22 January 2019

News Flash

चित्ती असो द्यावे समाधान..

वर्षांतून निदान एक-दोन वेळा तरी डॉ. आंबेडकर औरंगाबादला येत. त्यांना पाहणे तेही अगदी जवळून, हाही एक मोठा लाभ होता.

सामाजिक परिषदेचा न्या. रानडे पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सिरपूरकर यांच्या हस्ते स्वीकारताना. 

‘‘अनेक सार्वजनिक संस्थांत मला काम करता आले. माणसांचे मोठेपण, काहींचे लहानपणही पाहता आले. जीवनातले सगळेच अगदी मनाप्रमाणे घडले असे नाही. तसे कुणाचेच घडत नाही. जे आपल्याला मिळणे न्याय्य आहे, तेही का मिळत नाही याची कारणे जाणून घेतली म्हणजे खंत वाटत नाही. तिकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती येते. प्रेयस याचा अर्थ आवडणारे, भावणारे असा घेतला तर आयुष्याने मला पुष्कळ दिले आहे. शिक्षक, पत्रकार, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश अशा सगळ्या भूमिकांत जाता आले. सन्मानही झाले. त्या वेळी आनंद झाला नाही, असे म्हणणे चुकीचे होईल; मात्र ते मिळवण्यासाठी न पटणारे काही करावे, असे मात्र वाटले नाही. .’’

श्रेयस म्हणजे जे आपल्यासाठी हितकारक आहे ते आणि प्रेयस म्हणजे जे आपल्याला आवडते व म्हणून मिळावेसे वाटते म्हणून ते. प्रेयस जर अहितकारक असेल तर त्याचा मोह टाळून श्रेयसासाठी प्रयत्न करणे यात आपली परीक्षा असते. नियतीने मला पुष्कळसे श्रेयस जन्मत:च बहाल केले होते.

मराठवाडय़ातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले, अनेक अडचणी सोसून वकील झालेले; पण व्यवसायातून मिळू शकणाऱ्या आर्थिक समृद्धीमागे न धावता सामाजिक समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील होणारे वडील मला लाभले. त्यांच्यामुळे अनेक नि:स्वार्थी आणि त्यागी माणसे घरी आलेली पाहायला मिळाली. स्वातंत्र्य आले. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे स्वातंत्र्याच्या लढय़ात अग्रभागी असणाऱ्यांना सत्ता मिळू शकली नाही. मात्र त्याचीही खंत त्यांना वाटली नाही. असे नेतेही अगदी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांचे अनुकरण ही अवघड गोष्ट होती; पण जीवनात श्रेयस काय असते हे त्यांच्यामुळेच मला कळले.

