19 October 2019

News Flash

बालनाटय़ातून बालविकास

‘आजोबाऽऽऽऽ आपण घोडा घोडा खेळू या?’

बालनाटय़ांच्या आंतरशालेय स्पर्धातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. नाटक करताना नि ते पाहताना मिळालेल्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होतात. नाटिकेचं लेखन सोप्या, ओघवत्या भाषेत असल्याने आत्मविश्वास वाढणं, संवादकौशल्य वाढणं, संवादफेकीतून आवाजाचा पोत सुधारणं आणि सहकार्याची भावना यातून खरोखरीचा मुलांचा विकास होत असतो. विविध कला मुलांच्या वाढीत असं महत्त्वपूर्ण योगदान देत असतात.

‘आजोबाऽऽऽऽ  आपण घोडा घोडा खेळू या?’

‘चला चला राजे!’

‘द्या ना मला तुमची काठी!’

‘हं, ही घ्या!’

नातवाकडे काठी सुपूर्द करून त्याचं कौतुक करण्यात नि बाललीला न्याहाळण्यात आजोबा मग्न! दोन पायांत काठी पकडून दुडुदुडु धावणारं ते बालरूप म्हणजे बालनाटय़ाचा श्रीगणेशाच नाही का? खरंच, आपल्या अवतीभवतीचं निरीक्षण करणारं लहान मूल, त्या त्या गोष्टींना उत्स्फूर्त प्रतिसाद देणारं त्याचं मन, त्याला दाद देणारे त्याचे पालक यातूनच तर कळीचं फूल व्हायला लागतं!

पुढे शिशुवर्गात आपल्यासारखेच सवंगडी मिळतात. आईसारख्याच बाई मिळतात. त्या छान छान गाणी गोष्टी शिकवतात. तालासुरात म्हणायची ती बडबड गीतं, हातवारे करीत साकारायची अभिनय गीतं बालमनाला इतका आनंद देतात की गाणी कशी पाठ होतात कळतही नाही. मग घरीदारी, पाहुण्यांसमोर सुरू होतो आमचा सुंदर अभिनय! त्यातील निरागसता दुसऱ्याला रिझवून टाकते.. वाटून जातं.. बाळ आता मोठं होतंय. छान छान शिकतंय.

प्राथमिक शाळेत वेगवेगळ्या विषयांचे छान छान धडे! आम्हाला थोडं थोडं लिहिता-वाचता यायला लागतं. या वर्गात धडा गमतीशीर वाटण्यासाठी बाई करतात त्या धडय़ाचं नाटय़ीकरण! त्या धडय़ातील मनुली, चिंगी, आई, दादा यांच्या भूमिका बाई एकेकाला देतात. धडय़ातील गोष्ट संवादरूपाने साकार होते.

अगदी सोपे – सुटसुटीत संवाद! इथे नसते मोठे नेपथ्य – ना रंगमंच, पण बालनाटय़ाची सुंदर ओळख होऊ लागते. त्यातील संवाद म्हणताना आपणच खरी ‘आई’ आहोत असं वाटू लागतं. कुणी आपलं वाक्य चुकलं तर त्याला ते सांगण्यातही मजा येते.

घरी गेल्यावर ‘आज किनई आई, बाईंनी आमचं नाटक बसवलं. मला ना आई, चिंगीचं काम दिलं. नि सानिकाला मनुली!’ आई कौतुकाने ऐकत बसते. तर दुसऱ्या घरी दादा सांगत असतो – ‘बाबा, आज मी काय संवाद म्हटले सांगू?’ झालं! घरोघरी नाटकाचा दुसरा अंक सुरू होतो. यातून मुलांना काय काय मिळतं याची यादी नाही करता येणार.

