19 February 2020

News Flash

महोत्सव : यंदाही शॉर्टफिल्म्सची बाजी

फिल्मचा विषय, धाटणी, बाज वेगळा असल्यामुळे सगळ्याच फिल्म्स चांगल्या होत्या.

मामि फेस्टिवलमध्ये दर वर्षी आकर्षण असतं ते डायमेन्शन्स मुंबईचं; अर्थात शॉर्टफिल्म्सचं. मुंबई या विषयावर साधारण पाच ते सात मिनिटांची शॉर्टफिल्म बनवायची असते. पण, यंदा यात जरा वेगळेपण होतं. यंदा शॉर्टफिल्ममेकर्सना थीम दिली होती. थीम होती रुट्स म्हणजे मुळं. या थीमशी संबंधित अशा शॉर्टफिल्म्स बनवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. सगळ्यांनी ते आव्हान यशस्वीरीत्या पेललं असं म्हणावं लागेल. या विभागात सुरुवातीला कौशिक रॉय यांची ‘माला’ ही शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. कलकत्त्यातील माला ही चित्रपटप्रेमी. तिचं स्वप्नं फक्त एकच, सिनेमा बनवण्याचं. सिनेमे बघण्याचं. त्यासाठी खूप फिरायचं आणि सिनेमांचा अनुभव घेण्याचं. पण, तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलंय. काही दिवसांत तिचं लग्न आहे. पण, ती त्यासाठी फारशी आनंदी नाही. काही दिवसांवर लग्न आलेलं असतानाही ती घरच्यांना मुंबईला तिच्या दोन मैत्रिणींच्या लग्नाला जाण्याबद्दल विचारते. तिला मुंबईला जायचं असतं ते खरं तर मामि फिल्म फेस्टिव्हलसाठी. तिथे गेल्यावर ती एक वेगळं विश्व अनुभवते. तिला ती सापडते. तिला नेमकं काय करायचं तो मार्ग स्पष्ट दिसू लागतो आणि ती निर्णय घेते. ‘माला’ ही शॉर्ट फिल्म प्रेरणा देणारी ठरली. वेगळा विचार, संदेश, मांडणी या सगळ्याचा विचार करत डायमेन्शन्स मुंबई या विभागात ११ शॉर्टफिल्म्स दाखवल्या गेल्या. रुट्स आणि मुंबई या दोन गोष्टींचं भान ठेवत ‘अजीब दास्ताँ है ये’, ‘बॅच नंबर सेव्हंटी’, ‘हग्ज’, ‘माती’, ‘मीटर डाऊन’, ‘मुंबईज् महुआ. महुआज् मुंबई’, ‘बॉमबई’, ‘लँडलॉर्ड’, ‘टिकीट टू बॉलीवूड’, ‘पेडलिंग थ्रू द वेव्हज्’, ‘युअर्स लव्हिंगली’ या शॉर्टफिल्म्स डायमेन्शन्समध्ये दाखल झाल्या.

फिल्मचा विषय, धाटणी, बाज वेगळा असल्यामुळे सगळ्याच फिल्म्स चांगल्या होत्या. तरी विशेष उल्लेख करावा लागेल ते ‘मुंबईज् महुआ’, ‘बॉमबाई’, ‘टिकीट टू बॉलीवूड’, ‘अजीब दास्ताँ है ये’, ‘हग्ज’ या फिल्म्सचा. महुआ ही ट्रान्सजेंडर मुंबईत राहते. तिच्याकडे संवादकौशल्य आहे. तिची स्वप्नं अपुरी आहेत. तिच्या संवादकौशल्याने ती अनेकांचं लक्ष वेधून घेते. सगळ्यांना आशीर्वाद देते. तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी ती प्रयत्नशील आहे. चार मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये खरं तर नवीन काही नाही. तृतीयपंथीयांचा हा लढा गेली अनेक र्वष सुरूच आहे. पण, तरी या फिल्मच्या सादरीकरणामुळे ती लक्षवेधी ठरते. मुंबईशी अनेक घटक जोडले गेलेत. त्या घटकांची फक्त नावं उच्चारली तरी लगेच मुंबईची ओळख पटते. यात सगळ्यात लोकप्रिय घटक आहे लोकल ट्रेन. लोकल ट्रेनचा इतिहास, ती बनवण्याची प्रक्रिया, तिच्यात झालेले बदल, तिचं सततचं धावणं या सगळ्यावर आधी बोललं गेलंय, लिहिलं, वाचलंही गेलंय. पण, लोकल ट्रेनचं मनोगत कधी वाचलंय, ऐकलंय? नाही.. तर ‘बॉमबाई’ ही शॉर्टफिल्म यासाठी एकदम योग्य आहे. तिचा इतक्या वर्षांचा अनुभव, झपाटय़ाने बदलणाऱ्या मुंबईचा अनुभव, असंख्य लोकांचं रोजचं येणं-जाणं, तिच्या वाढलेल्या फेऱ्या, वाढलेले वेगवेगळे ट्रॅक्स असं साऱ्याविषयी ती बोलते. या फिल्ममध्ये मध्यवर्ती भूमिकेत लोकल ट्रेनच आहे. ती तिच्या भावना प्रेक्षकांशी शेअर करते. नव्या रचनेच्या लोकल ट्रेन्स बघून कधी ती ‘ये नये बच्चे भी कभी कभी मिलते है’ असं म्हणते. तर ‘मुझे सीएसटी स्टेशन बहुत पसंद है, क्युंकी हम सब वहापेही मिलते है’ असंही आवर्जून सांगते. वाशी स्टेशनला जाताना लागणाऱ्या मोठय़ा खाडीवर असणाऱ्या ब्रिजवरून जाताना लोकल ट्रेनला खूप आनंद होतो. ते सांगताना ‘मुझे वाशी रुट जाना अच्छा लगता है’ अशा आनंदी स्वरात ती सांगते. या फिल्मची सिनेमाटोग्राफी देखणी झाली आहे. इथे एखादी व्यक्ती पात्र म्हणून नसलं तरी लोकल ट्रेनला दिलेल्या आवाजामुळे आणि छायांकनामुळे फिल्म आकर्षक वाटते.

