29 February 2020

News Flash

महोत्सव : दिवाळीआधी सिनेदिवाळी..

ओझन अ‍ॅकिकटन दिग्दर्शित ‘माय मदर्स वाऊण्ड’ हा टर्की सिनेमा लक्ष वेधून घेणारा ठरला.

मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेजेस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मामि फेस्टिव्हल म्हणजे चित्रपटरसिकांसाठी पर्वणीच. जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट या महोत्सवात बघायला मिळतात. यावर्षी दिवाळीआधी दोन दिवस संपलेल्या या महोत्सवामुळे चित्रपटरसिकांची दिवाळी अधिकच समृद्ध, अधिकच संपन्न झाली..

नवरात्र संपलं की सगळे दिवाळीची वाट पाहतात. चित्रपटप्रेमी मात्र मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेजेस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मामि फेस्टिव्हलच्या प्रतीक्षेत असतात. जगभरातले महत्त्वाचे, उत्तम दर्जाचे सिनेमे, चित्रपटतज्ज्ञ, चर्चासत्र, लघुपट, सिनेसृष्टीतले बदल, तंत्रज्ञान, नावीन्य, आशय-विषय असं सगळंच एकत्रित मिळण्याचं ठिकाण म्हणजे मामि फेस्टिव्हल. या फेस्टिव्हलमध्ये विविध देशांमधले सिनेमे दाखवल्यामुळे त्याची भाषा कळणं कठीण असतं. पण, तरी या सिनेमांना गर्दी असते. कारण सिनेप्रेमींसाठी भाषेपेक्षा ती कलाकृती जास्त महत्त्वाची असते. चित्रपट हे एक वेड आहे. वेड; त्यातला आशय वाचण्याचं, व्यक्तिरेखांचं निरीक्षण करण्याचं, संगीताचा आस्वाद घेण्याचं, बिटवीन द लाइन्स ओळखण्याचं, तंत्रज्ञान अजमावण्याचं आणि चांगला-वाईट असे दोन्ही सिनेमे तितक्याच तन्मयतेने बघण्याचं. असा अनुभव घेणारे सिनेप्रेमी या महोत्सवात मोठय़ा प्रमाणावर दिसत होते.

नव्याने दिमाखात उभ्या असलेल्या मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं. उद्घाटन सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. तसंच चायनीज चित्रपटांतील योगदानाबद्दल जीया झांग के यांनाही जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘अ डेथ इन द गुंज’ या पहिल्याच सिनेमाला यंदा ओपनिंग फिल्मचा मान मिळाला. श्यामल चॅटर्जी हा विद्यार्थी त्याच्या परीक्षेत नापास होतो. पण, हे तो त्याच्या कुटुंबामध्ये कोणाला कळू देत नाही. कारण त्याचे कुटुंब, मित्रपरिवार असे सगळे एका रोडट्रीपला जाणार असतात. पण, या ट्रीपमध्येच असं काही घडतं की सगळ्यांच्या समोर एक अनपेक्षित गोष्ट समोर येते आणि सिनेमा वेगळ्या वळणावर जातो. कोंकणा सेन शर्माला ‘मास्टरकार्ड बेस्ट इंडिअन फिमेल फिल्ममेकर २०१६’ या पुरस्काराने मामि फेस्टिव्हलमध्ये गौरविण्यात आलं. कोंकणाने अभिनेत्री म्हणून नाव कमावलंच आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती वेगळ्या भूमिकेत दिसून येते.

