प्रभाकर कोलते chaturang@expressindia.com

मला स्वत:ला शिकविणे हा अत्यंत प्रेयस विषय वाटतो. शिकविताना माझी सगळी ज्ञानेंद्रिये कार्यरत होतात असे वाटते, मी जिवंतपणा अनुभवतो. शिकवता शिकवता मीही शिकतो आहे असे वाटते. सतत सतर्क राहण्यामुळे अनेक नवनवे कला-विषय, विविध कलांचे गूढत्व शिवाय शिकविण्यातले ममत्व आणि आपण वाट पाहात असलेला कलेचा ज्ञानकोश आपल्याला खुणावतो आहे, प्रयोग करायला सुचवतो आहे असे वाटत राहायचे. नवा अभ्यासक्रम म्हणजे मूलत: भूमितीची आणि त्याला जोडून येणारे अवकाश आणि रंग यांची कलात्मक पुनर्बाधणी करणारा अनुबंध होता.. मी अभ्यास सुरू केला..

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

प्रेयस म्हणजे आपल्या इंद्रियांना प्रिय असलेले सुख अथवा इंद्रियांविषयी आपल्याला प्रिय असलेली तीव्र जाणीव तर श्रेयस म्हणजे पुण्यकर्म किंवा कल्याणकारक कार्य करण्याशी संबंधित असलेली ऐच्छिक वृत्ती. त्या दोन्ही अंतस्थरीत्या एकदुसरीशी सहयोग करणाऱ्या आहेत, परंतु त्यांचे बाह्य़रूप, नेमके एकदुसऱ्याशी समांतर व वेळ पडल्यास एकदुसऱ्यास छेदही देणारे आहे. प्रेयसच्या मुळाशी हळुवार भाव-जाणीव कार्यरत असते तर श्रेयसाच्या कोशात अभिलाषा. माझ्या बाबतीत म्हणाल तर शिकविणे हे माझ्या इंद्रियांसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे आणि स्वत:च्या साधनेचा भाग असलेली चित्रकारिता पूजा बांधण्यासारखे अहम-कार्य आहे. अथवा मुक्तपणे इंद्रियाधीन होत चित्र-माध्यमातून व्यक्त होण्याचा गेल्या अनेक वर्षांचा माझा गंभीर छंद आहे.

व्यक्तीची चर्या, व्यक्तिमत्त्व, त्याच्या आंतरमनाशी जडलेली त्याची यशस्वी जीवनाविषयीची कल्पना, आकांक्षा आणि त्याच्या वैचारिक परिघाच्या आत-बाहेर रुजून वर आलेली त्याची दिवा-स्वप्ने आणि त्यांच्या वर्दळीत तग धरून वाढत असलेला नशीब नावाचा कोंब; जो फार कमी इच्छुकांच्या वाटय़ाला येतो; बहुतेकांच्या नशिबात नतद्रष्ट कोलदांडाच ‘फ्री ऑफ कॉस्ट’ आलेला असतो. माझ्या नशिबात ना स्वप्न आले ना कोलदांडा, फक्त काळोखच. मग मीच माझा कोलदांडा झालो. म्हटलं स्वत:ला कोलवण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाण मला फार लवकर आली. चित्रकार व्हायचे म्हणजे सतत चित्रे रंगवत राहणे, रंग नसतील तेव्हा रेखाटत राहणे एवढेच त्यावेळी कळत होते. रेखाटता रेखाटता एकदिवशी स्वप्न पडावे तसे स्वत:लाही माहीत नसलेले, अवगत नसलेले चित्र कागदावर उमटावे, आपसूक; असे वाटायचे. थोडक्यात भुलवणाऱ्या स्वप्नासारखे कठीण दिवस होते परंतु निराश मनावर फुंकर घालून कामालाही तेच जुंपत होते.

