानं संततीनियमनाची साधनं विकत घेऊन त्या स्त्रियांना देत असे.

अशा आई-वडिलांच्या पोटी जन्म मिळणं ही एक भाग्याची गोष्ट किंवा नियतीचा खेळ! मी धार्मिक वृत्तीचा अजिबात नाही. माझी आई सावरकरी विचारांची होती. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात तिनं प्रायोपवेशन केलं व देह सोडला. ती अजिबात जातपात मानत नसे. माझा भाऊ  प्रकाश हा फारसा अभ्यास करत नसे, ‘हॅपी गो लकी’ स्वभावाचा होता. त्यानं अभ्यास करावा म्हणून तिनं हस्ते नावाच्या एका हुशार दलित मुलाला आमच्या घरी राहायला आणलं. हस्ते नंतर बोर्डामध्ये मेरीटला आला व प्रकाशही फायटर पायलट झाला. आमच्या घरी देवाच्या तसबिरी नव्हत्या. परीक्षेला जाताना घरच्या मोठय़ांना नमस्कार करून बाहेर पडायचं हा प्रघात होता. त्यामुळे मी तिच्या पठडीत तयार झालो. मी फक्त एक विचारसरणी मानतो, मानवतेच्या कल्याणाची!

माझ्या बाबांची सतत बदली होत असे. त्यामुळे दहावीपर्यंतचं माझं शिक्षण सात गावांत सात वेगवेगळ्या शाळांत झालं. कधी कधी गमतीनं मला वाटतं, मी सात गावचं शिक्षण घेतलं – बालाघाट, पुणे, अमरावती, वाशिम, छिंदवाडा, जगदाळपूर व परत बालाघाट! त्यामुळे झालं असं की प्रत्येक गावात नवे मित्र, नवं जगणं आणि नवं शिक्षण! प्रत्येक शाळेची स्वत:ची अशी संस्कृती असते. ती ती संस्कृती मला शिकायला मिळाली. पण त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीशी समायोजन करण्याचं सामर्थ्यही मिळालं. बाबांचा आग्रह होता मातृभाषेतच शिक्षण घेण्याचा. त्यामुळे माझी मातृभाषा पक्की झाली. हिंदी व मराठी या दोन्ही भाषांत मी पारंगत झालो. आमच्या घरी फक्त एकच अट असायची, पहिले पाँचमें आना. पहिल्या पाचात नंबर आलाच पाहिजे, म्हणजे तुम्ही हुशार आहात, हे सिद्ध होते. मी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्य़ात पहिला आलो. उच्च शिक्षणासाठी मला मुंबईत तारामावशीकडे पाठवण्यात आलं. मी रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पक्का मुंबईकर झालो. मेडिकलचं शिक्षण मी मनापासून घेतलं. इंटर्नशिप करताना मी माझ्या काही ज्युनिअर्सच्या अभ्यासातल्या काही अडचणी सोडवू लागलो, त्या अडचणी समजावून देताना मला कळलं की माझ्यात शिकवण्याचं कौशल्य आहे. मी साध्या, सोप्या शब्दांत अवघड विषय समजावून देऊ  शकतो. मग मी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवू लागलो ते आजतागायत. मी जसा वृत्तीनं डॉक्टर आहे तसाच शिक्षकही आहे. ज्ञानदान करताना विद्यार्थीही मला घडवतो, तो मला नवं काही शिकवण्यासाठी प्रेरित करतो, असं मला वाटत रहातं. कारण त्याची ही प्रेरणा मला तोच परिचित विषय नव्यानं बघायला भाग पाडते व त्या विषयाचे नवनवे पैलू उलगडले जातात.

आजचा मेडिकलचा विद्यार्थी हा केवळ मेडिकल एके मेडिकल करतो. जीवनाच्या अन्य अंगांचा तो विचारच करत नाही. पण जे विद्यार्थी कला, क्रीडा क्षेत्रात काही खास कामगिरी बजावतात किंवा जे काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी मी परीक्षापूर्व काळात रात्री नऊ  ते बाराच्या दरम्यान खास शिकवण्या घेत असे. हे माझे मोफत क्लासेस त्या काळात खूप गाजले. आणखी एक गोष्ट मी आनंदानं करत असे. जी मुलं इंटर्नशिप करत होती, त्या निवासी डॉक्टरांना दररोज अभ्यासाला मुळीच वेळ मिळत नसे, मग रविवारी मी त्या मुलांसाठी सकाळी नऊ  वाजल्यापासून स्वतंत्र वेळ देऊन शिकवत असे. याला वेळेचं बंधन नसे. आमचे एम. एस. चे विद्यार्थी जितके रुग्ण घेऊन येत असत, तितक्या रुग्णांच्या आजारांवर मी भाष्य करत त्यांना समजावू देत असे. थोडीशी आत्मस्तुती वाटेल तुम्हाला, पण माझे रविवारचे हे क्लासेस

