‘फॅन्ड्री’ या आपल्या पहिल्याच सिनेमातून लक्ष वेधून घेणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेचा दुसरा सिनेमा या महिनाअखेरीला येतो आहे, ‘सैराट’. या चित्रपटाच्या नायिकेला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

प्रदर्शनाआधीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटांमध्ये सध्या सैराटचं आणि अर्थातच नागराज मंजुळेचं नाव सध्या चर्चेत आहे. निर्मितीपासून असलेला झी स्टुडिओचा सहभाग, सोशल मीडियावरील प्रमोशन, विषयाचं नावीन्य, चित्रपटाचे जगावेगळं नाव आणि अर्थातच नागराजसारखा पठडीबाहेरचं काम करू पाहणारा दिग्दर्शक हे सैराटच्या उत्सुकतेमागचे कारण म्हणावे लागेल. हा चित्रपट नेमका काय आहे, कथानकाचा बाज कसा आहे आणि नागराजने त्यात नेमकं काय केलंय याबाबत अनेक तर्कवितर्क केले जाताना दिसतात. पण नेमकं कथासूत्र काय आहे यावर मात्र काहीसं मौनच आहे.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
kangana ranaut career movies
१६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…
Ellyse Perry Got Broken Car Glass as Gift from Tata
WPL 2024: एलिस पेरीला मिळालं षटकाराने कारची काच तोडल्याचं बक्षीस, फायनलपूर्ली दिलं खास गिफ्ट

या चित्रपटाच्या नायिकेला पदार्पणातील राष्ट्रीय पारितोषिक मिळाले असले तरीही चित्रपट आजवर देशातील कोणत्याही चित्रपट महोत्सवात दाखवलेला नाही. फॅन्ड्रीच्या वेळेस नेमकी उलट परिस्थिती होती. फॅन्ड्री अनेक महोत्सवात गाजत होता, पुरस्कार मिळत होते, नंतर तो बऱ्याच काळाने प्रदर्शित झाला. आज चित्रपट तयार आहे, एका कलाकाराला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे आणि बर्लिन महोत्सवात त्याला पुरस्कारदेखील मिळाला आहे; पण भारतात मात्र त्याच्या कथेबाबत कसलाही सुगावा लागू दिलेला नाही. नागराजचा चित्रपट म्हणजे काही तरी वेगळं पाहायला मिळणार, जे फारसं आजवर कोणी हाताळलं नसेल, काहीतरी भाष्य असणार आणि त्याचबरोबर चित्रपटीय भाषेचा योग्य तो वापर केलेला असणार अशी खात्री तर सर्वानाच आहे, पण गेल्या आठवडय़ात केवळ गाणीच रिलिज करण्यात आली आणि कथासूत्रावर म्हणावं तसं भाष्य झालं नाही.

आकाश ठोसर
दहावीपर्यंत माझं शिक्षण पुण्यातच झालं. माझ्या डोक्यात पैलवानकीचं वेड होतं. त्यामुळे अकरावीनंतर मी जेऊरला गेलो. तेथे आखाडा आणि कॉलेज दोन्ही सुरू होतं. एकदा जेऊर स्टेशनवर बसलो असताना अण्णांचे (नागराज) भाऊ आले. त्यांच्याशी अगदी सहज मित्राप्रमाणे गप्पा मारल्या. मला माहीत नव्हते नागराज मंजुळेचे भाऊ आहेत ते. त्यांनी एक फोटो घेतला, मला वाटलं काही तरी छोटामोठा रोल मिळेल करायला. अण्णांनी पुण्याला ऑडिशनला बोलावले म्हणून गेलो. माझ्यासाठी ते सारंच नवीन होतं. आजवर कधी शाळेच्या गॅदरिंगमध्येदेखील स्टेजवर गेलो नव्हतो. गेल्या गेल्या अण्णांनी मला तेथे कुस्तीच करून दाखवायला लावली. वातावरण मोकळं झाल्यावर डायलॉग म्हणायला दिले. अ‍ॅक्टिंग काही मला जमत नव्हती. पण माझी निवड झाली. अभिनयाचं म्हणाल तर अण्णांनीच सारी तयारी करून घेतली.
मी असा पैलवानकीतून थेट हिरोगिरी करेन असे कोणालाच वाटले नव्हते. पण चित्रीकरणाचा संपूर्ण काळ धम्माल होती. सेटवर आमची टिम सॉलिड दंगा करायचो. बाळ्या आणि सल्या हे चित्रपटातील माझे मित्र आता अगदी घनिष्ठ मित्र झाले आहेत.
एक मात्र सांगावे लागेल, पूर्वी प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहायचो, पण आता पडद्यामागची माणसं कळली. कोण किती, कसं काम करते ते जाणवलं. चित्रपटाचे ग्लॅमरदेखील जाणवतंय, पण अण्णा पाठीशी आहेत, त्यामुळे हरवणार नाही.

