04 August 2020

News Flash

आणि ‘विज्ञान लेखक’ झालो..

माझ्या आयुष्यात माझी आई आणि माझी पत्नी सविता आणि मामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आर्थिक जुळवाजुळव करायची होती, त्याचवेळी विज्ञानाच्या लेखांना मागणी वाढत होती. लिहिणारे कमी होते. वृत्तपत्रे वेळच्या वेळी आणि चांगले मानधन देत होती. त्यामुळे भरपूर स्तंभलेखन केलं. दिवाळी अंकात विज्ञानकथांना मागणी होती. पंचवीसहून अधिक दिवाळी अंकांमध्ये तीन-चार वर्षे लिहिले. वैज्ञानिक लेखांची पुस्तके निघत होती. त्यामुळे ‘विज्ञान लेखक’ हा शिक्का अधिकाधिक घट्ट होत गेला आणि कायमचाच चिकटला. आज माझी १९० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत..

आमच्या वेळी म्हणण्याइतकं माझं वय झालंय, ज्येष्ठ हे विशेषणही गेली बरीच वर्षे मला लावलं जातंय. खरंतर ‘माझ्या विषयी’, हे माझं वृत्तपत्रीय लेखन आणि ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ या दोन पुस्तकांत माझ्याबद्दल मी बरंच काही सांगितलंय. तरीही बरंच काही उरलंय, त्यातल्या या काही हकीकती, मी विज्ञान लेखक म्हणून कसा घडत गेलो हे सांगणाऱ्या..

माझ्या शाळेत दोन प्रकारची मुलं असायची. एक माझ्यासारखी चड्डीला पृष्ठभागी ठिगळ असलेली आणि बहुधा वडीलभावाचे कपडे त्याला होईनासे झाले म्हणून यांना मिळालेली. दुसरी अगदी नीटनेटकेपणाचा गणवेश धारण करणारी. त्यांची पुस्तके नवी कोरी, व्यवस्थित कव्हर घातलेली असत. आमची बहुधा ओळखीच्या वरच्या वर्गात गेलेल्या मुलाची किंवा मग निम्म्या किमतीत खरेदी केलेली असत. आमच्या वर्गात बऱ्याच साहित्यिकांची मुलं होती. त्यातले काही माझे जवळचे मित्र होते. त्यातल्या एका कवीच्या मुलाचा वाढदिवस होता. त्याने मलाही वाढदिवसाला बोलावले होते. रिकाम्या हाताने जायचे नाही, असं आईनं सांगितलं. मग ओळखीच्या दुकानदाराकडून मागं खोडरबर असलेली पेन्सिल आणि बारा इंची पट्टी अशी भेट त्या दुकानदारानंच बांधून दिली. ती भेट घेऊन मी मित्राच्या घरी पोचलो. मला कपडय़ांचे दोनच संच होते. कोकणातला एक वाक्प्रचार आठवतो. त्याचा उत्तरार्ध इथं देतो  ‘..आणि एक दांडीवर.’ त्यामुळे चांगले कपडे घालायचा प्रश्नच नव्हता.

मित्राकडे पोहोचलो. त्याचा भाऊ माझ्यासारख्या मित्रांची वाटच बघत उभा होता. मला त्यानं त्या इमारतीच्या दारातच थांबवलं, ‘‘हे बघ, आमच्याकडे खूप मोठे मोठे लोक यायचेत तर तू जा. हे आठ आणे घे आणि काहीतरी खाऊ घेऊन खा!’’ त्याने मला आणि माझ्या वर्गमित्राला जवळजवळ हाकलूनच दिले. मी ते आठ आणे आणि ती पट्टी पेन्सिल घेऊन आलो. आईला सगळं सांगितलं. आईनं ती पट्टी पेन्सिल घेतली. मग म्हणाली, ‘‘ते आठ आणे उद्या शाळेत गेल्यावर त्या मित्राला दे!’’ दुसऱ्या दिवशी त्या मित्राने अगदी निरागसपणे आम्हाला विचारलं, ‘‘अरे! तुम्ही कुणीच काल का आला नाहीत?’’ कुणीच खरं कारण सांगितलं नाही.  पण त्या संध्याकाळी त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. पाणी मागितलं. तो पाणी आणायला गेल्यावर तिथल्या कपाटावर ते आठ आणे ठेवून दिले. त्या कठीण काळात माझ्या वडिलांचे मित्र बाळासाहेब कान्हेरे आणि माझा मित्र धनंजय गोळे त्याचे वडील, खरं तर कान्हेरे आणि गोळे या दोन कुटुंबांची खूप मदत झाली. इतरही अनेकांच्या मदतीवर वाढलो. शिष्यवृत्त्यांवर शिकलो. आईनं माझ्याकडून एकच अपेक्षा ठेवली होती. ती म्हणजे मी खूप शिकावं. मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं, पण पीएच.डी. पूर्ण करू शकलो नाही. ती तिची अपेक्षा माझ्या पत्नीने पूर्ण केली. त्यावेळी तिला झालेला आनंद अवर्णनीय होता. माझ्या आयुष्यात आणखी एका कुटुंबाचे

