डॉ. तारा भवाळकर

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हा केवळ भूतकालीन गौरवाचा आणि उमाळे काढण्याचा विषय नसून समाजाचा अनेक अंगांनी सार्वकालिक वेध घेण्याचा विषय आहे. त्यातूनच लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमाप्रमाणेच मायवाटेचा मागोवा’, ‘लोकांगण’ ‘लोकसंचितसारखी पुस्तके झाली. या निमित्ताने अशा प्रकारचा अभ्यासही मराठीत प्रथमच सुरू झाला.. पण अजुनी जाणवतं आहेच, खूप काही करायचं राहिलं आहे..

माझा जन्म १९३९चा. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचे हे प्रारंभ वर्ष. जन्मतारीख कागदोपत्री १ एप्रिल. कारण प्रथम शाळेच्या दाखल्यावर तीच तारीख आहे. अगदी रूढ काळाच्या हिशेबात बोलायचं झालं तर १९६० ते १९७० हे माझं पंचविशीचं दशक! त्याची तयारीही आधी चार-पाच र्वष झालेली. ही पंचविशी घडवण्यात माझ्या आधीच्या दशकाचा भाग मोठा आहे असं वाटतं. शाळेची ओढ जशी आपोआप आली होती तसंच वाचनाचं वेडही कसं रुजलं कोण जाणे! शिक्षणक्षेत्रात आले. पण खऱ्या अर्थाने ऐन पंचविशीचं दशक मात्र सांगलीला रंगभूमीशी अनेक अंगांनी नातं जोडीत रंगून काढलं.

राज्य नाटय़स्पर्धेतल्या नाटकांतून कामे केली आणि महाराष्ट्र राज्य स्तरावरचे अभिनयाचे रौप्यपदकांसह अनेक पुरस्कार घेतले. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरासाठी एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, शिबिरे घेत संस्थात्मक पातळीवर झोकून देऊन आनंद लुटला. पुढे महाविद्यालयात अध्यापन सुरू केल्यावर पदव्युत्तर संशोधनासाठीही नाटय़क्षेत्रातलाच विषय निवडला. मग रंगभूमीवरचा अभिनय बाजूला ठेवला आणि त्याची जागा अध्ययन आणि संशोधन यांनी घेतली. त्यासाठी खूप झपाटल्यासारखा प्रवास केला. भारतभरची लोकरंगभूमी पाहिली. अनेक कलावंतांच्या गाठीभेटी घेतल्या आणि कित्येकांशी मैत्र जुळले. अभ्यासाचा सगळाच अनुभव कष्टप्रद होता. पण आनंद देणारा आणि बौद्धिक श्रीमंत करणारा ठरला. पुस्तकांच्या रूपाने ते फलित पाहताना सार्थक वाटलं.

नोकरी लागल्यावर अधाश्यासारखी पुस्तकांची खरेदी केली. खऱ्या अर्थाने तेवढं एकच व्यसन जपलं. त्याच आधारावर गेल्या सुमारे ३०/३५ वर्षांत संशोधनपर म्हणता येईल अशी ३०/३५ पुस्तकं माझ्या नावावर जमा झाली. विरलत्वाने आढळणाऱ्या चिकित्सक, महामनिषी पूर्वसुरीचे संशोधनपर साहित्य वाचूनच माझी अभ्यासदृष्टी घडत गेली आहे, अजूनही घडते आहे, हे मला आवर्जून सांगायला हवे. त्यांच्याविषयी सांगण्यापूर्वी नाटक आणि लोकसंस्कृती हेच माझ्या जिज्ञासेचे आणि म्हणून अभ्यासाचे विषय कसे झाले, याविषयी.

माझे औपचारिक शिक्षण सलग असे झाले नाही. शालान्त परीक्षेपर्यंतच्या अकरा वर्षांत निरनिराळ्या गावी माझ्या आठ-नऊ शाळा झाल्या. एकीकडे उपजीविकेसाठी धडपड करीत बहि:स्थ विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा फक्त दिल्या. महाविद्यालयात मी विद्यार्थिनी म्हणून शिकायला कधीच जाऊ शकले नाही. गेले ती एकदम प्राध्यापक म्हणून शिकवायलाच. बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून माझं इतर काय नुकसान झालं माहीत नाही, पण फायदा खूप झाला, कारण त्या काळात परीक्षेच्या अभ्यासाखेरीज अवांतर वाचन-मनन सर्वसामान्य नियमित विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त आणि विविध विषयस्पर्शी झालं. पाठय़पुस्तकेही कधीच विकत घेता आली नाहीत. त्यामुळं ग्रंथालय धुंडाळणं, पुस्तकांसाठी कोणाच्या मिनतवाऱ्या करणं आणि ठरावीक अवधीत पुस्तक वाचून, टिपणं काढून परत करणं या सगळ्यांचा पुढे फायदाच झाला. तेव्हा मात्र फार ओढताण होई.

