29 February 2020

News Flash

नटसम्राटाला चित्रपटाचे ‘घर’

सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण...

सुप्रसिद्ध नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचं ‘नटसम्राट’ हे नाटक म्हणजे मराठी माणसाचा जीव की प्राण.. मराठी प्रेक्षकांचे अप्पा बेलवलकर आता त्यांना सिनेमाच्या पडद्यावर भेटायला येत आहेत..

काही कलाकृतीच अशा असतात, की त्यांच्या नावातच एक अनोखी अनुभूती असते. ‘नटसम्राट’ हे वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं मराठी रंगभूमीवरचे अद्भुत नाटक त्यापैकीच एक. या अद्भुताला अजरामर केलं ते डॉ. श्रीराम लागू यांनी, पण या अद्भुताची मोहिनी इतकी जबरदस्त की, प्रत्येक कलाकाराला एकदा तरी ते साकारावेसे वाटते. दत्ता भट, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी अशा अनेक दिग्गजांनी नटसम्राट साकारला. नवीन प्रयोग केले. काही चालले, काही विस्मृतीत गेले, पण नटसम्राट मात्र दंशागुळे उरून राहिला. कारण त्याचं कालातीत कथानक. प्रसिद्धीच्या मानाच्या शिखरावरचा तो परमवैभवाचा सर्वोच्च क्षण ते उतारवयातील उपेक्षा अशा प्रत्येक कलाकाराच्या मनातील अव्यक्त भावनांना हात घालणारं आणि त्याच वेळी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आयुष्यालादेखील सादवणारं हे कथानक. वेगवेगळ्या संचांत आणि सादरीकरणातील प्रयोगातून रंगमंचावर आले असले तरी रुपेरी पडद्यापासून लांब होते. तेच आता महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाखाली रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘कुणी घर देता का घर..’ हे प्रसिद्ध स्वगत आता नाना पाटेकर यांच्या दमदार खडय़ा आवाजात चित्रपटगृहात घुमणार असून, नटसम्राटाला चित्रपटाचं ‘घर’ लाभणार आहे.

तब्बल पाच वर्षे डोक्यात घोळणारा विषय महेश मांजरेकरांनी अखेरीस रुपेरी पडद्यावर उतरवला आहे. चित्रपट सुरुवातीला हिंदीत येणार अशीदेखील चर्चा होती. नाटकानेदेखील गुजराती, हिंदी, बंगाली असे प्रयोग पाहिले आहेत, पण अखेरीस ‘नटसम्राट’ त्याच्या मूळ भाषेत म्हणजेच मराठीतच पडद्यावर येत आहे.

वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपल्या संपूर्ण कारकीर्दीकडे काहीशा गर्वाने पाहणाऱ्या नायकाच्या पुढील टप्प्यावर घडणारे हे नाटय़ साकारण्याचं शिवधनुष्य नाना पाटेकर यांनी सांभाळलं आहे. पाटेकरांच्या आजवरच्या भूमिका, त्यांच्याभोवतीचं वलय, अनेक भूमिकांशी तादात्म्य पावणारा त्यांचा सुप्रसिद्ध तिरसट-तापट स्वभाव आणि त्यातून तयार झालेली त्यांची इमेज यामध्ये नटसम्राट अगदी परफेक्ट सूट होतोय असं ट्रेलरवरून प्रकर्षांने जाणवत आहे. कथानकातील कलाकारामध्ये असणारे सारे गुण त्यांच्याकडे आहेत. आपल्या या भूमिकेबद्दल नाना कमालीचे उत्साही दिसतात. नटसम्राट हा अंगी भिनल्याप्रमाणेच ते सर्वत्र वावरताना दिसतात. रंगभूमीवर पुरता मुरलेल्या पाटेकरांना ही भूमिका म्हणजे एक प्रकारे आव्हान आणि त्याच वेळी सुवर्णसंधी म्हणावी लागेल.

