अंबिका सरकार

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत स्त्रीच्या आयुष्यात आणि आचार-विचारांत होत गेलेले बदल मी मी पाहिले आहेत. त्याचं प्रतिबिंब माझ्या लेखनात उमटलं आहे. विवाहसंस्था, पती-पत्नीचं नातं यावर माझा विश्वास आहे. दोन वेगवेगळ्या घरांत, संस्कारांत वाढलेल्या माणसांमध्ये एकरूपता कमी असणं आणि तरीही हे नातं आयुष्यभर निभावणं हे कठीण असतं हेही मला समजतं. पण निभावून नेण्याच्या सगळ्या नात्यांत हे घडतच असतं. माझ्या कथा-कादंबऱ्यांतून तेच चित्र उमटत गेलं.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

मराठी साहित्यविश्वातील एक चांगली कथालेखिका अशी माझी ओळख असली तरीही आयुष्यातला अर्धा-अधिक काळ जवळजवळ ३६-३७ वर्ष मी अर्थशास्त्राची प्राध्यापक होते. महाविद्यालयातील नोकरी आणि संसार सांभाळून एकीकडे जे लेखन करू शकले त्या माझ्या लेखनाबद्दल मी बरीचशी समाधानी आहे.

माझी आई पट्टीची वाचक होती. तिचं शिक्षण मराठी चौथीपर्यंतच झालं होतं. वाचनाच्या छंदामुळे ठाकूरद्वारच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातून ती भरपूर पुस्तकं आणून वाचत असे. माझ्यातही ती आवड चालत आली. तेव्हाचं मराठी साहित्य मी खूप वाचलं. मात्र ज्युनिअर बी.ए.ला असताना (तेव्हा मी १९ वर्षांची होते) मला जाणवलं की आपलं इंग्रजी तितकंसं सफाईदार नाहीये. तो अडथळा पार करण्यासाठी मी इंग्रजी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. पहिली वाचलेली १-२ पुस्तकं मला बिलकूल समजली नाहीत. तरीही मी इंग्रजीच वाचत राहिले. तेव्हा मी मराठी एकही अक्षर वाचलं नाही. दिवसाचे आठ-नऊ तास फक्त इंग्रजी वाचन असं जवळजवळ दोन-अडीच महिने केलं. त्या कालावधीत डोळे सुजून येत, एकेका पापणीवर ५-६ रांजणवाडय़ा एकाच वेळी येत. पण मी त्याचा बाऊ केला नाही. माझी इंग्रजीची भीती कायमची गेली.  मी अस्खलित इंग्रजी बोलू लागल्यावर गिरगावातल्या शारदा सदन या मुलींच्या मराठी शाळेत माझं शिक्षण झालं आहे यावर तेव्हापासूनच ऐकणाऱ्यांचा विश्वास बसत नाही. अलीकडे माझे दोन कथासंग्रह पहिल्यांदाच वाचून एका लेखिकेने लिहिलं की, ‘‘काही अर्थानी तुमचं लेखन मला काळाच्या पुढचं वाटतं. तुमच्या कथानायिका शारीर संदर्भ उघड उघड वापरतात. पण त्यामागे ‘धीटपणा’चा वास अजिबात नसतो. उलट ती ‘जगण्यामागची आदिम प्रेरणा’ असण्याची अपरिहार्यता दिसते. नात्यांकडे तुमच्या व्यक्तिरेखा खुलेपणाने बघू शकतात. हे सगळं तुम्हाला इंग्रजी साहित्याच्या वाचनातून मिळालं का?’ त्या २-३ महिन्यांत मराठीतलं काहीही न वाचल्याने तेव्हा मी फक्त इंग्रजी माहोलमध्ये होते. लिहिताना जरी मला ते लक्षात आलं नसलं तरीही सतत इंग्रजीही वाचत राहिल्याने माझ्या मनाला आलेला मोकळेपणा लिखाणात नकळतपणे उतरत गेला असावा.

