16 January 2019

News Flash

समन्वयाचे जगणे

आयुष्याबद्दल सारे सांगून झाल्यावर श्रेयस आणि प्रेयस वेगळे असतात असे मला वाटत नाही.

नागनाथ कोत्तापल्ले

कुठल्याही विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळणे हे एक आव्हान असते. त्यातल्या त्यात असंख्य चळवळींचे केंद्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करणे हे आव्हानात्मक आहे. या पाच वर्षांत अनेक प्रवृत्तींची माणसे पाहिली. उघडय़ानागडय़ा स्वार्थाला तात्त्विक मुलामा कसा दिला जातो ते पाहिले, विरोध पाहिला आणि त्यापेक्षा अधिक सहकार्य पाहिले. लोकांनी भरभरून प्रेम केले. मी फार समाधानाने कुलगुरू म्हणून निवृत्त झालो. आयुष्याबद्दल सारे सांगून झाल्यावर श्रेयस आणि प्रेयस वेगळे असतात असे मला वाटत नाही. दोन्हीचा समन्वय करीत जगता आले तरच खरे जगणे!

आ  मचे घर मुळात शेतकऱ्याचे. किती पिढय़ा मातीत राबल्या माहीत नाही; परंतु एक चमत्कार व्हावा तसे झाले. माझे वडील शिकले, सातव्या इयत्तेपर्यंत. त्या काळात सातवी पास झाली की नोकरी सहजपणे मिळत असे. सरकारी अधिकारी घरी येऊन नोकरीची ऑर्डर देत असत. माझे वडील शिक्षक झाले आणि शेतकऱ्याचे घर शिक्षकाचे झाले. आजही माझा एक भाऊ उरलीसुरली शेती करतो. तो सोडून आम्ही उरलेले पाच भाऊ शिकलो. दोन बहिणींना मात्र वडिलांनी शिकविले नाही.

माझ्या जन्माच्या (म्हणजे १९४८ पूर्वी) किमान चार वर्षे आधी वडील शिक्षक झाले. त्यामुळे आम्ही सारीच भावंडे त्यांच्या बदलीच्या गावी – म्हणजे छोटय़ा छोटय़ा खेडय़ांमधून राहात असू. दुसरीपासून वडिलांची बदली जेथे झाली, त्या बाराहळी नावाच्या गावात माझे शिक्षण सुरू झाले. तेथे मी सातवीपर्यंत शिकलो. बाराहळी (ता. मुखेड) या गावाचा माझ्यावर खूपच परिणाम झालेला आहे, हे आता विचार करताना लक्षात येते.

बाराहळीला चौथीपर्यंत सरकारी शाळा होती. वडील त्याच शाळेवर मुख्याध्यापक होते. ते मुख्याध्यापक म्हणून मला काही सवलती वगैरे मिळत होत्या, असे मात्र नाही. उलट गणित सोडवता न आल्याने एकदा बेदम मार खाल्ला होता. महात्मा गांधी यांचा परिचय याच काळात, बालवयातच झाला. ही चांगलीच गोष्ट झाली.

बाराहळी हे गाव दोन सरंजामदारांमध्ये वाटलेले होते. म्हणजे अर्धा भाग देशपांडे यांच्याकडे, अर्धा भाग देशमुखांकडे. खाल्लाकडं आणि वरलाकडं अशी या भागांची नावे होती. देशपांडे आणि देशमुख यांचे वाडे भक्कम होते. गावाला धाक भरविणारे होते. हा काळ साधारणत: मी तिसरी-चौथीला होतो तेव्हाचा, म्हणजे १९५७-५८ चा होता. म्हणजे स्वातंत्र्य मिळून दहा वर्षे झाली होती तरी खेडय़ापाडय़ांतील सरंजामदारी संपलेली नव्हती. फौजदारसुद्धा देशपांडय़ांसमोर उभा राहून बोलत असे. म्हणजे काय परिस्थिती असेल याची कल्पना केलेली बरी आणि निजामाच्या काळात तर ही सरंजामदारी कशी असेल?

बालवयातही मला ही गोष्ट चमत्कारिक वाटे. आता लक्षात येते की, मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्धचे बीज माझ्या मनात येथेच रुजले असावे. याच देशपांडय़ांनी एक चांगली गोष्ट केली होती. पाचवीनंतरचे वर्ग त्यांच्या संस्थेच्या वतीने उघडावयास सुरुवात केली होती. या ‘प्रायव्हेट’ शाळेत मी सातवीपर्यंत शिकायला होतो. तरीही सरंजामी परंपरा मला कधीच आवडल्या नाहीत. आजही कोठे कोठे या परंपरा टिकून आहेत. लोक मुजरेही करतात, असे ऐकून आहे. असले हास्यास्पद प्रकार लोक का करीत असतील, हा मला छळणारा प्रश्न. त्याचे उत्तर कोण देणार?