अमरावतीला इंटर आर्ट्सची परीक्षा उत्तीर्ण होऊन मी औरंगाबादला परत आलो त्या वेळी सरकारी महाविद्यालयात जायचे की,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘मिलिंद’ महाविद्यालयात जायचे असा प्रश्न निर्माण झाला त्या वेळी क्षणाचाही विचार करावा लागला नाही. सरळ ‘मिलिंद’मध्ये प्रवेश घेतला. आकर्षण होते तेथल्या खुल्या वातावरणाचे आणि गुणवंत प्राध्यापकांचे. ‘मिलिंद’मधल्या या दोन वर्षांनी माझ्या जडणघडणीत मोठाच हातभार लावला. वाङ्मयाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे आणि त्याचबरोबर सामाजिक विषमतेच्या वास्तवाची जाणीव करून देणारे म. भि. चिटणीस आमचे प्राचार्य होते. आपल्यापेक्षा वेगळी राजकीय मते असणाऱ्या नेत्यांनाही विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी आवर्जून बोलावणारे उदार व्यवस्थापन अस्तित्वात होते. वर्षांतून निदान एक-दोन वेळा तरी डॉ. आंबेडकर औरंगाबादला येत. त्यांना पाहणे तेही अगदी जवळून, हाही एक मोठा लाभ होता. एकदा तर त्यांचे भाषणही ऐकण्याची संधी मिळाली. १९५५ ते १९५७ अशी दोन वर्षे मी ‘मिलिंद’मध्ये शिकत असतानाच काही महत्त्वाच्या घटना घडत होत्या. राज्यपुनर्रचना झाली आणि मराठवाडा मुंबई राज्याला जोडला गेला. साप्ताहिक ‘मराठवाडा’, ‘मराठवाडा साहित्य परिषद’ अशा मराठी भाषिकांच्या प्रातिनिधिक संस्थांचे हैदराबादहून औरंगाबादला स्थलांतर झाले त्यामुळे ‘मराठवाडा’चे संपादक अनंत भालेराव, मराठीचे नामवंत प्राध्यापक भगवंत देशमुख असे काही ज्येष्ठ औरंगाबादेत आले. आर्थिक स्वातंत्र्याचा लढा अजून लढावयाचा आहे, असे मानणारे आणि मराठवाडय़ाच्या विकासाचे प्रश्न लावून धरणारे गोविंदभाईंचे नेतृत्व उभे राहिले. गोविंदभाई, अनंतराव यांना वडिलांचे मित्र म्हणून मी ओळखत होतो. ‘मराठवाडा’ वृत्तपत्र राजकीय आणि वाङ्मयीन चळवळीचे केंद्रच बनले होते. मी तेथेही नेहमी जात होतो. या सर्वाचे संस्कार हेही माझ्यासाठी एक मोठे श्रेयस होते. पाचवीच्या वर्गातच उर्दू माध्यमातून शिकावे लागले होते. उर्दूबद्दल मनात तेढ नव्हती; पण ती भाषा पारतंत्र्याचे आणि मराठी भाषा स्वातंत्र्याचे प्रतीक असे समीकरण कुठेतरी खोल रुजलेले असावे. मराठी वाङ्मयाबद्दल अधिक आवड निर्माण होण्याला कदाचित तेही कारण झाले असावे. अंबाजोगाईला स्वामी रामानंद तीर्थानी स्थापन केलेले योगेश्वरी महाविद्यालय होते, तेथे आपण मराठीचा प्राध्यापक व्हावे, अशी इच्छा मनात निर्माण झाली होती. वडील वकील असल्यामुळे त्यांना चळवळीत भाग घेता येत होता, हेही मी पाहिले होते, म्हणून वकील व्हावे असेही वाटत होते. यापैकी कोणता मार्ग धरायचा हा अवघड निर्णय वडिलांनी माझ्यावरच सोपवला होता. निर्णय अवघड होता. शेवटी तो लांबणीवर टाकून दोन्ही अभ्यासक्रमांसाठी मी नाव नोंदवले. एम.ए. आणि एलएल.बी. या दोन्ही परीक्षांत पहिला वर्ग मिळाला. ‘योगेश्वरी’त अर्ज पाठवला. संचालक मंडळी मला लहानपणापासून ओळखत होती. मुलाखतीसाठी बोलावणे येण्याची मी वाट पाहू लागलो; पण ते आलेच नाही. काही थोडे मराठीचे व काही थोडे हिंदीचे तास घेणारा प्राध्यापक नेमून त्यांनी आपली दुहेरी गरज भागवली होती.