प्रेयस व श्रेयस हे शब्द, त्यांचे आपल्या जीवनातील स्थान, कार्य आणि परिणाम यांचा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, खरे तर मला एवढे ज्ञान कुठले असणार त्या काळात? परंतु प्रचंड अज्ञान कुठून, कसे, पण गोळा मात्र झाले होते माझ्या डोक्यात ज्ञानाला वजन नसावे बहुतेक कारण ते कधी जाणवले नाही परंतु अज्ञानाने डोके दुखायचे. ‘ज्यामुळे डोके दुखते ते ‘अज्ञान’ असे मग मीच माझे समीकरण तयार केले. अज्ञानाने डोके दुखते तर ज्ञानाने ते उल्हसित व्हायला हवे पण तसे काही व्हायचे नाही, कदाचित हे सगळे माझ्याच मनाचे खेळ होते.

चित्रकार व्हायचे म्हणजे नक्की काय व्हायचे आणि कसे व्हायचे याचे गणित नव्हते, व्याकरण नव्हते, विज्ञान नव्हते. किंवा चित्राची सोपी साधी, रसाळ आणि मनाला पटण्यासारखी व्याख्या सोप्या शब्दांत सांगणारा कोणी भेटला नव्हता. वाचनालयात खूप पुस्तके असत परंतु अधिकतम इंग्रजी. मराठी भाषेतील पुस्तके केवळ शोभेसाठी आणि ती शोधण्यात वेळ घालविण्यापेक्षा जे हाती आले आहे त्यातील केवळ चित्रे पाहून आपण खूप वाचले असे स्वत:लाच सांगत स्वत:चे समाधान करून घ्यायचे एवढेच कळत होते त्यावेळी. निव्वळ पुस्तकातील दुसऱ्या चित्रकारांची चित्रे पाहून स्वत:च्या चित्राचे आराखडे मांडण्यात काही वर्षे गेली. पुस्तकाच्या आधाराने साकारलेल्या आपल्या चित्राला; समजा कुणी चांगले म्हटलेच तर माझ्याच अंगावरचे केस मोरपिसासारखे गुदगुल्या करताहेत असे वाटायचे.

एक ते पाच वर्गाचे भावूक आणि मिश्र अडथळे ओलांडत ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे आवारही ओलांडून मुंबई शहराच्या भाऊ-गर्दीतला एक अशी स्वत:लाच स्वत:ची ओळख करून देताना नकळतपणे आयुष्यावर येऊ घातलेल्या जबाबदारीची क्षणभर तीव्र जाणीव झाली आणि माझीच पाठ किंचितशी वाकली आणि तिथून पुढच्या भविष्याकडे संभ्रमित डोळ्यांनी पाहात पाहात मी काय करायला हवे, कसे, किती कष्टायला हवे इथपासून; मी कोणाचे मार्गदर्शन घ्यायला हवे आणि ते कसे मिळवायचे इत्यादी इत्यादी, डोके पिंजून निघेपर्यंत स्वत:शीच खूपदा विचार करायचो आणि शेवटी येऊन थांबायचो ते एकाच नावासमोर आणि ते म्हणजे प्रा. शंकर पळशीकर. आश्चर्य म्हणजे ते मला सहजासहजी नव्हे पण फार प्रयासाने लाभले आणि त्यांनी पुढे केवळ मार्गदर्शनच नव्हे तर त्यांच्या सावलीखाली मी माझा पुढचा प्रवास नि:संकोचपणे आणि आनंदाने करीत राहिलो. आजही त्यांची सावली कायम माझ्या अस्तित्वावर दाटपणे स्थिरावली आहे असा माझा भास नव्हे तर ठाम विश्वास आहे. सरांनी माझ्यासाठी शब्दभांडार उघडले; सोबत विविध पुस्तकांशी भेटी घालून दिल्या. त्यापैकी‘ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकाने तर मनाची दारे, खिडक्या, छप्पर सगळेच उडवून लावले आणि आकलनाच्या दिशा आणि वाटा मोकळ्या केल्या. अनेक पुस्तके (ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, अमृतानुभव, उपनिषद इत्यादी) भेट म्हणून दिली. आश्चर्याची बाब म्हणजे कलात्मकतेच्या विविध रूपांबद्दल भरभरून ज्ञान देणाऱ्या सरांनी चित्रकलेविषयी एकही पुस्तक मला दिले नाही. वाचनाची दीक्षा देताना ‘न वाचनाचे’ धोके सांगितले. पळशीकर सर एक सव्यसाची शिक्षक, व्यासंगी चित्रकार आणि खुल्या दिलाचे माणूस म्हणून अवघ्या कला क्षेत्राला परिचित होते. असे शिक्षक भेटले की, विद्यार्थीही खडखडून जागा होतो तसा मीही झालो. पळशीकर सरांच्या सान्निध्यात अनेक लहान-मोठय़ा चित्रकारांच्या भेटी झाल्या त्यात त्यांच्या समकालिनांपासून माझ्या समवयस्कांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या भेटीतून मी वैचारिकरीत्या फुलत गेलो. चित्रकलेबद्दल सजग आणि संवेदनशील  होत गेलो.