ओझन अ‍ॅकिकटन दिग्दर्शित ‘माय मदर्स वाऊण्ड’ हा टर्की सिनेमा लक्ष वेधून घेणारा ठरला. सालीह नावाचा मुलाचा १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अनाथ आश्रमातून बाहेर पडतो. आश्रमातील प्राचार्य त्याला तिथे कोणी ठेवलं होतं याविषयीची माहिती देतात. आश्रमातून बाहेर पडल्यावर तो थेट प्राचार्यानी सांगितलेल्या पत्त्यावर जातो. एक लहान मुलगा, त्याचे आई-वडील आणि आजी असा तो परिवार असतो. या घरात गेल्यावर त्याची गाठ पडते ते त्या घरातल्या पुरुषाशी. दोघेही बोलत असलेल्या संदर्भाचा एकमेकांना काहीच अर्थ लागत नाही. त्या घरातली आजी त्या मुलाला स्वतंत्रपणे गाठते. सालीहच्या जन्माचा आणि त्याला आश्रमात ठेवण्याचा किस्सा सांगते. शिवाय त्याच्या वडिलांविषयीची माहिती पुरवते आणि इथून निघून जा असंही सांगते. तिथून तो त्याच्या वडिलांच्या शोधात निघतो. एका ठिकाणी थांबायचं ठरवतं. तेही एक कुटुंबच असतं. पण, दोघांचंच. नवरा आणि बायको. सत्य शोधण्याचा त्यांचा प्रवास तिथून सुरू होतो. कथा-पटकथा, अतिशय रंजक वळणं, पुरेसे आणि अचूक संवाद, अभिनय, संकलन, कला दिग्दर्शन या सगळ्यामुळे सिनेमा उत्तम ठरतो.

पूर्वी टर्की सिनेमे मामि फेस्टिव्हलमध्ये फारसे दाखवले जायचे नाही. पण यंदा हे चित्र बदलेलं दिसलं. विषय साधा असला तरी त्याच्या मांडणीमुळे टर्की सिनेमे मनोरंजक ठरतात. या टर्की सिनेमासह फेस्टिव्हलमध्ये ‘एट सेकंड्स’, ‘ब्ल्यू बायसायकल’, ‘द ब्राइड’, ‘विंटर स्लीप’, ‘स्नो पायरेट्स’ असे काही सिनेमे दाखवले गेले. या सिनेमांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाचा ट्रेलर गेल्या महिन्यात लाँच झाला. तो लाँच झाल्यावर काही तासांत व्हायरलही झाला. ‘पिंक’, ‘पाच्र्ड’ या सिनेमांनंतर आता ‘लिपस्टिक..’हा सिनेमा काय वेगळं घेऊन आलाय अशा चर्चाही होऊ लागल्या. अलंक्रिता श्रीवास्तव या दिग्दर्शिकेने गोष्ट सांगितली आहे ती चौघींची. चौघींची स्वप्नं, इच्छा वेगवेगळ्या. पण, शोध एकच; स्वातंत्र्य मिळवण्याचा. बुरखा घालून कॉलेजला जाणाऱ्या तरुणीला पॉप सिंगर व्हायचंय. तर एका छोटय़ा शहरात राहणाऱ्या एका तरुण ब्युटिशिअनला त्या बंदिस्त जागेतून निसटायचं असतं. बायको आणि तीन मुलांची आई अशा दोन भूमिका बजावणारी एक त्रासलेली महिला उद्योजिका म्हणून एक दुसरं आयुष्य जगते. तर ५५ वर्षीय एक विधवा फोनवर एका तरुणाशी रोमँटिक गप्पा मारते. अशा या चौघींची ही कहाणी. चौघींना हवं ते त्या मिळवतात का, त्यांना कोणकोणत्या परिणामांना सामोरं जावं लागतं हा सगळा प्रवास यात आहे.