‘आर. डी. बी. ज् क्लिनिक्स’ या नावानं प्रसिद्ध झाले होते. या माझ्या क्लिनिक्सना फक्त जी. एस. मेडिकलचेच नव्हे तर मुंबईतल्या सर्व मेडिकल् कॉलेजेसचे विद्यार्थी येत असत. माझ्या आजवरच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेताना, मला ज्या गोष्टींनी सर्वाधिक समाधान दिलं ते या क्लासेसनी. त्यावेळचे माझे विद्यार्थी जगभरात शल्यचिकित्सक म्हणून नाव मिळवून आहेत. ते जेव्हा जेव्हा भेटतात, तेव्हा तेव्हा सांगतात, सर, तुमची क्लिनिक्स आम्ही अटेंड करत असू, त्यातून आम्ही घडलो आहोत. अशा वेळी वाटतं, की आपण जरी अमाप पैसा मिळवला नसेल, पण हे विद्यार्थी, हे बरे झालेले रुग्ण हीच आपली खरी संपत्ती. मला नेहमी वाटतं, शिक्षकी पेशा हा लादून घेण्याची गोष्ट नाही तर ती, आतून वाटण्याची गोष्ट आहे, तुम्ही वृत्तीनं शिक्षक असला पाहिजेत. मला, माझं दोन शब्दांत जर वर्णन करायला सांगितलं, तर ते मी ‘शिक्षक डॉक्टर’ असं करीन. मला नेहमी असं वाटतं की एक डॉक्टर हा आधी चांगला माणूस असायला हवा, त्याच्याजवळ नम्रता हवी, तो काही परमेश्वर नाही तर तो रुग्णाचं आरोग्य सुधारवणारं एक माध्यम आहे हे त्यानं जाणून घ्यायला हवं. त्याच्याजवळ सर्वाना एकसारखं मानणारी समत्व दृष्टी हवी आणि त्याच्या अंत:करणात आईसारखं ममत्त्व हवं.

मला ज्या मंडळींना आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, अशा लोकांपर्यंत पोचावं असं नेहमी वाटत आलंय. कुलाबा जिल्ह्य़ाचे (आताच्या रायगड जिल्ह्य़ाचे) खासदार भाऊसाहेब राऊत यांच्या पुढाकारामुळे मी कर्जतजवळच्या कशेळेसारख्या खेडय़ांत अनेक मेडिकल कँप्स आयोजित केले आहेत. पहिला कँप आम्ही त्यांनीच सुरू केलेल्या एका शाळेत घेतला. त्यावेळी भाऊसाहेबांचे चिरंजीव बाबुराव, सुमंतराव आणि मनोहर, त्यांचे डॉक्टर जावई डॉ. तिटकारे, स्थानिक कार्यकर्ते पुढे आले. आमच्यासोबत माझी पत्नी डॉ. अरुणा, डॉ. अविनाश सुपे, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. महेश गोसावी, डॉ. नीला जोशी, डॉ. मोहन अग्रवाल, डॉ. मनोहर मुद्रस आदी सात आठ डॉक्टर मंडळींची टीम तयार झाली. आम्ही सारे कर्जतला पोहोचलो. तिथं जाण्यापूर्वी आम्ही काही औषधांच्या पुडय़ा सोबत तयारच ठेवल्या होत्या. त्यात पोटदुखीची औषधं, जंताची औषधं, पाण्यापासून होणारे विकार, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आदी औषधे होती. तपासणीअंती काही रुग्णांना मुंबईतील उपचारांची गरज होती, शस्त्रक्रियेची गरज होती. त्यांना स्वयंसेवक के. ई. एम. मध्ये घेऊन आले. के. ई. एम. ची भव्यता पाहूनच त्या बारा रुग्णांपैकी काही पळून गेले. ती निसर्गमुलं होती, शहराच्या त्या थक्क करणाऱ्या व माणूस म्हणून शून्य किंमत देणाऱ्या जगाला ते घाबरले, त्या निसर्गमुलांना उत्तम आरोग्याचं निसर्गफूल देण्याचा आमचा प्रयत्न होता, पण त्या बारांपैकी फक्त दोनच राहिले. नंतर ते रुग्ण बरे झाले, हे पाहून पुढच्या वेळी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. स्वातंत्र्यानंतरही इतकं अज्ञान समाजात आहे, हे पाहून आम्ही त्यानंतर अनेक वर्ष ही आरोग्य शिबिरं आयोजित करत असू.