त्यावरून साधारण कथेचा अंदाज येतो, नावीन्य जाणवते, नागराज टच जाणवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्केटिंगचा टच देखील प्रकर्षांने जाणवतो. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’मधला फरक लक्षात येतो. हा चित्रपट करमणूक प्रधानतेला वाव देणारा आहे का असे वाटू लागते. गाण्याचा अजिबात वापर न केला ‘फॅन्ड्री’ आणि चार गाणी तीदेखील एकदम फुल टू ऑर्केस्ट्रा असणारी हा बदल प्रकर्षांने जाणवतो. मार्केट शरणता आली आहे का असेदेखील वाटते. यावर नागराज सांगतो, ‘‘ही उत्कटपणे प्रेम करणाऱ्या तरुणांची गोष्ट आहे. प्रेम करणं किती अवघड असते हे ती दाखवते. ‘सैराट’ म्हणजे मुक्तपणा. ज्याला अडवता येत नाही असे. प्रेम असेच असते, हेच यातून दाखवायचं आहे. हा करमणूक प्रधान चित्रपट आहे, पण तो केवळ निर्मात्यांच्या पद्धतीने टिपिकल पद्धतीने मांडलेला नाही. सेन्सीबल गोष्टदेखील करमणुकीच्या अंगाने मांडता येते हे यातून आपणास जाणवेल.’’ नागराजच्या या वक्तव्याने केवळ करमणूक प्रधानतेला वाव नाही इतका दिलासा नक्कीच मिळतो.

नागराजची पठडीही थेटपणे भाष्य मांडणारी आहे. ‘फॅन्ड्री’ हा व्यवस्थेवर थेट भाष्य करणारा चित्रपट होता. त्यातून नागराजला जे काही सांगावंसं वाटत होतं ते त्याने थेट मांडलं होतं. अर्थातच ‘सैराट’कडूनदेखील हीच अपेक्षा आपल्याला असू शकते. त्याबाबत त्याला छेडलं असता तो म्हणतो की प्रत्येक कलाकृती ही सामाजिकच असते. स्वान्तसुखाय असं काही नसतं. स्वान्त सुखाय हे अर्धसत्य असतं. प्रत्येक ठिकाणी आपण समाजाला जोडलेलो असतो. अगदी एखाद्या खोलीत अडकून पडलेल्या माणसाची कथा जरी असेल तरी ती सामाजिकच असते. तो धागा येथे देखील आहे.’’

गाण्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगातून याची जाणीव होत राहते. ‘सैराट’च्या बाबतीत सांगायचे तर नागराजच्या चित्रपटाचं म्हणून जे वैशिष्टय़ जाणीवपूर्वक जाणवते ते म्हणजे नावीन्याची ओढ. नवीन लोकेशन आणि नवीन कलाकार हा पडद्यावर दिसणारच. लोकेशनचे नावीन्य ‘सैराट’मध्ये अगदी ठसठशीतपणे दिसतो. बॉलीवूड असो की मराठी इंडस्ट्री की अन्य कोणतीही, जेथे चित्रीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तेथेच जाण्यास प्राधान्य असते. अगदी मोजकेच दिग्दर्शक आडवाटेवर जातात. यातदेखील तेच दिसून येते. ‘सैराट’ पूर्णपणे करमाळा तालुक्यात चित्रित केला आहे. हा तसा मिश्रभाग आहे. दुष्काळी भागदेखील येथे आहे आणि उसाची संपन्नतादेखील. नागराजचं सारं बालपण करमाळ्यातच गेलं. तेव्हा जे पाहिलं जे त्याच्यात दडून बसलं होतं, ते त्याने बरोबर कॅमेऱ्यात उतरवल्याचे लक्षात येतं. अर्थातच अशा जागी गेल्यानंतर दळणवळणामुळे जी काही निर्मिती खर्चात वाढ होते ती झेलायची तयारी असणारा निर्माता असल्यामुळे हे शक्य झाल्याचे नागराज आवर्जून नमूद करतो.

रिंकू राजगुरू
शाळेत असताना अगदी छोटय़ा गटापासून गॅदरिंगमध्ये काम केलं होतं. पण चित्रपटात काम करण्याबद्दल कधीच विचार नव्हता आणि कधीच कॅमेऱ्यासमोर गेले नव्हते. एकदा नागराजदादाला भेटायला गेले होते, ऑडिशन झाली, पण चित्रपटात काम करण्याबद्दल कसलीच चर्चा नव्हती. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी तर खूपच घाबरायला झालं होतं. मला आधी वाटलं होतंकी दहाबारा माणसंच असतील आजूबाजूला, पण चित्रीकरणादरम्यानची गर्दी पाहून काहीसं दडपणंच आलं होतं. तसं नागराजदादानं भरपूर शिकवलं होतं, तयारी करून घेतली होती, पण इतक्या माणसांसमोर काही प्रसंग करताना खूपच ऑकवर्ड वाटत होतं. एखाद्या विनोदी प्रसंगी मज्जा वाटायची. पण काही प्रसंग करताना अवघडलेपणा येत होता. पण नंतर ठरवलंय, ही सगळी अ‍ॅक्टिंग आहे. दोन मिनिटांचा प्रसंग, हे काही खरं थोडीच आहे. मग एक चांगलाच आत्मविश्वास मिळाला आणि सगळेच प्रसंग सोप्पे झाले.
माझे आईवडील दोघेही शिक्षक असले तरी माझ्यातील हे सारे कलागुण असल्यामुळे त्यांनी मला कसलीच आडकाठी केली नाही. मिडियाची सुरुवातीला भीती वाटायची, पण आता सवय झाली. बुलेट आणि ट्रॅक्टर चालवणे, घोडय़ावर बसणे, विहिरीत उडी मारणं हे सारं माझ्यासाठी नवीन होतं. त्यामुळे थोडी भीती वाटली, पण नंतर सराव झाला.
सैराटचं चित्रीकरण आणि परीक्षा एकाच वेळी होती. शाळेनं नंतर परीक्षेला न बसण्याची सूट दिली, पण नंतर घेतलीच! वेळ मिळेल तसा अभ्यास करत होते, पण परीक्षेच्या दिवशी भरपूर रडारड केली. पण परीक्षा दिली. आज या कामामुळे ग्लॅमर मिळालं असलं तरी पुढे जाऊन मला डॉक्टर व्हायचं, पण चित्रपटातील कामं मिळाली तर तीदेखील करायची आहेत.

