16 October 2019

News Flash

खेळ यशस्वी होण्याची गुरुकिल्ली

एक दिवस अभ्यास केला नाहीस तरी चालेल

प्रसंग पहिला – एका प्रथितयश शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा. बहुसंख्य स्त्रिया, तुरळक पुरुषही उपस्थित. या सर्वासमोर ‘खेळ व व्यायामाचे महत्त्व’ या विषयावर चर्चा व उद्बोधन करताना मी विचारलं, ‘‘अभ्यास झाला नाही तर खेळायला पाठवणार नाही,’’ असं तुमच्यापैकी किती पालक मुलांना सांगता? या माझ्या प्रश्नावर अपेक्षेप्रमाणेच जवळ जवळ सर्वच हात वर आले. पालकांकडून असे करण्याची कारणेही अपेक्षित अशीच. ‘‘स्पर्धा किती वाढली आहे, अभ्यास न करून कसं चालेल?’’, ‘‘नियमित अभ्यासाची सवय आताच लागली, तर पुढे फायदा होईल’’, ‘‘परीक्षेमध्ये चांगले गुण मिळायलाच हवेत..’’ ही आणि अशाच आशयाची आणखी काही उत्तरे.

माझा दुसरा प्रश्न, ‘‘एक दिवस अभ्यास केला नाहीस तरी चालेल, मात्र मैदानावर जाऊन खेळलंच पाहिजे’’, असं तुमच्यापैकी किती जणांची मुलांना सांगायची तयारी आहे? या माझ्या प्रश्नाला अपेक्षेप्रमाणेच एकही हात वर आला नाही! ‘असे कसे चालेल?’ अशी पालकांमध्ये कुजबुज.

प्रसंग दुसरा – महाविद्यालयामध्ये नवीनच आलेल्या मुलांसमोर ‘आरोग्यपूर्ण जीवनशैली’ हा मानसशास्त्रांतर्गत विषयाचा पहिला तास घेताना मी विचारलं, ‘‘व्यायामाचे फायदे सांगा बरं!’’ या माझ्या प्रश्नाला ‘उंची वाढते, भूक लागते’ आदी शारीरिक फायद्यांपासून ‘एकाग्रता वाढते, तणावांचा निचरा होतो’ आदी मानसिक फायद्यांपर्यंत मुलांनी सांगितलेले अनेक मुद्दे मी फळ्यावर लिहीत गेले. ‘‘शाबास, खूप चांगली माहिती आहे तुम्हाला! मात्र आता तुमच्यापैकी किती जणं नियमित व्यायाम करता ते सांगा बरं!’’ वर्गात एकदम शांतता, तुरळक हात वर.

प्रसंग तीन – व्यायामशाळेत, अगदी पाच-सहा वर्षांपासून १६-१७ वर्षांपर्यंतच्या, प्रासंगिक गैरहजेरी असलेल्या, विद्यार्थ्यांची ‘हजेरी’ घेताना मुला-मुलींना अनुपस्थितीची कारणं मी विचारल्यावर, ‘अभ्यास’, ‘जवळ आलेली परीक्षा’, त्यासाठी ‘शिकवणीच्या वर्गाचे ज्यादा तास’, ही  मुख्य कारणे आहेत, हे कळल्यावर, ‘असे चालणार नाही, अभ्यासाचे तुमचे तुम्ही नियोजन केले पाहिजे’.. या माझ्या बोलण्यावर ‘ताई, मला यायचे होते, माझा अभ्यास पण झाला होता, पण आईनीच पाठवले नाही’ असे एकीने सांगितले. माझा रागाचा पारा थोडा उतरला आणि मी या मुलांशी संवाद साधायला सुरुवात केल्यावर लक्षात आले की या मुलांनाही रोज मैदानावर यायचे आहे, खेळायचे आहे, बागडायचे आहे.. मात्र पालक आणि शिकवणीचे वर्ग हे यातील प्रमुख अडथळे आहेत.