आयुष्याला कंटाळलेली मूळची जर्मनीची मेरी फुकुशिमा या शहरात येते. तिचं नीरस झालेलं आयुष्य बदलायला ती हा पर्याय निवडते. २०११ मध्ये फुकशिमामध्ये अणुबॉम्ब  प्लाटंच्या अपघातात जखमी झालेल्या काही लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी मेरी तिथे पोहोचते. पण, काही दिवसांतच तिला ते काम जमत नसल्याचं तिच्या लक्षात येतं. ती तिथून निघून जाण्याचा निर्णय घेते. पण, अचानक तिच्या मनात आलेला एक वेगळा विचार तिला पुन्हा मागे खेचतो. हा सिनेमा आजच्या काळातला असला तरी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमध्ये सादर केला आहे. हा विरोधाभास खटकत नाही. सिनेमाच्या अध्र्या भागात दोनच व्यक्तिरेखा दिसतात. पण, त्याचाही कंटाळा येत नाही. सिनेमात जर्मन, जपानी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांचा समावेश आहे. मेरीचा प्रवास डोरिस डोरी दिग्दर्शित ‘फुकुशिमा, मॉन अमॉर’ या सिनेमात रंजक पद्धतीने सादर केला आहे.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक जोडीचे सगळेच सिनेमे नेहमीच वेगळ्या वळणाचे असतात. सभोवतालचे विषय घेऊन त्याची मांडणी सोपी पण वेगळ्या प्रकारे केल्याने तो सिनेमा उठावदार ठरतो. ‘कासव’ या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना काही सांगू पाहतेय. मानव हा तरुण नैराश्यात पूर्णपणे अडकलेला आहे. त्यातून बाहेर कसं पडायचं हे त्याला कळत नाहीये आणि त्याला ते सांगायचंही नाही. अपघाताने त्याची आणि जानकीची भेट होते. तो बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे जानकी त्याला तिच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाते. तिथेच तिची राहायचीही सोय असते. त्या घरात ती त्याला ठेवते. जानकीचा साहाय्यक यदूसोबत ती त्याची काळजी घेते. तिला स्वत:ला नैराश्याचा अनुभव असल्यामुळे तिला मानवला यातून बाहेर काढणं गरजेचं वाटतं. पण ती त्याला कोणताही उपदेश करत नाही. असं न करता ती त्याला त्यातून बाहेर कशी काढते हा ‘कासव’चा प्रवास. सध्या प्रामुख्याने तरुणांमध्ये वेगाने पसरणारा मानसिक आजार म्हणजे नैराश्य. याच मुख्य मुद्दय़ावर सिनेमा भाष्य करतो पण वेगळ्या पद्धतीने. कोकणात देवगडमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालंय. या सिनेमाची सिनेमाटोग्राफी उत्तम झाली आहे. शांत अशा सिनेमाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत होते. सिनेमा झाल्यानंतर चित्रीकरण, संगीत, संवाद, पटकथा या सगळ्यावर चर्चा झाली. या जोडीचे सिनेमे उत्तम असले तरी ते प्रदर्शित व्हायला अनेकदा वेळ लागतो. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अस्तु’ या सिनेमाबाबत असंच झालं होतं. याबद्दल सुमित्रा भावे यांनी सांगितलं, ‘दिग्दर्शकाने एखादी चांगली कलाकृती करण्यासाठी त्याची शक्ती वापरावी. किंबहुना तो ती वापरू शकतो. एकदा त्याने चांगली कलाकृती बनवली की जाणकार निर्मात्यांनी तो सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचेल याकडे बघावं. प्रसारमाध्यमांनीही सिनेमा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल याची जबाबदारी घ्यावी.’ निर्माते मिळत नसल्यामुळे चांगल्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापासून वंचित राहतात, मधल्या मध्ये असे सिनेमे अडकतात याची खंत वाटत नाही का, असं विचारल्यावर त्या स्पष्ट सांगतात, ‘सिनेमा दीर्घकाळ टिकणारी कलाकृती आहे. पुस्तकासारखी. त्यामुळे ती तयार झाल्या झाल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही तरी पुढे कधीही ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेच.’

फेस्टिव्हलमध्ये सिनेमांचे बरेच पर्याय असल्यामुळे अनेकदा कोणता सिनेमा बघावा हा गोंधळ होतो. तसंच त्यांची ठिकाणंही अनेकदा लांब असतात. एका ठिकाणहून दुसरीकडे जाण्यासाठी वाहनांचे अनेक पर्याय असले तरी वेळ लागतो. अशातही काही सिनेमे पाहायचे राहून जातात. एका सिनेमाचे एकापेक्षा जास्त स्क्रिनिंग असले तरी एक चुकला तरी दुसरा मिळेलच अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेकांची गडबड होताना दिसत होती. असं असलं तरी एका सिनेमासाठी प्रत्येक वेळी गर्दी झाल्याचं दिसलं. संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये चर्चा असलेला आणि ऑडीअन्स चॉइस हा पुरस्कार मिळालेला सिनेमा म्हणजे असघर फरहाद दिग्दर्शित ‘द सेल्समन’. या सिनेमाचे दोन-तीन स्क्रिनिंग होते. प्रत्येक स्क्रिनिंगला तितकीच गर्दी होती. पहिल्या स्क्रिनिंगनंतर फेस्टिव्हलमध्ये आपापसात नेहमी चर्चा होत असते. अनोळखी लोकही एकमेकांना ‘आतापर्यंत कोणकोणते सिनेमे पाहिलेत. कोणता चांगला आहे’ असं विचारू लागतात. या देवाणघेवाणीतून चांगल्या सिनेमांबद्दलची माहिती पसरत जाते. तसंच ‘द सेल्समन’बद्दल झालं. मुळातच इराणी सिनेमे अतिशय सुंदर असतात. त्या सिनेमात अजिबात भपकेपणा नसतो. या इराणी सिनेमाची कथा अगदी साधी. तेहरनमध्ये राहणारं इमाद आणि रना हे जोडपं. त्यांच्या जुन्या घराचं मोठय़ा प्रमाणावर नुकसान होतं. त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहायला जा असं सांगितलं जातं. त्याच दरम्यान आधीच्या भाडेकरूशी निगडित एक घटना घडते. याचा रना आणि इमाद या जोडप्यावर काय परिणाम होतो, हे सांगणारी ही ‘द सेल्समन’ ही कथा. सगळ्यांच्या पसंतीस उतरणारा हा सिनेमा लक्षवेधी ठरला.