कालांतराने ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागलो आणि आर्थिकदृष्टय़ा आणि चित्रकार म्हणूनही स्थिरावलो. त्या काळात पळशीकरसरांनी बेंद्रे, हेब्बार, तय्यब आणि पदमसी यांच्याशी माझी ओळख करून दिली. हे सर्व एकमेकांचे मित्र, त्यापैकीपद्मसी आणि तय्यब हे दोघे तर एकमेकांचे गहिरे वर्गमित्र आणि दोघेही सरांचे परमभक्त, सरांच्या शिफारशीमुळे कॉलेजमधल्या पाचव्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी, एक आठवडय़ाचा शैक्षणिक मेळावा घडवून आणला होता त्यात या चार दिग्गजांनी ज्या तऱ्हेने भवताल, कलावंत आणि कला यांचे परस्पर संबंध आणि कलानिर्मितीचे इंद्रधनुष्य कसे पेलून धरायचे, कसे पाहायचे आणि कॅनव्हासला कसे निर्भीडपणे सामोरे जायचे हे समजावून सांगितले. पद्मसी यांनी तर मुलांना थेट एलिफंटा लेण्यांच्या येथे नेले आणि तिथल्या अतिभव्य आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात जणू दिव्यत्वाची प्रचीतीच दिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. किंबहुना मीसुद्धा जे.जे.मध्ये शिक्षक म्हणून अधिक रमलो ते त्यानंतरच. माझ्या लक्षात आले की, जे.जे.तील वातावरण अशा तऱ्हेने बाहेरच्या जगाशी जोडले जाणे अपरिहार्य आहे. मी माझ्या वर्गासाठी ते जोडणे अमलात आणत गेलो.

जे.जे.मध्ये शिकत असताना पळशीकर सरांच्या सोबत जे. कृष्णमूर्तीसारख्या तत्त्वज्ञानी ऋषींना ऐकण्याचा अनेकदा योग आला. त्या वयात अध्यात्म वगैरे फार काही कळत नव्हतं पण सर म्हणायचे की, कळत नसलं तरी कानावरून जाऊ दे. म्हणून ते तसं जाऊ दिलं आणि गम्मत म्हणजे ते कायमचं माझ्या कानात गुंतलं.. जे. कृष्णमूर्ती म्हणत शरीर झोपते परंतु मन कायम जागेच असते; म्हणूनच ते सावधही ठेवायला हवे. ते काही सांगताना दोन शब्दांमध्ये मोठा ठेहराव घेत आणि त्या दरम्यान ऐकणारा आपणहून विचार करायला प्रवृत्त होत असे.