ऋ ण मला मान्य करावे लागेल. भारती काकू आणि धाकटे काका हे दोघं!

मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्रविभागात प्रयोगदर्शक म्हणून काम करू लागलो. त्यावेळी संशोधन करता येईल असं वाटलं होतं. आमच्या विभागाचा त्यावेळी विस्तार सुरू होता.

डॉ. बा. गं. देशपांडे हे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. भयंकर उत्साही माणूस. आधी ते तेल आणि वायू महामंडळाचे प्रमुख भूशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. खंबायतचं तेल क्षेत्र शोधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात बरंच नवं घडत होतं. ते निवृत्त झाले आणि विभागाचे वातावरण कलुषित होऊ लागले.. एक प्राध्यापक त्यापदी विराजमान झाले आणि मला सारा हर्डीच्या ‘लंगूर्स ऑफ अबू’मधील माकडांच्या टोळीचा जीवनसंघर्षांचं मानवी जीवनातलं प्रत्यंतर अनुभवायला मिळालं. या प्राध्यापकांनी मला बोलावून घेतलं आणि ‘तू दुसरी नोकरी शोध’ असं स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यांना त्यांच्या विद्यार्थिनीला माझ्या जागी नेमायचं होतं. साधारणपणे काय घडणार याचा अंदाज मला आधीच आला होता. त्यामुळे ‘आकाशवाणी’तील कार्यक्रम अधिकारी पदांच्या जागेसाठी मी अर्ज केलेला होता. योगायोग असा की एक आठवडा आधीच त्या पदासाठी माझी निवड झाल्याचं पत्र मला मिळालं होतं. मी बाणेदारपणा दाखवायची ही संधी सोडली नाही आणि मी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. जर ‘आकाशवाणी’ची नोकरी हाताशी नसती तर मी कदाचित इतक्या तडकाफडकी राजीनामा दिला नसता, कोण जाणे?

