आज आपण हवामानशास्त्र या उपघटकाअंतर्गत येणाऱ्या ग्रहीय व स्थानिक वाऱ्यांविषयी माहिती घेऊयात. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा यांसाठी हा उपघटक अत्यंत महत्त्वाचा आहे.
ग्रहीय व स्थानिक वारे (Planetary Winds) :
पृथ्वी या ग्रहाच्या विस्तीर्ण प्रदेशात नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ग्रहीय वारे’ असे म्हणतात. या वाऱ्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते- व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे.

१. व्यापारी वारे /पूर्वीय वारे :
उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्त दरम्यान कर्क व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाचे पट्टे आहेत. इथून विषुववृत्ताजवळील ० ते ५ अंश उत्तर व दक्षिण दरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
व्यापारी वारे १० अंश ते २५ अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहत असतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना व्यापारी वारे असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात म्हणून यांना पूर्वीय वारे (Easterlies) असे म्हणतात.
व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार आहेत-
* उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे- उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहत असल्याने यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ असे म्हणतात.
* दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे- दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयकडून वायव्य दिशेकडे वाहत असल्याने त्यांना ‘आग्नेय व्यापारी वारे’ असे म्हणतात.
व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टय़े :
* हे वारे वर्षभर सातत्याने वाहतात. सागरी प्रदेशातून हे वारे नियमितपणे व वेगाने वाहतात.
* खंडांतर्गत प्रदेशात हे वारे त्यामानाने संथगतीने वाहतात.
* व्यापारी वाऱ्यांचा वेग दर तासाला सुमारे १६ ते २४ कि.मी. असतो.
* व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहतात, म्हणून हे उष्ण असतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण शक्ती वाढल्याने पूर्वेकडे हे वारे जास्त पाऊस देतात. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात, तसतसे त्यांच्यापासून पाऊस पडत नाही. म्हणूनच खंडाच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश आढळतो.
२. प्रतिव्यापारी वारे/पश्चिमी वारे (Westerlies)-
उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आहे. येथून ध्रुववृत्ताजवळ
६० ते ७० अंश उत्तर व दक्षिण दरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून यांना ‘पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार आहेत-
* उत्तर गोलार्धातील नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे- उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असल्याने त्यांना नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात.
* दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतिव्यापारी वारे- दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे वाहत असल्याने यांना वायव्य प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात.
लेखन : डॉ. जी. आर. पाटील

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..