कधी कधी तर शब्दाविना नाटय़ असतं. कसं ते पाहा – भूगोलाच्या धडय़ात सूर्य स्थिर आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते नि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती फिरताना तोही सूर्याभोवती फिरतोच. इयत्ता तिसरीत ही संकल्पना स्पष्ट करताना बाईंनी तीन मुलांना निवडलं. सूर्याला केलं मध्ये उभं. एक पृथ्वी तिला त्याच्याभोवती फिरण्याचा मार्ग आखून दिला. त्या मार्गावरून जाताना स्वत:भोवतीही फिरायला शिकवलं. तर चंद्र केलेल्या मुलाला पृथ्वीभोवती फिरत तिच्याबरोबर जायला शिकवलं! झाले सगळे तयार! वर्गात मुलांसमोर हे तीन मिनिटांचं नाटय़ सादर झालं नि सगळ्यांनाच नीट कळलं – अशा छोटय़ा छोटय़ा किती तरी गोष्टी मुलांपर्यंत सोप्या रीतीने पोहोचवता येतात ते नाटय़ानुभवातून.

सत्तर ऐंशीच्या दशकात मुलांसाठी बालनाटय़ांच्या आंतरशालेय स्पर्धा होत. कुमार कला केंद्र, लिटिल थिएटर, उत्कर्ष मंदिर – मालाड यांसारख्या नामांकित संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठय़ा थिएटरमध्ये या स्पर्धाचं आयोजन करीत. मुलांना हे मोठं व्यासपीठ मिळे. या स्पर्धात अभिनय केलेली किती तरी मुलं पुढे नामांकित अभिनेते व अभिनेत्री झाले आहेत. या स्पर्धाचं उद्दिष्ट मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा हेच होतं. दुसरं म्हणजे या संस्थांनी शिक्षकांना लिहितं केलं. शिक्षकांचा मुलांबरोबरचा अनुभव मोठा असतो. मुलांच्या समस्यांची त्यांना उत्तम जाण असते. त्यातून अनेक वास्तववादी नाटय़बीजं मिळू शकतात.. शिक्षकाच्या लेखणीतून या बीजाचं रोपात रूपांतर झालं तर ते अगदी सहजसुंदर होतं. या विश्वासाने शिक्षकांना संधी मिळाली. आपल्या शाळेसाठी नाटक लिहिणं, त्याचं दिग्दर्शन करणं, मुलांना उत्तम नाटय़ानुभव देणं अशी कामगिरी शिक्षक करू लागले. मुंबईतील अनेक नामवंत शाळा – छोटय़ा शाळा एकत्र येऊ लागल्या. चर्चा, बैठका आणि विचारांची देवाणघेवाण होऊ लागली आणि नितांत सुंदर बालनाटय़ांची निर्मिती होऊ लागली! स्पर्धेमुळे नाटय़निर्मितीचा स्तर उंचावला! एकाच ठिकाणी चार-पाच शाळांतील मुलांना चार-पाच उत्तम नाटकं पाहता येऊ लागली. निकोप स्पर्धेमुळे बक्षिसे मिळवून मुलांचा आत्मविश्वास द्विगुणित होत गेला!

यात नाटकाच्या संहितेला खूपच महत्त्व होतं. नाटक करताना नि ते पाहताना मिळालेल्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार व्हावेत असा उद्देश असे. नाटिकेचं लेखन सहज, सोप्या, ओघवत्या भाषेत असे. नाटक बसवता बसवता मुलांचं पटकन पाठ होऊन जाई.

