29 February 2020

News Flash

महोत्सव : मराठी टॉकीजचा तडका

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमाने मराठी टॉकीजची सुरुवात झाली.

दोन वर्षांपूर्वी मामि फेस्टिवलमध्ये ‘किल्ला’, ‘कोर्ट’, ‘नागरिक’, ‘सिद्धांत’, ‘रंगा पतंगा’ हे मराठी सिनेमे दाखवले होते. सिनेमांसाठी अनेकांनी पुष्कळ गर्दीही केली होती. मागच्या वर्षी हे चित्र थोडं बदललेलं दिसलं. ‘कौल’, ‘रिंगण’ असे मोजके सिनेमे वगळता मराठी सिनेमांची पाटी तशी कोरीच होती. यंदा मराठी सिनेमांसाठी मराठी टॉकीज असा एक विभागच करण्यात आला होता. एका दिवसात चार मराठी सिनेमे दाखवण्यात आले. ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘बायोस्कोप’ या तीन सिनेमांचं स्क्रीनिंग करण्यात आलं. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमाचा प्रीमिअर झाला. एखाद्या मराठी सिनेमाचा प्रीमिअर करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. व्हेंटिलेटर या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्रा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर यांनी तो दिग्दर्शित केलाय. त्याचा प्रीमिअर मामिमध्ये दाखवणार हे कळल्यावर या सिनेमाच्या सीट्स बुक करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. प्रीमिअरच्या आदल्या दिवशी दुपारीच बुकिंग फुल झालं होतं. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमाच्या प्रीमिअरला इतकी गर्दी व्हावी ही मोठी गोष्ट आहे. मराठी टॉकीज या विभागातील प्रत्येक सिनेमानंतर सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत चर्चा झाली. खरंतर मराठी टॉकीज असा विभाग मामिमध्ये पहिल्यांदाच होत असल्यामुळे त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल याचा अंदाज येत नव्हता. पण मराठी सिनेमे ज्या प्रेक्षागृहात दाखवले जाणार होते त्याच्या बाहेर प्रेक्षकांची मोठी रांग होती. त्यांच्यात सिनेमांविषयी चर्चाही सुरू होती. ही चर्चा इतरवेळी आंतरराष्ट्रीय सिनेमांबद्दल ऐकायला मिळायची. हीच चर्चा सिनेमा संपल्यानंतर त्यांच्या संपूर्ण टीमसोबतही ऐकायला मिळाली.

‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमाने मराठी टॉकीजची सुरुवात झाली. एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाचा मराठी प्रेक्षकांसह अमराठी प्रेक्षकांनीही आनंद लुटला. गंमत म्हणजे प्रेक्षकांमध्ये अमराठी प्रेक्षकांची संख्या तुलनेने जास्त आढळली. सिनेमातल्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनाही प्रेक्षक मनमुराद दाद देत होता. सिनेमा थिएटरमध्ये बघितल्यावर खऱ्या अर्थाने सिनेमाला प्रतिसाद कसा आहे ते समजतं. कारण सिनेमात घडणाऱ्या गोष्टींना प्रेक्षक तिथल्या तिथे दाद देत असतो. असाच अनुभव ‘राजवाडे..’ बघताना येत होता. तरुणाईची भाषा, त्यांचं वागणं, बोलणं, पिढय़ांमधलं अंतर, त्यांचे विचार हे सगळं अनेकांना जवळचं वाटत होतं. प्रेक्षकांच्या या प्रतिसादाबद्दल अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘आत्तापर्यंत लाभलेल्या प्रेक्षकवर्गापैकी मामिमधला प्रेक्षकवर्ग खूप आवडला. सिनेमातल्या बारकाव्यांनाही तो प्रतिसाद देत होता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आवडली.’ तर अभिनेता अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘एकत्र कुटुंब पद्धत, पिढय़ा, विचार, मतं हे सगळंच अनेक मोठय़ा शहरांमधले महत्त्वाचे मुद्दे आहेत. अशा मुद्दय़ांवर आधारित बनललेला ‘राजवाडे..’ मामि फेस्टिवलमध्ये दाखवला हे मी महत्त्वाचं मानतो.’ तर लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर सिनेमाच्या विषयाबद्दल म्हणाले, ‘मला पुणे शहराबद्दल काही सांगायचं होतं. तिथल्या एकत्र कुटुंब पद्धतीविषयी, तिच्या रचनेविषयी सांगायचं होतं. सिनेमात जी कथा मांडली आहे ती अनेकांबाबत घडत असते. ती मांडायची होती. मी कथा लिहिताना माझ्या डोक्यात विशिष्ट कलाकारांची नावं डोकाऊ लागतात. त्यामुळे मला कधीच कास्टिंग डिरेक्टरची गरज भासत नाही. मी ज्या कलाकारांना ज्या व्यक्तिरेखेसाठी घेतलं आहे त्यांनी उत्तमच काम केलंय. या सिनेमातलेही सगळेच कलाकार चांगल्या दर्जाचं काम करतात. हे सगळं शक्य झालंय ते मराठी रंगभूमीमुळे. त्या रंगभूमीवरच असे कलाकार अभिनयात पक्के होत असतात.’ सिनेमात लाँगर शॉट्स जास्त का वापरले आहेत, असा एक प्रश्न प्रेक्षकांमधून आला आणि सचिन यांनी थोडक्यात पण अतिशय महत्त्वाचं उत्तर दिलं. ‘सिनेमाच्या संहितेनुसार लोकेशन शोधायला गेल्यावरच नेमक्या कोणत्या जागी शूट करायचं हे ठरतं. त्यामुळे कुठे शूट करायचं हे तुम्ही आधीच ठरवू शकत नाही. त्यामुळेच लाँग शॉट की क्लोज शॉट हेही आधीच सांगता येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया ‘प्लॅनिंग अ‍ॅण्ड एक्झिक्युशन’ अशी नसून ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड एक्सपिरिअन्स’ अशी आहे’. सिनेमाचं कास्टिंग उत्तम आहे, सिनेमा कसा असेल माहीत नव्हतं. भाषा समजत नाही तरी सिनेमाला आलो होतो. पण, सिनेमा सुरू झाला आणि त्यातल्या व्यक्तिरेखांशी मी जोडला गेलो, अशी एक प्रतिक्रिया प्रेक्षकांमधूनही

आली.

‘वक्रतुंड महाकाय’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा मामि फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांना आवडला. दहशतवाद हा आपल्या देशाला भेडसावणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न. याविषयीचे अनेक सिनेमे, लेख, नाटकं येत असतात. प्रत्येकाच्या कथा, विषय वेगळे असतील पण धागा एक असतो. हाच धागा पकडत दिग्दर्शक पुनर्वसू नाईक ‘वक्रतुंड महाकाय’ हा सिनेमा घेऊन आले. एका गणपतीच्या मूर्तीमध्ये बॉम्ब असतो. आणि ती मूर्ती शहरभर एकाकडून दुसऱ्याकडे, मग तिसऱ्याकडे फिरत असते. असा हा त्या मूर्तीचा प्रवास या सिनेमात आहे. दोन वर्षांपूर्वी ‘वक्रतुंड महाकाय’ या सिनेमाची अनसेन्सॉर्ड प्रिंट मामिमध्ये दाखवली गेली होती. पण, यावर्षी सेन्सॉरने सुचवलेल्या काही बदलांसह या सिनेमाचं पुन्हा एकदा स्क्रीनिंग झालं. ‘आधी या सिनेमाचा शेवट वेगळा होता. शेवटी ब्लास्ट होतो आणि तो लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीला मिठी मारत पाण्याखाली असतो. ब्लास्ट झाल्यामुळे तो मुलगा मरतो. खरा असा शेवट होता. पण तो सेन्सॉर बोर्डाने बदलायला सांगितला. अहिंसेचं तत्त्व पाळत हा बदल करायला सांगितला होता. म्हणून चित्रपट प्रदर्शित होत असताना तो सीन काढून टाकण्यात आला’, असं दिग्दर्शक पुनर्वसू यांनी सांगितले.

मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच ‘बायोस्कोप’ या सिनेमासारखा प्रयोग केला होता. या आधी हा सिनेमा विविध फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आहे. चार कवी, चार कविता, चार दिग्दर्शक, चार लघुपट अशी संकल्पना घेऊन बायोस्कोप तयार झाला. या प्रायोगिक सिनेमासाठीही मामि फेस्टिवलमध्ये गर्दी झाली होती. खरंतर मराठी टॉकीज आणि सिनेमाचं नाव बायोस्कोप हे समीकरण काहींना जरा गोंधळात टाकणारं होतं. काही जण उत्सुकतेमुळे हा सिनेमा बघण्यासाठी आले होते. पण सिनेमा बघून झाल्यानंतर प्रेक्षकांना समाधान मिळाल्याचं दिसून येतं होतं. बायस्कोपमधील ‘मित्रा’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लघुपटाचे दिग्दर्शक रवि जाधव प्रेक्षकांसाठी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते. प्रेक्षकांमध्ये काहीजण लघुपटप्रेमी, काहीजण तांत्रिक गोष्टी शिकणारे असे होते. मित्रा हा लघुपट ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट करण्याविषयी रवि म्हणाले, ‘मित्रा हा लघुपट विजय तेंडुलकर यांची एक कथा आणि संदीप खरे यांची एक कविता यांचं मिश्रण आहे. लघुपटात खूप आधीचा काळ दाखवायचा होता. म्हणून ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटचा पर्याय निवडला. सध्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट शेडचा बराच वापर होताना दिसतो. ही चांगली गोष्ट आहे. पण, त्याची खरी गंमत श्ॉडो म्हणजे सावली दाखवण्यामध्ये आहे. ते त्याचं अचूक तंत्र आहे. हाच विचार मित्रामध्ये सतत केला गेला.’ हे सांगत असताना तुमच्याकडे आहे त्या साहित्याने लघुपट चित्रित करा, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचवा असाही सल्ला त्यांनी दिला. थ्रीडी, फोरडीचं तंत्रज्ञान हवं म्हणून तुम्ही एक वर्ष थांबून राहिलात तर स्पर्धेत आणखी दहा हजार जणांची वाढ होते, हे लक्षात घ्या. ‘बायोस्कोप’मध्ये ज्येष्ठ लेखक-कवी गुलजार यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांच्याविषयीचा अनुभवही त्यांनी प्रेक्षकांशी शेअर केला. व्यावसायिक सिनेमा आणि प्रायोगिक सिनेमा असे दोन प्रकार असले तरी कोणत्याही सिनेमाला नावं न ठेवता दोन्हीचा आनंद घ्यायला हवं असं ते म्हणाले. ‘व्यावसायिक सिनेमे बघणाऱ्यांनी प्रायोगिकमध्ये असं काय आहे या विचाराने ते सिनेमे बघावे. आणि प्रायोगिक सिनेमाप्रेमींनी व्यावसायिकमध्ये असं काय आहे म्हणून व्यावसायिक सिनेमे बघावे. दोन्हीचं जंक्शन शोधणं आपलं काम आहे. ‘लगान’, ‘थ्री इडियट्स’ हे सिनेमांचे जंक्शन होते. म्हणजे या सिनेमांनी व्यवसायही केला आणि ते प्रायोगिक पातळीवरचेही होते’, असं त्यांनी सांगितलं.

मराठी टॉकीज या विभागातील सर्वच सिनेमांना, चर्चासत्रांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सिनेमा दाखवून झाल्यानंतर त्याच्या टीमसोबत होत असलेली चर्चा दरवेळी रंगत होती. अमराठी प्रेक्षकांच्या मनात मराठी सिनेमांविषयीचं प्रेम, कुतूहल, उत्सुकता त्यांच्या प्रश्नांतून, प्रतिक्रियेतून दिसून येत होतं. मराठी सिनेमांना दिलखुलास दाद देत प्रेक्षकांनी मराठी टॉकीज या विभागाचं मनापासून स्वागत केलं.

First Published on November 11, 2016 4:52 am

Web Title: marathi talkies
Next Stories
1 महोत्सव : यंदाही शॉर्टफिल्म्सची बाजी
2 कलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.!
3 फॅण्ड्रीनंतर सैराट…
X
Just Now!
X