चित्रकला म्हणजे बघण्याची अर्थात डोळ्यांची भाषा. तिला इतर भाषांसारखी व्याकरणाची गरज नाही आणि ती प्रत्येक चित्रकाराच्या चित्राप्रमाणे बदलू शकते. पॉल क्ली या पाश्चात्त्य चित्रकाराने मात्र बाऊहौसमध्ये शिक्षक असताना चित्र-अवकाश आणि चित्र-घटक यांचे अंतर-नाते सोप्या साध्या दृक प्रत्ययातून कला-विद्यार्थ्यांसाठी मांडले, नंतर ते आपल्याकडेसुद्धा अभ्यासक्रमातून ओळखीचे झाले परंतु हवे तसे रुजले नाही, परिणामी आपल्याकडे चित्रकलेचा अभ्यास म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशा दु:स्थितीत तग धरून आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

मला स्वत:ला शिकविणे हा अत्यंत प्रेयस विषय वाटतो. शिकविताना माझी सगळी ज्ञानेंद्रिये कार्यरत होतात असे वाटते, मी जिवंतपणा अनुभवतो. विशेष म्हणजे शिकवता शिकवता मीही शिकतो आहे असे वाटते. कधी कधी तर विद्यार्थीही नकळतपणे नव्या कल्पना सुचवतात. विशिष्ट विषय शिकवा म्हणून आग्रह करतात त्यामुळे चित्रकला विषयाचे गांभीर्य दोन्ही बाजूंना लक्षात येते आणि जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव होते. अर्थात मी केवळ शिकवितानाच नव्हे तर नेहमीच जबाबदार असायला हवे. अगदी झोपेतही, असे स्वत:ला बजावत असतो, नेहमीच. कृष्णमूर्तीच्या भाषेत म्हणायचे झाले तर मनाने कायम जागे असणे म्हणजेच विचारासकट सतर्क असणे. अशा या कायम सतर्क राहण्यामुळे अनेक नवनवे कला-विषय, विविध कलांचे गूढत्व शिवाय शिकविण्यातले ममत्व आणि आपण वाट पाहात असलेला कलेचा ज्ञानकोश आपल्याला खुणावतो आहे, प्रयोग करायला सुचवतो आहे असे वाटत राहायचे. नवा अभ्यासक्रम म्हणजे मूलत: भूमितीची आणि त्याला जोडून येणारे अवकाश आणि रंग यांची कलात्मक पुनर्बाधणी करणारा अनुबंध होता आणि तो स्वत: अभ्यास केल्याशिवाय शिकविणे म्हणजे गुन्हा ठरला असता. म्हणून मग त्याचा अभ्यास केला आणि त्याच दरम्यान माझी औरंगाबादच्या कला-महाविद्यालयात बदली झाली. मी हिरमुसलो कारण ती एकप्रकारे काळ्या पाण्याची शिक्षाच वाटली मला, परंतु ती मी आनंदाने निभावून नेली. कारण माझ्या डोक्यात ‘बाऊहौस’ नावाची नवी हौस कायमसाठी जागी झाली होती.