पण माझी पीएच.डी. करायची संधी हुकली, हेही मला कळून चुकलं होतं. त्या काळात केलेल्या संशोधनावर माझे काही शोध निबंध प्रसिद्धही झाले होते. ते सगळं नव्या परिस्थितीत फोल ठरलं होतं. त्या काळातल्या माझ्या संशोधनात जुन्नरजवळ केलेल्या क्षेत्र परीक्षणात मला ज्वालामुखीच्या राखेचे नमुने मिळालेले होते. त्यावर मी शोधनिबंधही प्रसिद्ध केला होता. त्यावर एक प्राध्यापक उखडल्याचं मला कळलं. ते सर म्हणाले, ‘‘आम्ही गेली ४०-५० वर्ष डेक्कन ट्रॅपवर हिंडतोय, तपासतोय. आम्हाला कुठं ही ‘व्होल्कॅनिक अ‍ॅश’ दिसली नाही. हा कालचा पोरगा आम्हाला खुळा समजतोय काय?’’ माझ्या फटकळ स्वभावाप्रमाणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘असंख्य लोक गेली दोन हजार वर्षे डेक्कन ट्रॅपवर चालताहेत. ते कधी असं काही म्हणाले नाहीत. नीट बघितलं की सगळं दिसतं.’’एक दिवस मला एक निरोप आला,  ‘‘घाटे, अहो तुमची नोकरी जायची वेळ आलीय. तुम्ही ताबडतोब जाऊन त्या प्राध्यापकांची माफी मागा.’’ मी देशपांडय़ांना हे सांगितलं. ते म्हणाले, ‘‘तू काळजी करू नको. मी काय करायचं ते बघतो.’’ त्या प्राध्यापकांना त्यांचं म्हणणं खरं करता आलं नाही. खरी गम्मत तर पुढे आहे. माझ्या पत्नीची पीएच.डी. झाल्यानंतर ती तिच्या मार्गदर्शकांच्या एका प्रकल्पात काम करीत होती. दरम्यान मी विद्यापीठही सोडलं होतं. आकाशवाणीही सोडली होती आणि पुण्यात महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचा संचालक म्हणून काम करू लागलो होतो. वरील प्रसंगाला दहा-बारा वर्षे होऊन गेली होती. माझी पत्नी ज्या प्रकल्पात काम करीत होती तिच्या त्या प्रकल्पातल्या संशोधनात त्यांना ज्वालामुखीय राखेचा एक खूप मोठा थर सापडला. ती बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजली. बीबीसीने ती बातमी दिली. प्रमुख इंग्रजी वर्तमानपत्राने ती पहिल्या पानावर छापली. मग हे प्राध्यापक बहुधा जागे झाले. त्यांना अत्र तत्र सर्वत्र ‘व्होलकॅनिक अ‍ॅश’ दिसू लागली. त्या राखेबद्दल जो शोधनिबंध प्रसिद्ध  झाला त्यात माझ्या संशोधनाचा संदर्भ होता. हे मी आईला सांगितलं. तिचं एक वेगळंच तत्त्वज्ञान होतं. ती नेहमीप्रमाणे म्हणाली, ‘‘बघ तू जे भोगलंस त्याचं उट्टं सविताने काढलंच की नाही?’’

माझ्या आयुष्यात माझी आई आणि माझी पत्नी सविता आणि मामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. माझा मामा श्रीराम भिकाजी वेलणकर हा कायम दीपस्तंभ बनून माझ्या सोबत होता. माझ्या आईनं मात्र खूप भोगलं. मराठी चित्रपटांतून दाखवतात त्यापेक्षा तिचं आयुष्य हलाखीत गेलं. संसार सुखाचा चालला असताना वडील गेले. पदरात दोन मुलं. बँकेत दोनशे रुपये. त्या परिस्थितीतून माझ्या धाकटय़ा आणि मोठय़ा काकांच्या, तसंच बाळकाका (कान्हेरे) च्या मदतीमुळं तिनं आम्हाला वाढवलं. त्याही परिस्थितीत तिनं माझी वाचनाची आवड जोपासली. ‘खूप शिक आणि मोठा हो!’ एवढंच तिचं म्हणणं होतं.

