काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ पाहण्यात आला. आजकाल काही कॉपरेरेट कंपन्या एक नवीन फंडा राबवीत आहेत. ऑफिस सुरू होण्याच्या वेळेला किंवा ब्रेकच्या वेळेमध्ये सगळे एकत्र येतात आणि गाणी लावून पाच-दहा मिनिटं मनसोक्त नृत्य करतात. या कल्पक व जरा हटके पद्धतीमुळे अनेक चांगले बदल कंपनीमध्ये पाहायला मिळत आहेत.

आजकालच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळे घडय़ाळाच्या काटय़ावर धावत असतो, डोक्यावर प्रचंड तणाव घेऊन काम करीत असतो. या धकाधकीच्या दिनक्रमात बरेचदा कळत नकळत आपले आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत जाते! कोणतेही काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची साथ असणे फार महत्त्वाचे आहे. हेच अनेक मोठय़ा कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सिद्ध झालेय, त्यामुळे या नव्या पद्धतीचा वापर कंपन्यांमध्ये करण्यात येत आहे. कामातून वेळ काढून, थोडा वेळ सगळ्यांनी एकत्र येऊन ‘डान्स’ केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते, कंटाळा झटकून परत काम करण्याची ऊर्जा मिळते, पूर्णवेळ संगणकासमोर बसून काम करण्यातून एक ब्रेक मिळतो आणि सगळ्यांनी एकत्र येऊन नृत्य केल्याने ऑफिसमध्ये एक प्रकारचे आनंदी, उत्साही वातावरण तयार होते. तणाव व कंटाळा कमी झाल्यावर काम केल्याचा चांगला परिणाम दिसून येतो; परिणामी याचा फायदा कंपनीला होतो!

या वर्षी १० ऑक्टोबरला जगभर साजरा केल्या गेलेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची ‘थीम’ सुद्धा ‘कार्यालयातील मानसिक स्वास्थ्य’ अशी ठरवली होती. कामाचा प्रचंड तणाव, ऑफिसमधील स्पर्धा, वाढत चाललेला कामाचा व्याप; या सगळ्या गोष्टींचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. त्या अनुषंगाने आधी उल्लेख केलेला कल्पक, नृत्याचा मार्ग हा मानसिक तणाव दूर करण्यास नक्कीच फायदेशीर उपाय ठरत आहे.

मागील दोन लेखांमध्ये सर्वागीण विकासासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी नृत्याचा कशा प्रकारे उपयोग होतो याचा आपण आढावा घेतला. आज आपण नृत्यकलेचा मानसिक आरोग्य टिकवून ठेवायला कसा उपयोग होऊ शकतो; त्याबद्दल जाणून घेणार आहोत. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. सुखी, समाधानी व निरोगी आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे. शरीर व मनाचा घनिष्ठ संबंध आहे आणि या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर पूरक परिणाम होत असतो. त्यामुळे शारीरिक आरोग्याकडे लक्ष देताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत नाही ना, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकल्यापासून अनेक गंभीर शारीरिक आजारांसाठी आपण उपचार घेतो, शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी व्यायाम, आहार यांकडे लक्ष देतो. मात्र तितकेसे लक्ष मानसिक आरोग्याकडे दिले जात नाही. त्याबद्दल मनमोकळेपणाने बोलण्याची सुद्धा अनेकांना लाज वाटते. त्यामुळे नैराश्य, आत्महत्या, इतर मानसिक आजार त्यांच्या सुरुवातीच्या काळात दुर्लक्षित केले जातात आणि योग्य उपचार न घेतल्याने त्यांचा जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही काही गोष्टींचा नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. समुपदेशनाबरोबरच चांगली कलाकृती पाहणे, वाचन करणे, काही कला जोपासणे, बाहेर फिरायला जाणे, प्राणायाम व योगासने, मनातील भावना व्यक्त करणे अशा अनेक गोष्टींमधून मनावरील ताण हलका होण्यास मदत होते. नृत्यकलेचा मानसिक आरोग्यासाठी मोठय़ा प्रमाणावर व विविध ठिकाणी वापर होत आहे आणि नृत्यकला मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

मी, अनेकदा कामाचा किंवा इतर वैयक्तिक आयुष्यातील ताण, थकवा नृत्यवर्गाला गेल्यावर विसरून जाते. नृत्य केल्यानंतर मन ताजेतवाने होते, राग शांत होतो आणि विविध गोष्टींवर शांतपणे विचार करण्याची संधी मिळते. असाच अनुभव अनेक लोकांना येत असतो आणि म्हणूनच अनेक जण कामाच्या, आयुष्याच्या धावपळीत सुद्धा नृत्याचा वर्ग चुकणार नाही याचा प्रयत्न करताना दिसतात.