नव्या अभ्यासक्रमाच्या परिक्रमेत पॉल क्लीचे (Pedagogical Book); सोबत कान्डिन्स्कीचे (Concerning Spiritual in Art)). या दोन पुस्तकांचे पारायण करणे आवश्यक वाटले. कारण एकजण (क्ली) चित्रकलेचे व्याकरण मांडतो तर दुसरा (कान्डिन्स्की) कलेतील मुक्त आविष्काराची ओळख करून देताना कलेचा अध्यात्माशी, अमूर्ततेशी असलेला संबंध अधोरेखित करतो. पॉल क्ली आणि कान्डिन्स्की हे दोघेही- एक जर्मन तर दुसरा रशियन; त्यांचे दृष्टिकोन एक-दुसऱ्याला छेदणारे असले तरी चित्रकलेच्या अभ्यासात नवा दृष्टिकोन आणि विचार मांडणारे होते. त्यांच्या दृष्टीने चित्रकला म्हणजे करमणुकीचा विषय नव्हता तर आधुनिक संदर्भ-विषय घेऊन दृश्य-विचार मांडणारा मुक्त-प्रवास होता. पॉल क्ली चित्राकडे बीजगणिताच्या अंगाने पाहात असे तर कान्डिन्स्की स्वैर अभिव्यक्तीच्या दृष्टीने. या दोघांमुळे माझा आकलनाचा मार्ग कठीण झाला परंतु तो मला कलेबद्दल अंतर्यामी खडबडून जागा करणारा ठरला आणि त्यामुळे प्रेयस अधिक प्रिय झाले. माझ्या मते पॉल क्ली याने कलाशिक्षणात गणिती शिस्त आणूनही दृश्याविषयीचा मूलभूत मोकळेपणा तथा विचार-प्रवर्तक असा दृष्टिकोन जगापुढे ठेवला, त्याला आवश्यकतेनुसार स्पष्ट करीत मी शिकविण्याचा प्रयत्न केला. त्याचा विद्यार्थ्यांना जेवढा लाभ झाला त्यातून अधिक मला झाला आणि मी माझ्यातल्या शिक्षकाला, विद्यार्थ्यांना किती तऱ्हेने शिकविता येईल हे शोधण्यात दंग झालो. कान्डिन्स्की तर रंगांचा जादूगर होता आणि त्याचे अमूर्ततेविषयीचे विश्लेषण मनाला भिडणारे ठरले. तो म्हणतो, ‘‘आंतरमनाला गरजेचे वाटणारे सगळे मार्ग पवित्र असतात, चित्रकाराला जड आणि सूक्ष्म यांची कलात्मक सांगड घालता आली पाहिजे. मी माझ्या नकळत पूर्णपणे त्या दोघांचा विद्यार्थी झालो. दोघांचाही केवळ चित्र-माध्यमातूनच अभिव्यक्ती-विचार सादर करण्याचा मानस माझ्या मनाला भावला. कलाकृती आधी ठरवून करण्याची गोष्ट नाही तर आंतरचक्षूंनी पाहात पाहात आशयाला, रूपाला आणायची भावस्थिती आहे असे त्यांना वाटत असे. चित्रभाषेशिवाय इतर कुठल्याही बोलीभाषेचा किंवा दृश्यलिपीचा अभिव्यक्तीसाठी वापर करणे म्हणजे रंग, आकार इत्यादी चित्र-घटकांचा अपमान करण्यासारखे आहे असे कान्डिन्स्कीला वाटे तर पॉल क्लीला वाटे की कलाकृतीतील आशयाची हालचाल, ताल, तोल सांभाळत तिला दृश्यात आणायचे असते. या दोघांनीही ‘बाऊहौस’च्या शिक्षण कार्यात मोलाची भर घातली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं नाही तर स्वत:सोबत मुक्तपणे शिकू दिले. आपल्याकडे आजही चित्रकलेच्या शिक्षणाविषयी आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ चालू आहे, हे दुर्दैव आहे.

त्याच दरम्यान, नुकतेच ज्यांचे निधन झाले त्या डॉ. कृष्णा रेड्डी यांची कार्यशाळा आयोजित करण्याची माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळ जवळ चाळीस ग्राफिक चित्रकार त्या उपक्रमाला उपस्थित राहिले होते. डॉ. रेड्डी यांनी कलर-व्हिस्कोसिटीबाबत उपस्थितांना जो अनुभव दिला तो सद्गदीत करणारा होता. अशा कार्यशाळा, व्याख्याने, काव्य-संमेलने आखून ती यशस्वी करून दाखविण्यात मोठे आव्हान असे आणि ती पेलण्याची क्षमता माझ्यात असल्याचा आनंददायी शोध मला रेड्डींच्या कार्यशाळेमुळे लागला.

नंतर १९८३ मध्ये फाऊंडेशनच्या मुलांना घेऊन मी ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’च्या हिरवळीवर एक ‘हॅपनिंग’ नावाचा कला-प्रकार सादर केला होता (त्याचे वैशिष्टय़ म्हणजे चक्क एक खरीखुरी चारचाकी गाडी वर्तमानपत्रात गुंडाळली होती आणि हा दृश्य परिणाम सादर केलेल्या अनेक कलाप्रकारांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा होता. असे दृश्य मला वाटतं, आमच्यासकट प्रेक्षक पहिल्यांदाच पाहात होते असावेत.) तो पाहून इतर सर्व प्रेक्षक आणि विद्यार्थी दिग्मूढ झाले होते. सर्व विद्यार्थी भारावून गेले होते. त्यापैकी अनेकांनी चित्रकलेच्या क्षेत्रालाच स्वत:ची कलात्मकता निष्ठेने सादर करण्याचा निश्चय केला आणि तो ते आज खरा करून दाखवीत आहेत. आज त्यापैकी अनेकजण कलाक्षेत्रात नावारूपालाही आले आहेत.

