डॉ. सुचेता भिडे-चापेकर

चित्रकला आणि नृत्य, दोन्ही माझ्या आवडत्या दृश्य कला  आहेत. कॅनव्हासवर रेषांच्या रेखाटनातून चित्र साकारले जाते. रंगमंचावर हस्तमुद्रा आणि अभिनयातून नृत्य साकारले जाते. चित्र आणि नृत्य या दोन्ही कलांमध्ये भावनांचे रंग भरले जातात. अर्थवाही शब्दालंकारातून बांधलेली गीतरूपी बंदिश आणि संगीत याच्या जोडीनेच अभिनयातून नृत्य साकारले जाते. म्हणजेच नृत्य करताना मी रंगमंचावरील कॅनव्हासवर चित्रच रेखाटत असते. तो एक वेगळाच आनंद असतो. कोणालाही भाग्य वाटावे असे कलात्मक जीवन मला लाभले आहे..

Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

बालवयामध्ये घरातच उत्तम संस्कार होणे महत्त्वाचे असते. हे भाग्य मला लाभले. माझे वडील चित्रकार असल्यामुळे बालपणापासूनच कलेची दृष्टी लाभली. मात्र, मी नृत्य करायचे हे वडिलांनी आधीच ठरवून टाकले होते. त्यामुळे नृत्यामध्ये गती संपादन करताना अडसर येऊ नयेत म्हणून मी जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हे वडिलांनी निश्चित केले. मात्र, त्या वेळी प्री-एलिमेंटरी आणि एलिमेंटरी अशा चित्रकलेच्या परीक्षा दिल्याशिवाय तेथे प्रवेश मिळत नसे. मी त्या परीक्षा दिलेल्या नव्हत्या, मग काय, एक वर्ष थांबावे लागले. चित्रकलेच्या परीक्षा देऊन जे. जे. कला महाविद्यालयामध्ये रीतसर प्रवेश घेतला.

ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे हे आमचे विभागप्रमुख होते. ‘चित्रकला आणि नृत्य यातील समांतर गोष्टी या विषयावर तू विद्यार्थ्यांशी संवाद साध’, असे त्यांनी मला सांगितले. हा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी ध्यानात आल्या. चित्रकला काय किंवा नृत्य, दोन्ही दृश्य कला आहेत. कॅनव्हासवर रेषांच्या रेखाटनातून चित्र साकारले जाते. रंगमंचावर हस्तमुद्रा आणि अभिनयातून नृत्य साकारले जाते. चित्र आणि नृत्य या दोन्ही कलांमध्ये भावनांचे रंग भरले जातात. अर्थवाही शब्दालंकारातून बांधलेली गीतरूपी बंदिश आणि संगीत याच्या जोडीनेच अभिनयातून नृत्य साकारले जाते. म्हणजेच नृत्य करताना मी रंगमंचावरील कॅनव्हासवर चित्रच रेखाटत असते. हे चित्र अधिकाधिक चांगले आणि विलोभनीय कसे होईल हाच माझा प्रयत्न असतो आणि हा प्रयत्न मी जाणीवपूर्वक करत असते. नृत्यामध्ये फक्त शिस्त, भूमिती नसून त्यामध्ये ताल, सूर आणि अभिनयाचा भाग आहे. हे नसेल तर नृत्य हे केवळ कवायतीच्या स्वरूपातच राहील, असे मला वाटते. ते तसे होऊ नये हा माझा रियाज सदैव सुरू असतो.

