15 October 2019

News Flash

नाटक कुमारांचं

गेल्या अंकात (२९ एप्रिल) प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या नाटकाचा विचार केला.

मुलं जशी वेगवेगळी नाटकं पाहू शकतात तसंच ते नाटक लिहायला सुरुवातही करू शकतात

कुमार वयोगटातल्या मुलांची संवेदनशीलता जिवंत राहील असं नाटक त्यांना नक्की आवडू शकतं. या वयोगटातली मुलं जशी वेगवेगळी नाटकं पाहू शकतात तसंच ते नाटक लिहायला सुरुवातही करू शकतात. कारण रचना कौशल्य त्यांना जमू शकतं आणि आवडूही शकतं. व्यक्त होण्यासाठी, मनात नेमकं काय वाटतं हे मांडण्यासाठी नाटक हे एक प्रभावी माध्यम आहे याची जाणीव त्यांना होऊ शकते.

गेल्या अंकात (२९ एप्रिल) प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या नाटकाचा विचार केला. या वयोगटातल्या मुलांसाठी आपल्याकडे मराठीत फार मोजकी पण चांगली पुस्तकं आहेत. माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, शैलजा राजे, स्वाती राजे अशी काही मंडळी सातत्यानं लिहित आहेत. त्यांच्या साहित्याचा, गोष्टींचा आणि काही परदेशी भाषांतून अनुवादित केलेल्या गोष्टींचा साठा आपल्याकडे निश्चित आहे. त्याच्यावर आधारित, त्यातला नाटय़मय भाग शोधून काढत या वयोगटातल्या मुलांसाठी सुंदर नाटकं होऊ  शकतात. तसंच, या पुढचा वयोगट म्हणजे पाचवी- सहावी- सातवीतली मुलं. माध्यमिक शाळेत जाणारी. त्यांच्यासाठीही नाटकांचा पूर्ण दुष्काळ आहे.

प्राथमिक शाळेतल्या मुलांसोबत सातत्यानं संवेदनशीलतेच्या पातळीवर काम केल्यावर, त्यांना वाचनाची गोडी लागल्यावर, निरीक्षणाची सवय लावल्यावर आणि अक्षरं, शब्द, भाषा यांची गंमत खेळून झाल्यावर नाटकाकरता ही मुलं तयार असू शकतात. मातीत, चिखलात नुसताच धुल्ला करण्यातली मज्जा थोडी मागे पडायला सुरुवात होते आणि तीच माती, तोच चिखल वापरून किल्ला बांधण्याची, छोटय़ा छोटय़ा गोष्टी करून बघण्याची अक्कल यायला लागते असं वय. सध्याच्या पिढीला तर तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित वस्तू हाताळणे, त्यात नवे प्रयोग करणे हे डाव्या हाताचा मळ आहे. ते आता यंत्रांशी खेळू शकतात. थोडक्यात, ही माध्यमिक शाळेत जाऊ  लागलेली मुलं, त्यांना जग मोठं आहे हे कळायला सुरुवात झालेली असते. ते व्यवहारी आणि क्रूर आहे याचेही अनुभव येत असतात. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तयार होऊ  लागलेली असते आणि त्याच वेळी इतर अनेक नवे विषय, नव्या गोष्टी कळत, समाजत असतात, ओळखीच्या होतात. भाषा वळवता, वाकवता यायला लागते. काही धक्कादायक गोष्टीही समजू लागतात. शरीर आणि बुद्धी दोन्ही झपाटय़ानं वाढत असतं.

अशा मुलांसाठी त्यांच्या आजूबाजूचे विषय, ज्यात माणसं, त्यांचे परस्पर नातेसंबंध, निसर्ग, निसर्गातली गुंतागुंत, माणूस आणि त्याचं पर्यावरण (म्हणजे निसर्ग-झाडं, प्राणी, पक्षी इतकंच नाही तर भवताली जे जे आहे ते सगळं) यांचा परस्परसंबंध असे अनेक विषय येऊ  शकतात. कल्पनेच्या भराऱ्या घेण्याबरोबरच वास्तव, त्यांचं मन समजून घेणारे विषय आणि गोष्टीही असू शकतात. त्यांना प्रश्न पाडणाऱ्या, बुचकळ्यात टाकणाऱ्या किंवा कोडय़ात ठेवणाऱ्या गोष्टीही आवडतात. कारण, त्यांना त्यांची बुद्धी चालवायला आवडते. त्यातलं आव्हान त्यांना समजलेलंही असतं आणि पेलणारंही असतं. नव्या गोष्टींचा शोध लावायला आवडतं, शंका विचारायला आवडतात, प्रश्न विचारायला तर खूपच आवडतं.