नाटकाचा मर्यादित पट आणि चित्रपटाचा अमर्याद अवकाश ह्य़ामुळे मूळ नाटकाची तुलना या माध्यमांतरात करावी की न करावी, असा एक वाद नेहमीप्रमाणे येथेदेखील होण्याचा संभव आहे, पण चित्रपट करताना काही बदल करावे लागतात. दृश्य माध्यमामुळे अनेक संवाद कमी होतात आणि कथेतलं नाटय़ उभारण्यासाठी अनेक इतर घटकांचा आधारदेखील घ्यावा लागतो. असे अनेक प्रसंग ट्रेलरमधून जाणवतात. याच अनुषंगाने चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर सांगतात की, त्यांनी फार पूर्वी कधी तरी नाटक पाहिले होते. त्यामुळे नाटकाच्या म्हणून अशा ठरावीक प्रतिमांमध्ये ते अडकले नव्हते. कलाकाराची ट्रॅजेडी नाटकातून उमटत होतीच, पण त्याचबरोबर त्याच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या बदलाचे मूळ म्हणजे हा कलाकार नाटक घरी घेऊन येतो. तो त्यातून बाहेरच पडत नाही. ही लाइन त्यांना चित्रपटासाठी महत्त्वाची वाटली आणि त्यातून मग आजूबाजूच्या पात्रांचीदेखील बाजू मांडणं शक्य झालं आहे.

चित्रपटासाठी करण्यात आलेल्या बदलात एक महत्त्वाची नोंद घ्यावी लागेल ती म्हणजे अप्पासाहेब बेलवकरांचा मित्र हे पात्र नव्याने आलं आहे. महेश मांजरेकर सांगतात, ‘‘प्रत्येक कलाकाराचा असा एक मित्र असतोच. तो त्याच्याबरोबर अनेक चांगल्या-वाईट प्रसंगात असतो. त्याचबरोबर हे नातं ‘लव्ह अ‍ॅण्ड हेट’सारखं असतं. नाटकाची संहिता वारंवार वाचताना त्यांना दडलेलं पात्र जाणवलं.’’ या नव्या पात्रामुळे विक्रम गोखले हे या चित्रपटात दिसणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विक्रम गोखले आणि नाना पाटेकर दोघांचीही नाळ ही रंगभूमीशी जुळलेली असल्यामुळे नटसम्राटाची उंची, प्रतिष्ठा याची त्यांना जाण आहे. त्यातही दोघेही विजयाबाईंच्या तालमीत तयार झालेले. अर्थातच एक अनोखी जुगलबंदी यानिमित्ताने पाहायला मिळेल असे वाटते.

अप्पासाहेब बेलवलकरांच्या बरोबरच महत्त्वाचे असे नाटकातील पात्र म्हणजे त्यांची पत्नी कावेरी. ही भूमिका मेधा मांजरेकर साकारत आहेत. नाना पाटेकरांनीच या भूमिकेचं खूप कौतुक केलं आहे. याबद्दल ते सांगतात, ‘‘मेधा काही कसलेली कलाकार नाही, पण तिचे बोलके डोळे खूप काही सांगून जातात.’’ चित्रपट माध्यमाचा हा फायदा नक्कीच म्हणावा लागेल.

नाटकाला जशा भिंतीच्या मर्यादा असतात, तसे चित्रपटात होत नाही. किंबहुना अनेक प्रसंगांत कल्पनाशक्तीचा जास्तीत जास्त वापर करून ती साकारण्याची संधी असते. ‘नटसम्राट’ चित्रपटात ही संधी दिग्दर्शकांनी व्यवस्थित वापरली असल्याचे ट्रेलरवरून जाणवते. काही महत्त्वाची स्वगतं आणि प्रसंगांसाठी एक उद्ध्वस्त थिएटर वापरण्यात आलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णपणे सेट आहे. असाच एक प्रसंग आहे तो रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या पुलाखालचा. हादेखील सेटच आहे. एकनाथ कदम या कल्पक सेट डिझायनरने ही किमया केली आहे. कथानकाला पुरेपूर न्याय देण्यासाठी केलेल्या या खटाटोपामुळे या चित्रपटाचे बजेट सहा कोटींच्या आसपास गेले असल्याचे समजते. अर्थातच मराठीतील सध्याच्या चित्रपटांच्या तुलनेने हे खूपच जास्त आहे आणि असे पाठबळ मराठीला यानिमित्ताने लाभणं याची विशेष नोंद यानिमित्ताने घ्यावी लागेल.