नृत्यासंदर्भात सर्व शक्यतांना आजमावून पाहणे हीच माझी साधना असते. या साधनेला ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून संस्थात्मक स्वरूप आले. माझी मुलगी अरुंधती पटवर्धन ही नृत्याचा वारसा पुढे नेत आहे. संस्थेच्या राज्यभरात तीसपेक्षाही अधिक शाखा कार्यरत आहेत. कोणालाही भाग्य वाटावे असे कलात्मक जीवन मला लाभले. मात्र, नृत्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मला गायन रितसर शिकता आले नाही. म्हणजे नृत्यासाठी आवश्यक असे कर्नाटक शैलीचे गायन मी शिकले आहे. पण, खास कंठसंगीताचे म्हणून शिक्षण घेण्याचे राहून गेले. मला स्वर कळतात. नृत्यामुळे बंदिश लक्षात राहते. पण, राग समजतोच असे होत नाही. सुदैवाने माझा गळा चांगला आहे. पण, नृत्यामध्येच इतकी बुडून गेले की या साऱ्यामध्ये गायन शिकण्याचे राहून गेले. ही खंत आहे असे मी म्हणणार नाही. पण, राहून गेले हेच खरे!

माझे शिक्षण मुंबईला झाले असले तरी माझा जन्म पुण्याच्या नारायण पेठेतील. माझे आजोबा गोपाळ वामन भिडे हे लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. वडील विश्वनाथ भिडे यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांना कला शिक्षण घ्यायचे होते. त्या काळी मुंबई येथील जे.जे. कला महाविद्यालय ही एकमेव संस्था होती. मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची त्या वेळी आजोबांची ऐपतदेखील नव्हती. आणि ‘चित्रकला शिकून पोट भरेल का’ अशा विचारांतून त्यांनी वडिलांची इच्छा मान्य केली नाही. आजोबांचे चुलतबंधू मुंबईला चित्रकार होते. इंटर सायन्सला असताना वडिलांनी घर सोडले आणि मुंबईला काकाकडे राहून त्यांनी चित्रकला आत्मसात केली. हे काका त्या वेळी चित्रपटांची पोस्टर्स म्हणजेच भित्तिपत्रके करायचे. त्यांना वडील मदत करीत असत. या कलेतील त्यांची गती पाहून ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदी यांनी वडिलांना कला दिग्दर्शक म्हणून नोकरी आणि त्यांच्या ‘मिनव्‍‌र्हा मुव्हीटोन’मध्ये स्टुडिओसाठी जागादेखील दिली होती. वडिलांनी राज कपूर यांच्या ‘संगम’पासून ते ‘बॉबी’पर्यंतच्या सर्व चित्रपटांसाठी काम केले होते. माझी आई माहेरची यमुना दांडेकर. तिच्या लहानपणीच तिचे आई-वडील गेले. मामांनी तिचे पालनपोषण केले. मामी तिची वेणी घालत असताना भगवद्गीतेतील एक श्लोक दररोज तिला सांगत. त्यामुळे तिला भगवद्गीता मुखोद्गत होती. तत्त्वज्ञान आणि इंग्रजी विषय घेऊन ती बी.ए. ऑनर्स होती.

माझ्या वडिलांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे आजोबांचा विरोध पुढे मावळला. माझा जन्म नारायण पेठेतील भरल्या घरात गोकुळामध्ये झाला. वडील मुंबईला असल्यामुळे आमचे कुटुंब तेथेच स्थायिक झाले. लहानपणी कोणतेही गाणे लागले की मी लगेचच हातवारे करायचे. जे  कोणतीही मुले करीतच असतात. ते माझे हातवारे पाहून मी नृत्य करायचं हे जणू वडिलांनी ठरवूनच टाकले होते. त्यामुळे माझ्या कला शिक्षणाला घरातून पाठिंबा आणि प्रोत्साहनच मिळाले. मुंबईला आम्ही राहात होतो त्याच्या शेजारच्या इमारतीमध्ये तुळशीदास मंगेशकर मास्तर नृत्य शिकवायला येत असत. कथक आणि भरतनाटय़म, मणिपुरी अशा विविध नृत्यशैली समजण्याचं ते माझं वय नव्हतं. फक्त नृत्य शिकायला मिळणार हा आनंद होता. मंगेशकर मास्तरांना या विविध शैलींमधील नृत्य येत होते. ते शिकवायला येत तेव्हा आई पेटी वाजवून साथसंगत करायची. वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत मंगेशकर मास्तरांनी मला शिकविले. त्याच कालखंडात माझ्या भावाची मुंज पुण्यात झाली होती. पण, मुंबई येथील जे लोक येऊ शकले नाहीत अशांसाठी वडिलांनी दादर  येथे स्वागत समारंभ ठेवला होता. त्यामध्ये मी नृत्य सादर केले होते. हे नृत्य पाहून सोहराब मोदी यांनी मला ‘पन्नास रुपये’ बक्षीस दिले होते.

‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’तर्फे १९६६ मध्ये आहिताग्नी राजवाडे कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात माझे नृत्यावर सप्रयोग व्याख्यान झाले. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी,

डॉ. वसंतराव देशपांडे आणि वामनराव देशपांडे त्याला उपस्थित होते. ‘हिच्या तोंडून सरस्वती प्रकट होते’ असे वसंतराव म्हणाले होते. त्या कार्यक्रमानंतर पं. भीमसेनअण्णा यांनी मला १९६७ च्या सवाई गंधर्व महोत्सवात संधी दिली होती. त्यानंतर मी आतापर्यंत चार वेळा त्या स्वरमंचावरून नृत्य सादर केले आहे. नृत्यासाठी घरच्यांकडून मला जेवढे प्रोत्साहन मिळाले तेवढेच सासरच्या मंडळींकडूनही लाभले. माझ्या भावाचा अभियांत्रिकीचा मित्र विजयकुमार ऊर्फ अनिल चापेकर हेच माझे जीवनसाथी झाले. ते ना. गो. चापेकर यांचे नातू. त्यामुळे साहित्यिक वारसा लाभलेल्या अनिल चापेकर यांना माझ्या नृत्यप्रेमाची माहिती होती आणि माझा प्रवासदेखील त्यांनी जवळून पाहिला होता म्हणून माझी नृत्यसाधना अविरत राहू शकली. असे भाग्य क्वचितच एखाद्या कलाकाराला लाभते.

५-६ वर्षे मंगेशकर मास्तरांकडे शिकल्यावर वडिलांनी गुरूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. मंगेशकर मास्तर स्वत: गुरू आचार्य पार्वतीकुमार यांच्याकडे थोडे शिकले होते. मग मलाही त्यांच्याकडे शिकण्यासाठी घेऊन जायचे हे निश्चित झाले. प्रत्यक्ष नृत्याबरोबरच गुरू पार्वतीकुमार यांचा शास्त्राभ्यास हा व्यासंगाचा विषय होता. त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह प्रचंड होता. सकाळच्या वेळी मी रियाजासाठी सात वाजता ग्रँट रोडला त्यांच्या घरी पोहोचायचे तेव्हा मास्तर पूजेअर्चेत मग्न असत. ते रियाजाच्या खोलीत येईपर्यंत मी ग्रंथांच्या खजिन्यात हरवून जात असे. कदाचित मला लवकर बोलवून उशिरा क्लास सुरू करण्यामागे त्यांचा हाच हेतू असावा. भरतनाटय़ममधील कुठलीही हालचाल मग ती नृत्ताची (शुद्ध नर्तनाची) असो किंवा अभिनयाची, मास्तर पटकन शास्त्रातील व्याख्या सांगून स्पष्ट करत. ‘काय सुंदर श्लोक आहे, लिहून घेऊ?’, असे मी विचारायचे तेव्हा मास्तर सुखावून जात आणि पूर्ण ग्रंथच माझ्यासमोर येत. मग मी त्यामध्ये बुडून जात असे. रंगमंचीय आविष्काराबरोबरच मी नृत्यामध्ये पीएच.डी. केली याचे सारे श्रेय पार्वतीकुमार मास्तर यांच्या प्राथमिक शिक्षणाला आणि त्यांनी मनापासून जागविलेल्या व खतपाणी घातलेल्या शास्त्रप्रेमाला देते. मास्तरांच्या हालचाली अतिशय सौष्ठवपूर्ण आणि रेखायुक्त असत. अभिनय करताना डोळ्यांतून सर्वच भावछटा ते उत्तम दाखवीत. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर तोच भाव उमटावा म्हणून ते अक्षरश: हजारो उदाहरणे देत. पुराणकथा आणि त्यातील व्यक्तिरेखांशी वास्तवाचे नाते जोडत. तालाचा भाग असो किंवा अभिनयाचा ते समरस होऊन शिकवायचे. ‘मी जे देतो ते नुसते घेऊ नका. ते पचवा आणि तुमचे म्हणून नव्याने मांडा’ हे मास्तरांचे विचार मनावर पक्के कोरले गेले. त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणून पुढे जाऊ शकले याचे समाधान आहे.