बाराहळीच्या शाळेमध्ये माझ्या वर्गात काही दलित मुले होती. अर्जुन त्यापैकी एक. शाळेत उशिरा प्रवेश घेतल्यामुळे तो चौथीला असताना दाढी करून येत असे. फार सुस्वभावी होता तो. आणखी एक मित्र होता. एकदा मी त्यांच्या वस्तीवर गेलो. स्वच्छ, सारवलेली लखलखीत घरे, रस्तेही स्वच्छ होते. इतकं छान राहतात ही माणसं. मग त्यांच्याबाबत भेदाभेद का, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. हळूहळू कळत गेले की, जात नावाची गोष्ट माणसानेच निर्माण केलेली आहे. धर्म नावाची गोष्ट माणसानेच निर्माण केलेली आहे आणि जात-धर्माचा वापर हितसंबंधांसाठीच केला जातो. महाविद्यालयात येईपर्यंत मी जातीय मानसिकतेतून मुक्त झालो होतो. त्याचे बीज माझ्या बाराहळीच्या वास्तव्यातच पडलेले होते, असे मी म्हणू शकतो. म्हणूनच पुढे १९७८ मध्ये माझ्या मुलाला शाळेत घालताना मुलाची जात ‘माणूस’ अशी नोंदविली. शाळेतील मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांनी खूप समजाविले; पण मी म्हणालो, बघू या, मुलाला केवळ माणूस म्हणून जगता येते की नाही ते! आजही अनेकांना हे धाडस वाटते.

सातवीपर्यंत मी बाराहळीच्या प्रायव्हेट शाळेत होतो. मग मी आठवीला माझ्या गावी मुखेडला आलो. मी आणि आजी दोघेच राहात असू. आजी शेतीकडे बघे. आठवडय़ाच्या बाजारात भाजीपालाही विके. या शाळेत असतानाच मी एक कविता लिहिली, एक लेख लिहिला. हे मी का लिहिले हे सांगता आले नसते, तरी एका लेखकाचा जन्म झालेला होता, हे मात्र खरे.

माझ्यातल्या लेखकाचा खरा विकास झाला तो मी महाविद्यालयात गेल्यानंतर आणि पुढे विद्यापीठात गेल्यानंतर. मी देगलूर येथे नुकत्याच सुरू झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. वडिलांचा आग्रह होता की, मी विज्ञान शाखेकडे जावे. निदान कॉमर्सकडे तरी जावे; परंतु वाङ्मयाच्या आवडीपोटी मी कला शाखेत प्रवेश घेतला. तेथे लक्ष्मीकांत तांबोळी हे मराठी शिकवायला होते. त्यांच्या घरी मी जाऊ लागलो. कविता, ललित लेख, कथा त्यांना दाखवू लागलो. त्यांचे ग्रंथालय माझ्यासाठी कायम उघडे होते. मी देगलूर महाविद्यालयात प्रवेश घेतला, हे चांगलेच झाले असे मला तेव्हाही वाटत होते आणि आजही वाटते. आम्हाला प्राचार्य म्हणून हेमचंद्र धर्माधिकारी हा अवलिया माणूस होता. तत्त्वनिष्ठेमुळेच पुढे त्यांना महाविद्यालयही सोडावे लागले. माझ्या जडणघणीत त्यांचा मोठा वाटा आहे, एवढेच येथे सांगतो. प्रा. गोपछेडे, प्रा. जाजू हे शिक्षक अजूनही आठवतात. बी.ए.च्या परीक्षेत मी विद्यापीठात सर्वतृतीय आलो.

महाविद्यालयातील एक आठवण सांगितली पाहिजे. बी.ए.च्या तृतीय वर्षांला असताना (१९६९) नांदेडला शिक्षणतज्ज्ञ वा. ना. दांडेकरांसंबंधी एक अनुचित घटना घडली. म्हणजे शासकीय विश्रामधाममध्ये ते थांबले होते. तेथे जिल्हा पोलीस प्रमुख आले आणि त्यांनी वा. ना. दांडेकरांचे सामान खोलीबाहेर फेकून दिले, कारण त्यांना ती खोली हवी होती. या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक मोठा निषेध मोर्चा काढला. त्या मोर्चाचे नेतृत्व करणारे जे विद्यार्थी होते, त्यात मी होतो. आमचा मोर्चा प्रचंड मोठा होता आणि पोलिसांना आवरता आवरता नाकीनऊ आले. ‘अन्याय घडो कोठेही, पेटून उठू आम्ही’ अशी काहीशी माझी प्रकृती आहे असे वाटते. पुढे बीडला प्राध्यापक झाल्यानंतर तर मोर्चे, सत्याग्रह, अटक आणि सुटका या गोष्टी नित्याच्याच झाल्या.