प्रसंग चार – १९६० व १९७०च्या दशकांमधला डोळ्यात झणझणीत अंजन घालायला लावेल, असा मानसतज्ज्ञ वॉल्टर मिशेल यांनी केलेला अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील ‘स्टॅनफोर्ड मार्शमेलो’ हा जगप्रसिद्ध प्रयोग’! वरकरणी बघता हा प्रयोग तसा साधाच. प्रयोगात सहभागी होणारी चिमुकली मुले फक्त चार ते सहा या वयोगटातली. प्रयोगशाळेत असलेल्या छोटय़ा छोटय़ा खोल्यांमध्ये, एक साधे टेबल व खुर्ची, टेबलावर एक छोटी ताटली आणि ज्याच्यावर हा प्रयोग होणार आहे तो मुलगा वा मुलगी. प्रयोगकर्ता त्या खोलीत येऊन त्या मुलासमोरच्या ताटलीत एक मार्शमेलो ( मुलांना अतिशय आवडणाऱ्या मऊ मऊ गोड गोळ्या) ठेवतो. ‘मार्शमेलो’ ठेवता ठेवतानाच त्या मुलाला सांगितले जाते की, ‘‘तुला हवे असल्यास तू हा ‘मार्शमेलो’ लगेच खाऊ  शकतोस, मात्र तू जर थोडा वेळ थांबलास तर तुला दोन ‘मार्शमेलो’ मिळतील.’’ मुलासमोर ‘मार्शमेलो’ ठेवून प्रयोगकर्ता बाहेर निघून जातो व सुमारे १५ मिनिटांनी परत येतो. मधल्या वेळात या मुलांना दोनपैकी एका गोष्टींमध्ये निवड करावयाची असते – १) समोर असलेला मार्शमेलो खाणे – त्यातून तात्काळ मिळणारे पण अल्पसे समाधान घेणे किंवा २) प्रयोगकर्त्यांची वाट पाहणे, म्हणजेच थोडय़ा वेळाने,  जास्त समाधान देणाऱ्या गोष्टी मिळवणे. काही मुलं ‘त्यांना काय करायचे आहे’ याच्या सूचना मिळायच्या आधीच ‘मार्शमेलो’ खायला सुरुवातही करतात, मात्र काही मुले तोंडाला पाणी सुटले असूनही खाण्याचा मोह होऊ नये, म्हणून कशा क्लृप्त्या रचतात हे ‘यूटय़ूब’वरील या प्रयोगाच्या व्हिडीयोमध्ये बघणे खूपच मजेशीर आहे. ‘मार्शमेलो’ प्रयोग त्यानंतरही अनेकांनी विविध वयोगटांतील व्यक्तींवर, विविध पद्धतीने केला आहे. या व अशाच पद्धतीने केलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष खूप काही सांगून जातात. जी मुले मोह टाळून समाधान लांबवू शकली त्या मुलांचे शिक्षण दर्जेदार होते, त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले होते आणि मोठेपणी त्यांचे आयुष्य जास्त यशस्वी व समाधानी होते. या उलट जी मुले मोह टाळू शकली नाहीत ती मुले या सर्व बाबतीत कमी होती, त्यांचा गुन्हेगारी प्रवृतीकडे कल तुलनेने जास्त होता. ‘उत्तेजना व मोहावर ताबा’ हा ‘भावनिक बुद्धिमत्ते’चा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पुस्तकी अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्या मुलांपेक्षा ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली ती आयुष्यामध्ये जास्त यशस्वी तर होतातच आणि अतिशय अनुभवसंपन्न समाधानी आयुष्य जगतात असे अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे. यामुळेच मुलांची भावनिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी परदेशात (आणि थोडय़ाफार प्रमाणात आपल्याकडेही) अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

भावनिक बुद्धिमत्तेवर संशोधन करणारे संशोधक मेयर, सॅलोव्ही, कारुसो यांनी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे ‘स्वत:च्या आणि इतरांच्या भावनांबद्दल प्रक्रिया करण्याची क्षमता असणे’ असे सांगून भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख चार घटक दिले आहेत.

१. भावनांचे अचूक तसेच परिस्थितीनुरूप आकलन होणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचे प्रकटीकरण करणे.

२. भावनांची माहिती व ज्ञान असणे आणि त्या समजणे.

३. बोधनिक (cognitive) कार्य आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भावनांचे समायोजन करण्याची क्षमता असणे.