१९५४-५५ च्या सुमारास ‘हंस’, ‘वसंत’, ‘सत्यकथा’ अशा मासिकांत नवकथाकारांच्या उत्तमोत्तम कथा छापून येत असत त्या वाचून मला लिहावंसं वाटायला लागलं. तेव्हा मी साधारण वीस-बावीस वर्षांची होते. लेखनाची आवड लागल्याने इतर गोष्टी बाजूला सारून १९५५ पासून मी लिहायला सुरुवात केली. माझ्या मनात जे विषय आले ते मी उत्साहाने लिहू लागले. त्याच उत्साहात लिहिलेल्या ५-६ कथा ‘हंस’चे संपादक अनंत अंतरकर यांच्याकडे पाठोपाठ नेऊन दिल्या. त्यांनी माझ्या लेखनाचं अवास्तव कौतुक न करता उत्तेजन मात्र दिलं हे विशेष! त्या खूप चांगल्या नसूनही व तसे त्यांनी स्पष्ट सांगूनही ‘हंस’मध्ये एकामागे एक छापल्या. प्रत्येक कथेला १० रुपये मानधन दिलं. त्या काळचे ते १० रुपये आजच्या काळात किती झाले असते?

त्यानंतरच्या काळात परिस्थितीमुळे माझं कथालेखन बंदच होतं. माझं पहिलं लग्न मोडलं आणि मला घराबाहेर पडावं लागलं. जगण्यातल्या संघर्षांला तोंड देण्याच्या त्या काळात आणि त्यानंतरही बरीच वर्ष माझ्याकडून फारसं लिहिलं गेलं नाही. दुसरं लग्न झाल्यावर काही लिहिलं असेल, आता आठवत नाही पण ते अगदीच थोडंथोडं लिहिलं. साधारण १९६३-६४ मध्ये लेखन पुन्हा सुरू झालं. १९६८ मध्ये लिहिलेली आणि १९६९ च्या सत्यकथेत प्रसिद्ध झालेली ‘वीज’ ही कथा बरीच नावाजली गेली. तेव्हा राम कोलारकर वर्षांतल्या निवडक कथांचा संग्रह काढत असत. तसंच सर्वोत्कृष्ट कथेला बक्षीसही देत असत. त्यांना ती कथा आवडली. ते मुद्दाम माझ्या घरी आले. ‘‘माझ्या मनात तुमच्या कथेला बक्षीस देण्याचं आहे,’’ असं ते म्हणाले. पण त्या वर्षी विद्याधर पुंडलिकांच्या ‘माळ’ या कथेला ते दिलं गेलं. मला त्याचं वाईट वाटण्याचं कारणच नव्हतं. चांगलीच कथा आहे ती, मलाही पुंडलिकांचं लेखन आवडतं.

मला लिहिणं आवडतंय हे बरंच आधी लक्षात येऊनही ‘वीज’च्या निमित्ताने मात्र आपण चांगलं लिहू शकतो असा आत्मविश्वास आला. माझी ‘वीज’ आणि गौरी देशपांडेची ‘कावळ्या-चिमणीची गोष्ट’ या दोन्ही कथा सत्यकथेत मागे-पुढे प्रसिद्ध झाल्या तेव्हा सत्यकथेच्या कार्यालयात आमची पहिली भेट झाली. ‘वीज’ प्रसिद्ध झाल्यानंतर मला पत्रं यायला लागली आणि माझ्याकडून कथा मागवण्यात येऊ लागल्या. मग काय, ‘मागणी तसा पुरवठा’ अशा मी पुष्कळ कथा लिहिल्या. पण एकावेळी मला लक्षात आलं की, या कथा पुरेशा कसदार नाहीयेत, म्हणून मी कथा लिहिणं कमी केलं. १९८० पर्यंत २६-२७ कथा लिहून झाल्या होत्या. श्री. पु. भागवतांनी माझा कथासंग्रह काढण्याचं मान्य केलं. तो पहिला कथासंग्रह ‘चाहूल’ मौज प्रकाशनाकडून प्रसिद्ध झाला. त्यात ‘वीज’ समाविष्ट केली गेली. त्या कथासंग्रहाला राज्य सरकारचं पारितोषिकही मिळालं. उरलेल्या कथा ‘प्रतीक्षा’ या नावाने मार्च १९८१ मध्ये ‘मॅजेस्टिक’ने काढलेल्या कथासंग्रहांत घेतल्या गेल्या. त्यानंतर त्याची सुधारित आवृत्ती दोन जास्तीच्या कथांसह नवचतन्य प्रकाशनाने जानेवारी २००४ मध्ये ‘प्रचीती’ या नवीन नावाने काढली.