माझ्यासाठी चित्रनिर्मिती, लेखन आणि शिकविणे या एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत. चित्र-निर्मिती ही पहिली अत्यंत महत्त्वाची बाजू, लेखन-वाचन दुसरी तर शिकविणे ही नाण्याची कडा म्हणजे तिसरी बाजू. ही तिसरी बाजू गुळगुळीत होऊ नये याची काळजी लेखन-वाचन आणि चित्रनिर्मिती करूनच घेता येते हे मला ही तिन्ही कार्ये नित्यनेमाने केल्यामुळेच कळले.

त्याचप्रमाणे हे निर्मिती-कार्याचे-त्रिकुट लक्षात घेता; मला माझ्यातला लेखक, चित्रकार आणि शिक्षक या तिन्ही अंगांनी कार्यक्षम असणं माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं आणि त्यात मी कोणतीही कसर ठेवली नाही. माझे मित्र दिवंगत चित्रकार प्रभाकर बर्वे यांनी स्वत:ला अशा तऱ्हेने नियमाच्या घडय़ाळाला बांधून घेतलं होतं, हे मी अनुभवलं होतो. त्यांच्याकडे माझे नित्याचे जाणे-येणे असे. ते म्हणत नोकरी करणाऱ्या चित्रकाराने स्वत:वर सक्ती केल्याशिवाय आणि कामात सातत्य राखल्याशिवाय त्याच्या हातून नवनिर्मिती होणार नाही. त्यांच्याकडे पाहून मला वाटायचं त्यांच्यासाठी नोकरी म्हणजे घडय़ाळातली वेळ आहे आणि कला-निर्मिती म्हणजे न मोजता येणारा काळ आहे. त्यांनी शांतपणे दोन्हीशी सामना केला. त्यांच्या हातून उत्कृष्ट कलानिर्मिती झाली. ते या जगात असेपर्यंत मला त्यांच्या मैत्रीची ऊब मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.

निष्ठा डगमगली की व्यासंगाचा व्यवसाय व्हायला वेळ लागत नाही आणि एकदा व्यवसायात अडकलात की व्यासंग तुमच्याकडे पाठ फिरवतो. हे मी अनेक शिक्षकांच्या आणि चित्रकारांच्याही बाबत घडताना पाहिले आहे आणि मनाशी ठरवले की काही झाले तरी शिकवण्यासोबत चित्रनिर्मिती करणे हा हाती घेतलेला वसा आहे आणि तो जिवावर बेतले तरी टाकायचा नाही. बावीस वर्षे मी ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये अत्यंत आनंदाने आणि निष्ठेने शिकविले परंतु ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ मधल्या अप्रिय तथा घाणेरडय़ा राजकरणाला कंटाळून मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मोकळ्या स्वच्छंद वातावरणात आलो.

एवढय़ा दीर्घ प्रवासाच्या अनुभवानंतर चित्रकला शिक्षणाबद्दल माझी काही ठाम मते झाली आहेत. ती म्हणजे चित्रकला शिकवायची नसते तर ती शिकायची असते. ज्याला शिकायची आहे त्याला सर्वतोपरी साहाय्य करावे. एकटे होणे किती आवश्यक आहे ते सांगावे. चुका करू द्याव्यात, दृष्टांत झाल्याप्रमाणे त्याच्या तोंडातून ‘चित्रेखा चित्रेखा’ असा चित्रघोष झालेला आपण ऐकत नाही तोवर त्याला गटांगळ्या खाऊ द्याव्यात. तो बुडणार नाही याची दक्षता मात्र आपण घेत राहावी.

prabhakarkolte@hotmail.com