मला माझ्या पेशाचा अभिमान आहे. या पेशाला कोणी काही नावं ठेवली तर माझं पित्त खवळतं. आम्ही जेव्हा मेडिकलचे पदव्युत्तर विद्यार्थी होतो, तेव्हा आम्ही निवासी डॉक्टरांचा संप घडवून आणला होता, तो भारतातलाच नव्हे तर जगातला पहिला अशा स्वरूपाचा संप होता. आम्हाला त्या वेळी अतिशय तुटपुंजे वेतन मिळत असे, अक्षरश: तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांइतका पगार आम्हाला देत असत. निवासी डॉक्टरांना जेमतेम १५७ रुपये पगार होता, तर रजिस्ट्रारला १९० रुपये मिळत असे. सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, की हे निवासी डॉक्टर म्हणजे विद्यार्थी आहेत, त्यांना विद्यावेतन आपण देत आहोत, तर आमचं म्हणणं होतं की आम्ही पूर्ण वेळ डॉक्टर आहोत आणि आम्हाला स्वतंत्र प्रॅक्टिस करायला मान्यता आहे, त्या दृष्टीनं आमचं विद्यावेतन ठरवलं पाहिजे. ज्या काळात दूरध्वनी नव्हते त्या काळात, आम्ही महाराष्ट्रभर आमचे सहकारी प्रत्यक्ष पाठवले व राज्यभरातील, देशभरातील विविध ठिकाणच्या इंटर्न डॉक्टरांचा पाठिंबा मिळवला. १७ दिवस संप चालला होता. आम्ही काही जण अग्रेसर होतो. एकदा आमच्या संपात मध्यस्थी करायला बॅ. नाथ पै आले होते. त्यांनी त्यांच्या अद्भुत वक्तृत्वानं आम्हाला संप मागे घ्यायला लागेल अशी स्थिती निर्माण केली, पण मी त्या वेळी आग्रही भूमिका घेतली व ‘जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आम्ही संप मागे घेणार नाही,’ असं त्यांना सांगितलं. त्या दरम्यान आदरणीय डॉ. व्ही. एन. शिरोडकर यांनी आमची भेट घेतली, आमची भूमिका त्यांनी समजावून घेतली आणि थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना फोन लावला, दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री डॉ. रफिक झकेरिया, महापालिकेचे जे. बी. डिसूझा आणि आमची बैठक बोलावली. डॉ. शिरोडकरांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली. नाईक साहेबांनी सर्व ऐकून घेतलं, झकेरियांना विचारलं की, ‘‘ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का?’’ ते ‘हो’ म्हणाले, डिसूझांनीही मान्यता दिली आणि १५ मिनिटांत आमचा १७ दिवस चाललेला संप संपला. आम्हाला ४०० ते ५०० रुपये पगार मिळू लागला. आमच्या ठोस भूमिकेचा विजय झाला, पण त्याहीपेक्षा समाधानाची गोष्ट म्हणजे आम्ही न्याय मिळवू शकलो.

एक डॉक्टर या नात्यानं मी अनेक प्रयोग केले. माझं स्वत:चं एक निरीक्षण सांगतो. आपण जे मेडिकल सायन्स शिकवतो, ते पाश्चिमात्य आहे. पाश्चिमात्य सांगतात, ते प्रमाण मानण्यापेक्षा आपण आपल्या अनुभवाअंती रुग्णावरील उपचारप्रक्रिया ठरवावी, असं माझं मत आहे. मी त्या दृष्टीने बरेच प्रयोग करत राहिलो. ज्या रुग्णांच्या अन्ननलिका काही कारणानं संकुचित होतात किंवा अ‍ॅसिड वगैरे पोटात गेल्यानं जळतात, अशा अन्ननलिका रुंद करण्यासाठी एक प्रयोग मी केला. एकदम एखादी जाड रबरी नळी घालून ती रुंद करण्याचा प्रयत्न केला, तर अन्ननलिकेला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून आधी छोटय़ा नळीनं, नंतर अधिक रुंद नळीनं शेवटी अधिक रुंद नळीनं अन्ननलिका टप्प्याटप्प्यानं रुंद करून पाहिली. त्यासाठी मी रुग्णाला एक अखंड धागा पाण्याबरोबर गिळायला सांगतो, त्या धाग्याला एंडोस्कोपीच्या साहाय्यानं जठरात आणलं जातं, नंतर जठराला एक भोक पाडून त्यातून तो धागा बाहेर काढला जातो व वरचे आणि खालचे टोक नीट चिकटवले जाते. धाग्याच्या जठराकडील टोकाला एक पातळ रबरी नळी बांधून ती तोंडामधील अखंड धाग्याच्या मदतीनं खेचायची, अशा प्रकारे तीन अधिकाधिक रुंद होत जाणाऱ्या नळ्या वापरून अन्ननलिका रुंद करायची अशी पद्धत मी रूढ केली. माझे विद्यार्थी याला ‘बापट डायलेटर’ असं म्हणतात. या पद्धतीनं जेव्हा एखादा रुग्ण बरा होतो, त्या वेळी मनाला झालेला आनंद, हृदयाला मिळालेलं समाधान अवर्णनीय असतं. अशा स्वरूपाचे अनेक प्रयोग आम्ही करत आलो आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरनं रुग्णाचा विश्वास संपादन केला पाहिजे. दुसरं म्हणजे त्या रुग्णाला त्याच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची यथायोग्य जाणीव करून दिली पाहिजे. रुग्ण तयार झाल्यानंतर मगच प्रयोगाला सुरुवात केली पाहिजे.