एम.ए. झाल्यानंतर मी बीडला प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तेथे १९७१ मध्ये एकदमच दोन महाविद्यालयांना परवानगी देण्यात आलेली होती. पैकी नवगण महाविद्यालयाच्या केशरकाकू यांनी मला निकाल लागण्याआधी नेमणूकपत्र पाठविले होते त्यासाठी माझ्या शिक्षकांनी एकमुखाने माझी शिफारस केली होती. एम.ए.ला शिकवायला फार मोठी माणसे होती. वा. ल. कुलकर्णी, यू. म. पठाण, सुधीर रसाळ आणि गो. मा. पवार हे शिक्षक होते. गावात दुसरे महाविद्यालयही त्याच वर्षी सुरू झाले होते. बंकटस्वामी असे त्या महाविद्यालयाचे नाव. या महाविद्यालयानेही उत्तम शिक्षक जमविले होते. दोन्हींकडे भरपूर विद्यार्थी होते; पण पहिल्या वर्षी बंकटस्वामी महाविद्यालयात अधिक प्रवेश झाले होते. प्राचार्य पाटोदेकर हे मोठे कल्पक प्राचार्य तेथे होते. दुसऱ्या वर्षी त्यांनी आणि कॉलेजचे सेक्रेटरी यांनी मला गळ घातली आणि मी बंकटस्वामी कॉलेजमध्ये रुजू झालो. दोन वर्षे बरी गेली. माझा विवाहही झाला, महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापिका विजया बाब्रस यांच्याशी. हा आंतरजातीय विवाह होता; पण त्याची तशी आम्ही काही प्रसिद्धी केली नाही, कारण जात महत्त्वाची नव्हतीच ना!

दोन वर्षे बरी गेली, म्हणजे आनंदात गेली आणि प्राचार्य आणि संस्थाचालक यांच्यात मतभेद सुरू झाले. प्राचार्य बीडला राहात नाहीत, औरंगाबादहून येणे-जाणे करतात, असे संस्थाचालकांचे म्हणणे, तर संस्थाचालकांनी प्राध्यापकांचा भविष्य निर्वाह निधी बँकेत भरलाच नाही, असे प्राचार्याचे म्हणणे. तणाव वाढत गेला. प्राचार्याच्या बाजूने सर्व शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी. रोज मोर्चे, सत्याग्रह असे प्रकार सुरू झाले. ‘युक्रांद’ संघटनेने प्रकरण हाती घेतले. रीतसर आंदोलन सुरू झाले. मग विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही प्राध्यापक रस्त्याच्या कडेला झाडाखाली वर्ग घेऊ लागलो. महाविद्यालयात कायम तणावाची परिस्थिती असे. पोलिसांचे आमच्यावर कायम लक्ष असे. १९७४ मध्ये सुरू झालेले हे आंदोलन पुढचे चार-पाच वर्षे वेगात चालत राहिले. चॅरिटी कमिशनर यांनी महाविद्यालय कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात दिले. शिक्षक विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनात मी अतिशय सक्रिय होतो. ‘युक्रांद’चे विद्यार्थी नेते विजय गव्हाणे माझ्याच घरी राहात असत.

नुकते लग्न झालेले. एक मुलगा झालेला. आंदोलनामुळे आठ-आठ महिने पगार होत नव्हते. घरूनही काही आधार नाही. अनेक लोक/मित्र म्हणायचे, तुझ्यासारख्या माणसाने असल्या भानगडीत पडायलाच नको. संस्था-चालकांबरोबर राहिल्यास तुझा फायदा होईल. हा मार्ग व्यवहार म्हणून श्रेयस्कर होता; परंतु तत्त्व म्हणून मनाला पटणारा नव्हता. लढत राहिलो. खूप त्रास झाला. सोसत राहिलो, परंतु माघार घेणे स्वभावातच नव्हते आणि नाही.

खरे म्हणजे या संपूर्ण कालखंडावर एक भक्कम कादंबरी होईल. बघू कधी जमते ते.