तंजावरच्या मराठी राजांनी भरतनाटय़मसाठी लिहिलेल्या मराठी रचनांवरील संशोधनास गुरू पार्वतीकुमार यांनी सुरुवात करून अनेक रचनांची रंगमंचीय संस्करणे तयार केली. माझ्या भाग्याने त्या मला शिकवून प्रथम रंगमंचावर सादर करण्याची संधीदेखील मास्तरांनी मला दिली. या पूर्ण संशोधन प्रक्रियेमध्ये मला सहभागी करून घेतले. ‘तंजावर नृत्यप्रबंध’ हे त्यांचे पुस्तक ‘महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती’ मंडळाने प्रसिद्ध केले आहे. त्याच्या प्रस्तावनेत मास्तरांनी माझा विशेष उल्लेख केला आहे. याहून त्यांच्या मोठय़ा मनाचे प्रतीक ते कोणते? गुरू पार्वतीकुमार यांनी भरतनाटय़म नृत्यातील तंजावरमधील प्रयोगांचा खास अभ्यास केला. तेथील शहाजीराजे भोसले यांनी या नृत्यशैलीसाठी पूर्वापार वापरल्या जाणाऱ्या कर्नाटक संगीताचा परीघ ओलांडत मराठी व हिंदीत रचना केल्या. सरफोजीराजे यांनीही त्यांचा वारसा पुढं नेला. मग मीही शहाजीराजांच्या रचनांवर आधारित संशोधनात्मक काम केलं. मुंबई व चेन्नईतल्या म्युझिक  अ‍ॅकॅडमीत मी नृत्यप्रबंध सादर केला. त्यासाठी गुरू किट्टप्पा यांनी मला शहाजीराजांच्या रचना राग-तालात बांधून दिल्या. अनेक वर्षे मी या रचनांचे देशात आणि परदेशात सादरीकरणही केले. आता  साहित्याची भाषा मराठी आहे, तर मग संगीत हिंदुस्तानी का नको, असे रसिकांनी मला विचारले. मी ते आव्हान स्वीकारलं. सुरुवातीला नाटय़पदांवर नृत्यसंरचना केल्या. त्यासाठी

डॉ. वसंतराव देशपांडे यांनी मला मार्गदर्शन केले. नंतर पूर्णपणे हिंदुस्तानी संगीताचा विचार केला. तेव्हा डॉ. प्रभा अत्रे यांनी विविध रागांमधील बंदिशींसाठी आणि तालयोगी  पं. सुरेश तळवलकर यांनी तालरचनेसाठी खूप सहकार्य केलं. पं. अर्जुन शेजवळांनी पखवाजवरील तालरचनांसाठी मदत केली आणि भरतनाटय़म मराठी संस्कृतीत एकरूप झालं. यातून ‘नृत्यगंगा’ हा कार्यक्रम विकसित होत गेला.