सविता माझ्या आयुष्यात आली नसती तर? हा प्रश्न आजकाल मला वारंवार सतावतो. तिनं माझ्याशी लग्न करायचं ठरवलं हे माझं सुदैव, हेही मला जाणवतं. मी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना माझी आणि विजय पेंडसेची मैत्री झाली. तो १९७३ मध्ये पुणं सोडून त्रिवेंद्रम येथे इस्त्रोमध्ये नोकरीसाठी गेला. तोपर्यंत मी त्यांच्या घरातलाच एक झालो होतो. जाण्याच्या आधी त्यानं त्याच्या बहिणीला फुप्फुसाच्या क्षयाची बाधा झाल्याचं मला सांगितलं होतं. त्या काळात खरं तर ती तिच्या महाविद्यालयाकडून हॉकी खेळायची. इतरही खेळात ती प्रवीण होती.  एक दिवस सविता घरीच दिसली. बरीच कृशही दिसली. मी तिला घेऊन माझा मित्र डॉ. सुरेश देशपांडे याच्याकडे गेलो. त्याने एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवलं. मग एक्स-रे काढल्यावर ‘योग्यवेळी आलात. थोडा उशीर झाला असता तर अवघड होतं’, असं सागून उपचार सुरू केले. त्या उपचार काळात तिच्या सहनशक्तीची परीक्षाच होती. दीड वर्षांने तिला डॉक्टरांनी पूर्ण बरी झाल्याचं सांगितलं. या काळात आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. ‘लग्न करशील का?’ हा प्रश्न आम्हाला कधी विचारावा लागलाच नाही. तिला पुढे शिकायचं होतं. तिने पुरातत्त्वशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. क्षेत्रपरीक्षणानिमित्त हिंडली. काही उत्खननात भाग घेतला. भारतीय प्राच्यविद्या आणि इतिहास परिषदेच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधन पत्रिका संपादक मंडळावर तिनं काम केलं. तिला कायमस्वरूपी नोकरी लागल्यावर मला पूर्णवेळ लेखक व्हायची परवानगी तिनं दिली. या काळात आम्हाला काही हितचिंतकांनी खोचक प्रश्न विचारलेच. ‘‘तुझी बायको तुझ्यापेक्षा जास्त शिकली. कमाल आहे. घरी काही वाद होत नाहीत ना?’’ हा तिला पीएच.डी. मिळाल्यावर विचारला गेलेला प्रश्न, नंतर ‘‘अरे, बायको नोकरी करते, तू नोकरी सोडून बसलास, काही त्रास नाही ना?’’ या दोन प्रश्नांना, ‘‘काळजी करू नका’’ एवढंच मी उत्तर देत असे. आम्ही दोघं मात्र मनापासून हसायचो. सविताला डॉक्टरेट मिळाल्याचा आनंद तिच्या माझ्यापेक्षा माझ्या आईला आणि धाकटय़ा काकूला झाला. सविता पीएच.डी. झाली तेव्हा मी पुण्याच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचा संचालक होतो. संग्रहालयातर्फे होणाऱ्या व्याख्यानमाला लोकांपर्यंत पोहोचवल्याच पण मुलांसाठी विज्ञानवर्ग, तसंच मराठी विज्ञान लेखकांचे वार्षिक मेळावे मी संग्रहालयाच्या वतीने सुरू केले. पण त्या नोकरीत मन रमत नव्हतं. अनेक कारणं होती. लेखनाकडेही दुर्लक्ष होत होतं. सविता नोकरीत कायम झाल्यावर मग मी नोकरीचा राजीनामा दिला.

माझ्यावर विज्ञान लेखक हा शिक्का खरं तर अगदी सहजासहजी बसला. २५ जून १९७५ या दिवशी मध्यरात्री भारतात आणीबाणी घोषित करण्यात आली. त्या काळात मुख्यत: मी सामाजिक कथा लिहीत असे. माझी ‘एक दिशाहीन संध्याकाळ’ ही कथा प्रकाशित झाली आणि प्राध्यापक प्रभाकर सोवनींनी मला ‘सृष्टिज्ञान’ परिवारात सामील करून घेतलं होतं. त्यामुळे मी ‘सृष्टिज्ञान’मध्ये छोटे-छोटे विज्ञान लेख लिहीत असे. सरांमुळेच मी ‘विज्ञानयुग’ या मासिकातही १९७५ नंतर लिहू लागलो होतो. पण या मासिकात लिहूनही ‘विज्ञान लेखक’ हा शिक्का बसणं तसं अवघडच होतं. कारण त्यांचे मर्यादित वर्गणीदार.

