25 March 2019

News Flash

देणं म्हणाल तर ते एवढंच आहे..

आपण इंग्रजी-मराठी-हिंदी साहित्याची पुस्तकं असलेलं दुकान काढावं असं मला अधूनमधून वाटत असे.

‘‘हा लेख लिहिताना एक खुळा विचार मनात आला की मी समजा भाजी विक्रेता झालो असतो, वा विमा एजंट झालो असतो, तर हे एवढं सगळं, साहित्यकलांच्या आस्वादाचं आवार, मला मिळालं असतं का? साहित्याच्या अध्यापनात आणि साहित्याच्या निर्मितीत, अन्य कलांच्या आस्वादात जे काही मिळत गेलं ते नितांत समृद्ध करणारंच होतं. अशी तुलना करणं चूकच आहे, प्रत्येकाचं स्वत:चं आयुष्य असतं, पण हळूहळू माझ्या लक्षात येत चाललं आहे की मी प्रेयसमध्ये श्रेयस विलीन करून टाकलेलं आहे..’’

एम. ए. झाल्यानंतर काही दिवस मी घरीच होतो. तेव्हा आमच्या शेजारच्या प्राध्यापक महोदयांनी मला भाजीचं दुकान काढण्याचा सल्ला दिला होता. सुशिक्षितांनी बेकारीत दिवस काढू नयेत, मिळेल ते काम करावं, कष्ट करावे, फक्त पांढरपेशा नोकरीचा ध्यास घेऊ नये असा त्यांचा दृष्टिकोन होता. मला तो सल्ला रुचला नाही. मात्र त्यांनी मला पुस्तकांचं दुकान काढा, असं म्हटलं असतं तर ते मी आनंदानं मान्य केलं असतं! आपण इंग्रजी-मराठी-हिंदी साहित्याची पुस्तकं असलेलं दुकान काढावं असं मला अधूनमधून वाटत असे. या दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत.

त्यापकी एक किंवा दोन्ही गोष्टी आचरणात आणल्या असत्या तर.. भाजीचं दुकान लवकरच गुंडाळावं लागलं असतं! साहित्याचे वाचकच कमी म्हणून शालेय पुस्तकं, वह्य़ा, पेन्सिली, नकाशे असं काहीतरी होऊन नकोच ते म्हणून मीच बंद करून टाकलं असतं! असे सल्ले थांबले असं झालं नाही. पाच वर्षांत तीन तालुका पातळीवरील महाविद्यालयांत हंगामी म्हणून काम केल्यानंतर सरकारी महाविद्यालयात रुजू झालो. त्यानंतर दुसऱ्या एका प्राध्यापकाचं सविस्तर पत्र आलं. त्याच्या मते, खासगी किंवा सरकारी महाविद्यालयात शिकवण्याची नोकरी करण्यात काही अर्थ नाही; मी एलआयसीची एजन्सी घ्यावी! त्या वेळी प्राध्यापकांचे पगार फारच कमी होते. त्याच्या मते, मी विमा क्षेत्रात फार धडाडीने काम करू शकतो, वर्षभरात गाडी घेणार, दोन वर्षांत बंगला बांधणार! ही परमावधी झाली, कृतार्थ व्हावं अशी स्थिती! हे त्याचं स्वप्नरंजन नव्हतं. माझ्याबरोबर शिकणाऱ्या एकदोघांनी आचरणात आणून हे दाखवून दिलं होतं. त्यानं मला सल्ला देताना हे गृहीत धरलं होतं की प्राध्यापक आहे, म्हणजे समाजात प्रतिष्ठा आहे, आणि मी खूप बोलू शकतो, समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो! हे मात्र खरं नव्हतं. प्रतिष्ठा असेल, पण मी बोलू शकतो हे खोटंच होतं. वर्गात ४५ मिनिटं एखाद्या विषयावर बोलणं, ते कितीही रोचक असलं तरी, वेगळं आणि पॉलिसी गळ्यात मारण्यासाठी करावी लागणारी बडबड वेगळी हे मला ठाऊक होतं. माझ्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी हपापलेले हे सल्ले मला श्रेयस मार्गाकडे नेणारे होते यात शंका नाही. पुढं आणखी एक सल्ला माझ्या डोक्यातूनच आला, तो मात्र अफलातून होता. परिवीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर पगार बंद झाला. म्हणजे इथली नोकरी संपली की काय? मग काय करायचं? तर ‘तिश्नगी’ (तहान) या नावाचं एक दुकान काढायचं, आणि त्यात सर्व प्रकारची पेयं (अपेयंदेखील) ठेवायची! अर्थात हा मार्ग श्रेयसाकडे जाणारा कितपत ठरला असता याविषयी शंकासुद्धा घेण्याची गरज नाही. ‘तिश्नगी’ हे मनात उघडलेलं दुकान मी केव्हाच बंद करून टाकलेलं आहे, पण हे नाव आता कुणाला वापरायचं असेल तर जरूर वापरावं.

