29 March 2020

News Flash

कलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.!

असे काही कलाकार आहेत जे एकटाच्या जिवावर सिनेमा लढवताना फारसे दिसले नाहीत.

संपूर्ण सिनेमा आपल्याच नावावर चालावा, असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न. पण, काहींना अनेक कलाकारांच्या गर्दीतच सिनेमा करण्यात धन्यता वाटते. या कलाकारांपैकी काहीं उत्तम अभिनेते असतात, काही त्या टोळीतच बरे वाटतात तर काही गर्दीतसुद्धा त्यांच्या अभिनयाची कमाल दाखवतात.

हिंदी सिनेमांमध्ये अभिनेता-अभिनेत्रींची संख्या खूप आहे. सध्या तर तिथे खूपच गर्दी झाली आहे. याचा मुलगा, तिचा भाऊ, तिची बहीण असे कलाकारांचे कुटुंबीय हिंदी सिनेसृष्टीत येऊ पाहताहेत. त्यातही स्टार किडचा तर चांगलाच बोलबाला असतो. असे अनेक येतात त्यातला एखादाच चमकतो. पण, ही नवी मंडळी मागे हटत नाहीत. सिनेमे करीत राहतात. तेही एकटय़ाच्या जिवावर. फ्लॉप तर फ्लॉप! पण, असे काही कलाकार आहेत जे एकटाच्या जिवावर सिनेमा लढवताना फारसे दिसले नाहीत. ते येतात एखाद्या टोळीसोबतच. म्हणजे मल्टिस्टारर सिनेमांमधून ते दिसतात. मग त्यात असलेल्या तीन-चार हिरोंमध्ये त्यांचा एक चेहरा असतो. सिनेमा त्यांच्या चेहऱ्यावर चालेलच असं नाही पण, सिनेमा कधी कधी चालतो तर कधी कधी आपटतो. ते कलाकार मात्र लक्षात राहतात.

आगामी ‘ढिशूम’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सगळ्यात शेवटी एंट्री होते ती अक्षय खन्नाची. चकचकीत, भव्यता, अ‍ॅक्शन, ड्रामा असं सगळं असलेला हा ट्रेलर शेवटी येणाऱ्या अक्षय खन्नाकडे लक्ष वेधून घेतो. अहा.. अक्षय खन्ना हॅण्डसम वगैरे म्हणून नाही. पण तो काही वर्षांनी सिनेमात दिसतोय म्हणून. त्याला बघून प्रेक्षक फ्लॅशबॅकमध्ये जातो. त्याचे सिनेमे आठवू लागतो. ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘रेस टू’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘थर्टी सिक्स चायवा टाऊन’ अशा सिनेमांची नाव येतात. पण पुन्हा एकदा या सिनेमांवर नजर टाकली तर लक्षात येईल यात तो एकटाच हिरो असं नव्हतचं. त्याच्यासोबत होती अनेक कलाकारांची झुंबड. त्याच्यासोबत असलेले कलाकार प्रस्थापित आणि लोकप्रिय असे होते. तसंच या सिनेमांमधलं अक्षय खन्नाचं काम बरं झालं होतं. या सिनेमांमधल्या त्याच्या भूमिका वेगवेगळ्या छटांच्या होत्या. त्या त्या वेळी त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं असलं तरी हा हिरो सिनेमात खऱ्या अर्थाने हिरो असा कमीच दिसला. ‘ताल’, ‘डोली सजा के रखना’ या दोन सिनेमांत मात्र तो चमकला. पण, हे सिनेमे त्याच्या करिअरच्या अगदी सुरुवातीचे होते.

एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा मुलगाही लोकप्रियच होईल असं ठामपणे मांडणं खरं तर चुकीचंच आहे. पण, हे असं आजही बोललं जातं. जितेंद्र त्या काळचा लोकप्रिय नायक. त्याचा मुलगा तुषार कपूर. आता तुषारनेही लोकप्रिय व्हावं असा अट्टहास असू नये. तसा नव्हताही. त्याने त्याच्या परीने एकटय़ाचे म्हणजे सोलो हिरो असलेले सिनेमे केले. पण ते ‘मुझे कुछ कहना है’, ‘जिना सिर्फ मेरे लिए’, ‘गायब’ वगैरे सरधोपट प्रकारचे. पुढे ‘गोलमाल’मधल्या त्याच्या मूकअभिनयामुळे तो जरा प्रकाशझोतात आला. अधेमधे त्याने ‘शोर इन द सिटी’, ‘खाकी’ अशा काही सिनेमांमध्ये काम केले पण, ते फारसे जमून आले नाहीत. ‘द डर्टी पिक्चर’ हा सिनेमा यशस्वी ठरला. त्याचं कामंही त्यात चांगलं झालं. पण, त्यात त्याच्यासोबत विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, इम्रान हाश्मी हे कलाकार होते, हे विसरून चालणार नाही. पुढे त्याने त्याच्या ‘गोलमाल’, ‘क्या कूल है हम’ या लोकप्रिय सिनेमांची सीरिज करण्यातच धन्यता मानली. असंच काहीसं झालं ते आफताब शिवदासानी याचं. बालकलाकार म्हणून याने ‘मिस्टर इंडिया’, ‘शहेनशहा’, ‘चालबाज’, ‘अव्वल नंबर’, ‘सीआयडी’ अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘मस्त’ या सिनेमातून त्याने नायक म्हणून सिनेसृष्टीत त्याने पदार्पण केलं. त्यासाठी त्याला सवरेत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. पुढे ‘कसूर’ या सिनेमासाठी खलनायकाच्या भूमिकेसाठीही त्याला पुरस्कार मिळाला आहे. बालकलाकार म्हणून केलेले लोकप्रिय सिनेमे, पुरस्कार एवढं सगळं आफताबच्या नावे असूनही नंतर मात्र त्याच्या करिअरची गाडी घसरली. ती अजूनही रुळावर येईना. बालकलाकार म्हणूनच कुणाल खेमू या अभिनेत्याचीही करिअरची सुरुवात झाली होती. ‘हम है राही प्यार के’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुडवा’, ‘जख्म’, ‘दुश्मन’ अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये कुणालने काम केलंय. या सिनेमांमधला कुणाल जेवढा लक्षात आहे तेवढा मोठा झाल्यावर नायक म्हणून आलेल्या सिनेमांमध्ये नाही. ‘कलयुग’मधून नायक म्हणून त्याने पदार्पण केलं पण त्यानंतर तो मल्टिस्टारर सिनेमांमध्ये दिसला. ते सिनेमेही फार चालले नाहीत.

कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यासारखा लोकप्रिय होईलच असं नाही, तसंच कलाकारांची भावंडं त्यांच्यासारखी हुशार असतील असंही नाही. याची अनेक उदाहरणं आहे. सिनेसृष्टीत नाव कमावलेल्या अनेक कलाकारांच्या भावंडांनीही या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली पण, ते आले आणि गेलेही. यामध्ये उदय चोप्रा हे नाव प्रामुख्याने घेता येईल. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा. पण हिंदी सिनेमांमध्ये फारसा चमकला नाही. त्याने करिअरची सुरुवात साहाय्यक दिग्दर्शकापासून केली. ‘मोहब्बते’मधून अभिनेता म्हणून पदार्पण केल्यानंतर त्याने काही सिनेमे केले खरे; पण ते का केले असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. पण असो, ‘धूम’ या सिनेमाने आणि त्याच्या पुढच्या दोन भागांनी त्याला तो कलाकार आहे असं म्हणवून घेण्याची संधी दिली. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ हा अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा या आजच्या आघाडीच्या स्टार्ससाठी महत्त्वाचा सिनेमा ठरला. या सिनेमाचं उदयने स्क्रीन रायटिंग केलं होतं. ‘ग्रेस ऑफ मोनॅको’ आणि ‘द लाँगेस्ट वीकेण्ड’ या दोन हॉलीवूडपटांच्या निर्मात्यांपैकी तो एक होता. हे सगळं बघता त्याने लेखक आणि निर्माता अशा दोन भूमिकाच कराव्यात असं वाटू लागतं.