देशात आणीबाणी घोषित झाली. त्याबरोबर सर्व छापायचा मजकूर हा आधी तपासून घ्यावा आणि मग छापावा, अशी प्रसिद्धीपूर्व छाननीही सुरू झाली. मजकुराची प्रसिद्धीपूर्व तपासणी करण्याचे काम पोलिसांवर सोपवले गेले. हा एक मजेशीर प्रकार होता; पोलीस बिचारे काय काय आणि किती वाचणार? संपादक मंडळी छापायचा मजकूर घेऊन म्हणजे त्याच्या ‘गॅल्या’ किंवा कच्ची छपाई असलेला मजकूर घेऊन पोलीस चौकीत रांगेत उभी असत. काही दिवसांतच संपादकांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे वैज्ञानिक लेख असेल तर पोलीस लगेच तो पास करतात. त्याचा आम्हाला फायदाच झाला. श्री. भा. महाबळ  एक दिवस मला म्हणाले, ‘अरे, आपल्याला एक वैज्ञानिक स्तंभ सुरू करायचा आहे, पुढच्या आठवडय़ापासून. माझा ‘विज्ञानवेध’ हा स्तंभ ‘मनोहर’ला सुरू झाला. ह. मो. मराठे म्हणाले, ‘किलरेस्कर’ला लिही. तिथे लिहू लागलो. तेव्हा पुण्यातूनही ‘तरुण भारत’ निघत असे. त्यांनीही विज्ञानावर मजकूर द्याल का? असे विचारले. माझी काहीच हरकत नव्हती. सायंटिफिक अमेरिकन, न्यू सायंटिस्ट, सायन्स डायजेस्ट अशी बरीच इंग्रजी- अमेरिकी नियतकालिकं तेव्हा रद्दीच्या दुकानात मांडून ठेवलेली असत. ‘इकॉनॉमिस्ट’मध्येही विज्ञानासंबंधी मजकूर असे. शिवाय विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातून वैज्ञानिक संशोधन पत्रिका उपलब्ध होत होत्या. फर्गसनच्या बाई जेरबाई ग्रंथालयाची दारे उघडीच होती. वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखं माझं पेन चालू लागलं. सुरुवातीचे लेख थोडे क्लिष्ट झाले. वाक्यरचना इंग्रजी पद्धतीची होती. पण प्रभाकर सोवनी, श्री. भा. महाबळ आणि ह. मो. मराठे त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं माझ्या लेखनातील अशा गोष्टी नजरेस आणून देत, त्यामुळे हळूहळू लेखनात सुधारणा होत गेली. आ.मा. तथा बाबा लेले यांच्या संपर्कात मी ‘सृष्टिज्ञान’मुळे आलो. त्यांनी मला एक अतिशय मोलाचा सल्ला दिला. ‘जे लिहिशील ते सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल, अशा पद्धतीनं लिही. आपली विद्वत्ता दाखवायला म्हणून लिहू नकोस.’ मी या मार्गदर्शनाबद्दल बाबा लेले यांच्या कायम ऋणात राहू इच्छितो.

मला विज्ञान लेखनाकडे वळण्यास प्रवृत्त करणारी आणखी एक घटना कारणीभूत ठरली. गजाभाऊ क्षीरसागर बरीच वर्षे सोवनी सरांच्या मागे लागले होते; पृथ्वीसंबंधी सांगोपांग माहिती देईल, असे पुस्तक लिहा. सोवनी सर तेव्हा फर्गसनचे उपप्राचार्य होते. शिवाय भूशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे हे पुस्तक लिहिणं त्यांना शक्य होत नव्हतं. एक दिवस गजाभाऊंनी तो विषय काढला. तेव्हा सर म्हणाले, ‘अहो, ते काम घाटेच करतील’ मग त्यांनी हे पुस्तक लिहिताना मला सर्वतोपरी मदत केली. ‘वसुंधरा’ला राज्य पुरस्कार मिळाला. मग माझ्यावरचा विज्ञान लेखक हा शिक्का घट्ट झाला.

माझ्या विज्ञान लेखनात आकाशवाणीचाही फार मोठा हातभार लागला आहे. छोटी छोटी वाक्यं, सुटसुटीत सोप्या भाषेत लिहायचंच पण त्यात सातत्यही राखायचं, हे मी आकाशवाणीत शिकलो. तसंच ऐनवेळी कुठल्याही विषयावर लिहायची मानसिक तयारी आकाशवाणीत पणाला लागली. एक दिवस सकाळीच बातमी आली. इंग्लंडमध्ये पहिली टेस्ट टय़ूब बेबी जन्माला आली. ‘आकाशवाणी’त पोहोचलो, तर माई (क्लारा अंधारे) दारातच स्वागताला हजर होत्या. ‘अरे, आजच्या बातम्या ऐकल्यास का? आजच्या आमच्या कार्यक्रमात ‘टेस्ट टय़ूब बेबी’बद्दल तुला बोलायचंय. मी ‘नलिका बालक’ या विषयावर वाचतच होतो. उंदीर आणि गिनीपिगवर झालेल्या प्रयोगाची कात्रणं माझ्याकडे होती. ती घेऊनच ऑफिसात आलो होतो. माझ्याकडून असं लेखन वारंवार करून घेतलं जात होतं. त्याचा फायदा झाला. मी एवढं कसं आणि का लिहिलं? हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो. त्याचं उत्तर ‘परिस्थिती’आहे.