अंबाजोगाईची संस्था ज्यांनी वाढवली ते रामचंद्र गोविंद ऊर्फ बाबासाहेब परांजपे त्या वेळी लातूरला राहत होते. अंबाजोगाईला माझी निवड झालेली नाही, हे त्यांना कळाले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवला की ‘लातूरला यंदा नवीन महाविद्यालय सुरू होते आहे, तू लातूरला ये.’ मी अर्ज केलेला नव्हता तरी बाबासाहेबांनी मला मुलाखतीसाठी पत्र पाठवण्याची व्यवस्था केली. मी बसने मुलाखतीसाठी निघालो. लातूरच्या अलीकडे असलेल्या मांजरा नदीवर त्या वेळी पूल नव्हता. नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे समोर लातूर दिसत असतानासुद्धा आमची बस तिथपर्यंत जाऊ शकली नाही. दुपारी चार-साडेचारला पूर उतरल्यावर बस पुढे निघाली. महाविद्यालयाच्या इमारतीत गेलो तेव्हा तेथे फक्त एक कारकून हजर होते. त्यांनी मला माझे नाव विचारून हातामध्ये एक पाकीट दिले. त्यात माझी मराठीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र होते. अंबाजोगाईला नाही; परंतु मराठीचा प्राध्यापक होण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली होती. लातूर शहरातले माझे वर्षभराचे वास्तव्य हा एक अतिशय आनंददायी अनुभव होता. नव्याने निघालेले गावातले महाविद्यालय हा सगळ्याच गावाच्या कौतुकाचा विषय होता. गावातल्या सांस्कृतिक उपक्रमाचे नेतृत्वही महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडे आपोआप आले होते. जीवनधर शहरकर माझ्याबरोबर अमरावतीला शिकत होता आणि वासुदेव बेंबळकर प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी सेवा दलातल्या ऋणानुबंधामुळे नावाने ओळखत असे. त्या दोघांच्या घरी दिवसातले चार-दोन तास तरी हमखास जात. बाबासाहेबांनी माझ्या राहण्यासाठी त्यांच्या घराजवळच एक घर मिळवून दिले होते. लातूरात मी रमलो होतो, पण वर्षभरातच मला लातूर सोडावे लागले. लातूरला पिण्याच्या पाण्याची फारच वाईट अवस्था होती. नळातून जवळजवळ चिखलच येई आणि त्यापाठोपाठ येणारे गढूळ पाणीही फक्त पंधरावीस मिनिटे मिळे. त्या पाण्याने माझे पचन पार बिघडून गेले.

लातूर सोडल्यावर काही दिवस औरंगाबादला कायद्याचा प्राध्यापक म्हणून काम करून मी नंतर बीडला वडिलांबरोबर वकिली करण्यासाठी गेलो. वडील अभ्यासू दिवाणी वकील म्हणून ओळखले जात होते. मी त्यांच्याबरोबर वकिलीसाठी आल्याचा आनंद त्यांना झाला असणारच. माझी सनद आली त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून मला न्यायालयात प्रत्यक्ष काम करता आले. खटल्याची तयारी करताना मला आलेली एखादी शंका मी वडिलांना विचारली व त्यांनी तिचे लगेच उत्तर दिले, असे फार कमी वेळा घडले. या मुद्दय़ाचे उत्तर या कायद्याच्या अमुकअमुक कलमात सापडू शकेल, त्या खालचे निवाडेही वाच आणि तरीही तुला काही शंका राहिलीच तर मग मला विचार असे ते सांगत. परिणाम असा झाला की, स्वत:च अभ्यास करून आपल्याला आलेल्या शंकेचे उत्तरे शोधावे याची सवय लागली. आत्मविश्वासही वाढला. वडील कोर्टात चालू असलेल्या प्रकरणात स्वत: कसा अभ्यास करतात हे तर मी पाहतच होतो. त्यातूनच माझे शिक्षण होत होते. अगदीच आवश्यक वाटले तेव्हा त्यांनी मला शिकवलेही. वडिलांच्या वकिलीप्रमाणेच त्यांचे वकृत्व हेही माझ्यासाठी सहज लाभलेले महत्त्वाचे शिक्षण होते. बोजड किंवा अलंकारिक भाषा तेही कधीही वापरत नसत. आपले बोलणे दुसऱ्याला समजावे म्हणून आहे, त्याच्यावर छाप टाकण्यासाठी नाही, असे ते नेहमी सांगत. हजार हजार शेतकऱ्यांच्या सभेत कूळ कायदा समजावून सांगणारी त्यांची भाषणे मी ऐकली आहेत. राजकारणातील अनेक मूल्ये बदलली. या पडझडीचे चटके ज्यांना सोसावे लागले त्यात तेही होते; पण कधीही कटुतेचा किंवा सामान्य माणसांवरचा विश्वास ढळल्याचा उद्गार त्यांच्या तोंडून मी ऐकला नाही. ज्यांनी त्यांच्यावर राजकीय अन्याय केले त्यांच्याबद्दलही त्यांनी मनात कटुता ठेवली नाही. घरी ते कोणावर रागवले आहेत, असे मी कधी पाहिलेच नाही. स्वयंपाकाला त्यांनी कधी नावे ठेवली नाहीत. कित्येक वेळा मीठ खूपच जास्त होऊनही त्यांनी सांगितलेच नाही आणि निमूटपणे तो पदार्थ खाऊन टाकला याबद्दल आईची बोलणीही त्यांनी पुन्हा खाल्ली. माझ्या वडिलांच्या स्वभावात एक संतपण होते, ते मला पाहायला मिळाले हे माझे फारच मोठे भाग्य होते.