माझ्या विद्यार्थ्यांना मी एकच गोष्ट नेहमी सांगत आलोय, ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत रुग्णाचं हित लक्षात घेतलं पाहिजे. मला स्वत:ला मेडिकल रिपोर्टपेक्षा, रुग्णाला प्रत्यक्ष तपासण्यावर भर द्यायला अधिक आवडतं. कित्येकदा ठरीव पद्धतीच्या उपचारांपेक्षा रुग्णाच्या प्रत्यक्ष तपासणीतून आणि त्याच्या मेडिकल हिस्ट्रीमधून रोगाचं निदान व्हायला मदत होते.

माझ्या मनात एक कायमस्वरूपी खंत आहे, आपल्या मराठी माणसांना आपल्या मातृभाषेचा अजिबात अभिमान नाही ही ती खंत. मी मातृभाषेतच शिक्षण घेतलं, माझ्या मुलांनीही मातृभाषेतच शिक्षण घेतलं. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांपेक्षा शाळेला अधिक महत्त्व दिलं जातं, ही माझ्या मनातली दुसरी खंत. शाळेला शोधत पालक का जातात? अमुक एका शाळेतच प्रवेश हवा असा त्यांचा आग्रह का असतो, हे कळत नाही. शाळेला कोण मोठं करतं याची पालकांना जाणीव नाही. विद्यार्थी शाळेला घडवतात, शिक्षक शाळेला घडवतात हे समजून घ्यायला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांच्या ग्रहणशक्तीला पालकांनी व शाळांनी जोखलं पाहिजे व त्याला झेपेल असं शिक्षण दिलं पाहिजे. इंग्रजी भाषा ही जागतिक महत्त्वाची आहेच, पण ती मातृभाषेची जागा घेऊ  शकत नाही, हे समजून घ्यायला हवंय. रुग्णसंवादासाठी स्थानिक भाषा यायलाच हवी ना! आता हेच बघा ना, पोटातल्या जळजळीसाठी बळेत्रा हा शब्द गुजरातीत वापरला जातो, जर हा शब्द डॉक्टरला माहिती नसेल, तर तो रुग्णाशी काय कपाळ संवाद साधणार? मेकॉले एकदा म्हणाला होता, ‘भारतीयांना इंग्रजी शिकवा, ते बटीक होतील.’ आज तसंच झालंय! सर्व स्थानिक भाषांचा सन्मान केला पाहिजे. पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या उद्घाटनाच्यावेळी माजी पंतप्रधान नरसिंह राव म्हणाले होते, ‘‘सर्व भारतीय भाषा या भगिनीभाषा आहेत.’’ या भगिनीभावाचा आपण सन्मान केला पाहिजे.

आज आयुष्याच्या या टप्प्यावरून मागे बघताना मला जाणवतं, की माझ्या आवडत्या लेखकाप्रमाणे- आचार्य अत्र्यांच्या तत्त्वाप्रमाणे मी आनंदानं जगलो. जिथं डोकावून पाहावंसं वाटलं, तिथं डोकावलो, वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात हात घालावासा वाटला तर मी झरा झालो, उंच डोंगरावर जावंसं वाटलं तर मी तो डोंगरच झालो, माझ्या प्रत्येक रुग्णाबरोबर मी तो तो आजार भोगला, त्याची वेदना माझी मानली व दु:खातून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आदरणीय तात्यासाहेब शिरवाडकर लिहितात तसं, सुखी आणि समाधानी आयुष्याचं गुलबकावलीचं फूल मला लाभलंय.

शब्दांकन- नितीन आरेकर

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 4:18 am

Web Title: dr ravi bapat article sharing experience with patients
Next Stories
1 जगण्याची लढाई
2 आणि ‘विज्ञान लेखक’ झालो..
3 जगलो, तेच लिहीत गेलो
Just Now!
X