मी आकाशवाणीत रुजू झालो, तो नागपूरला. सविता तेव्हा पीएच.डी. करीत होती. दोन ठिकाणचा खर्च होता. वर्षांतून दोन-तीन कथा लिहिल्या जायच्या. त्या पैशांनी संसाराला मदत होत नव्हती. विज्ञानाच्या लेखांना मागणी वाढत होती. लिहिणारे कमी होते. वृत्तपत्रे वेळच्या वेळी आणि चांगले मानधन देत होती. त्यामुळं मग मी वृत्तपत्रात लिहू लागलो. भरपूर स्तंभलेखन केलं. दिवाळी अंकात विज्ञानकथांना मागणी होती. अनुभवानं आधी पैसे मग कथा, हा उपक्रम सुरू केला.  लेख आणि कथा मिळून पंचवीसहून अधिक दिवाळी अंकांमध्ये तीन-चार वर्षे लिहिले. नोकरी सोडून पूर्णवेळ लिहू लागलो. ‘फीचर सिंडिकेट’ उदयास येऊ लागल्या होत्या. आलेल्या वैज्ञानिक लेखांची पुस्तके निघत होती. त्यामुळे ‘विज्ञान लेखक’ हा शिक्का अधिकाधिक घट्ट होत गेला आणि कायमचाच चिकटला.

आज माझी १९० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. काही तात्कालीक पुस्तकांचे अपवाद वगळता बहुतेकांच्या दोन तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अनेक अडचणींना तोंड दिलं, पण त्यांचा बाऊ केला नाही. वाईट अनुभव आले नाहीत असं नाही, पण त्यातून शिकत गेलो. आपल्याला भेटलेली चांगली माणसं विसरली जातात पण वाईट माणसं आयुष्यभर लक्षात राहतात, हे खरं पण त्यांना अनुल्लेखानं मारणंच चांगलं, असं मला वाटतं. विशेषत: मी ‘पैंजण’, ‘बुवा’तसच ‘अद्भुत-कादंबरी’ आणि नंतर ‘किलरेस्कर’मासिकाचा कार्यकारी संपादक होतो त्या काळात मी किती महान साहित्यिक आहे आणि माझं संपादन कौशल्य कसं इतरांपेक्षा वेगळं आहे, हे सांगणाऱ्या किंवा पुस्तकांच्या मनोगतामध्ये आवर्जून माझे आभार मानणाऱ्या काहींनी नंतरच्या काळात मला कसं टाळलं, याचे अनेक किस्से सांगू शकेन, पण तीही एक गम्मत होती.

वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक मित्र मिळाले ती मिळकत, यापेक्षा खूप मोठी आहे. मुकुंदराव किलरेस्करांचा लोभ, श्री. भा. महाबळ, ह. मो. मराठे यांच्या सहवासात केलेली टिंगल-टवाळी, सुबोध जावडेकर, डॉ. अरुण मांडे यांचा स्नेह, सुरेश भट, श्रीधर शनवारे यांची वयाने लहान असून झालेली दोस्ती, भूजल शास्त्रज्ञ मुकुंद घारे, प्रा. प्रभाकर सोवनी, लि. वि. पेशवा या गुरुजनांचे प्रेम यांनी आयुष्य संपन्न व्हायला मदतच झाली. जोपर्यंत वाचू शकतो आणि लिहू शकतोय अशा परिस्थितीत गेलो तर मग सोन्याहून पिवळं..

savitaghate@gmail.com
chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 3:31 am

Web Title: story of author niranjan ghate career
Next Stories
1 जगलो, तेच लिहीत गेलो
2 नावीन्याचा अविरत शोध
3 पुष्कळ अजुनी उणा।
Just Now!
X