जडणघडणीच्या या दिवसांतच मी एस. एम. जोशींना पाहिले. मला ज्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर वाटत आला त्यात माझ्या वडिलांनंतर एस.एम.चेच नाव घेतले पाहिजे. अनेक प्रसंगांनी त्यांच्या स्वभावाचे नितळपण पाहता आले. माझ्यासाठी हाही एक श्रेयसयोग होता. वकिली बरी चालली होती. तिशीत प्रवेश करणार होतो. लग्न करण्याचे लांबणीवर टाकण्याचे कोणतेही कारण आता उरले नव्हते. एके दिवशी माझा मित्र डॉ. गोविंद जोशी याच्या घरी मी गप्पा मारत बसलो होतो. जोशी वहिनींना भेटायला आलेल्या एका बाईंच्या बरोबर एक मुलगी होती. लक्ष वेधले जावे अशीच ती होती. त्या दोघी परत गेल्यावर डॉक्टरनी मला सहज विचारतात तसा प्रश्न केला की, मुलगी तुला कशी वाटते? प्रश्नाचे प्रयोजन अगोदर माझ्या लक्षात आले नाही. डॉक्टर म्हणाले, ‘‘ही मुलगी तुला सांगून आली आहे. तुला आवडली का सांग.’’ मित्रच विचारत असल्यामुळे आढेवेढे न घेता मी खरे ते सांगून टाकले. माझा होकार कळताच डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना निरोप दिला आणि माझे लग्न ठरले. विमलला (लग्नापूर्वीचे तिचे नाव) पाहिले तेव्हाच ती आवडली होती, प्रेयस होती. आता आमच्या सहजीवनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. कुटुंबातल्या आणि सार्वजनिक जीवनातल्या सुख-दु:खाच्या, कसोटीच्या अनेक प्रसंगांत ती बरोबर असल्याने मला दृढपणे उभे राहता आले. येणारे-जाणारे असलेल्या आतिथ्यशील कुटुंबात ती वाढली होती. तेच आतिथ्य तिने माझ्या सार्वजनिक कामामुळे विस्तारलेल्या कुटुंबातही सांभाळले. काही प्रेयस श्रेयससुद्धा असते हे नंतर लक्षात येते.