महाविद्यालयातल्या नोकरीतलं काम बरंच वाढल्याने लिहिण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. तेव्हा लिहिलेल्या २-३ चांगल्या कथांपकी एक होती ‘नाळ!’ ती ‘सत्यकथा’मध्ये नेऊन दिली. पण ते बंद होण्याच्या मार्गावर होतं म्हणून ती प्रसिद्ध होऊ शकली नाही. नंतर ती ‘हंस’मध्ये प्रसिद्ध झाली. संपादक

राम पटवर्धनांनी ती वाचली होती. ते मला म्हणाले, ‘‘अहो, हा तर कादंबरीचा ऐवज आहे. तुम्ही कथेत गुंडाळून तो वाया घालवला आहे. तुम्ही कादंबरी लिहा.’’ हे ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. पटवर्धनांना म्हटलं, ‘‘मी कसली कादंबरी लिहितेय?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? नाही जमली तर सोडून द्या.’’ आणि मी ती लिहायला सुरुवात केली. माझ्या मते ती पूर्ण झाल्यावर पुन्हा पटवर्धनांना नेऊन दिली. ती त्यांनी बारकाईने वाचून मला एक-दीड पान भरून सूचना लिहून दिल्या. ते टिपण अजूनही आहे माझ्याकडे! मी वैतागून त्यांना म्हणाले, ‘‘जाऊ दे, आता तुम्हीच लिहा ही कादंबरी!’’ ते बाड तसंच त्यांच्या पुढय़ात ठेवून मी घरी निघून आले. आणि मग चार दिवसांनी जाऊन ते परत घेऊन आले. त्यांच्या सूचना पुन्हा वाचून त्या कादंबरीच्या काही भागाचं पुनल्रेखन करून ती पूर्ण केली, तीच ती ‘एका श्वासाचं अंतर!’. त्या कथेवर कादंबरी म्हणून काम करायला लागल्यानंतर झालं असं की १९८६ मध्ये माझा मुलगा अपघातात अचानक गेला. पण मी मनाचा हिय्या करून ती पूर्ण केली.

‘नाळ’ या कथेची नायिका सून आहे. सुनेच्या मनात नवरा-सासरची माणसं यांच्याविषयी काय असेल, तिचं मन कसं चालतं अशी ती कथा मी लिहिली होती. ‘एका श्वासाचं अंतर’ ही कादंबरी सासू या व्यक्तिरेखेला मध्यवर्ती ठेवून लिहिली आहे. माझ्या कादंबरीत मुलाचं आईवर आणि आईचं मुलावर अतिशय प्रेम आहे. परंतु, त्याची बायकोची निवड आईला अजिबात पसंत नाहीये, तरीही आईने तिच्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय असं सगळं त्यात आहे. ही कादंबरी १९८९ मध्ये ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झाली. नंतर ती पुस्तक रूपाने आली. तिला दोन पुरस्कारही मिळाले, एक साहित्य अकादमीचा आणि दुसरा पुण्याच्या मराठी साहित्य परिषदेचा. त्या कादंबरीवर चांगले अभिप्राय आले. त्यापकी, एका बाईंनी त्यांच्या अभिप्रायात जे म्हटलं ते माझ्या अगदी लक्षात राहिलं. त्यांनी लिहिलं होतं, ‘साने गुरुजींची ‘श्यामची आई’ या पुस्तकानंतर ‘आई आणि मुलगा’ यांच्यातील प्रेमाचं इतकं प्रत्ययकारी चित्रण करणारी दुसरी कादंबरी अजून मराठीत झाली नाही.’ या कादंबरीनंतर मी ज्या ५-६ कथा लिहिल्या त्या माझ्या शेवटच्या ‘शांतवन’ या कथासंग्रहात प्रसिद्ध झाल्या. त्याच संग्रहात ‘नाळ’सुद्धा घेतली आहे. त्या सर्व कथांचे विषय वेगवेगळे आहेत. त्यांच्या मध्यवर्ती स्त्री असली तरीही ती निरनिराळ्या दृष्टिकोनांतून आपल्यासमोर येते.