गुरू पार्वतीकुमार यांचे संशोधन १९७० पासून मी पुढे नेऊ शकले. मास्तरांचे संशोधन, संस्करण व संरचना १८व्या शतकातील सरफोजी राजांच्या संदर्भातील होते. परंतु, १७व्या शतकातील शहाजीराजांच्या रचनांशी माझी ओळख मास्तरांमुळेच झाली. त्यांची उत्तमोत्तम मराठी पदे मी गेल्या तीन तपांहून अधिक वर्षे रंगमंचावर सादर करीत आहे. या संदर्भात मला तंजावरचे ज्येष्ठ गुरू किट्टप्पा पिल्ले यांचे मार्गदर्शन लाभले. मुळातून शिकायचे कसे आणि काय हा मूलमंत्र मला पार्वतीकुमार मास्तरांकडून मिळाला. किट्टप्पा सर हे गुरू पार्वतीकुमार यांच्याकडे येत असत. गुरू पार्वतीकुमार यांनी ‘तालम्’ या वाद्यासंदर्भात काही प्रयोग करून वेगवेगळ्या सुरांचे ‘तालम्’ म्हणजे टाळ बनवून घेतले होते, ते बघण्यासाठी किट्टप्पा सर येत. तिथेच माझा आणि त्यांचा परिचय झाला.

भरतनाटय़म म्हणजे साक्षात दृश्य संगीत ही माझी धारणा बालसरस्वती यांचे नृत्य बघताबघतानाच पक्की होत गेली. त्या खरोखरी पूर्ण देहाने गाणे आळवीत. हीच सांगीतिक गुणवत्ता मला किट्टप्पांच्या शैलीतून जाणवली. त्या काळात त्यांच्या ज्येष्ठ शिष्या वैजयंतीमाला यांचे कार्यक्रम किट्टप्पा यांच्या नटुवांगमसह बघणे हा एक समृद्ध अनुभव असे. मी कर्नाटक संगीत शिकायला सुरुवात केली. थैलांबाल कृष्णन यांच्याकडील शिक्षणाने मला भरतनाटय़म नृत्यातील संगीताचा साक्षात्कार झाला. ‘गाणं’ कसं ‘नाचता’ येऊ शकतं हे मला तेव्हा कळू लागलं होतं. नृत्य माझ्यासाठी दृश्य संगीत बनलं. त्यामुळेच शहाजीराजे यांच्या रचना नृत्यातून सादर करण्याचा विचार आला तेव्हा मी किट्टप्पा सरांकडून शिकण्याचे ठरविले. तमीळ, तेलगूशिवाय कोणतीच भाषा येत नसल्याने त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हा प्रश्न होता. पण, आमच्यातील खरा बंध नृत्याच्या भाषेचा आणि नृत्यावरील प्रेमाचा असल्याने ही चिंता अनाठायी असल्याचे ध्यानात आले. ‘नृत्य हे दिसायला सुंदर हवे आणि ऐकायलाही’, असे भरतनाटय़म विषयक तत्त्वज्ञान ते अगदी सोप्या शब्दांत मांडत. त्यांच्या रचना तालामध्ये म्हणण्यासाठी कठीण वाटल्या तरी नृत्यासाठी किचकट नसत. या दोन गुरूंमुळे मी घडले. भरतनाटय़म नृत्यशैलीच्या क्षेत्रातील माझी वाटचाल मी ‘नृत्यात्मिका’ या पुस्तकातून मांडली आहे. हे माझे आत्मचरित्र नाही तर माझा कलाप्रवास प्रांजळपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इटली येथील एका कार्यक्रमात ऐनवेळी पखवाजवादक येऊ शकले नाहीत. पण, तेथील एक पखवाजवादक बरोबर घेऊन नृत्य सादर केले. शिवाय सादर करताना बोल म्हणण्याचे कामही मी स्वत:च केले. तेथील प्रेक्षकांना या अभिनव प्रयोगाचे विलक्षण कौतुक वाटले. तब्बल पाच वेळा टाळ्यांच्या गजरात त्यांनी ‘कर्टन कॉल’ घ्यायला लावला. नृत्य आणि त्याची परंपरा, तंजावरच्या मराठी राजाचे योगदान, नृत्यगंगा-जन्म नूतनशैलीचा या गोष्टी मी ‘नृत्यात्मिका’ या पुस्तकातून मांडल्या आहेत. कोणत्याही कलाप्रकारचे शास्त्र तयार झाल्याशिवाय त्याची जिवंत परंपरा निर्माण होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे कलावंतास आपल्या कलाविष्कारात शास्त्र आणि परंपरा या दोहोंची अभ्यासपूर्ण सांगड घालता येणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र आणि पुणे हा उत्तर हिंदूुस्तान आणि दक्षिण भारताला जोडणारा सेतू आहे. पण, आपल्याकडे उत्तर हिंदुस्तानी संगीताचा प्रभाव असल्यामुळे कथक नृत्यशैलीचा प्रसार मोठय़ा प्रमाणावार झाला. पं.उदय शंकर, पं.गोपी कृष्ण आणि पं.बिरजू महाराज हे कलाकार आणि त्यांना लाभलेले वलय त्यासाठी उपयोगी ठरले. कोणत्याही व्यक्तीला तालाचे आकर्षण असतेच ही बाब तालप्रधान असलेल्या कथक नृत्यशैलीच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरली. त्या तुलनेत दक्षिण भारत जवळ असूनही भरतनाटय़म शैलीचा फारसा प्रसार झालेला नव्हता. ही बाब ध्यानात घेऊन भरतनाटय़म नृत्याचे शिक्षण देण्यासाठी ३० वर्षांपूर्वी ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. संस्थेच्या राज्यभरात पंचवीसहून अधिक शाखा कार्यरत आहेत. सध्याच्या काळात संगणक, गुगल याद्वारे माहिती मिळत असली तरी आंतरदृष्टी मिळण्यासाठी त्या विषयातील गुरूच हवेत. तर, कोणतीही गोष्ट करण्यामागची कारणमीमांसा पोहोचलीच नाही तर विद्यार्थ्यांना विषय समजणार नाही. ‘स्वानंदासाठी कला’ हेच संस्थेचे ब्रीद असल्यामुळे विद्यार्थिनी कलेकडे सजगपणे पाहतील. प्रत्येक जण कलाकार होऊ शकत नाही हे खरे असले, तरी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करताना नृत्य कलात्मक दृष्टी देते. माणसाला अनेक गोष्टीतले सौंदर्य समजते. गणित, इतिहास-भूगोल शिकविण्याबरोबरच कला विषय शाळेच्या अभ्यासात समाविष्ट करायला नको का?

