23 July 2019

News Flash

प्रयोगशीलता हवी

कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार.

नक्कल करत, चित्रकलेच्या तासाला कंटाळत मोठी होणारी मुलंच मोठी होऊन आपली शहरं विद्रूप करतात. कारण आयुष्यातील कलेचं स्थान समजण्याएवढय़ा संवेदनशील शिक्षणापासून ती वंचितच राहतात. कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार. मुलामा गळूनच पडणार आहे. त्यामुळे कलेची खोली संवेदनक्षम शिक्षकांनी समजून घेऊन मुलांसाठी नवनवीन प्रयोग करून शोधून काढली पाहिजे.

कलेतून मूल स्वत:ला शोधतंही आणि हरवतंही. वयाच्या विविध टप्प्यांवर करून बघावा असा एक सुंदर चित्रउपक्रम आहे. याला मी ‘ओळख मुखवटा’ असं नाव दिलंय. स्वत:ची ओळख सांगणारे दोन किंवा तीन शब्द शोधायचे, लिहायचे. स्वत:चा चेहरा फक्त रेषांनी कागदावर काढून घ्यायचा. त्या शब्दांतून व्यक्त होणारी स्वत:ची ओळख चित्ररूपाने त्या मुखवटय़ावर उतरवायची. स्वत:ची ओळख शोधणं आणि त्यातून स्वत:च्या अस्तित्वाला अर्थ देणं हे मानवी स्वभावाचं वैशिष्टय़. ही ओळख थेट चित्रात उतरवण्याने मुलांनाच काय पण मोठय़ांनाही काही गोष्टींची स्पष्टता येते. आरशात दिसणारे आपण आणि चित्रात दिसणारे आपण, यात फरक असतो. रूपाचं कौतुक करण्यापेक्षा गुणांचं कौतुक मुलं सहज करू लागतात. विशिष्ट वयात विशिष्ट आवडीनिवडी कशा बदलत जातात हेही चित्ररूपात जतन होतं. एका दहा वर्षांच्या मुलीला अभ्यासाचे विषय खास आवडत नाहीत, पण ती पाण्यात उतरली की मासळीसारखी सुंदर पोहते. तिचं हे पाण्याचं प्रेम ओळख मुखवटय़ातही उतरलं. संपूर्ण चेहरा निळ्या रंगाच्या छटांनी तिने रंगवला आणि त्यात पोहणारी ती. एका बारा वर्षांच्या मुलाला पुस्तकंच वाचायला आवडतात, तर त्याने पुस्तकाचेच आकार थोडे बदलून डोळे, नाक, तोंड दाखवलं. मी पहिल्यांदा हा मुखवटा केला सोळा वर्षांपूर्वी. तेव्हाच्या वयानुरूप तुकडय़ांत वाटली गेलेली मी दाखवण्यासाठी चक्क कागदाचे तुकडे एकमेकांना चिकटवून मुखवटा तयार केला होता. परदेशात राहात असणारी भारतीय मुलगी म्हणून भारत देशाचा आकार, तिरंगा असे काही मातृभूमीचा वियोग दाखवणारे घटक होते. आता नुकताच केलेला ओळख मुखवटा आहे, त्यात डोळ्यांच्या जागी माझी दोन मुलं आहेत आणि चित्रकार असल्याने चेहऱ्यावर अनेक रंग आहेत. दर काही वर्षांनी हा ओळख मुखवटा केला तर आपली बदललेली ओळख आपल्यालाच अचंबित करेल.

चित्र काढण्यासाठी झाड हा असा एक विषय आहे की ज्याचे खोड आणि झाडोरा असे दोन भाग असंख्य पद्धतींनी काढता येतात. हिमालयातील काही भाग सोडता झाड न पाहिलेलं लहान भारतीय मूलही सापडणार नाही. छोटय़ा मुलाने काढलेल्या एका रेघेतून तयार केलेलं खोड आणि त्याला काटकोनात काढलेल्या फांदीला लागलेले दोन-तीन आंबे, एक-दोन पानं यातूनही सुंदर झाड तयार होतं. पूर्वापार चालत आलेल्या – त्रिकोणी डोंगर, त्यामागून अर्धा बाहेर आलेला सूर्य, त्याचे रेघारेघांचे किरण, एक नागमोडी नदी, बाजूला झाड आणि एक झोपडीवजा घर, आकाशात मराठी चार आकडय़ासारखे पक्षी – या चित्रातून आपण मुक्त व्हायची फार गरज आहे. चित्र म्हणजे काय काय याच्या सीमांची व्याप्ती वाढवायची निकड आहे. चाकोरीबद्ध चित्रांतून, दृश्यांतून, सौंदर्यातून बाहेर पाडण्यासाठी ही धडपड करायला हवी. किंचित बाक असणाऱ्या उलट कंसासारख्या रेघांचं खोड आणि त्यावर अर्धगोल काढत तयार केलेला एक झाडोरा हे झाड काढायला मी मुलांना बंदी करते. ‘हे सोडून आता कुठलंही झाड काढा’, असं म्हटलं की मग मुलांचा सर्जनशीलतेचा खजिना बाहेर येऊ लागतो.