माझं लहानपण अगदी पारंपरिक पद्धतीच्या ब्राह्मणी वळणाच्या मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. पुण्यातल्या शनिवार पेठेतलं सुमारे पंचावन्न साठ वर्षांपूर्वीचं ‘वाडा संस्कृती’मधलं वातावरण! घरात फार शिकलेलं कोणीच नाही. आजच्या अर्थाने पुरोगामी वगैरे तर नाहीच नाही. त्यातही आई-वडील दोघांचीही मुळं पुणे जिल्ह्य़ातल्या ग्रामीण भागात रुजलेली, वडिलांचे घराणे गणपती उपासकांचे. त्या काळात गावाकडे जात्यावर दळण्याचा प्रघात होता. सुट्टीला गेलं की आम्हा मुलींचा त्यात सक्रिय सहभाग असे. त्यामुळे जात्यावरच्या शेकडो ओव्या पाठ होऊन गेल्या. माझ्या एका गुणाने- खरे तर अवगुणाने मला सतत वाकडय़ा वाटा शोधायला भाग पाडलं असंही आता वाटतं. तो अवगुण म्हणजे प्रचंड हट्टीपणा! ‘अमुक एक करू नको’ म्हटलं की, ‘का करू नको?’ असं वाटणारच. असा हटवादीपणा वाढत जाई. त्यालाच गोंडस भाषेत ‘जिद्द’ म्हणता येईल का? हट्टीपणाचीच एक आठवण. मुलगी म्हणून विशिष्ट वयात सोवळ्याची बंधने (खरे तर अस्पर्शाची) तर लादली गेलीच. शिवाय, ‘बायकांनी गुरुचरित्र वाचू नये’ असे दंडक आले. तेव्हा एकदा मुद्दाम गुरुचरित्र विकत आणून कॉटवर लोळत वाचून काढलं. अनेक बाबी स्वतंत्रपणे स्वत:च्या जबाबदारीवर करीत राहणे हेच स्वाभाविक होत गेलं. परंपराशील पद्धती जगत असताना सण-उत्सव प्रसंगीची प्रसन्नता, सौंदर्य, स्नेहीसंबंधीयांनी एकत्र जमून घेतलेला आनंदानुभव यांचा एक ठसा उमटला, तसाच त्या जीवनातील र्निबध, दंडक, कधी कधी अकारण जाचणी विशेषत: मुलगी म्हणून या अनुभवांचेही ठसे उमटले. म्हणून लोकजीवनाचे, लोकसंस्कृतीचे स्वरूप एक अभ्यासक म्हणून समजून घेणे अधिक सोपे झाले.

नाटकाबाबत- अभिनयाची ओढ होती. त्यादृष्टीने बारा-पंधरा वर्षे हौशी रंगमंच, राज्य नाटय़स्पर्धा, एकांकिका लेखन, दिग्दर्शन असे उत्साही उपक्रम केले. अभ्यासाच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून एक निबंध लिहिण्याची वेळ आली, तेव्हा अभावितपणे नाटक हाच विषय हाताळला. त्यानंतर केवळ ओढ म्हणून ‘यक्षगान आणि मराठी नाटय़परंपरा’ (१९७८-७९) वर लेखन केले. म.सा.प. हैदराबादने ते प्रसिद्ध केले. प्रा. नरहर कुरुंदकरांनी त्याला प्रस्तावना लिहिली आहे. पुढे अल्पावधीत या पुस्तकाची दुसरी, तिसरी आवृत्ती निघाली.  प्राध्यापकी जीवनात पीएच.डी.साठी संशोधन हा एक टप्पा आला तेव्हाही नाटकच आठवलं. तोवर नाशिक सोडून नोकरीनिमित्त सांगलीला विष्णुदासांच्या नाटय़पंढरीत रंगमंचावर धडपडही चालू होती. तेव्हा विष्णुदासांचं नाटक हा कुतूहलाचा विषय ठरला आणि यथावकाश ‘पौराणिक नाटकांची जडणघडण’ शोधण्याचा खटाटोप केला. एकलव्य पद्धतीच्या धडपडीत दशावतार, यक्षगान, कथकली, तंजावरची नाटके, लोकनाटय़े, त्यामागची विध्यात्मकता असे जिज्ञासेचे प्रदेश वाढत गेले. स्वच्छंदीपणे दक्षिणेकडे केरळपर्यंत, कोकण गोवा असा प्रवास करीत लोकनाटय़प्रकार अनुभवले. विद्यापीठीय प्रबंध बाजूला पडला आणि बुडत्याचा पाय खोलात रुतत चालला, तो अजून वर येतच नाही.