‘हग्ज’ ही शॉर्ट फिल्म मुंबईतल्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विनोदी अंगाने भाष्य करते. मुंबईतल्या जागेविषयी. वेगवेगळ्या शहरांतून हजारो जण मुंबईत येत असतात. नोकरीसाठी, शिक्षणासाठी मुंबईत आलेले एकेका खोलीत चार-पाच जण असे राहतात. मुंबईत राहण्याची त्यांची गरज भागली जाते. अशाच एका तीन रूम पार्टनर्सवर आधारित ही फिल्म. ‘मुंबईमें रहनेको जगह नहीं मिले तो भी चलेगा लेकीन हगनेके लिए चाहिए’ असं एक वाक्य फिल्ममध्ये आहे. या वाक्यावरून फिल्मचा विषय कळलाच असेल. तीन मित्र एकत्र एकाच खोलीत राहत असल्यामुळे त्याच्यामध्ये शौचालयाला आधी कोण जाणार याबद्दलचा वाद सुरू असतो. पण हा वाद फार गंभीरपणे न मांडता विनोदी शैलीत मांडलेला आहे. ‘अजीब दास्ताँ है ये’ ही मुंबईचा वेग लक्षात आणून देणारी फिल्म. सतत धावणाऱ्या या मुंबईच्या तालावर अनेक जण नाचतात. सकाळी उठायचं, आवरायचं, लोकल ट्रेनमध्ये धक्के खात ऑफिस गाठायचं असं चक्र सतत सुरू असतं. मुंबईच्या तालावर नाचावंच लागतं ते मुंबईत राहण्यासाठीच. पण, या सगळ्यात अनेक जण स्वत:ला हरवून बसतात. या धावपळीत स्वत:ला काय हवं हे विसरतात. ज्या वेगाने रोजच पळतात त्याच वेगाने स्वत:ला मागे सारत असतात. अशा वेळी समोर येतंय, दिसतंय, मिळतंय ते अनुभवायचं असं सरधोपट आयुष्य जगत असतात. असंच आयुष्य जगणाऱ्या एका माणसाची कहाणी यात आहे. त्याला त्याची बायको, मुलगा हवाय. त्याचं त्यांच्यावर प्रेमही आहे. त्याला बायकोकडून शारीरिक सुखही मिळतंय. तरी त्याच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. अशा माणसाची ‘अजीब दास्ताँ..’ ही कथा. गोल्डन गेटवे अ‍ॅवॉर्ड ‘मुंबईज् महुआ’ या फिल्मला मिळालं तर सिल्वर गेटवे अ‍ॅवॉर्ड ‘अजीब दास्ताँ है ये’ या फिल्मला मिळालं. ‘बॉमबाई’ या फिल्मला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.

विविध भावभावना शॉर्ट फिल्म्समधून मांडणाऱ्या तरुण मंडळींचा उत्साह दांडगा होता. शॉर्टफिल्म्ससाठी लागणारं बजेट, लोकेशन्स अशा सगळ्याची त्यांच्यासाठी कसोटी असल्याचं ते सांगत होते. लोकेशन्सच्या बाबतीत मित्रपरिवाराचं खूप सहकार्य मिळाल्याचं प्रत्येकाने नमूद केलं. एखाद्या मित्राचं घर, मैत्रिणीचं ऑफिस, शेजारच्यांची गॅलरी अशा प्रकारे लोकेशन्सचा प्रश्न मिटायचा. खऱ्या लोकेशनवर काम करताना परवानगी मिळणं हे अतिशय कठीण काम असायचं असंही ते आवर्जून सांगतात. जागा मिळवण्याच्या संघर्षांतून योग्य तो मार्ग काढत प्रत्येकाने आपली शॉर्टफिल्म सजवली होती. प्रेक्षकांनीही त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना भरभरून दाद दिली. मामि फेस्टिव्हलमध्ये इतर अनेक ठिकाणी महत्त्वाच्या आणि चांगल्या सिनेमांचं स्क्रीनिंग सुरू असूनही चित्रपटप्रेमींनी ‘डायमेन्शन्स मुंबई’ या विभागाकडे पावलं वळवली होती.