लहानपणापासून नृत्य शिकायला सुरुवात केली तर नृत्यातून ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे अनेक पैलू आपोआप शिकायला मिळतात. नृत्य शिकताना कधी कधी एखादी गोष्ट शिकायला जास्त वेळ लागतो, स्पर्धामध्ये भाग घेतल्यावर हारजीत अनुभवयाला मिळते, रंगमंचावर सादरीकरणाच्या आधी पोटात गोळा येतो. पण या सगळ्यांमध्ये आपला सराव चालू ठेवून, ध्येय निश्चित करून मेहनत करण्याची सवय लागते. लहानपणी अभ्यास व नृत्य या दोन्ही गोष्टींना योग्य वेळ दिला तर, वेळेच्या नियोजनाचीही सवय होते आणि या गोष्टी पुढील जीवनात फायदेशीर ठरतात. आलेल्या एखाद्या अपयशाने किंवा नृत्यात झालेल्या दुखापतीने खचून न जाता आपण नव्या जिद्दीने पुन्हा नृत्य करण्याची उभारी घ्यायला शिकतो. रंगमंचावर सादरीकरण केल्याने भीड चेपली जाते व आत्मविश्वास वाढायला मदत होते. पुढे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात या अनुभवांची शिकवण मदतीस येऊ शकते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणालाही नृत्य केल्यावर, ‘कसं वाटतंय?’ असे विचारले तर बहुतांश वेळा, ‘हलकं वाटतंय’, ‘‘मस्त वाटतयं,’’ अशीच उत्तरे ऐकायला मिळतात. नृत्यामुळे मनावर होणाऱ्या चांगल्या परिणामांमागे तशी वैज्ञानिक कारणांची जोडसुद्धा आहे! नृत्यावर केल्या गेलेल्या वैज्ञानिक चाचण्यांमध्ये असे सिद्ध झालेय की नृत्य केल्यावर मेंदूमध्ये ‘एंडोर्फिन’ (endorphin) संप्रेरक स्रवतात. हे संप्रेरक ‘हॅपी हॉर्मोन’ म्हणून ओळखले जाते. आनंद वाटण्याच्या भावनेसाठी एंडोर्फिन संप्रेरक काम करते, तसेच त्यामुळे मूड चांगला होण्यास हातभार लागतो. त्यामुळे नृत्यामुळे मेंदूत स्रवत असलेल्या ‘हॅपी’ हॉर्मोनमुळे, नृत्य केल्यावर मन आनंदी होते आणि मूड सुधारतो! तसेच नृत्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन, नॉन एपिनेफ्रिन, डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरची पातळी वाढण्यास मदत होते, परिणामी निराशा, दु:ख कमी होण्यास मदत होते. कारण या न्यूरोट्रान्समीटरची पातळी नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये घटलेली दिसून येते. नृत्य शिकून सादरीकरण वा सराव करण्यातून आनंद तर मिळतोच पण त्याचशिवाय नृत्योपचार पद्धतीमध्ये नृत्याचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्यामुळे नृत्योपचारामध्ये नृत्य शिकून त्याचे सादरीकरण करणे हे उद्दिष्ट नसते; तर शारीरिक हालचालींचा भावनिक पातळीवर मेळ साधून, मानसिक उपचारांसाठी नृत्याचा वापर केला जातो. लहान मुलांमध्ये स्वमग्नता, चंचलपणा मतिमंदता इत्यादी गोष्टींसाठी तसेच मोठय़ा व्यक्तींमध्ये नैराश्य अतिचिंतेचा विकार, नातेसंबंधातील तणाव; याचबरोबर मेंदूचे-कंपवात, अर्धागवायू, स्मृतिभ्रंश अशा आजारांसाठीही नृत्योपचाराचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. नृत्यामुळे शरीर व मन यांचे संतुलन सुधारण्यास मदत होते, हाच नृत्योपचार पद्धतीचा पाया समजला जातो. लहानपणापासून नृत्याची आवड असल्यास मुलांना नृत्याचे प्रशिक्षण दिले तर सुदृढ शरीर व मन जपण्यासाठीही मुलांना मार्गदर्शन मिळू शकेल. निश्चितच त्याचा फायदा पुढील आयुष्यात निरोगी आयुष्य जगण्यासाठी होऊ शकेल.

आजकाल तरुण पिढीसुद्धा तणाव कमी करण्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी नृत्याचा मार्ग निवडताना दिसत आहे. तसेच मेंदू, मन व शरीर स्वास्थ्यासाठी वृद्धांमध्येही नृत्याचा अवलंब केल्याचे निदर्शनास येत आहे. नृत्याच्या अनेकविध फायद्यांबद्दल लोक, जागरूक होताना दिसत आहेत; हा नक्कीच आशादायी बदल समाजात घडत आहे. कुठलाही मानसिक आजार असला किंवा नसला तरी मानसिक स्वास्थ्यासाठी नृत्यासारखा उपाय अवलंबून बघायला काहीच हरकत नाही. शरीराएवढीच मनाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यासाठी जरा नृत्याच्या लयीवर थिरकायला विसरू नका! ‘किप डान्सिंग, किप स्माइलिंग, स्टे मेंटली फिट!’

तेजाली कुंटे

tejalik1@gmail.com