दरम्यान एक प्रबंध लिहावा लागलाच. त्याला त्या वर्षीचा पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला. ‘मिथक आणि नाटक’ (सविता प्रकाशन १९८८) हे पुस्तकही पुढे प्रकाशित झालं, पण त्यातूनही कुतूहलाची क्षितिजं विस्तारली. ती रूढ अर्थानं नाटकापुरती राहिली नाहीत. हे जास्त महत्त्वाचे. मागच्या पिढीतले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, वि. का. राजवाडे, धर्मानंद कोसंबी यांनी आपापल्या विषयांसाठी ज्ञानसाधना करताना केलेला वैयक्तिक सुखाचा होम आणि समर्पण यामुळे संशोधन हे आपल्यासारख्याचे खऱ्या अर्थाने काम नव्हे. याचंही रास्त भान राहिलं आहे. लोकसाहित्याच्या क्षेत्रात दुर्गाताई भागवतांची तपश्चर्या, डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा अखंड ज्ञानयज्ञ हे प्रेरणा देतात आणि ‘पुष्कळ अजुनी उणा।’ अशी आपल्या उणेपणाची जाणीव करून देत असतात. अर्थात हे सगळे माझे अप्रत्यक्ष मार्गदर्शक. त्यांचे लेखन वाचून काही विचार, दिशा दृढ होत गेल्या.

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा साक्षात परिचय अलीकडच्या काही वर्षांतला. त्यांचं अखंड मार्गदर्शन मिळत राहिलं. आम्हा दोघांचं ‘महामाया’ (१९८८) हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याआधी माझी चार-पाच पुस्तकं प्रकाशित झाली होती. पण डॉ. ढेरे यांच्या चिकित्सक आणि शिस्तबद्ध लेखनप्रक्रियेचा तेव्हा अनुभव आला. त्या मानानं माझी लेखनप्रक्रिया किती अलीकडच्या टप्प्यावर आहे, याचंही भान आलं. त्याचा उपयोग पुढच्या कामासाठी होत राहिला.

स्त्रीविषयक लेखनाची थोडी पाश्र्वभूमी येथे स्पष्ट करणे योग्य होईल. निमित्त झालं १९७५ – आंतरराष्ट्रीय स्त्री गौरव (मुक्ती) वर्षांचं! या काळात जगभरातच स्त्री-जीवनविषयक बरंच मंथन, संशोधन होऊ लागलं. अनेक नवीन विचारांबरोबरच अपारंपरिकस्त्रीविषयक आणि स्त्रीनिर्मित लेखनाचा पुनर्विचार सुरू झाला. सभा, संमेलने, चर्चासत्रे यातून स्त्रीमनाचा, स्त्री जीवनाचा शोध होत होता. ‘साहित्य’ हा माझा विषय! मला तीव्रतेने जाणवले की, आजवर प्रतिष्ठित साहित्यात स्त्रीविषयी जे बोलले, लिहिले गेले आहे, त्या सर्वाचे आधार पुरुष लेखकांच्या लेखनातील आहे. यात स्त्रीला स्वत:बद्दल काय म्हणायचं आहे? त्याचा मागमूसही नाही. किंबहूना स्त्रीला असं काही स्वतंत्रपणे वाटत असेल, तिने ते कोठेतरी व्यक्त केले असेल याचीही जाणीव दिसली नाही. या सर्वात खऱ्या अर्थाने स्वत:विषयीचे मन आणि मत कोठे भेटत असेल तर ते स्त्री रचित परंपराशील देशी भाषेतील लोकसाहित्यात! मग माझ्या बालपणापासूनच्या अनुभवातल्या स्त्रियांच्या कथा, गीते, ओव्या, म्हणी, उखाणे अगदी शिव्यांसह आठवले. स्त्रीवादी नवीन सैद्धान्तिक अभ्यासदृष्टीतून त्यांचे अन्वय उलगडत गेले. त्यातून पुरुषप्रधान व्यवस्थेचा पगडा असलेल्या, सासर-माहेरच्या कौतुकाने ओथंबलेल्या स्त्रियांच्या ओव्या, कथा, गीते यांचे कौतुक आमच्या लोकसाहित्याच्या पुरुष अभ्यासकांनी भरभरून केले आहे. पहिल्या पिढीतल्या स्त्री अभ्यासकांनीही तेच अनुकरण केले. मला मात्र अशा ‘कौतुकाच्या’ साहित्यापेक्षा त्यात वेदनेने, करुणेने ओथंबलेली बाई दिसली आणि त्याहीपेक्षा अधिक विद्रोह करणारीही परंपरेतीलच बाई दिसली.