‘सैराट’चे चित्रीकरण तब्बल ८० दिवस सुरू होतं. आपल्याकडच्या एकंदरीत मराठी चित्रीकरणाची पठडीही तीस चाळीस दिवसांची आहे. पण येथे चित्रीकरणाला भरपूर वेळ दिला आहेच, पण त्याचबरोबर नवोदितांना तयार करण्यासाठी आधीदेखील बराच वेळ खर्ची घालावा लागला आहे. तरीदेखील नागराज म्हणतो की हे सारं वेगवानच आहे. त्याच्या मते वेळ काढत चित्रीकरण लांबवण्यात काहीच अर्थ नाही. तुमचं स्क्रिप्ट अचूक असेल तर मग तुम्ही ठरवल्याप्रमाणे वेगातदेखील काम करता येते.

दुसरं नावीन्य आहे ते नव्या चेहऱ्यांचे. ज्यांनी कधी कॅमेराच पाहिला नाही अशांना घेऊन चित्रपटकरणंही नागराजची खोडच (चांगल्या अर्थाने) म्हणावी लागेल. मात्र अशांना घेऊनच चित्रपट करण्यात एक मजा असते असे त्याला वाटते. मुळात दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं ते अशा वेळी अधिक प्रभावीपणे सांगता येते. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे यावर त्याचा अगदी ठाम विश्वास आहे. नवोदितांकडून काम करून घेताना, विशेषत: ते जर लहान असतील तर कधी कधी त्यांना आपल्याला जो भावार्थ हवा आहे तो कळणार नाही, पण अशा वेळी आपल्याला हवं ते काहीसं चलाखपणे त्यांच्याकडून काढून घ्यावं लागतं. नागराज सांगतो की माझ्या पात्रांकडून मला जे हवंय ते काढून घेणं मला आवडतं. अर्थात हे नेमकं बऱ्यापैकी जमलंय असं गाण्यांची झलक पाहून लक्षात येतंय.

पण ज्या गाण्यांमुळे हे सारं सध्या जाणवतंय त्या गाण्यांचं थोडं विश्लेषण करावं लागेल. नागराजच्या मते या चित्रपटांसाठी गाणी हवी होती. गाण्यांचे शब्द, संगीतातला ऱ्हिदम, हॉलीवूडला जाऊन केलेलं ध्वनिमुद्रण हे सारं जरी सध्या लोकप्रिय होतं असलं तर त्यात हॉलीवूडमधील ध्वनिमुद्रण सोडलं तर कसलंही नावीन्य नाही. गाणी लोकप्रिय होत असली तरी अजय-अतुल यांनी नेमकं या गाण्यातून नवीन काय केलं हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्यांच्या यापूर्वीच्या अनेक ट्रॅकचा प्रभाव वारंवार जाणवत राहतो. झिंगाट गाणं ऐकताना तर थेट ‘लल्लाटी भंडार..’ हे ‘जोगवा’तील गाणंच ऐकतोय की काय असे वाटते. असो बहुसंख्यांना गाणी आवडली आहेत. त्यातून प्रसिद्धी नक्कीच होतेय. त्यातून कथानकाला स्पर्श होतोय आणि चित्रपटात काहीतरी वेगळं असेल याची जाणीव होते.

नागराजचा चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळा शेवट असण्याची  अपेक्षा अनेकांना आहे. तो त्यावर फारसा बोलू इच्छित नाही. नागराजला वाटते की चित्रपटाआधी कथानकावर फार बोलू नये. आणि अर्थातच नंतरदेखील समीक्षेत कथानकावर भर असू नये. चित्रपटाची कथा सांगण्यापेक्षा इतर बाबींवर भाष्य असावं. चित्रपट येण्या आधी आणि नंतर अशा दोन समीक्षा असायला हव्यात असे त्याला वाटते.

आज जे दिसतंय त्यावरून ‘सैराट’कडून अपेक्षा आहे. ती किती सार्थ आहे हे २९ एप्रिललाच कळेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com