‘द बॉलकम हिल्स अफ्रिकन लेडिज ट्रप’ हा ऑस्ट्रेलियातला सिनेमा थक्क करून सोडणारा होता. रोझ होरीन या दिग्दर्शिकेने हे धाडसी पाऊल उचललं आहे. आ फ्रिकेतल्या चार महिलांवर हा सिनेमा बेतलेला आहे. या सिनेमाची धाटणी वेगळी आहे. या चारही महिला लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे अनुभव एका नाटय़कृतीतून सांगण्यासाठी रोझ होरीन त्यांच्यासोबत काम करतेय. थोडक्यात, या सिनेमात एक नाटक तयार होण्याची प्रक्रिया आहे. हा सिनेमा कथास्वरूपात नाही तर माहितीपटाच्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. पण, याची मांडणी सुटसुटीत असल्यामुळे ती गोंधळात पाडणारी नाही, ही या सिनेमाची जमेची बाजू. अत्याचार झालेल्या महिलांकडून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल वारंवार सिनेमात सांगितलं आहे. असं का, हा प्रश्न दिग्दर्शिकेला विचारण्यात आला. त्यावर दिग्दर्शिका रोझ यांनी सांगितलं, ‘अत्याचार झालेल्या महिलांच्या भूतकाळात फारसं न डोकावता त्यांनी त्या अत्याचारावर नंतर मात कशी केली, त्यातून त्या बाहेर कशा पडल्या या संघर्षांची कहाणी सांगण मला जास्त महत्त्वाचं वाटलं. अत्याचार का होतो हे सांगणंही तितकंच गरजेचं होतं. तसंच बलात्कार, लैंगिक शोषण, हिंसाचार याचे परिणाम कसे आणि काय होतात आणि त्यातून एखादी महिला बाहेर कशी पडते यावर मला सिनेमा केंद्रित करायचा होता.’ सिनेमामध्ये नाटकासाठी घेतलेल्या कार्यशाळेबाबतही माहिती दिली आहे. पाच वर्षांपासून सुरू असलेली नाटकाची प्रक्रिया अखेर यावर्षी संपली आणि नाटकाचे प्रयोग व्हायला लागले. प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिग्दर्शिका सांगते. अत्याचार झालेल्या महिलांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कलाकारांना न घेता अत्याचार झालेल्या खऱ्या महिलांनाच यात का घेतलं असा एक प्रश्न प्रेक्षकांमधून उमटला. त्यावर रोझ यांनी सांगितलं, ‘सुरुवातीला कलाकारांना घेऊया असं डोक्यात होतं. पण, नंतर त्या चौघींना भेटले. त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग वाटलं की त्याच त्यांचे अनुभव अधिक प्रभावीपणे मांडू शकतात. गरज होती ती थोडसं ग्रुमिंग करण्याची. त्यासाठी आम्ही कार्यशाळा घेतली.’ वास्तववादी विषय हाताळून वेगळी मांडणी करून सिनेमा एका गंभीर मुद्दय़ावर भाष्य करतो.

