महत्त्वाची निरीक्षणे :

  • आकलन या उपघटकावरील उतारे मराठी व इंग्रजीत असतात. अनेक विद्यार्थी या उपघटकाची तयारी योग्य प्रकारे करत नाहीत आणि मग फाजील आत्मविश्वासामुळे अनेकांना हा उपघटक व्यवस्थित सोडवता येत नाही. काहींना प्रत्यक्ष पेपर सोडवताना दोन तासांचे नियोजन योग्य प्रकारे न जमल्यानेही नकारात्मक परिणाम हाती येतो.

२०१६ च्या पूर्वपरीक्षेसाठी आकलन या उपघटकाच्या अभ्यासाची रणनीती :

  • मित्रांनो, शक्यता आहे की, या वर्षी यूपीएससी परीक्षेच्या पूर्वपरीक्षेप्रमाणे, एक उतारा व त्यावर एकच प्रश्न असे काही प्रश्न असू शकतील. त्यामुळे अशा या पॅटर्नला सामोरे जाण्याची तयारी करा.
  • परीक्षा होईपर्यंत दररोज किमान एका उताऱ्यावरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जितके जास्तीत जास्त उतारे सोडवता येतील तेवढे उत्तम. यामुळे वेळेचे नियोजन जमू शकते आणि वर्षभर केलेली आपली मेहनत वाया जात नाही.

सरावासाठी उतारा-१

खालील उताऱ्याचे आकलन करून विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या.

पूर्व बंगालमध्ये सुरू झालेले स्वातंत्र्य आंदोलन आणि ते चिरडण्यासाठी पाकिस्तानने अंगीकारलेली दमननीती हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे असे भारताने मानले नाही. निर्वासितांचा भार भारतावर पडला, म्हणून भारताची सहानुभूती बांगलादेशकडे वळली असे समजणे हा संकुचितपणाचा आविष्कार झाला असता. इंदिरा गांधी यांनी मनोमनी खूणगाठ बांधली ती ही की, पूर्व बंगालमधील संघर्ष हा तेथील लोकांनी पाकिस्तानी राजवटीच्या जुलुमाविरुद्ध पुकारलेला लढा होता आणि स्वातंत्र्यप्रेमी भारताने, वसाहतवादाविरुद्ध जगात इतरत्र चाललेल्या लढय़ाचाच तो एक भाग मानला पाहिजे. या लढय़ाचे पर्यवसान म्हणून निर्वासितांचा लोंढा भारतात आला. त्या निर्वासितांना आसरा देणे, त्यांच्या पालनपोषणाचा भार वाहणे हे मानवतावादी दृष्टिकोनातून भारताचे कर्तव्य होय. पण त्याही पलीकडे भारताचे कर्तव्य होते ते बांगलादेशच्या स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल सहानुभूती प्रदíशत करणे, त्या स्वातंत्र्यसनिकांच्या आकांक्षांना आपल्या परीने प्रतिसाद देणे आणि जगाच्या व्यासपीठावर बांगलादेशचा आवाज उठविणे हे होय.

इतर कोणत्याही राजकीय पक्षोपपक्षांच्या नेत्यांपेक्षा इंदिरा गांधी यांच्या मन:चक्षूंसमोर भावी कर्तव्याचे अधिक स्पष्ट स्वरूप उभे होते. त्यांनी निर्वासितांना आश्रय दिला, पण त्याच वेळी जाहीर केले, की सर्व निर्वासित आपल्या मायभूमीत परत गेलेच पाहिजेत. ते परत गेलेच पाहिजेत, असे म्हणून इंदिरा गांधी थांबल्या नाहीत. त्यांनी आपला निर्धार जाहीर केला, की पूर्व बंगालमधून आलेले सर्व निर्वासित परत जातीलच. यात जसा निर्धार व्यक्त होत होता, त्याचप्रमाणे दूरदर्शी राजकीय पवित्र्याची खूणही त्यातून प्रकट होत होती. ही खूण अशी की बांगला देशचा स्वातंत्र्यसंग्राम संपुष्टात येणार नाही, तो पाकिस्तानच्या पाशवी शक्तीला चिरडता येणार नाही, कारण हा लढा स्वातंत्र्यासाठी पुकारण्यात आलेला आहे आणि त्या लढय़ाच्यामागे साऱ्या बंगाली जनतेची शक्ती उत्स्फूर्तपणे एकवटलेली आहे. इंदिरा गांधी यांनी मनाचा निर्धार करून पार्लमेंटमध्ये बांगलादेशबद्दलची सहानुभूती जी व्यक्त केली तिच्यामागे नुसता पोकळ आवेश नव्हता. बांगलादेशातील लोकांना ज्या अनन्वित यातना सोसाव्या लागत होत्या, त्याबद्दलची कणव येऊन प्रकट झालेल्या त्या भावनाही नव्हत्या. इंदिरा गांधी यांना स्पष्ट दिसत होते ते असे, की लोकनियुक्तप्रतिनिधींना चिरडून टाकणाऱ्या पाशवी सत्तेविरुद्ध लोकांनी ते केलेले बंड होते आणि म्हणून जगातील राष्ट्रांना त्या संघर्षांत हस्तक्षेप करणे क्रमप्राप्त होते. याबाबतीत भारताची जबाबदारी वाढली होती ती यामुळे, की एके काळच्या आपल्या बांधवांवर अत्याचार होत असताना भारताला निष्क्रिय व स्तब्ध राहणे शक्यच नव्हते.

* खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे ?

१)     इंदिरा गांधींना पाकिस्तानी दमणनीतीची कीव आली. लोकांवर अत्याचार झालेत म्हणून इंदिरा गांधींनी बांगलादेश मुक्तीसाठी प्रयत्न केले.

२)     पाकिस्तानने जो जुलूम पूर्व पाकिस्तानात चालवला एके काळचे ते भारतीय बांधव होते, त्यांच्या अत्याचाराविरुद्ध भारताला उभे राहणे आवश्यकच होते, मात्र त्यात लोकनियुक्त प्रतिनिधींना चिरडून टाकणाऱ्या शक्तीविरुद्ध मात्र नव्हता, तर त्यात पाकिस्तानविषयी द्वेष होता.

१) विधान १ बरोबर      ३) विधान १ व २ बरोबर

२) विधान २ बरोबर     ४) विधान १ व २ चूक

(उर्वरित प्रश्न उद्याच्या अंकात)