‘मूव्ही मेला’ रंगला

मूव्ही मेला हा दोन दिवसांचा कार्यक्रमही मामिमध्ये चांगलाच रंगला. या कार्यक्रमात बॉलीवूडमधले बडे स्टार, दिग्दर्शक, लेखक उपस्थित होते. या मूव्ही मेलामध्ये नेहमीच जाणकार, अनुभवी मंडळी प्रेक्षकांशी संवाद साधत असतात. सिनेमा, सिनेमा घडवण्याची प्रक्रिया, सिनेमासंबंधी इतर घटक, विषय, कथा, शिक्षण, अनुभव अशा अनेक विषयांवर या कार्यक्रमात खूप चांगली चर्चा होत असते. यंदाही बॉलीवूडच्या अनेक चमकत्या ताऱ्यांनी इथे हजेरी लावली. रोहित शेट्टी, झोया अख्तर, विशाल भारद्वाज, गौरी शिंदे, शुजित सरकार अशा अनेक दिग्गजांसोबत संवाद साधण्याची संधी सिनेप्रेमींना लाभली होती. बॉलीवूडचे हे आघाडीचे दिग्दर्शकांनी त्यांचे अनुभव, सिनेसृष्टीतली शिकण्याची प्रक्रिया, सिनेमाचं तंत्र, दिग्दर्शनाची नजर अशा अनेक विषयांवर बोलते झाले. या नावाजलेल्या दिग्दर्शकांशी संवाद साधताना प्रेक्षकांपैकी अनेक सिनेप्रेमींनी, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांनी त्यांच्या मनातले अनेक प्रश्न, शंका विचारले. या दिग्दर्शकांनीही कोणत्याही प्रकारची अढी न ठेवता प्रतिसाद दिला. असंच एक मजेशीर आणि मनोरंजक पॅनल झालं ते म्हणजे शाहिद कपूरचं. शाहिद कपूरच्या करिअरची सुरुवात साइड डान्सर म्हणून झाली होती. सिनेमांमध्ये येण्याआधी जाहिरातींमधूनही तो झळकला होता. आता तो बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्यांच्या रांगेत बसतो. अशा कलाकाराचा करिअर प्रवास जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही? त्याने त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव सांगितला. या प्रवासासह तो अभिनय, स्टारडम, ग्लॅमर या मुद्दय़ावरही भाष्य करायला विसरला नाही. शाहिद कपूर तसा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा. त्याची इमेज म्हणजे मस्ती-मजा-धमाल करणारा असा. या कार्यक्रमातील मुलाखतीतही तो असाच आनंद घेत प्रेक्षकांशी संवाद साधत होता. शाहिद उत्तम नाचतो हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे तो इथे नाचला नसता तरच नवल होतं. मुलाखतीच्या शेवटी तो राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्यासोबत पाय थिरकवायला विसरला नाही. आभासी वास्तव आणि सिनेमा या संबंधांवर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि वरिष्ठ सल्लागार, युनायटेड नेशन्स आणि लाइट शेडचे संस्थापक आणि सीईओ गाबो अरोरा, मेमेसिस स्टुडिओचे संस्थापक आणि फिल्ममेकर आनंद गांधी आणि रॅडिऑन टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि चीफ आर्किटेक्ट राजा कोदुरी यांचे चर्चासत्र झाले. दिग्दर्शक-लेखक सकुन बत्रा यांच्यासोबत ही चर्चा चांगली रंगली होती. ‘जो जिता वही सिकंदर’ हा सिनेमा २५ वर्षांपूर्वी आला असला तरी तो आजही तितकाच बघावासा वाटतो. एव्हरग्रीन म्हणावा अशा या सिनेमात तगडे कलाकार होते. या सिनेमाला २५ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मामि फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाच्या पूर्ण टीमचं रियुनिअन होतं. आमिर खान, दीपक तिजोरी, देवेन भोजानी, पूजा बेदी, ममिक, फराह खान आणि दिग्दर्शक मन्सूर खान अशी संपूर्ण टीम या भेटीसाठी आली होती. ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमाचे कलाकार रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक करण जोहर हे तिघंही सिनेमाची कथा, विषय, मांडणी, प्रक्रिया याविषयी बोलले. दोन दिवस सुरू असणारा हा मूव्ही मेला खऱ्या अर्थाने रंगला होता.

First Published on November 11, 2016 4:51 am

Web Title: short films 2
Next Stories
1 कलाकारांची गर्दी.. तिथे हे दर्दी.!
2 फॅण्ड्रीनंतर सैराट…
3 फेस्टिव्हलमध्ये महिलाराज…
Just Now!
X