मी भाजी विकली नाही, पुस्तकं विकली नाहीत, विमा व्यवसाय केला नाही वा पेयअपेयपानगृह चालवलं नाही, त्या कामांसाठी आवश्यक अशी क्षमता, अर्हता आणि पात्रता माझ्यात नव्हती. हे अगदी शंभर टक्के खरं आहे की मराठी या विषयात एम.ए. करायचं ठरलं त्या वेळी व्यवहाराचा, वास्तवाचा विचार अजिबातच केला नव्हता. साहित्याची आवड एवढंच सांगता येईल. चंद्रपूरला शाळेत असल्यापासून वाचनाचा नाद जडलेला होता. त्या वेळी जी काही ग्रंथालयं तिथं उपलब्ध होती, तिथं जाऊन वाचत बसे. बी.ए.ला मराठी साहित्यात चांगले गुण मिळाले होते. समाजशास्त्र हाही विषय मला आवडत असे. पण बी.ए.ला तो विषय नव्हता. बी.ए.च्या प्रथम वर्षांत असल्यापासून माझ्या कविता मासिकांतून येत असत. प्राध्यापकांनीही या विषयाच्या बाबतीत प्रोत्साहन दिलं होतं. कवितेच्या बाबतीत मार्गदर्शन कुणाचं नव्हतं. महाविद्यालयात बरेच कवितासंग्रह होते. परंतु त्या कवितेचं अनुकरण करावं असं वाटत नव्हतं. ठिकठिकाणी महाविद्यालयं निघत होती. कुठंतरी नोकरी मिळेलच अशी खात्रीही होती. त्यामुळे महाविद्यालयात साहित्याचं अध्यापन करणं ही एक दिशा माझ्या नजरेसमोर होती. त्याप्रमाणे पुढे महाविद्यालयात भाषा व साहित्य शिकवत राहिलो, वयाची साठ र्वष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालो, पण शिकवणं अद्याप संपलं नाही. इयत्ता अकरावीपासून एम.ए.पर्यंतचे विद्यार्थी, आणि भारतीय प्रशासन सेवेचे परीक्षार्थी यांना शिकवण्याचं काम केलं आणि ते मनापासून केलं. वाचनाचा, संदर्भ टिपून ठेवण्याचा, टिपणं काढण्याचा नाद असल्यामुळे ते शिकवणं बरं झालं असावं!

माझ्या मते या कामात श्रेयस आणि प्रेयस या दोन्ही तत्त्वांचं यथायोग्य मिश्रण आहे. याच कामाचा भाग समजून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि दूरशिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्यासाठी पुस्तकं लिहिली. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या भाषा अभ्यास मंडळात निमंत्रक म्हणून इतर सदस्यांच्या व संपादकांच्या सहकार्यानं इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतची पुस्तकं तयार केली. राज्य मराठी संस्थेच्या वतीनं व सहकार्यानं शालेय मराठी कोशाचं संपादन केलं. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांसाठी आयोजित केलेल्या उद्बोधन वर्गात व्याख्यानं दिली, विविध चर्चासत्रांमध्ये निबंध वाचले. एक शैक्षणिक कार्य समजूनच संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश या कोशांच्या संपादनकार्यात सहभागी झालो. शिक्षक-प्राध्यापकांच्या आयुष्यात प्रश्नपत्रिका काढणं आणि उत्तरपत्रिका तपासणं ही दोन कामं असतातच, ती महत्त्वाची आहेतच, पण अगदी अपरिहार्य असेल तेव्हा ती केली, एरवी ती टाळण्याकडे कल अधिक होता. अमरावतीला असताना उन्हाळ्याची सुटी पेपर्स तपासण्यात जायची. बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., एम.ए. अशा सर्व परीक्षांचे पेपर्स तपासून झाले. एम. फिल.च्या प्रबंधिका आणि पीएच.डी.चे प्रबंधही तपासले. आपण नाही म्हणू शकतो हे कळल्यावर बरं वाटलं. बरेच प्राध्यापक हे काम अतिशय आवडीनं करतात, त्यामुळे माझ्यासारख्याची सुटका होत असे. बरं हे काम अगदी विनामूल्य करायचं असे, असंही नाही. पण माझा तिकडे कल नव्हता असंच म्हटलं पाहिजे. एकदा पेपर्स सगळे नीट तपासले, पण सह्य़ा करायचं राहून गेलं. उशीर होऊ नये म्हणून घाईनं पाठवूनही दिले. मग काय, मानधन जाऊ दे, उलट दंड झाला! आम्ही इतकी र्वष आय.ए.एस.ला शिकवलं, पण त्यांचे पेपर्स काढण्याचं वा तपासण्याचं काम आमच्याकडे कधीही आलं नाही, नेट-सेटचं कामही आलं नाही. त्यामुळे एक झालं की या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांवर टीका करण्याचं आमचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं! मराठीला शिकवणीची काही गरज नसते अशी आम जनतेची समजूत असल्यामुळे शिकवण्या कधी कराव्याच लागल्या नाहीत! अशा रीतीने भलत्या मार्गाला मी लागू नये याची काळजी व्यवस्थेतच अंतर्भूत होती. त्यातच माझा आनंद होता.

अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात दहा र्वष होतो. प्रशस्त दगडी इमारत आणि भोवती खूप मोठं आवार. पलीकडे प्राचार्य, प्राध्यापक यांचे बंगले. झाडं खूप होती. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असे. त्याच काळात झाडांची पानं गळण्याचा मोसमही असे. शिकवणं कमी झालेलं असल्यानं स्टाफरूममध्ये सगळेच प्राध्यापक गप्पागोष्टीत रमलेले असत. वर्तमानकाळातील राजकारणापासून अस्तित्ववादापर्यंत अनेक विषय निघत. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजविज्ञान आणि मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू या भाषा विषयांचे प्राध्यापक यांच्या चर्चानी स्टाफरूमचं वातावरण गजबजलेलं असायचं. अधूनमधून विज्ञान विषयाचे प्राध्यापकही डोकावून जात. या चच्रेतून पुस्तकांची, लेखकांची नावं येत, आपण ती वाचली पाहिजेत असं वाटायचं. ग्रंथालयात बऱ्याच गोष्टी सापडायच्या. ‘एन्काउंटर’ मासिक येत असे, पूर्वी ‘लंडन मॅगझिन’ येत असे, त्याचे बरेच अंक होते. ‘कल्पना’ हे हैदराबादहून निघणारं उच्च दर्जाचं हिंदी नियतकालिक येत असे. गजानन माधव मुक्तिबोधांच्या कविता मी प्रथम याच नियतकालिकात वाचल्या होत्या. या महाविद्यालयात असताना माझा ‘योगभ्रष्ट’ हा कवितासंग्रह, ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध’, आणि ‘मर्त्य’ या तीन छोटय़ा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. याच काळात ‘सत्यकथा’, ‘प्रतिष्ठान’, ‘युगवाणी’, इत्यादी नियतकालिकांतून पुस्तक परीक्षणेही केली होती.

प्रभा (गणोरकर) याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती, आणि आता तिथंच प्राध्यापक होती. कविता, पुस्तक परीक्षणं असं तिचंही लेखन चाललेलं होतं. साहित्याखेरीज चित्रकला मला विशेष आवडते, तिला संगीत अधिक प्रिय आहे, आणि त्याची जाणही आहे. त्यामुळे घरी भारतीय शास्त्रीय संगीत, हिंदी चित्रपट संगीत, पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत यांच्या ध्वनिमुद्रिका सतत वाजत असत. त्या काळात अमरावतीत दरवर्षी संगीत महोत्सव होत असे. भीमसेन जोशी, कुमारगंधर्व, किशोरी आमोणकर यांसारखे दिग्गज येत असत. अमरावतीचा रंगभूमीच्या वैभवाचा काळ मागे गेलेला होता. इंद्रभुवन थिएटरचं नाव ऐकलं होतं. पण तिथं झालेलं नाटक कधी पाहिलं नव्हतं. त्या वेळी अ‍ॅब्सर्ड थिएटरची चर्चा चालली होती. महाविद्यालयात काही पुस्तकं होती. पण दरवर्षी मुंबईस गेल्यानंतर जशी ध्वनिमुद्रिकांची खरेदी होत असे, तशी पुस्तकांचीही होत असे. नाटकांची, पटकथांची पुस्तकं घ्यायचो, रंगभूमीविषयक विवेचनपर पुस्तकंही आणायचो. तेव्हा घेतलेली चित्रपटविषयक पुस्तकं अद्याप घरी आहेत. रंगभूमी व नाटकं यांच्या वाचनाचा परिणाम असा झाला की ‘नाटय़धर्मी’ नावाची एक हौशी मंडळी आम्ही सुरू केली. राजा ईडिपस, हयवदन, इतिहास आमच्या बाजूला आहे (विलास सारंग), यात्रिक (जी. ए. कुलकर्णी) अशी नाटकं, लघुनाटकं नाटय़धर्मीच्या मुलांनी केली. मीही त्यांच्यासाठी लेखन केलं. मासिकांतून माझे हे नाटय़प्रयोग छापलेले आहेत, त्यांचं पुस्तक निघायचं आहे.

तात्पर्य असं की साहित्य, चित्र, संगीत, नाटक या गोष्टींमध्ये आम्ही मग्न असायचो. या सर्व आवडीच्या गोष्टी होत्या, आणि मला वाटतं की या आमच्या कल्याणाच्या गोष्टीही होत्या. साहित्य क्षेत्रात आमचं दोघांचंही नाव परिचयाचं झालेलं असल्यामुळे बाहेरून कुणी लेखक, व्याख्यानांच्या निमित्तानं आलेले असले की ते आवर्जून आमच्याकडे येत. त्यात बुजुर्ग गो. नी. दांडेकर यांच्यापासून समकालीन सतीश काळसेकरांपर्यंत अनेक होते. सामाजिक कार्य असं आम्ही काही करीत नव्हतो, पण ज्यांना साहित्याची आवड व जाण आहे असे काँग्रेसमधले, समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी अशा सर्वाचं आतिथ्य आमच्याकडे होत असे. प्रभा सूपशास्त्र अथवा पाककला या विषयातही तज्ज्ञ असल्यामुळे ते आतिथ्य विशेषच होत असे. मात्र मी तिच्याकडून ही विद्या शिकू शकलो नाही. कुकर लावता येणं, किंवा एखादी भाजी करता येणं एवढंच मला आलं. हां, सर्व साहित्य असलं तर झणझणीत उसळ मात्र मला करता येते! मात्र आमच्या दोन्ही मुलांनी, राही आणि ऋत्विक यांनी, आईची ही कला आत्मसात केली आणि विकसितही केली. श्रेयस, प्रेयस याबाबतीत कठोपनिषदाइतकं कठोर जर आपण झालो नाही, तर उत्तम स्वयंपाक करता येणं हा श्रेयस मार्ग आहे असं म्हणता येईल. अर्थात हा केवळ बाईचा प्रांत आहे, पुरुषानं तिकडे फिरकायचंही नसतं असं माझं मत नाही. आज जगभरच्या शेफ मंडळींनी ते सिद्धच केलं आहे म्हणा! अमुकच बाईचं क्षेत्र, तमुकच पुरुषाचं क्षेत्र असं आज काही राहिलेलं नाही.

हा लेख लिहिता लिहिता एक खुळा विचार मनात आला की मी समजा भाजी विक्रेता झालो असतो, वा विमा एजंट झालो असतो, स्वत:च्या प्रयत्नानं व नशिबानं (उंदीरशेटच्या गोष्टीप्रमाणे) आज देशाविदेशात भाजीचा कारभार करणारा भाजीकिंग झालो असतो, किंवा सर्वात मोठय़ा विमा कंपनीचा अध्यक्ष झालो असतो, तर हे एवढं सगळं, साहित्यकलांच्या आस्वादाचं आवार, मला मिळालं असतं का? हा जरतरचा भाग आहे, पण तरीही त्याचं उत्तर नाही हेच आहे. साहित्याच्या अध्यापनात आणि साहित्याच्या निर्मितीत, अन्य कलांच्या आस्वादात जे काही मिळत गेलं ते नितांत समृद्ध करणारंच होतं. अशी तुलना करणं चूकच आहे, प्रत्येकाचं स्वत:चं आयुष्य असतं.