मुलांचं नाटक बसवणं हा एक मस्त अनुभव असतो. बालनाटय़ाचं लेखन पूर्ण झालं की त्यात किती पात्रे आहेत, त्या पात्राचं काम करायला योग्य विद्यार्थी कोणता? या मुलांची निवड करणं. ‘ज्यांना नाटकात भाग घ्यायचा आहे त्यांनी हॉलमध्ये जमा’ म्हणताच दहा – बारा पात्रांसाठी पन्नास एक मुलं जमायची! या मुलांकडून संहितेतील थोडय़ा भागाचं वाचन घेऊन शेवटी दहा-पंधरा मुलं निवडायची. पुन्हा एकेक पात्राच्या गरजेनुसार यातून कोण योग्य ठरतंय याचा विचार – त्यात त्या भूमिकेला योग्य शरीरयष्टी, सुस्पष्ट आवाज, चेहऱ्यावरील भाव या प्राथमिक गोष्टी पाहायच्या! इतकं करूनही एक-दोन भूमिकांसाठी योग्य विद्यार्थी नसेल तर पुन्हा शाळेत इतर वर्गात शोधून ते पात्र मिळवायचं! अशी प्राथमिक निवड झाली की या मुलांबरोबर पूर्ण नाटिकेचं वाचन व्हायचं! मग कोणाला कोणती भूमिका, त्याने ती कशी करायची, संवाद कसे म्हणायचे, हावभाव, अ‍ॅक्शन कशा करायच्या हे सारे क्रमाक्रमाने शिकवायचे.

खरं सांगायचं तर या निवडीपर्यंतही मुलं बरंच काही शिकतात. एक तर ज्यांची निवड होते त्यांना आनंद होतो. अभिमान वाटतो. ‘आपल्याला बाईंनी नाटकात घेतलेलं’ याचं अप्रुप! त्याच वेळी निवड न झालेल्यांना आपण पुढील वेळी काय सुधारणा केली पाहिजे हेही कळतं.

नाटकाच्या तालमी सुरू होतात तेव्हा प्रत्येक जण हातात आपापलं स्क्रिप्ट घेऊन मोठय़ा विश्वासाने तयार असतो. हळूहळू तालमींमुळे  नाटक आकार घेऊ लागतं. तेव्हा या मुलांच्या व्यक्तिरेखा खरोखरच नाटकात इतक्या एकरूप होतात की अगदी ती भूमिका जगणं म्हणजे काय ते यांच्याकडून शिकावं. त्या नाटकातून मिळालेले विचार अगदी सहज त्यांच्यात झिरपतात. चांगल्या विचारांचं सोनं होतं.

आपल्या बरोबरच्या मुलांना मदत करणं, कुणी चुकलं तर सांभाळून घेणं, नाटकाच्या यशासाठी मनापासून धडपणं चालू असतं. आत्मविश्वास वाढणं, आत्मभान येणं, संवादकौशल्य वाढणं, संवादफेकीतून आवाजाचा पोत सुधारणं आणि सहकार्याची भावना यातून खरोखरीचा विकास होत असतो. तालमींमुळे बुडालेला अभ्यास नंतर आपला आपणच भरून काढायचा आहे. ही जबाबदारीची जाणीव होते.

नाटक सादर होताना तर प्रेक्षागृहातील आपल्या समोरच्या एवढय़ा बालप्रेक्षकांना आपण आनंद देतोय ही भावना खूपच समाधान देते. समोरचे बालप्रेक्षकही आपल्या दादा-ताईच्या नाटकात दंग होतात. नाटकातील संवाद एकाग्रतेने ऐकतात, योग्य तिथे टाळ्या देतात, गाणी, संगीत असेल तर ताल धरतात. नाटक संपून पडदा पडताच नाटय़गृह डोक्यावर घेतात. हा अवर्णनीय आनंद, उत्साह या बालांचा कोणता विकास घडवीत असेल हे वेगळं सांगायला नको! अशी ही बालनाटय़ं सतत व्हावीत! होतच राहावीत. विविध कला अशा मुलांच्या आयुष्यात जितक्या लवकर येतील तेवढा त्यांचा विकास लवकर तसेच वैविध्यपूर्ण होईल यात शंकाच नाही.

प्रतिभा निमकर

chaturang@expressindia.com

 

 

 

First Published on June 3, 2017 4:19 am

Web Title: child development from child dramatic play