खरं तर अशा टोळीसोबत काम करणाऱ्या कलाकारांच्या वाटय़ाला चांगले सिनेमेही येतात. त्या सिनेमांची चर्चाही होते. त्यांच्या कामाबद्दलही बोललं जातं. पण, त्यात असलेल्या इतर कलाकारांमुळे काही कलाकार दबले जातात. अक्षय खन्नाने ‘दिल चाहता है’, ‘हमराज’, ‘रेस’ अशा सिनेमांमध्ये चांगलं काम केलंय. पण, त्यात असलेल्या आमिर खान, अनिल कपूर अशा बडय़ा कलाकारांमुळे ते थोडे एक पाऊल मागे थांबतात. अर्थात असं सगळ्याच कलाकारांसोबत होतं असंही नाही. काही कलाकारांच्या सोबतीला तगडे कलाकार असले तरी त्यांच्या अभिनयात मात्र काहीच दम नसतो. उदय चोप्रा हे नाव त्यात घ्यावचं लागेल. एखादी गोष्ट कधी कधी फिलर म्हणून वापरावी लागते तसा उदय चोप्रा काही सिनेमांमध्ये आहे असं वाटू लागतं. बॉबी देओलने ‘बरसात’ या त्याच्या पहिल्या सिनेमासाठी पदार्पणाचा पुरस्कार पटकावला. मात्र त्यानंतर त्याच्या करिअरची घडी काहीशी विस्कटली. काही अपवाद वगळता त्याने केलेले सिनेमे यशस्वी ठरले नाहीत. एकीकडे सनी देओलने सिनेसष्टीत इतकं नाव कमावलं होतं तर दुसरीकडे बॉबीचं करिअर चांगल्या वेगाने सुरू होऊन नंतर मंदावलं.

या कलाकारांपैकी काही कलाकारांच्या ठरावीक सिनेमांमधल्या व्यक्तिरेखा लक्षात राहिल्या. त्या कलाकारांचा अभिनय उत्तम असल्यामुळे त्यांचं कौतुक झालं. तसंच त्यांच्या व्यक्तिरेखा आजही आठवतात. म्हणूनच प्रेक्षकांना सर्किट अजूनही लक्षात आहे. तर अभय देओलचा ‘जिंदगी ना मिलेगा दोबारा’मधला शांत कबीर प्रेक्षकांना आवडला. अभय देओल हा खरं तर चांगला अभिनय करतो. पण, तो त्याच्या अभिनयाचं कसब अनेकदा मल्टिस्टारर सिनेमांमध्येच दाखवू शकला आहे. तर बॉबी देओलचा ‘हमराज’मधला लुक आणि अ‍ॅटिटय़ूड हे दोन्ही लक्षात आहेत. अक्षय खन्नाच्या तर जवळपास प्रत्येक सिनेमातल्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. मग तो ‘दिल चाहता है’मधला शांत सिद्धार्थ असो, ‘हंगामा’मधला प्रियकर असो किंवा ‘रेस’मधला भावाशीच राजकारण खेळणारा धूर्त भाऊ असो; त्याच्या व्यक्तिरेखा लक्षात राहिल्या आहेत.