माणसांतील नाती आणि त्यांचे आपसांतील संबंध मला महत्त्वाचे वाटतात. माझ्या कथा आणि कादंबऱ्यांतून घटना असतात. त्यांना मिळणाऱ्या या प्रतिसादांतून माणसांचे स्वभाव उलगडतात.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत स्त्रीच्या आयुष्यात आणि आचार-विचारांत होत गेलेले बदल मी पाहिले आहेत. त्याचं प्रतिबिंब माझ्या लेखनात उमटलं आहे. विवाहसंस्था, पती-पत्नीचं नातं यावर माझा विश्वास आहे. दोन वेगवेगळ्या घरांत, संस्कारांत वाढलेल्या माणसांमध्ये एकरूपता कमी असणं आणि तरीही हे नातं आयुष्यभर निभावणं हे कठीण असतं हेही मला समजतं. पण निभावून नेण्याच्या सगळ्या नात्यांत हे घडतच असतं. ‘अंत ना आरंभही’ ही कादंबरी २००२ नंतर लिहायला घेतली. त्या कादंबरीतल्या नायिकेचे दोन मुलगे अमेरिकेत स्थायिक झालेले असतात. नायिकेची पहिल्या लग्नाची, पायाने किंचित अधू असलेली मुलगी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा आई तिला म्हणते, ‘तू असं करू नकोस. लग्न कर, मी त्याच्याशी बोलते.’ त्यावर मुलगी म्हणते, ‘अगं, मी ही अशी लंगडी. उद्या त्याला मला सोडून जावंसं वाटलं तर? मी त्याला का अडकवून ठेवू? म्हणूनच आम्हाला मूलही नकोय.’ आईला, कादंबरीच्या नायिकेला ते पटतं आणि ती मुलीला पूर्ण पाठिंबा देते. या कादंबरीलाही राज्य पुरस्कार मिळाला.

कविता लेखन काही मी करू शकले नाही. त्याबद्दल खंत करण्याचं कारणही नाही. प्रत्येक लेखकाने कवीही असायला हवं असं थोडंच आहे? तशा ५-६ कविता माझ्याकडून लिहिल्या गेल्या, त्यातली एक कविता मला विशेष उल्लेखनीय वाटली व ती ‘स्त्री’ मासिकात प्रसिद्धही झाली. त्या कवितेचं शीर्षक – ‘गादी.’

प्रदीर्घ प्रवासातून परतल्यावर

तू कोसळतोस गादीवर

प्रचंड शिळेसारखा

जेमतेम पुटपुटत

तू किती मऊमऊ आहेस.

अणकुचीदार बोटं, कोपरं खुपशीत

खोल आत आत घुसतोस

मुसंडी मारून घाईगर्दीने.

अरे, ती पारोशी आहे

झाडली झटकलेली नाही

अंगावर धुवट स्वच्छ चादर नाही

कोन साधून मांडलेल्या

गोल गुबगुबीत उशा नाहीत

पायाशी पांघरूण नाही मायेचं

क्षणभर मऊ म्हणालास सुसरबाईला

की झालं?