अनेक वर्षांपूर्वी चंद्रलेखा यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेताना त्यांनी सांगितलेला महत्त्वाचा धडा आठवतो, ‘‘तुला काय करायचं नाहीये हे पक्कं ठरव, तरच काय करायचंय त्याचा शोध लागेल.’’ ही स्पष्टता जर मुलांनाही देता आली तर! तेच ते झाड काढत राहिलं तर डोळ्याला दिसणाऱ्या खऱ्या झाडांचं सौंदर्य चित्रात कसं पकडू शकेल कोणी? ते सरधोपट झाड अपेक्षित नाही याने मुलांनाही दिलासा मिळतो. मग मी पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं काढते, मुलांना त्याची नक्कल करायला परवानगी नसते.

अनेक ठिकाणी असं होतं की कला शिक्षक फळ्यावर चित्र काढून देतात आणि त्याची उत्तम नक्कल करणाऱ्याला पैकीच्या पैकी मार्कही देतात. यातून फक्त तंत्र अवगत केलं जातं. पण कलेचा मूळ हेतूच जर सौंदर्य समजून घेणे, सौंदर्यनिर्मिती करणे, संवेदनक्षमता वाढवणे, आत्मपरीक्षण करणे, कल्पनाशक्तीचा विकास करणे, उत्स्फूर्त प्रयोग करणे, अभिव्यक्ती आजमावणे, दृश्य संवेदना जागृत करणे इत्यादी असेल, तर मग नक्कल करून यातला कुठलाही हेतू साध्य होईल का? नक्कल करत, चित्रकलेच्या तासाला कंटाळत मोठी होणारी मुलंच मग आपली शहरं विद्रूप करतात. कारण आयुष्यातील कलेचं स्थान समजण्याएवढय़ा संवेदनशील शिक्षणापासून ती वंचितच राहतात. ही परिस्थिती बदलली नाही तर अशीच ओंगळवाणी दृश्य जागोजागी, रस्तोरस्ती तयार होत राहतील. कलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार. मुलामा गळूनच पडणार आहे. त्यामुळे कलेची खोली संवेदनक्षम शिक्षकांनी समजून घेऊन मुलांसाठी नवनवीन प्रयोग करून शोधून काढली पाहिजे.

एक उपक्रम असा आहे की पांढरा कागद समोर धरून शांतपणे त्यात काही आकार दिसतात का, कशाचं प्रतिबिंब दिसतं का, हे शोधणं आणि त्याचं चित्रात रूपांतर करणं. कोणाला सावल्या दिसतील तर कोणाला कागदावरचाच एखादा डाग. यात चित्र असू शकतं आणि ते प्रत्येकाला वेगळं दिसणार आहे हाच एक केवढा नावीन्यपूर्ण विचार आहे. रॉबर्ट रॉशनबर्ग या अमेरिकन आधुनिक चित्रकाराने पांढरे कॅनव्हास रंगवले आणि काळेही. पांढऱ्या कॅनव्हाससमोर प्रेक्षकाने उभं राहून स्वत:च्या कपडय़ांचा रंग त्यात प्रतिबिंबित होतो का? कुठली सावली त्यावर दिसते का? इतर काही दिसतं का याचा शोध घेणं अभिप्रेत होतं. त्याने काळ्या कॅनव्हासवर काळे कागद चिकटवले, काळी कापडं चिकटवली आणि तो काळा रंग अजून गडद केला. त्याच्या उंचवटय़ांमुळे जे छायाप्रकाश तयार झाले तेच चित्र. हे प्रयोग डोळे उघडे करणारे आहेत!