अभय देओलच्या रांगेत आणखी दोन नावं घेता येतील. एक म्हणजे रितेश देशमुख आणि दुसरं शर्मन जोशी. रितेश देशमुखची सुरुवात ‘तुझे मेरी कसम’ या सरधोपट सिनेमाने झाली. सिनेमा येण्याआधी गवगवा झाला पण यशस्वी ठरला नाही. रितेश हळूहळू हिंदी सिनेसृष्टीत स्थिरावला. ‘मस्ती’ हा सिनेमा त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर त्याचे एकेक सिनेमे येत गेले. त्यात काही मल्टिस्टाररही होते. त्याच्या करिअरचा खरा टर्निग पॉइंट ठरला ‘एक व्हिलन’ हा सिनेमा. यात दुसरा अभिनेता असूनही रितेश भाव खाऊन गेला. आताही त्याचे तद्दन मल्टिस्टारर सिनेमे करणं सुरूच आहे. ‘हाऊसफुल थ्री’ त्याचंच एक उदाहरण. दोन वर्षांपूर्वी त्याचे एकापाठोपाठ एक असे तीन सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘हमशकल्स’, ‘एक व्हिलन’ हे हिंदी तर ‘लय भारी’ हा मराठी सिनेमा. या तिन्ही सिनेमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत त्याने त्याच्या अभिनयाची कुवत प्रेक्षकांना दाखवली आहे. ‘बँजो’ या आगामी हिंदी सिनेमातून तो एकटाच हिरो असणार आहे. त्यामुळे त्या सिनेमाबाबत उत्सुकता आहे.

कलाकारांच्या टोळीत काम करणारे काही जण प्रेक्षकांची तसंच सिनेसृष्टीतील जाणकारांची शाबासकीही मिळवताना दिसतात. ते गर्दीतून येतात पण त्यांचं काम चोख करतात. यामध्ये दोन नावं प्रामुख्याने घ्यावी लागतील. शर्मन जोशी आणि अर्शद वारसी. अर्शद वारसीची ओळख आजही सर्किट अशीच आहे. त्याचं मुन्नाभाईला ‘भाय, हा भाय’ असं टपोरी लहेजात बोलणं लोकप्रिय झालं होतं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘हलचल’, ‘इश्किया’ अशा मल्टिस्टारर सिनेमांमध्ये अर्शद झळकला आणि त्याच्या भूमिकांसाठी त्याने पुरस्कारही पटकावले. शर्मन जोशीचंही तसंच काहीसं आहे. ‘रंग दे बसंती’ मध्ये आमिर खान, अतुल कुलकर्णी असे बडे कलाकार असले तरी शर्मनचा सुखी प्रेक्षकांना भावला. ‘लाइफ इन अ मेट्रो’मध्ये तर कलाकारांची गर्दीच होती. तरी त्यातही त्याने उत्तम काम केलं. ‘थ्री इडियट्स’ आणि ‘गोलमाल’साठी त्याला पुरस्कार मिळाला.

थोडक्यात काय तर, सिनेमाचं संपूर्ण मैदान मोकळं मिळत असूनही काहींना दम के बॅटिंग करता येत नाही. तर काही जण मैदानात अनेक मुरलेले खेळाडू असले तरी त्यावर मात करीत योग्य प्रकारे खेळ खेळतात. काही कलाकारांची एकटय़ाने सिनेमाची खिंड लढवताना दमछाक होते. पण, त्यातलेच काही कलाकार आता पुढचं पाऊल उचलत आहेत. आता काही कलाकार सिनेमात एकच हिरो असलेले प्रोजेक्ट्स घेऊ लागले आहेत. कलाकारांमध्ये अभिनयकौशल्य असलं तर त्यांचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो; किमान त्या कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होतं. पण कलाकारातच दम नसेल तर त्याच्यासाठी ‘बॅक टू टोळी’ असंच म्हणावं लागेल!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2016 1:19 am

Web Title: multi starrer
Next Stories
1 फॅण्ड्रीनंतर सैराट…
2 फेस्टिव्हलमध्ये महिलाराज…
3 इंडस्ट्री फक्त १५ टक्क्यांची
Just Now!
X