नाटक आणि चित्रपट ही दोन्ही भिन्न माध्यमे आहेत किंबहुना दोघांची जातकुळी वेगळी आहे. त्यामुळे हे माध्यमांतर करताना मूळ गाभ्याला धक्का न लावता चित्रपटाचा म्हणून एक नवा आशय साधावा लागतो आणि हे काम पटकथा-संवाद लेखकाचं असतं. ही पडद्यामागची सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली आहे ती अभिजित देशपांडे आणि किरण यज्ञोपवीत यांनी. अभिजित देशपांडे यांनी पटकथा हिंदीत लिहिली होती. नंतर किरण यज्ञोपवीत यांनी त्याआधारे नव्याने मराठीत पटकथा लेखन केलं आहे.

यज्ञोपवीत याबद्दल सांगतात की, अशा प्रतिष्ठित प्रभावी कलाकृतीचे माध्यमांतर करताना प्रचंड मोठी जबाबदारी असते. त्या कलाकृतीचे जे मापदंड असतात त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाटकातील स्वगतं हे त्याचा प्राण आहेत, किंबहुना बहुसंख्य प्रेक्षकांना ती पाठदेखील असतात. त्यामुळे महत्त्वाची स्वगतं तशीच ठेवण्यात आली आहेत. चित्रपटाच्या दृष्टीने दिग्दर्शकाने एक जो वेगळा दृष्टिकोन ठेवला होता त्याआधारे पटकथेची मांडणी केली आहे. चित्रपटात ही केवळ एका वृद्धाची शोकांतिका म्हणून समोर येत नाही, तर एका कलाकाराची म्हणून येते. एखाद्या कलाकाराला हा सारा बदल होतानाची वेदनादायी प्रक्रिया शोधण्याचा, मांडण्याचा, त्याच्या जगण्यातून आलेला सर्व पट दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे.

तात्यासाहेबांचा नायक हा त्या काळानुसार होता. चित्रपटासाठी थोडे संदर्भ अलीकडचे वापरले आहेत. नव्या पिढीच्या नाटकांचे प्रतिनिधित्व करणारा असा नटसम्राट उभा करणं हे माझं काम होतं, असं ते सांगतात. नाटकाचे भाषासौंदर्य आणि बांधणीबरोबरच त्यामागे असणारी काव्यात्मकता मांडायचा प्रयत्न यातून दिसून येतो. चित्रपटातला नटसम्राट हा तात्यासाहेबांच्या नटसम्राटाप्रमाणे व्रतस्थ, तटस्थ नाही. तो थोडा अधिक व्हलरेबल आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून ते जाणवतं.

खरे तर नाना पाटेकर आणि महेश मांजरेकर एकत्र म्हटल्यावर हे दोघे भांडत बसतील आणि हा चित्रपट होणारच नाही, असं इंडस्ट्रीतल्या अनेकांना वाटत होतं. हा असा चित्रपट की, ज्यामध्ये मला दिग्दर्शकाला काही सांगायला लागलं नाही असे पाटेकरांनीच खुलेपणाने सांगितलं आहे. त्यावरूनच एकंदरीत या चित्रपटनिर्मितीबाबत उत्सुकता आहे. नटसम्राटाची मोहिनीच अशी की, ६५ दिवसांचं वेळापत्रक केवळ ३५ दिवसांत पूर्ण झालं. प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या नटसम्राटाच्या सोबतीनेच हे रुपेरी पडद्यावरचे नटसम्राटाचे घरदेखील लोकांच्या मनात घर करेल अशी आशा करायला हरकत नाही.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 11, 2015 1:28 am

Web Title: natsamrat
टॅग Cinema
Next Stories
1 भरजरी आणि भावना
2 ‘शोले’ची चाळिशी अन् राजाभाऊंचा थ्रीडी चष्मा
3 बजरंगीचे सतरंगी स्वप्न!
X
Just Now!
X