अमेरिकेतला ‘सर्टन वुमेन’ हा  किली रिचर्डट दिग्दर्शित चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही असं दिसलं. एक महिला वकील आणि तिचा अशील, एका जोडप्याचं नवीन घर मिळवण्याचा संघर्ष आणि एक शेतात काम करणाऱ्या तरुणीची रात्रशाळेत शिकवणाऱ्या एका मुलीशी झालेली मैत्री अशा तीन ट्रॅकभोवती सिनेमा फिरतो. हे तीन ट्रॅक एकमेकांना जोडले गेलेले आहेत. सिनेमा थोडा गुंतागुंतीचा वाटतो. ‘द नॅरो पाथ’ हा सतीश बाबुसेनन, संतोष बाबुसेनन यांचा मल्याळी सिनेमा. आजारी वडील आणि त्यांच्यासोबत राहणारा त्यांचा मुलगा अशा दोघांची ही कथा. मुलगा अखिल त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत बंगळुरूला नोकरीनिमित्त जाण्याचं ठरवतो. सिनेमाची कथा एका दिवसाचीच आहे. अखिलला तो बंगळुरूला जाणार आहे हे वडिलांना सांगायचं आहे. पण, तो तिथवर पोहोचत नाही. त्या संपूर्ण दिवसात वडिलांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो. अखेर त्याला ते जमत नाही आणि तो त्याचा निर्णय बदलतो. पण यामुळे त्याचे वडील एक वेगळं वळण घेतात. सिनेमाची कथा अगदी एका ओळीत आहे. त्यामुळे इथे पटकथेचा पसारा नाही. एकच ट्रॅक पुढे पुढे सरकतो. लोकेशन अगदी वास्तवदर्शी आहेत. त्यामुळे सिनेमालाही वास्तवदर्शी लुक येतो. फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला सिल्व्हर गेटवे अवॉर्ड मिळालं आहे.

आठवडाभर सुरू असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये सिनेमा कसा असेल याचा साधारण अंदाज येतो. सिनेमात विशिष्ट व्यक्तिरेखा बघायला मिळतील, संवाद असतील, आकर्षक रंगबेरंगी लोकेशन्स बघायला मिळतील अशी साधारण कल्पना डोक्यात असते. पण, तुम्ही सिनेमागृहात प्रवेश केलात, खुर्चीवर बसलात आणि समोर अ‍ॅनिमेटेड सिनेमा सुरू झाला तर.. सुरुवातीचे दहा-पंधरा मिनिटं होऊनही एकही संवाद त्यात नसेल तर, त्याच पंधरा-वीस मिनिटांत सिनेमात एका व्यक्तिरेखेव्यतिरिक्त दुसरं कोणीच दिसलं नाही तर, तरीही भांबावून जाऊ नका. मायकेल डय़ुडोल द वित या दिग्दर्शकाचा ‘द रेड टर्टल’ हा सिनेमा हे सगळं दाखवूनही उत्तम ठरतो. एक मुलगा समुद्राच्या पाण्यातून वाहत एका बेटावर येऊन पोहोचतो. तिथून बाहेर पडण्याचे अनेक प्रयत्न करतो. पण, सगळे अयशस्वी होतात. त्याच्या अपयशाला कारणीभूत असलेलं एक लाल कासव बेटावर येतं. एक चमत्कार घडतो. त्यातून एक मुलगी बाहेर येते. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांना मुलगा होतो. तो मोठा होतो. ते बेट त्यांचं विश्व बनून जातं. पण, नंतर एक अशी घटना घडते की त्या कुटुंबातला प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागतो. एकही संवाद नसताना अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून सिनेमा प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती ध्वनिसंयोजनाने. संवाद नसल्यामुळे संपूर्ण सिनेमा बघताना चित्रपटगृहात शांतता अनुभवता आली.

दिवाळीच्या अगदी दोन दिवस आधी संपलेल्या या फेस्टिव्हलमुळे चित्रपटप्रेमींसाठी खरी दिवाळी एक आठवडा आधीच सुरू झाली होती असंच म्हणावं लागेल. एके दिवशी जास्तीत जास्त सिनेमे बघण्याचा आनंद अनेकांनी घेतला.

First Published on November 11, 2016 4:55 am

Web Title: diwali for cinema industry
Next Stories
1 महोत्सव : मराठी टॉकीजचा तडका
2 महोत्सव : यंदाही शॉर्टफिल्म्सची बाजी
3 कलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.!
X
Just Now!
X