बीडला मी सहा वर्षे होतो. खूप आठवणी आहेत. बीडजवळ कोळगाव नावाचे गाव आहे. निवडणुकीच्या राजकारणातून गावातील धनदांडग्यांनी दलित – आदिवासींच्या वस्तीत आग लावून दिली. १९ झोपडय़ा बेचिराख झाल्या. हे कळल्यानंतर मी एका मित्रासोबत कोळगावला गेलो होतो. चौकशी होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी दलितांवर बहिष्कारही टाकला होता. या संपूर्ण प्रकरणाचा मोठा वृत्तांत मी तेव्हा ‘मनोहर’मध्ये लिहिला होता. याच अनुभवातून पुढे १९८५ मध्ये माझी ‘मध्यरात्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली. सामाजिक बहिष्कारावर लिहिलेली ही मराठीतील एकमेव कादंबरी आहे. या कादंबरीची व्हावी तशी चर्चा झाली नाही, याचे मला अजूनही वाईट वाटते. १९८५ मध्येच मी आणखी एक कादंबरी लिहिली. ‘गांधारीचे डोळे.’ समाजाला प्राप्त झालेल्या बधिरावस्थेला ध्वनित करण्यासाठी तृतीय पुरुषी व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण राजकारण साकारण्याचा येथे प्रयत्न केला आहे. या कादंबरीचा हिंदीत अनुवाद झाला, परंतु मराठीत मात्र फारशी चर्चा झाली नाही.

बीडची एक हृद्य आठवण म्हणजे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तेथे तेव्हा वकिली करीत असत. ते आणि मी मिळून मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा चालवत असू. त्यांना जेव्हा कळले की, माझी पत्नी गरोदर आहे, तेव्हा त्यांनी आणि नंदिनी वहिनींनी मोठे डोहाळ जेवण आयोजित केले होते. बीडची सारी वर्षे आंदोलनाने व्यापली होती. तरी रात्र झाली की माझे वाचन आणि लेखन मात्र चालूच होते. बीडच्या वास्तव्यात मी खूप कथा लिहिल्या. त्यांचे पुढे संग्रह आले. बीडला असतानाच माझा ‘मुडस्’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा कवितेसाठीचा विशेष पुरस्कार मिळाला.

बीडला सहा वर्षे प्राध्यापकी केल्यानंतर मी तेव्हाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात रुजू झालो. पुढे तब्बल १९ वर्षे या विभागात होतो. माझा आधीपासून ओढा डाव्या विचारसरणीकडे होताच. समाजवादी विचारसरणीचे लोक मला जवळचे वाटत असत. आता मी या विचारसरणीकडे अधिक डोळसपणे ओढला गेलो. सरळ सरळ प्रश्न सुटणार नाहीत, या ठाम भूमिकेपर्यंत माझा प्रवास झाला. परिणामी उजव्या विचारसरणीच्या, संघविचारांच्या व्यक्तींशी संघर्षही झाला. एकदा आम्ही काही प्राध्यापकांनी दसऱ्याच्या दिवशी विद्यापीठात शस्त्रपूजा म्हणून प्रयोगशाळांची जी पूजा केली जाते, ती बंद व्हावी म्हणून अर्ज केला. प्रयोगशाळांमधील उपकरणांची पूजा आम्हाला हास्यास्पद वाटत होती. विद्यापीठासारख्या ठिकाणी हे व्हावे, हे अधिक हास्यास्पद वाटत होते. आमच्या पत्राची व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली. आमच्यावर कार्यवाही करावी, असे काही लोकांचे म्हणणे होते; परंतु ती कल्पना कशामुळे कुणास ठाऊक बारगळली. त्या पत्रावर सर्व प्रथम सुप्रसिद्ध समीक्षक के. रं. शिरवाडकर यांची सही होती. या सबंध कालखंडात राष्ट्रीय-आंतराराष्ट्रीय पातळीवर काम करणारे राजकीय विश्लेषक मोईन शाकीर आणि माझी मैत्री झाली. त्यांच्या सहवासाचा परिणाम माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवर झाला.