तिला तिच्या पारंपरिक ग्रामीण कृषिनिष्ठ समाजजीवनात कृतिशील विरोध करणे शक्य नव्हते. मात्र तिला स्वत:च्या दुय्यमत्वाचे भान येत नव्हते असे नाही. तो जात्यावरच्या ओव्यांतून, म्हणी-उखाण्यांतून व्यक्त होत होती.

‘‘कडू विंद्रावन, डोंगरी त्याचा रहावा।

पुरुषाचा कावा, मला यडीला काय ठावा॥’’

(विंद्रावन – एक डोंगरी कडू फळ)

असं कधी वेड पांघरून आपलं शहाणपण व्यक्त करीत होती.

दुसरी एक ओवी सीतेसंबंधी आहे :

‘‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा।

हिरकणी सीताबाई, राम हलक्या दिलाचा॥

ही ओवी आणि लोकपुराणे सापडली तेव्हा आणीबाणीच्या काळातील क्रांतिकारी लेखिका स्नेहलता रेड्डी यांच्या ‘सीता’ या नाटकामागची प्रेरणा जाणवली. अगदी अलीकडे २०१३च्या दिवाळी अंकात, ऋ ग्वेदातील काही सुक्ते, लोकपरंपरेतील मराठी ओव्या आणि बंगालमधील स्त्रियांचे एक लोकव्रत; यांचा चिकित्सक अभ्यास मी मांडला आहे. या तिन्हीचा अनुबंध स्त्रियांच्या स्थितीगतीवर प्रकाश टाकतो. एकूण लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हा केवळ भूतकालीन गौरवाचा आणि उमाळे काढण्याचा विषय नसून समाजाचा अनेक अंगांनी सार्वकालिक वेध घेण्याचा विषय आहे. त्यातूनच ‘लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा’प्रमाणेच ‘मायवाटेचा मागोवा’, ‘लोकांगण’ लोकसंचितसारखी पुस्तके झाली. याखेरीज ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘मनातले जनात’, ‘निरगाठ-सुरगाठ’, ‘स्नेहबंध’ अशी अन्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा ही दुसरी परिवर्धित आवृत्तीही प्रकाशित झाली आहे (लोकवाङ्मय प्रकाशन २००२). सैद्धान्तिक अभ्यासाने तिला अधिक टवटवी आणली. लोकसंस्कृतीमधील स्त्रीच्या स्थितीगतीचा वेध घेणारा ‘मायवाटेचा मागोवा’ (शब्दालय प्रकाशन १९९८) मला खुणावीत राहिला. या निमित्ताने अशा प्रकारचा अभ्यासही मराठीत प्रथमच सुरू झाला. आधुनिक स्त्रीवादी अभ्यासकांना त्याचे महत्त्व वाटते. या अभ्यास-क्षेत्रामुळे एका शोधनिबंध वाचनासाठी अमेरिकेत जाण्याचीही संधी मिळाली.