एका कुठल्याशा छोटय़ा बेटावर ज्वालामुखीमुळे सगळं काही भस्मसात झालं आणि अभ्यासकांनी तिथे पुन्हा जीवनिर्मिती कशी होते याचा अभ्यास करायचं ठरवलं. काही वर्षांत तिथे गवत आणि झाडं उगवली आणि बघता बघता अरण्य तयार झालं. अभ्यासातून असं आढळलं की त्या जळलेल्या बेटावर जिथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही तिथे वाऱ्याबरोबर तरंगत एक कोळी प्रथम आला आणि नंतर हळूहळू जीव वाढत गेले. हा जसा निसर्गाचा चमत्कार आहे तितक्याच ताकदीचा काळ्या आणि पांढऱ्या कॅनव्हासचा रॉशनबर्गचा प्रयोग मला वाटतो. आपल्या दृश्य संवेदनांना घातलेलं ते आव्हान आहे. अशी आव्हानं जेव्हा मुलांसमोर आपण ठेवू तेव्हाच कलाप्रांतात बसलेला गाळ ढवळून निघेल आणि खऱ्या विचार मंथनातून काहीतरी नवं निर्माण होईल.

पूर्वापार चालत आलेल्या – त्रिकोणी डोंगर, त्यामागून अर्धा बाहेर आलेला सूर्य, त्याचे रेघारेघांचे किरण, एक नागमोडी नदी, बाजूला झाड आणि एक झोपडीवजा घर, आकाशात मराठी चार आकडय़ासारखे पक्षी – या चित्रातून आपण मुक्त व्हायची फार गरज आहे. चित्र म्हणजे काय काय याच्या सीमांची व्याप्ती वाढवायची निकड आहे. चाकोरीबद्ध चित्रांतून, दृश्यांतून, सौंदर्यातून बाहेर पाडण्यासाठी ही धडपड करायला हवी. किंचित बाक असणाऱ्या उलट कंसासारख्या रेघांचं खोड आणि त्यावर अर्धगोल काढत तयार केलेला एक झाडोरा हे झाड काढायला मी मुलांना बंदी करते. ‘हे सोडून आता कुठलंही झाड काढा’, असं म्हटलं की मग मुलांचा सर्जनशीलतेचा खजिना बाहेर येऊ लागतो. आणि ‘‘तुला काय करायचं नाहीये हे पक्कं ठरव, तरच काय करायचंय त्याचा शोध लागेल,’’ या वाक्यातली सत्यता पटते.

आज भारतात होणाऱ्या चित्रकलेच्या कुठल्याही स्पर्धा-परीक्षांमध्ये एवढा मोकळेपणा आणि सर्जनशीलतेला खऱ्या अर्थाने खत पाणी घालणारं धाडस, हे दोन्हीही दिसत नाही. माणसांच्या त्वचेच्या रंगावरून तर अगदी सातत्याने दुमत होताना दिसतं. स्वत:चा वर्ण सावळा असणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याने चित्रातील मुलं गोरीच दाखवलेली आवडतात. खऱ्याच्या थोडंदेखील जवळ जाण्यासाठी आपली दृष्टी तयार नाही. चांगलं चित्रही आपल्याला कळत नाही आणि चांगलं दृश्यही आकळत नाही. माझा एक विद्यार्थी मला गेलं दीड र्वष सांगतो आहे की, ‘मला चित्र नाही काढता येत आणि आवडतही नाहीत.’ हे त्याने पहिल्यांदा म्हटलं तिथेच माझी परीक्षा सुरू झाली. त्याला आवडेल, मजा येईल, जमेल आणि प्रोत्साहन मिळेल अशा अनेक पद्धती सतत शोधाव्या लागतात. काही मुलांना वर्गात बसून चित्र काढायचं नसतं, अशा वेळी आमचा तास मैदानावर भरतो. सर्व जण मैदानावर जाऊन झाडांची चित्रं, खोडांचे पोत, शाळेची इमारत, खेळणारी मुलं, झाडाची जमिनीवरची सावली, पडलेले दगड रचून त्याचं चित्र, चित्र काढणाऱ्या मित्र-मैत्रिणींचं चित्र असे किती तरी विषय शोधतात आणि चित्रांत रंगून जातात. सहावी-सातवीच्या सुमारास जेव्हा मुलांचा चित्रातला रस कमी होऊ लागतो तेव्हा असे उपक्रम हात देतात. केवळ तंत्र आणि कौशल्य यांवर भर देणाऱ्या सर्वानीच चित्रकला शिक्षणात काही सर्जनशील बदल करण्याची फार आवश्यकता आहे. ते केल्याखेरीज काहीही नवं उगवणार नाहीये हे विसरता कामा नये.

आभा भागवत abha.bhagwat@gmail.com

First Published on February 25, 2017 2:20 am

Web Title: beautiful picture activities for kids children paintings city kids painting