वकील झालो तेव्हा मुंबईत तू वकिलीला ये असे बोलावणारे ज्येष्ठ स्नेही होते; पण त्या वेळेला माझ्या डोक्यात राजकारण होते. विरोधी पक्षाचे राजकारण तसे सरळधोपट होते. आणीबाणीमुळे १९७७ ला जनता पक्षाची राजवट आली आणि आमचे काही मित्र थोडा काळ सत्तेत बसले. सत्ताधारी बनणे सवयीचे तर नव्हतेच; पण अवघड होते. आता बीडमध्येच राहण्याचे प्रयोजन नव्हते. उच्च न्यायालयात वकिली करावी, असे फार दिवसांपासून मनात होते. मुंबईला जाण्याचे ठरवले. सुरुवातीचे काही

दिवस घर कसे चालणार आणि मुंबईत जागा कशी मिळणार असे दोन अवघड प्रश्न समोर होते. मित्रांची सदिच्छा फार मोठी होती. दोन्ही प्रश्न सुटले. उच्च न्यायालयात सुमारे तीन वर्षे वकिली झाली होती आणि अचानक उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ औरंगाबादला

स्थापन व्हावे, अशी मागणी पुढे आली. बरेच दिवस प्रलंबित असलेल्या या मागणीवर आतापर्यंत मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री दोघांचे एकमत होत नसल्यामुळे निर्णय होत नव्हता. आता तो योग आला आणि औरंगाबादला न्यायपीठ होण्याचा निर्णय झाला. या निर्णयाबाबत न्यायालयात खटलाही झाला; पण सुदैवाने नवे न्यायपीठ कायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले. मजजवळ असलेले बहुतेक काम मराठवाडय़ातलेच होते. त्यामुळे न्यायपीठाबरोबरच मीही औरंगाबादला वकिलीला आलो.

नवे न्यायपीठ होणार म्हणजे येथेही आणखी न्यायाधीश लागणार याचा विचार मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. एके दिवशी मला तुम्ही न्यायाधीशपद स्वीकाराल का अशी मुख्य न्यायाधीशांनी विचारणा केली. विचारणा गौरवाची आणि आनंदाची असली तरी त्या काळात अवघड होती. वेतन तर थोडे होतेच; शिवाय सरकारी गाडीची सोय नव्हती, पण तरीही मी होकार दिला. एक पाश्र्वभूमी अशी होती की, माझे वडील आणि त्यांचे एक मित्र बरोबर मॅट्रिक झाले. बरोबरच त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मित्राने चळवळीत फारच थोडा प्रत्यक्ष भाग घेतला. पुढील शिक्षण आणि वकिलीवर लक्ष केंद्रित केले आणि ते हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. माझ्या वडिलांनी मात्र प्रत्येक सत्याग्रहात भाग घेतला आणि बाहेर आल्यावर मुक्त असेपर्यंत वकिली केली. त्यांनी जर स्वत:ला झोकून दिले नसते तर तेही व्यावसायिक यशाच्या आणखी पायऱ्या चढत गेले असते; पण जे मिळाले नाही त्याबद्दल त्यांना कधीही खंत वाटली नाही. समोरच्या पर्यायातून त्यांनी त्यांच्या अंत:प्रेरणेतून निवड केली. त्यांच्यासाठी चळवळीत तुरुंगवास पत्करणे हेच श्रेयस होते.