केवळ विद्यार्थीच नव्हे तर रसिकांनाही भरतनाटय़म नृत्यशैलीचा रसास्वाद घ्यायला तयार करण्यासाठी आम्ही कलावर्धिनी संस्थेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न केले. या शैलीची माहिती करून देण्यासाठी परिक्रमा महोत्सव तर, रसास्वादासाठी नृत्य व विवेचनपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अभिजात नृत्याच्या कार्यक्रमांसाठी तिकीट विकत घेणारा रसिकवर्ग तयार करता आला, याचे समाधान आहे. मुलगी अरुंधती पटवर्धन ही आता संस्थेची धुरा सांभाळत आहे. तिला साथ देण्यासाठी रमा कुकनूर व  यशोदा पाटणकर यांच्यासारख्या माझ्या अनेक शिष्या-कन्या आहेत. या ‘लीलादरू’,‘जलधारा’, ‘पंचतत्व’ ‘अर्धनारीश्वर’ आणि अलीकडील ‘तुका म्हणे’ यांसारखी गद्य-पद्याची जोड असलेली अनेक नृत्यशिल्पं घडवून त्या परंपरेला नवे आयाम देत आहेत. ‘तुका म्हणे’चे अनेक ठिकाणी १३ प्रयोग झाले आहेत आणि अजूनही होत आहेत.  सध्या ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या आकर्षणातून गल्लोगल्ली नृत्याचे वर्ग सुरू झालेले दिसतात. या सगळ्यातून तरून जात भारतीय अभिजात नृत्याला उज्ज्वल भवितव्य आहे, याची ग्वाही देणारे प्रयत्न युवा पिढीकडून होत आहेत, याचं मला मोठं समाधान आहे.

suchetachapekar@hotmail.com

(शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी)