15 August 2020

News Flash

आनंदयात्रा

वयाच्या शहात्तराव्या वर्षी गावोगावी कवी संमेलने घेत आहे, जे मी माझ्या आनंदासाठी करत आहे.

रामदास फुटाणे chaturang@expressindia.com

‘कटपीस’ कवितेमुळे माझा हिंदी कवी संमेलनाचा अनुभव ‘अर्थपूर्ण’ होता. कविता उत्पन्नाचं साधन होऊ शकतं, हे मी हिंदी मंचावरील कवींकडून शिकलो. ‘सामना’, ‘सर्वसाक्षी’या चित्रपटाचा आर्थिक अनुभव मात्र  चांगला नव्हता. त्यात सोलापूरला ७ सप्टेंबर १९८६ रोजी व्याख्यानाचं निमंत्रण आलं. मी विषय दिला – ‘भारत कधी कधी माझा देश आहे.’ तो श्रोत्यांना आवडला, इतका की ते माझ्या उत्पन्नाचं साधन झालं. कंटाळवाण्या मराठी कवी संमेलनास टाळून मी मनोरंजन व प्रबोधन हे सूत्र घेऊन महाराष्ट्रात कवी संमेलनाचे अनेक कार्यक्रम केले. ग्रामीण भागातील कवी मुंबई-पुण्यात आणले व मुंबई-पुण्याचे कवी घेऊन बृहन् महाराष्ट्रात फिरलो. त्यायोगे कवितेची एक चळवळ उभी राहिली..

मुंबईत आलो अन् जंगलात वाट चुकलेल्या वाटसरूसारखी अवस्था झाली. जायचे होते कोठे? आलो कोठे? खरं तर बालपण सारं अहमदनगर जिल्ह्य़ातल्या जामखेडसारख्या ग्रामीण भारतात गेलेलं. पोहोचलो होतो इंडियात!

लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. आठवीत प्रवेश केला आणि चित्रकला हा स्वतंत्र विषय शिकण्यास मिळाला. तरी अकरावीपर्यंत कोणतीही आर्ट गॅलरी पाहिली नव्हती. दिवाळी अंकातून भेटणारे दीनानाथ दलाल, मुळगावकर, तर भिंतींवरील बीडीच्या कॅलेंडरवर असणारे एस. एम. पंडित. वयाच्या बाराव्या वर्षांपासून ‘नवयुग’ आचार्य अत्रेंच्या बरोबरच दत्तू बांदेकरांना घेऊन आलेला. व्यंगचित्र ठाकरे बंधूंची. व्यंग कळत नव्हतं; परंतु बहुतेक मजकूर काँग्रेसविरोधातला. या ‘नवयुग’मुळे वाचनाची आवड सुरू झाली व गावातील लोकमान्य वाचनालयात नियमित जाऊ लागलो. व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके, द. अ. बडमंत्री, मंगेश तेंडुलकर, वसंत सरवटे भेटत गेले. चित्र पाहणे व वाचन ही महत्त्वाची आवड. त्यातच गावात आठवडा बाजारात येणारा तमाशा. भाऊ बापू नारायणगावकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर या तमाशांचा आनंदही घेत होतो. पुढे चित्रकलेचं शिक्षण घेऊन चित्रकार होण्याचं स्वप्न रंगवू लागलो. अकरावी एस.एस.सी.नंतर पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात चित्रकला शिक्षकाचा एक वर्षांचा सर्टििफकेट कोर्स केला व १४ जून १९६१ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या कान्हूर पठार (जि. नगर) येथे चित्रकला शिक्षक म्हणून रुजू झालो. पगार एकशे पंधरा रुपये. थेट मुंबई गाठली. मुंबईतून गिरगावातील ‘मारवाडी विद्यालय’ येथे जुलै १९६२ ला रुजू झालो. हिंदी माध्यमाची शाळा होती. सर्व श्रीमंतांची मुलं शाळेत होती. त्यांच्यातच बालपण गेले. पण लहानपणी आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा झालो’ या पुस्तकाने प्रेरणा दिली. त्या मार्गावर इथपर्यंत आलो होतो; परंतु स्थर्य नव्हतं. नोकरीची वेळ सकाळी ७ ते १२.४० होती. जे.जे.मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला; परंतु नोकरी करून ते शक्य नव्हतं. दुपारी ३ ते ६ दादरच्या ‘मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स’मध्ये जाऊ लागलो. संपूर्ण दुपारचा एकनंतरचा वेळ मोकळा होता. परंतु या वेळेत मराठी व ड्रॉइंगच्या शिकवण्या मिळाल्यामुळे मी शिक्षण अर्धवट सोडून दिलं.  मी राहत होतो फणसवाडीतील चाळीत. सर्व शेजारी गुजराती होते. शाळेतील सर्व शिक्षक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे होते. विद्यार्थी मारवाडी होते. शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी करत असूनसुद्धा चित्रकलेपासून मात्र मी दूर गेलो.

हिंदी कवी संमेलनं ऐकता ऐकता मीही हिंदीत लिहू लागलो. माझी पहिली मराठी कविता १९६४ मध्ये ‘साप्ताहिक स्वराज्य’मध्ये छापून आली होती. आणि त्याचं मानधन म्हणून पाच रुपये मनीऑर्डर आली होती. १९६५ मध्ये लिहिलेल्या ‘कटपीस’ या हिंदी कवितेमुळे मी ओळखला जाऊ लागलो. हिंदी कवी संमेलनात निमंत्रित म्हणून जाऊ लागलो. काका हाथरसी, निर्भय हाथरसी, शैल चतुर्वेदी, हुल्लड मुरादाबादी, अशोक चक्रधर, सुरेंद्र शर्मा इत्यादी कवींबरोबर सूत्रसंचालक रामरिख मनहर मला घेऊन जात. त्यावेळी मला कवितेचे मानधन म्हणून एक हजार रुपये मिळायचे आणि माझा तेव्हा पगार होता तीनशे रुपये.

तोपर्यंत मराठी कवी किंवा अ. भा. मराठी संमेलनाला कधीही जात नव्हतो. ‘कटपीस’मुळे दादा कोंडके मित्र झाले आणि त्यांनी ‘सोंगाडय़ा’ चित्रपटाची निर्मिती व्यवस्था पाहण्यास सांगितले. मी नोकरी न सोडता महिन्यातून दहा दिवस ‘सोंगाडय़ा’च्या शूटिंगसाठी बिनपगारी रजा घेऊन जाऊ लागलो. नंतर ‘एकटा जीव सदाशिव’ व वसंत सबनीस यांच्या ‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’ टीममध्ये काम केलं. चित्रकार होण्यापेक्षा मराठी चित्रपट निर्मितीकडे मन ओढ घेऊ लागलं. ‘सोंगाडय़ा’ची निर्मिती नव्वद हजार रुपयांत झाली होती. मला चित्रपट काढायचा असल्यास लाख सव्वा लाख रुपये लागतील, असा अंदाज होता. मी निम्म्या पशांसाठी भागिदार घेतला आणि माझे जे मित्र माझ्यावर खूप खर्च करीत होते त्या सर्वाना दोन हजारांपासून पाच हजारांपर्यंत रुपये उसने देण्याची विनंती केली. मित्रांची संख्या भरपूर असल्यामुळे त्यापैकी अनेकांनी मदत केली व ‘सामना’चित्रपटाची निर्मिती झाली.

‘सामना’ चित्रपट काढण्यापूर्वी (१९७२ पूर्वी) माझ्या अनेक मित्रांत दादा कोंडके यांच्याबरोबरच मध्य प्रदेशचे माजी मंत्री प्रसिद्ध गीतकार विठ्ठलभाई पटेल (‘झूठ बोले कौवा काटे’, ‘ना मांगू सोना चांदी’) हेही होते. त्यांचा वाळकेश्वर येथे समुद्रकिनारी बंगला होता. तेथे अनेक चित्रपट कलावंत व हिंदी लेखकांची मत्री झाली. त्यामुळे माझी अभिरुची बदलत गेली. दादा कोंडके मित्र असूनसुद्धा मी चित्रपट काढण्यापूर्वी विजय तेंडुलकरांशी मत्री केली आणि माझ्यासाठी लिहिण्यास सांगितले. मला राजकारणावरच चित्रपट काढायचा होता. खेडय़ातील ग्रामपंचायत व झेडपीचे राजकारण मी जवळून पाहत होतो. तेंडुलकरांनी सुरुवातीला नकार दिला होता. परंतु सतत एक वर्ष मागे लागल्यानंतर त्यांनी होकार दिला आणि ‘सामना’ लिहिला. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव त्यांनी ‘सावलीला भिऊ नकोस’ असं दिलं होतं. मी नाव बदलण्याची विनंती केली आणि ‘सामना’ नाव ठरलं. हा चित्रपट गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित करावा, अशी त्यांची इच्छा होती; परंतु मला तेंडुलकरांचं ‘अशी पाखरे येती’ खूप आवडलं होतं. नंतर जब्बार पटेलचं ‘घाशीराम’ही आलं होतं. मी ही जबाबदारी पूर्वी कधीही चित्रपट न केलेल्या जब्बारवर सोपवली.

२० जानेवारी १९७४ रोजी कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओत आदरणीय भालजी पेंढारकर ऊर्फ बाबांच्या उपस्थितीत आणि लता मंगेशकर यांच्या हस्ते ‘सामना’चा मुहूर्त झाला. लतादीदींनी सामना चित्रपटातील ‘सख्या रे घायाळ मी हरिणी..’ हे गीत मानधन न घेता गायले. विजय तेंडुलकरांचे लेखन, डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांचा अभिनय, भास्कर चंदावरकर यांचे संगीत यामुळे वेगळा चित्रपट घडत होता. आपण मराठीला वेगळा चित्रपट देत आहोत, याचा आनंद होत होता. परंतु चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो पुण्यात साधारण व इतर कोठेच चालला नाही. मुंबई येथील प्रदर्शनात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र जर्मनीतील एका स्त्रीने एका इंग्रजी वृत्तपत्रातील माहिती वाचून सेंट्रल सिनेमात तो चित्रपट पाहिला. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या संचालिका उमा डिकुन्हा यांनी ‘सामना’ची पिंट्र मागितली. दिल्लीत चित्रपट निवडला गेला. भारतातून दहा-बारा चित्रपट स्पर्धेसाठी गेले होते. तोपर्यंत माझ्या डोक्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आलाच नव्हता. जर इथलेच लोक चित्रपट पाहत नाहीत  तर तिथं कोण पाहणार, या भावनेनं मी उदास झालो होतो. परंतु मेमध्ये बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धक विभागात जगातील उत्कृष्ट १६ चित्रपटांत ‘सामना’ची निवड झाली होती. मी तेव्हा जामखेडला होतो. लोकांनी रेडिओवर बातमी ऐकली होती. कौतुक सुरु झाले होते.

पण तिथे जायचे कसे, खिशात एसटी भाडय़ालाही पैसे नव्हते. रोजचा दिवस मी उसने पैसे घेऊन काढत होतो. मी डॉ. श्रीराम लागू यांना बरोबर घेऊन मंत्रालयात गेलो व सांस्कृतिक कार्यमंत्री मधुकरराव चौधरी व सुशीलकुमार शिंदे यांना भेटलो. त्यांना ‘सामना’ चित्रपट दाखवला. ‘सामना’साठी मदत मिळावी म्हणून स्वत: सुशीलकुमार शिंदे माझा अर्ज घेऊन मुख्यमंत्री चव्हाण साहेबांकडे गेले व पंचवीस हजार रुपये मंजूर केले. डॉ. लागू, निळू फुले यांना बर्लिनला नेण्याचे मी ठरवले. परंतु तिकिटाचे सर्वाचे मिळून ६७ हजार रुपये होत होते. या वेळी सचिव पळनीटकर व मुंबई महापालिकेचे आयुक्त एम. डब्ल्यू. देसाई यांनी मदत केली.  शेवटी २७ हजार रुपयांत तिकीट मंजूर झाले. परंतु तिकीट हातात नव्हते. २५ जूनला बर्लिन येथे पोहोचणे गरजेचे होते. २४ पर्यंत तिकिट हाती नव्हते. निळू फुले म्हणाले, ‘‘रामदास, तुझा जामखेडला आणि माझा पुण्यात सत्कार झाला आहे. इथून असेच परत घरी जाणे चांगले नाही. आपण गोव्याला जाऊ. तिथं काही परदेशी वस्तू विकत घेऊ आणि मित्रांना भेट देऊ.’’ पण २४ तारखेला संध्याकाळी ५ वाजता तिकीट हाती आले. विमान रात्री दहा वाजता होते. आम्ही सर्व जण एसटी स्टँडवर जावे तसे थेट नऊ वाजता विमानतळावर पोहोचलो. पण सोबत डॉ. श्रीराम लागू व निळू फुले असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली. विमानात बसलो. विमान रोमला उतरणार होते. विमानात बसताच आम्ही झोपी गेलो. जाग आली तेव्हा विमान उतरले होते, पण ते रोमच्या नव्हे तर दिल्लीच्या विमानतळावर. जब्बार पटेल म्हणाला, ‘‘विमानाच्या पंख्याला आग लागल्यामुळे विमान उतरले आहे.’’ आपल्या नशिबात बर्लिन नाही याची सतत जाणीव होत होती. रात्री सर्व प्रवासी तिथल्याच हॉटेलमध्ये उतरले आणि नेमकी दुसऱ्या दिवशी दिल्लीत आणीबाणी सुरू होती आणि सर्वत्र स्मशानशांतता पसरली होती..

पण त्यातूनही आम्ही दुसऱ्या दिवशी बर्लिनकडे प्रयाण केले. चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन समारंभ चुकला होता. त्याचे सर्वात जास्त दु:ख नर्गिस व सुनील दत्त यांना झाले होते. ‘सामना’ बर्लिनला जावा, यासाठी राजकारण्यांचा विरोध असतानाही नर्गिस यांनी पाठपुरावा केल्यामुळेच तो बर्लिनला जाऊ शकला. बर्लिनमधील हॉटेल हिल्टन येथे प्रत्येकाला स्वतंत्र रूम मिळाली होती. निळू फुले व मी अनेक वर्षे कोल्हापूरच्या आणि मुंबईच्या दहा रुपये कॉटच्या हॉटेलमध्ये राहून ‘सामना’ पूर्ण केला होता. ‘सामना’ चित्रपट काढला तेव्हा मुंबईत माझ्याकडे ऑफिस किंवा फोन नव्हता. पब्लिक फोनवरूनच मी सर्वाशी संपर्क साधत होतो. चित्रपट निर्मितीच्या वेळचा सारा प्रवास मी एसटीच्या लाल डब्यातून केला होता. आलेल्या संकटावर पर्याय शोधणे, सतत चालू होते. चित्रपट फ्लॉप झाल्यास काय करायचे, कसे जगायचे, याचे अनेक मार्ग माझ्याकडे उपलब्ध होते. कला आणि व्यवहार याची उत्तम सांगड घातला आली पाहिजे, तरच यशस्वी निर्माता होऊ शकतो, याची जाणीव होतीच. त्याप्रमाणे वाटचाल सुरु झाली होती. खरं सांगायचं तर ‘पडद्यामागील सामना ’ या विषयावर लिहायचं तर स्वतंत्र पुस्तक लिहावं लागेल. तीनशे साठ रुपये पगार असणारा ड्रॉइंग शिक्षक भागिदार घेऊन चित्रपट कसा काढतो, खिशात एसटी भाडय़ालाही पैसे नसताना बर्लिन-लंडनला कसा जातो, हा विषय अनेक पानांचा आहे.

मी ‘सामना’ची निर्मिती (१९७४), ‘सर्वसाक्षी’चं दिग्दर्शन (१९७८), ‘सरुवता’चं दिग्दर्शन (१९९४), ‘सरपंच भगीरथ’चं दिग्दर्शन (२०१३) याव्यतिरिक्त काय केलं? इच्छा नसतानाही आमदार कसा झालो? या सर्व गोष्टी इतक्या कमी शब्दांत लिहिताच येणार नाही. प्रत्येकाची पुस्तके होतील आणि त्यातून वाचकांनाही जगण्याची ऊर्जा कळेल हे नक्की. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध भाषा बोलणारे श्रीमंत उद्योगपती, अत्यंत कष्टाळू गरीब जामखेडची जनता, शरद पवार, सुशीलकुमारजी शिंदे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यापासून जामखेडच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य माझे मित्र असल्यामुळे खूप काही शिकता आले. भालजी पेंढारकर यांच्या ‘देव, देश व धर्म’ यावरील चिंतनापासून राम मनोहर लोहिया, निळू फुले यांच्या विचारांपर्यंत अनेक गोष्टी ऐकता आल्या.

भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, वसंत सबनीस, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गोिवद तळवलकर, माधव गडकरी, विद्याधर गोखले, इसाक मुजावरपासून अरुण साधू, दया पवार यांसारखे मित्र बनले. त्यांना ऐकता आलं हे आनंदाचे क्षण. जामखेड येथील डॉ. रजनीकांत आरोळे, डॉ. नेबल आरोळे संघाचे डॉ. डी. बी. खैरनार यांना ऐकताना एकच शिकलो,

वाकू दे बुद्धीस माझ्या

तप्त पोलादापरी (मर्ढेकर)

आयुष्याच्या या प्रवासात खूप काही शिकत गेलो. माझ्या ‘कटपीस’ या कवितेमुळे हिंदीतील कवी संमेलनाचा अनुभव ‘अर्थपूर्ण’ झाला. कविता हे उत्पन्नाचं साधन होऊ शकतं, हे मी हिंदी मंचावरील कवींकडून शिकलो. ‘सामना’, ‘सर्वसाक्षी’ या चित्रपटांचा आर्थिक अनुभव चांगला नव्हता. मात्र त्याच दरम्यान आणखी एक घटना घडली.  ७ सप्टेंबर १९८६ रोजी सोलापूरच्या व्याख्यानाचं निमंत्रण आलं. मी विषय दिला – ‘भारत कधी कधी माझा देश आहे.’  प्राचार्य निर्मलकुमारजी फडकुले यांनी काही सूचना केल्या. तो कार्यक्रम श्रोत्यांनाही आवडला. आणि ते माझ्या उत्पन्नाचं साधन झालं. कंटाळवाण्या मराठी कवी संमेलनास टाळून मी मनोरंजन व प्रबोधन हे सूत्र घेऊन दया पवार, फ. मुं. शिंदे, विठ्ठल वाघ यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात कवी संमेलनाचे अनेक कार्यक्रम  केले. ग्रामीण भागातील कवी मुंबई-पुण्यात आणले व मुंबई-पुण्याचे कवी घेऊन बृहन् महाराष्ट्रात फिरलो. एक मात्र नक्की त्यातून कवितेची एक चळवळ उभी राहिली.

१९८२ मध्ये मराठी चित्रपट महामंडळाचा कार्यवाह असताना सुधीर फडके यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत चित्रपट महोत्सव केला. १९९० मध्ये महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांना पुरस्कार सुरू केले. जामखेडला ‘श्री संत नामदेव पुरस्कार’, नगरला ‘संजीवनी खोजे पुरस्कार’, पुण्यात ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’, मुंबईत नानीके रुपानी यांचा ‘प्रियदर्शिनी पुरस्कार’, सोलापूर येथे ‘भरूरतन दमाणी पुरस्कार’ सुरू केले. बाळासाहेब विखे पाटील भेटले. त्यांना पद्मश्रींच्या नावाने साहित्य पुरस्कार सुरू करण्यास सांगितले व त्यांनी तो त्याच आठवडय़ात सुरू केला. मराठी साहित्यात वर्षांला दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पुरस्कार सुरू झाले.

मी कवी आहे की नाही, हे माझ्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनंतर जर कोणी माझं वाचत असेल तर ठरणार आहे. आज मी साहित्य, कला, राजकारण, समाजकारण या क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणूनच जगत आहे. गेली १५ वर्ष!

मी सध्या जागतिक मराठी अकादमीचा अध्यक्ष असून जगातील मराठी बांधवांना घेऊन ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन भरवत आहे. वयाच्या शहात्तराव्या वर्षी गावोगावी कवी संमेलने घेत आहे, जे मी माझ्या आनंदासाठी करत आहे. कवितांचे कार्यक्रम हा माझ्या जगण्याचा आनंद आहे.

आता बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत. चांगलं नाटक लिहिता आलं नाही. चांगला चित्रकार होता आलं नाही, त्याची खंत आहेच. तरीसुद्धा – आयुष्य एस.टी.च्या लाल डब्यातून प्रवास करण्यात निघून गेलं. शहात्तर संपत आलंय. किती दिवस हातात आहेत माहीत नाही; परंतु उरलेला प्रत्येक दिवस आनंदात जगणं आपल्या हातात आहे. दु:ख चालत येतं. आनंदाचे क्षण आपणच शोधायचे असतात. अनेक क्षेत्रांतील अनेक मित्रांचं प्रेम हीच माझी शक्ती आहे. चित्रकलेकडे वळावं वाटतं, पण लगेच कार्यक्रमाचे फोन येतात व दोन तासांच्या कार्यक्रमासाठी चोवीस तासांचा प्रवास करावा लागतो. गर्दीत जगण्याची सवय लागलीय. पण तरीही ती माझ्यासाठी एक आनंदयात्रा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:01 am

Web Title: writer ramdas phutane life journey
Next Stories
1 रंगमंचाच्या कॅनव्हासवरचं नृत्यचित्र
2 फरक पडणार हे नक्की!
3 चित्रनिर्मितीचा वसा
Just Now!
X