महाविद्यालयातल्या आणि तत्पूर्व अध्यापनाच्या माझ्या व्यवसायाचाही माझ्या वाटचालीत मोठा वाटा आहे. कारण त्या निमित्ताने विद्यापीठांतील विविध व्याख्यानमालांमधून एकाच विषयावर तीन-चार अभ्यासपूर्ण व्याख्याने देण्याची, चर्चासत्रांतून शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळत गेली. ‘लोकनगर रंगभूमी’ (निहारा प्रकाशन १९८९), ‘यक्षगान आणि मराठी नाटय़परंपरा’ (म.सा.प. हैदराबाद १९७८-७९), ‘प्रियतमा’ (चेतश्री प्रकाशन १९८५) या पुस्तकांची निर्मिती होण्यासाठी काही व्याख्यानमालांचे निमित्त झाले. मुख्य म्हणजे मला पुस्तकांच्या जगात राहण्याचा आनंद मिळाला.

या शोधयात्रेत खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरली, ठरत आहेत ती पुस्तके. त्यांच्याच प्रकाशात काही नवीन उमगण्याचा आनंद घेता येतो. लहानपणी स्वत:च्या मालकीची पाठय़पुस्तकेही नसल्याने माझ्यातल्या वाचकाची बरीच उपासमार झाली होती. नतंरच्या काळात मात्र मी हावरटासारखी पुस्तके खरेदी करीत राहिले. पण त्या खरेदीला गेल्या काही वर्षांत थोडं वळण लागलं, ते डॉ. ढेरे यांच्यामुळं. एकतर ते स्वत:च मला उपयुक्त वाटलंसं पुस्तक दिसलं की खरेदी करीत. एखाद वेळी इंटरनॅशनलमधून किंवा एखाद्या अनवट ठिकाणाहून एखादं महत्त्वाचं पुस्तक मिळण्याची शक्यता असेल तर विचारून खरेदी करीत. अडीअडचणीला त्यांच्या समृद्ध संग्रहाचा आधार आहे. पण त्यासाठी माझ्या शक्ती खूप उण्या पडतात, त्याची खंत वाटते. आता तो आधारही संपला, याचे दु:ख आहेच.

रूढार्थाने नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही मी तीन-चार वर्षे पुणे विद्यापीठातील नाटय़विभाग (ललित कला केंद्र) आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत अतिथी अध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केलं. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांची पीएच.डी.ची परीक्षक, चर्चासत्रे सहभाग, व्याख्याने यांतून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणाशी जोडलेली राहिले. बारावीच्या एका पाठय़पुस्तकाची संपादक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी आणि अन्य विद्यापीठांसाठी लोकसांस्कृतिक लेखन (पुस्तके) लिहिली. स्वतंत्र ग्रंथलेखन अजून चालू आहे. व्याख्याने, चर्चासत्रे, विद्यापीठे अन्य संस्थांतूनही व्याख्यानांसाठी निमंत्रित म्हणून सहभाग असतोच. त्यामुळे सतत नवीन पिढीशी संबंध येतो. साचलेपण अजून तरी जाणवत नाही. यंदाच वयाची ७९ वर्षे पूर्ण केली आहेत. एकेकाळी वेडय़ासारखा ग्रंथसंग्रह केला, आता त्या मालमत्तेची (इस्टेट) निरवानिरव कशी करावी या विवंचनेत आहे.

केलेल्या कामाची दखल म्हणून अनेक पुरस्कार मिळाले (वीस-पंचवीस). त्यात उत्कृष्ट प्रबंधासाठीचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, साहित्य-संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरववृत्ती (दिल्ली), अनेक संस्थांचे ग्रंथपुरस्कार, कर्नाटकाचा नुकताच मिळालेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार, अ. का. प्रियोळकर पुरस्कार, सिद्धिविनायक ट्रस्टचा गार्गी पुरस्कार, सु. ल. गद्रे पुरस्कार आदी  प्रोत्साहक ठरत आहे.

एकूण सुमारे या ८० वर्षांच्या वाटचालीतले सगळे भले-बुरे अनुभव, माणसे आणि मुख्य म्हणजे माझे आई-वडील, सगळे कुटुंबीय यांची सतत आत्मीय साथ! माझ्या हातून काही बरे घडले असेल तर त्या श्रेयसाचे ते धनी! बाकी प्रेयस म्हणाल तर अडथळे पार करीत, नकार पचवीत मिळालेला निर्मितीचा निखळ आनंद हा स्वार्थ असतोच!

‘‘आत्मवस्तु कामाथ सर्वम्, प्रियम् भवति॥’’ असे मला प्रामाणिकपणे वाटते.

chaturang@expressindia.com