दरम्यानच्या काळात नामांतराचे मोठे आंदोलन झाले, अनेक दलितांचे बळी गेले, मराठवाडय़ातले सौहार्द संपले. जातीयवादी शक्ती किती विध्वंसक रूप घेऊ शकतात, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यातून एक चांगले झाले, की विद्यापीठाचा नामविस्तार झाला. हा निर्णय पथदर्शक म्हणावा लागेल. कारण पुढे अनेक विद्यापीठांचे नामविस्तार झाले; शांततेत झाले. मराठवाडा विद्यापीठानंतर मी तेव्हाच्या पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि तत्कालीन कुलगुरू वसंतराव गोवारीकर यांचा माझ्यावर मोठाच लोभ जडला. अनेकदा ते मला बोलावून घेऊन गप्पा मारत असत. नव्याने आलेला एक प्राध्यापक कुलगुरूंच्या इतका जवळ कसा, असा प्रश्न अनेकांना पडे. वसंतराव गोवारीकर माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवीत. त्यांनी मला सिनेटवर नेमले. शिवय वीस ते पंचवीस महत्त्वाच्या समित्यांवर माझी नेमणूक केली. एका प्रकारे माझ्या पुढील कुलगुरुपदाची पायाभरणीच  झाली, तीही गोवारीकरांमुळे असे म्हणता येईल.

नऊ वर्षे येथे काम केल्यानंतर २००५ मध्ये कुलपती एस. एम. कृष्णा यांनी माझी नेमणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केली. २०१० पर्यंत मी तेथे काम केले. कुठल्याही विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळणे हे एक आव्हान असते. त्यातल्या त्यात असंख्य चळवळींचे केंद्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करणे हे आव्हानात्मक आहे. या पाच वर्षांत अनेक प्रवृत्तींची माणसे पाहिली. उघडय़ानागडय़ा स्वार्थाला तात्त्विक मुलामा कसा दिला जातो ते पाहिले. विरोध पाहिला आणि त्यापेक्षा अधिक सहकार्य पाहिले. लोकांनी भरभरून प्रेम केले; त्या बळावर भूगोल, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, नृत्य आणि संगीत इत्यादी नवे विभाग आणि अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करू शकलो. अनेक नव्या इमारतींचे आराखडे तयार केले. त्यांच्यासाठी निधी गोळा केला. विद्यापीठ परिसरातील काही जुनी अतिक्रमणे हटवू शकलो. विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव वर्षभर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे घेऊन साजरा केला. समारोपाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आलेल्या होत्या. हे सारे करताना व्यवस्थापन परिषद अधिसभा आणि विद्वत परिषद माझ्यामागे ठामपणे उभे होते, याचा मला आनंद वाटतो. मी फार समाधानाने कुलगुरू म्हणून निवृत्त झालो.

सर्व अधिकार मंडळाने लोक माझ्याबरोबर का राहिले याचा विचार करताना असे जाणवते की, विद्यापीठ कायदा मी प्रमाण मानला. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यापीठासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करावयाचे, अशी माझी भूमिका होती. त्यामुळे शासनातील अनेक उच्चपदस्थांचे रागही मी ओढवून घेतले; पण मला त्याची काहीच तमा वाटली नाही. कारण कुलगुरुपदाचा वापर करून पुढे मला काहीच मिळवायचे नव्हते.

मी समाधानाने निवृत्त झालो; पण एक असमाधान मात्र आहेच.

विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी १९९४ पासून चालू होती; परंतु ही मागणी कुठल्या ना कुठल्या कारणाने मान्य होत नव्हती. नव्याने झालेल्या नांदेड येथील स्वामी रामानंद विद्यापीठात स्वामीजींचा पुतळा उभा राहिला होता. शिवाजी आणि पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसविण्यात आलेले होते. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या नावाच्या विद्यापीठात का नको, असा प्रश्न होता. मी पुढाकार घेतला. सर्व घटकांशी संवाद केला. पुतळा बसविण्याचा निर्णय झाला २००९ मध्ये. मग शिल्पकार ठरला. अतिशय देखणा पुतळा तयार झाला. पुतळा बसविण्याची जागा निश्चित झाली. उंच चौथरा उभा राहिला. पुतळा विद्यापीठ परिसरात आणला गेला आणि माझी मुदत संपली.

पुढे सहा-आठ महिन्यांनी माननीय शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मला त्याचा आनंदच झाला.

– पण माझ्यानंतर आलेल्या कुलगुरूंनी मला बोलावण्याचे तर सोडाच, पण निमंत्रण पत्रिका पाठविण्याचे सौजन्यही दाखविले नव्हते. असतात अशी माणसे. अनुभव घ्यायचा आणि सोडून द्यायचे!हे सारे सांगून झाल्यावर श्रेयस आणि प्रेयस वेगळे असतात असे मला वाटत नाही. दोन्हीचा समन्वय करीत जगता आले तरच खरे जगणे!

nagnathkottapalle@gmail.com 

chaturang@expressindia.com

First Published on May 19, 2018 12:31 am

Web Title: nagnath kottapalle experience as vice chancellor of marathwada university