सक्रिय राजकारणाचा पर्याय आता मी मनातून काढून टाकला होता. बदलत्या राजकीय वास्तवाचे काही विशेष लक्षात घेऊन तो निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यायाधीशपद स्वीकारण्यात काहीच अडचण नव्हती. मी होकार दिला आणि नेमणुकीसाठी उशीर लागू लागला तेव्हा ते विसरूनच जाऊन वकिली करू लागलो. खूप उशिराने नेमणूक आली तरी मला नऊ वर्षांहून अधिक काळ न्यायाधीश म्हणून काम करता आले. मी न्यायाधीश झाल्याचे आई-वडिलांना पाहता आले. माझ्या कार्यकाळात अनेक पक्षकारांच्या चेहऱ्यावर आपल्याला न्याय मिळाल्याचा आनंद मला पाहता आला. न्यायाधीशपदाचे खरे पारितोषिक तेच असते. औरंगाबादला मी वकिलीला आल्यानंतर मुंबईतला रोजच्या प्रवासाचा वेळ वाचला आणि थकवाही कमी येऊ लागला. आपण काही लिहावे असे वाटू लागले, अनंत भालेरावांचे काही लेखन संपादन करण्यात मी सहभागी झालो होतो. प्रत्यक्ष माझे लेखन मात्र खूप उशिरा न्यायाधीशपदाच्या कार्यकाळातच सुरू करता आले. स्वामी रामानंद तीर्थाचे चरित्र लिहिण्यासाठी मी बराच प्रवास केला. त्या वेळी हयात असणाऱ्या स्वामीजींच्या सहकाऱ्यांना भेटलो. एखादे चरित्र लिहिणे म्हणजे तो काळ पुन्हा जगणे असते हे मला लक्षात आले आणि आणखी एक संस्मरणीय अनुभव मिळाला. मराठवाडय़ाचे सामाजिक आणि राजकीय जीवन याविषयी बाहेर फारशी माहिती नाही, हे लक्षात आल्यावर मी काही व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आपण इतिहास अधिक चांगला सांगू शकतो असे जाणवले. इतिहासाचे सोडा पण समकालीन व्यक्तीलासुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न हा व्यक्तिचित्र लिहणाऱ्या लेखकाला किती

आनंद देणारा असतो हेही मला अनुभवता आले. माझे एखादे लेखन वाचून कोणी वाचक आपल्याला ते आवडल्याची आणि त्यामुळे आपल्या जीवनातीलही काही घटना आपल्याला आठवल्या असे भरभरून सांगतो तेव्हा व्यक्तिचित्रातली ती व्यक्ती त्या वाचकालाही कळाला आहे, हे कळते.

आज स्वातंत्र्यलढय़ातील अनेक प्रसंग आणि व्यक्ती यांच्या इतिहासाला सोयीची वळणे देण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा वेळी त्यांच्याबद्दलही लिहावेसे वाटते. अगदी पन्नास वर्षांपूर्वी जे होऊन गेले तेही आज अज्ञात होऊ लागले आहे. ती माणसे आणि त्यांचे जीवन पुन्हा सांगताना मलाही एक समाधान वाटते, म्हणून मी लेखन चालूच ठेवले आहे. मी लिहीत पुष्कळ असलो तरी मला खरा आनंद बोलताना होतो; मात्र हे भाषण श्रोत्यांशी संवादाच्या रूपाचे मला हवे असते. श्रोत्यांची संख्या ही फारशी महत्त्वाची नसते; पण मला वातावरण संवादाचे लागते; समारंभाचे नको असते. अनेक सार्वजनिक संस्थांत मला काम करता आले. माणसांचे मोठेपण काहींचे लहानपणही पाहता आले. जीवनातले सगळेच अगदी मनाप्रमाणे घडले असे नाही. तसे कुणाचेच घडत नाही. जे आपल्याला मिळणे न्याय्य आहे, तेही का मिळत नाही याची कारणे जाणून घेतली म्हणजे खंत वाटत नाही. तिकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती येते. प्रेयस याचा अर्थ आपल्याला आवडणारे, भावणारे असा घेतला तर आयुष्याने मला पुष्कळ दिले आहे. शिक्षक, पत्रकार, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश अशा सगळ्या भूमिकांत जाता आले. सन्मानही झाले. त्या वेळी आनंद झाला नाही, असे म्हणणे चुकीचे होईल; मात्र ते मिळवण्यासाठी न पटणारे काही करावे, असे मात्र वाटले नाही. ज्या माणसाच्या अवतीभोवती वावरता आले त्यांचे ते श्रेय असावे.

nana_judge@yahoo.com 

chaturang@expressindia.com

First Published on April 14, 2018 12:11 am

Web Title: success story of former justice narendra chapalgaonkar