हे त्या गादीचं अप्रूप

ही अंगीची रग

संगी जिरवायची एकटय़ाने एकदाची.

नंतर मोकळीक आहेच तुला घोरायची

शिक्षा गादीला

सहनायची

प्रतिवाद केला तर म्हणशील

संतापून

गा चा मा करतेयस तू

उगाचच..

तेव्हा सोय नाहीच

तक्रार करायची.

ही कविता गौरी देशपांडेला फार आवडली. आमचं लेखन सुरू असताना गौरी आणि मी, आमच्या भेटी होत गेल्या. पुष्कळदा ती परदेशी असे व आमचा अखंड पत्रव्यवहार चालू असे. ती माझ्यापेक्षा वयाने लहान होती. ती भारतात परत आल्यानंतर आमच्या घरी पुष्कळदा राहायला येत असे. एकदा आली की सलग आठवडाभरसुद्धा आमच्यासोबत ती असे. ती फक्त माझीच नाही तर माझा नवरा-मुलं, आमच्या सगळ्यांची ती मत्रीण होती. माझ्या मुलांची लाडकी होती. ती प्रचंड बुद्धिमान होती. अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत असत. तिच्या आग्रहाखातर मीही तिच्याकडे जपानला जाऊन काही दिवस राहिले होते. तिच्या विचुर्णीच्या घरीदेखील अधूनमधून आम्ही जात असू. ती माझ्या आधी जाईल आणि तिचा मृत्युलेख लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल हे ध्यानीमनीही नव्हतं. तिच्या घातक सवयींचा मला मुळीचच अंदाज आला नाही. लक्षात आलं तेव्हा फार उशीर झाला होता. तिचं येणं कालांतराने कमी झालं तरी ते या कारणांमुळे असेल असं कधी समजलं नाही. कारण मीही तेव्हा नोकरीच्या व्यापात गुरफटलेलीच होते. पण आपण तिच्या त्या सवयींना आळा घालू शकलो असतो का याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. ती अत्यंत मनस्वी होती आणि फक्त स्वत:च्या मनाचा कौल मानणारी होती.

२००० नंतर आधी माझा नवरा, नंतर मोठी मुलगी अणि त्यानंतर धाकटी मुलगी असे एकेक करत गेल्यानंतर माझा जगण्यातला रसच संपून गेला. जगावसं वाटत नव्हतं. पण धाकटय़ा मुलीचे दोन मुलगे, माझे नातू आहेत. त्यांचं वास्तव्य परदेशी असलं तरीही तेव्हा ते अडनिडय़ा वयात होते. त्यांच्याकडे बघून मनाने उमेद धरली. त्याआधी १९८६ मध्ये माझा मुलगा ट्रेकिंगला गेलेला असताना अचानक झालेल्या अपघातात गेला. तो धक्का मोठाच होता. पण तेव्हा आमचं चौघांचं कुटुंब होतं. एकमेकांना सावरून घेत पुढे चालत राहिलो. आता मात्र मी अगदी एकटी पडल्यासारखं वाटतं. माझ्या मुलाप्रमाणे असणारा माझा विद्यार्थी आणि त्याची पत्नी माझी सर्वतोपरी काळजी घेतात. तरीपण, त्यांचे त्यांचे व्यवसाय-व्याप असतात. त्यात आपण आपली भर का घालायची असंही वाटतंच ना!