आम्ही मुंबईत आलो आणि एकवीस र्वष राहिलो हे एक वळण होतं. प्रेयस गोष्टींत प्रचंड भर घालणारं हे वळण होतं. केवळ पुस्तकांचा विचार केला तरी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, एशियाटिक लायब्ररी, मुंबई विद्यापीठ ग्रंथालय, एसएनडीटी ग्रंथालय, एल्फिन्स्टन कॉलेज ग्रंथालय, मॅक्समुल्लर भवन- सगळीकडे मुक्त संचार सुरू होता. शिवाय नव्या पुस्तकांसाठी स्ट्रण्ड हे दुकान. पूर्वी अमरावतीहून येऊन पुस्तकं घ्यायचो. आता दोनतीन दिवसांआड स्ट्रण्डची चक्कर. फुटपाथवर पुस्तकं, नियतकालिकं. चित्रांसाठी जहांगीर, पंडोल, ताजमहाल हॉटेल गॅलरी. स्क्रीन युनिट, प्रभात यांचे चित्रपट महोत्सव. एनसीपीएतील नाटक आणि संगीत. आकाशवाणी थिएटरमधले कलात्मक चित्रपट. अमरावतीच्या तुलनेत एका विशाल जगात आलो होतो आणि इथं सगळं दुथडी भरून वाहत होतं. एल्फिन्स्टनच्या गॉथिक इमारतीतून बाहेर पडल्यावर रस्त्यावर अनेक झगमगीत गोष्टी दिसत, आजही दिसतात, त्यांतच पुस्तकांची दुकानं आहेत, चित्रांची प्रदर्शनं आहेत, माझ्या मनातलं ओढाळ वासरू मला तिकडे ओढत नेत असे. प्रवासी कंपनीबरोबर विदेशात गेलो तेव्हा त्यांच्या स्थळांमध्ये लूव्र हे एकमेव कलास्थळ होतं, आणि वेळ किती तर फक्त एक तास! उरलेला वेळ कशासाठी तर पॅरिसमधलं शॉपिंग! अर्थात याचं उट्टं आम्ही अमेरिकेत गेलो तेव्हा काढलं. वॉशिंग्टन डीसीमधील स्मिथ्सोनियन, न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन, बॉस्टन, सॉल्ट लेक सिटी, सिअ‍ॅटल, जॅकसन व्हिल अशा सर्व ठिकाणी असलेल्या कलाविथींना भेटी दिल्या. पुढे ब्रुसेल्सला भेट दिली तेव्हा रॉयल म्यूझियम, मॅग्रिट म्यूझियम, आणि अ‍ॅम्स्टरडॅमचं विन्सेंट म्यूझियम. परिणामी मी चित्रकलेवर लिहायला लागलो.

मला चंद्रपूर येथे व अमरावती येथे राहत असताना असं वाटत असे की अभाव तर पुष्कळच आहे, पण उत्तम पुस्तकांचा अभाव असणं, आपल्या देशातल्या आणि जगातल्या चित्रकारांची चित्रं पाहता न येणं, देशोदेशी उत्तम कलात्मक चित्रपट तयार होतात, ते बघायला न मिळणं हाही मोठा अभावच आहे. इंटरनेटमुळे आजची पिढी हे सगळं घरात बघू शकते, जगभरचं उत्तम संगीत ऐकू शकते. हा अभाव काही प्रमाणात दूर झालेला आहे.

हळूहळू माझ्या लक्षात येत चाललं आहे की मी प्रेयसमध्ये श्रेयस विलीन करून टाकलेलं आहे. आमच्या दोघांच्याही आवडीनिवडीचे संस्कार आमच्या मुलांवर झाले आहेत. साहित्य, संगीत, चित्र, चित्रपट यांमध्ये त्यांनाही तितकाच रस आहे. शेवटी एक अस्वस्थ करणारा विचार मनात येतो – आपण समाजाला काय दिलं? लिहिण्याव्यतिरिक्त काहीही दिलेलं नाही. जे लोक आज खेडय़ापाडय़ांत, रानात जंगलात, अनेक आपत्ती-अडथळ्यांशी सामना करीत विविध अभावग्रस्तांच्या आयुष्यात पहाट उगवावी म्हणून कष्ट करीत आहेत, त्यांच्या तुलनेत आपण काहीच नाही आहोत. मी फक्त एवढंच केलं की अशा असंख्य अभावग्रस्तांची पिळवट माझ्या कवितांतून, रेखाटनांतून व्यक्त केली. देणं म्हणाल तर ते एवढंच आहे.

vasantdahake@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 17, 2018 12:50 am

Web Title: vasant abaji dahake article in loksatta