४. स्वत:च्या तसेच इतरांच्याही भावना नियंत्रित ठेवण्याचे कौशल्य असणे.

मानसशास्त्रातील बरेच संशोधन असे दाखवते की वैयक्तिक आयुष्य असो वा इतर नातेसंबंध, नोकरीचे ठिकाण असो वा कामाच्या इतर जबाबदाऱ्या, छंद असोत वा नुसताच वेळ घालविण्याची वृत्ती, ज्यांच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता आहे, त्या व्यक्ती या सर्व ठिकाणी यशस्वी, आनंदी व समाधानी असण्याची शक्यता खूप जास्त असते. याचे साधे कारण म्हणजे या व्यक्तींना दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्यांच्या भावना जाणून घेता येतात, त्यानुसार आपली वर्तणूक सहज बदलता येते, गैरसमज टाळता येतात आणि स्वत:चे तसेच भोवतालचे वातावरणही आनंदी ठेवता येते.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी भावनिक बुद्धिमत्ता हा एक खूप मोठा घटक आहे आणि नियमित खेळामधून याची चांगली वाढ होते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. २००६ मध्ये लार्सन, हॅन्सन आणि मोनेटा यांनी २००० शाळकरी मुलांकडून ते कोणत्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेतात याची माहिती घेतली. या सर्वेक्षणातही असे आढळून आले की अभ्यासेतर उपक्रम, इतर उपक्रम यापेक्षाही क्रीडा उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ध्येयनिश्चिती, सातत्य, कष्ट घेण्याची तयारी, भावनांवर ताबा व सांघिक कामांमध्ये चांगली गुणवत्ता दिसते. असेच फायदे आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरातील आणि कठीण परिस्थितीला तोंड देत जगणाऱ्या, पण क्रीडा सहभाग असणाऱ्या मुलांमध्येही आढळून आले आहेत. १९७९ ते २००५ या कालावधीत १२ हजार व्यक्तींवर केलेल्या दीडशेहून अधिक संशोधनपर अभ्यासाचे निष्कर्षही हेच दाखवितात की रोज सुमारे ३० मिनिटे खेळ आणि व्यायामामध्ये घालवलेला वेळ आयुष्याचा दर्जा वाढविण्यामध्ये खूप मोठय़ा प्रमाणात मदत करतो. ‘मल्लखांब या खेळाच्या नियमित

सरावामुळे होणारे मानसशास्त्रीय फायद्यांवर’

संशोधन करताना मी नियमित मल्लखांब करणाऱ्या मुली आणि कोणत्याच खेळामध्ये सहभागी न होणाऱ्या मुलींवर प्रायोगिक पद्धत वापरून अभ्यास केला तेव्हा माझ्या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्येही हेच आढळून आले की नियमित मल्लखांब करणाऱ्या मुलींची भावनिक बुद्धिमत्ता, समस्या निराकरण क्षमता आणि सकारात्मकता कोणत्याच खेळामध्ये सहभागी न होणाऱ्या मुलींपेक्षा खूप चांगल्या प्रकारे वाढली आहे. यामुळेच शाळकरी, महाविद्यालयीन आणि अभ्यास करण्याच्या वयातील सर्वच मुला-मुलींनी आणि मोठय़ांनीही भरपूर खेळले पाहिजे आणि खेळाद्वारे शारीरिक व मानसिक विकास साध्य केला पाहिजे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अगदी दुसऱ्या-तिसऱ्या वर्षांपासून आधी अगदी छाती फुटेस्तोवर अभ्यासाच्या स्पर्धेत धावणारी, मग नोकरीच्या आणि यशस्वीतेच्या मागे धावणारी, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली, भ्रमणध्वनीवर मग्न असणारी ही पिढी.. जर आज मैदानावर उतरली तर? असा आशावाद ठेवण्यापेक्षा त्यांनी मैदानावर उतरायलाच हवे असे आपण सर्वानीच कसोशीने प्रयत्न करायला हवेत.

डॉ. नीता ताटके

neetatatke@gmail.com

First Published on December 16, 2017 5:13 am

Web Title: articles in marathi on outdoor games