माझ्या विमनस्क मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी अनुवाद करायला घेतले. त्या वेळी इतर काही सुचत नव्हतं आणि मन कशाततरी गुंतवणं आवश्यक होतं. एकूण तीन पुस्तकांचे अनुवाद मी केले. ‘द रीडर’, ‘छोटा राजकुमार – लिटिल प्रिन्स’ आणि ‘अगाथा ख्रिस्ती अ‍ॅण्ड इलेव्हन मिसिंग डेज’. गौरीच्या मृत्यूनंतर ‘तटबंदी’ या एस्थर डेव्हिड यांच्या कादंबरीचा अर्धा उर्वरित अनुवाद मी पूर्ण केला. अलीकडच्या काळात अनुवादित केलेल्या काही कथा ‘मुक्त शब्द’च्या दिवाळी अंक तसंच मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यापकी अन्रेस्ट हेमिग्वेची ‘स्नोज ऑफ किलिमांजारो’ ही कथा अतिशय कठीण आहे. एका विदुषीने मला म्हटलं की ती अजिबात समजतच नाही. मलाही ती कठीणच वाटली आणि माझ्याकडून ती अर्धवटच सोडली गेली होती. पण चित्राच्या प्रेमळ आग्रहाने मी ती पूर्ण केली आणि नंतर ती ‘मुक्त शब्द’ मासिकात छापली. अशा अलीकडच्या अनुवादित कथा एकत्र संग्रहित करून प्रसिद्ध व्हाव्यात अशी माझी इच्छा जरूर आहे. पण त्यासाठी करावे लागणारे सायास आता माझ्याच्याने होणे नाही.

अनुवाद करताना मूळ इंग्रजीतला अर्थ नीट जाणून घेऊन, त्याच्या अर्थाला धक्का न लावता ते मराठीत भाषांतरीत करायचं. त्याकरता जे प्रयास करावे लागतात ते मी केले. प्रत्येक शब्दाच्या अर्थाला सुयोग्य असा शब्द निवडून, पारखून घेऊन नंतरच तो घेत गेले. एखादा शब्द सुचला तरीही तो पुरेसा सार्थ नाही तर त्याऐवजी दुसरा सार्थ शब्द कोणता असेल, तो कसा सापडेल त्याचा शोध घ्यायचा हे न कंटाळता करत बसावं लागतं. वाक्यावाक्याला असा झगडा करत पुढे जावं लागतं. कारण असं की दोन्ही भाषांवर सारखंच प्रभुत्व लागतं. माझं ते आहे असं मी मानत नाही, म्हणून मला जास्त झगडावं लागलं.

आज माझं ८७ वं वर्ष सुरू आहे. शरीर आणि मन जोवर साथ देतंय तोवर जगणं क्रमप्राप्त आहे. हालचाली काहीशा मंदावल्यात, जास्त वाचन करता येत नाही कारण नजरेवर ताण येतो. तरीही इंटरनेट, अ‍ॅण्ड्रॉइड सेलफोन, आयपॅड यांच्याशी मी गट्टी केली आहे. त्यामुळे माझ्या नातवांशी, देशा-परदेशातील विद्यार्थ्यांशी मी संपर्कात राहू शकते. तसेच, वाचनाने तर मी इतरांशी आणि स्वत:शीही जोडलेली आहेच. यापूर्वी वाचलेली शेक्सपिअरची काही नाटकं पुन्हा वाचायला घेतली. आधी वाचलेली असूनही तेव्हा वाचताना निसटलेला भाग आता नव्याने समजतो याचा आनंद होतो. रामचंद्र गुहांची पुस्तकं वाचताना महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि स्वातंत्र्यकाळ याविषयीही नवीन काही लक्षात येतं आणि आधीच्या समजुतीत बदल घडतो.

आजवर माझे ३ कथासंग्रह, २ कादंबऱ्या, ३ अनुवादित पुस्तकं आणि काही असंग्रहित लेखन प्रकाशित झालं. कथा-कादंबरीलेखनात मी कोणाचं अनुकरण केलं नाही. या सदराचा विषय आहे, आपल्या जगण्यातील श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे कल्याण, हित आणि प्रेयस म्हणजे ऐहिक, भौतिक, लौकिक, सांसारिक सुख, इत्यादी. माझं आयुष्य ज्या वेगाने पुढे पुढे गेलं की नेमक्या या शब्दात हा प्रश्न मला कधी पडला होता किंवा आता तरी पडला आहे का अशी शंका आहे

(शब्दांकन: चित्रा राजेन्द्र जोशी)

chitrarjoshi@gmail.com