म्हणूनच की काय, ‘का का कुमारी’ सारखी महाश्वेतादेवींची गोष्ट ग्रामीण/आदिवासी भागातील वास्तवाचं चित्रण करणारी असूनही शहरातल्या माध्यमिक शाळेतल्या मुलांनाही तितकीच आपलीशी वाटते. कारण त्यातली नायिका, मोयाना नावाची मुलगी सतत सगळ्यांना प्रश्न विचारते. ‘अमुकच का?’, ‘ढमुकच का?’ असं विचारायला ती अजिबात घाबरत नाही. आदिवासी घरातली ही मुलगी. शिक्षणाची कुठलीही पाश्र्वभूमी नाही. परिस्थितीमुळे कष्टमय आयुष्य जगणाऱ्या तिच्या आई-वडिलांकडे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत आणि काही प्रश्नांची उत्तरं ते टाळतात. जंगलात बकऱ्यांमागे पायपीट करताना तिचं डोकंही चालतं. ती डोळे उघडे ठेवून जगाकडे बघते. रानातले, गावातले सगळे गंध तिला जाणवतात. ती सगळे आवाज टिपते. आणि सगळं स्वीकारण्याकरता मन मोकळं ठेवते. त्यामुळेच तिच्या मनात प्रश्न तयार होतात. पण गावातल्या लोकांनाही तिच्या प्रश्न विचारण्याचा त्रासच होत असावा किंवा त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच कधी शोधली नसावीत. मोयानाला न थकता, न चिडता उत्तरं देणारी एकच व्यक्ती भेटते. तिची शिक्षिका (गोष्ट सांगणारी लेखिकाच). मग ती चक्क घर सोडून त्या शिक्षिकेबरोबरच राहू लागते आणि तिथे राहायला गेल्यावर तिला सापडतो पुस्तकांचा खजिना. आता मोयानाला तिच्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकांतून मिळायला लागतात. अर्थातच, त्यासाठी ती तळमळीनं शिक्षण घेते आणि मग एके दिवशी ज्या शाळेत ती शिकते त्याच शाळेत शिकवू लागते. पण.. आता.. ती तिच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याकरता प्रोत्साहन देते.

एका लेखिकेनं तिच्या दृष्टिकोनातून एका छोटय़ा मुलीचा आलेला हा विलक्षण अनुभव सहज, सोप्या शब्दांत मांडलाय. ज्या वयोगटातल्या मुलांचा आपण इथे विचार करत आहोत त्यांना ही गोष्ट आपलीशी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. कारण, ग्रामीण असो वा शहरी भाग, बहुतेक मुलांच्या वाटय़ाला हे येत नाही. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीच जात नाहीत (मग आता आजच्या पिढीतली मुलं गुगलचा आधार घेतात. हवी ती माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं मिळवतात; तर त्याही विषयी मागची पिढी तक्रार करते.). एकतर त्यांना, प्रश्न विचारू नका असं सरळ सांगितलं, सुचवलं जातं किंवा दिशाभूल करणारी उत्तरं दिली जातात. या पलीकडे, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं, आपला शिक्षक आपला मित्र असणं, प्रत्येक गोष्टीला ‘का?’ विचारण्याचं स्वातंत्र्य असणं (त्यासाठी ‘उर्मट’, ‘आगाऊ’ असे शिक्के न बसणं) हे सगळं स्वप्नवतच आहे आणि हवंहवंसं. त्यामुळे या गोष्टीशी मुलं नकळत जोडली जातात.

तर या वयोगटातल्या मुलांची संवेदनशीलता जिवंत राहील असं नाटक त्यांना नक्की आवडू शकतं. शिवाय रचनाही थोडीशी गुंतागुंतीच्या असू शकतात. म्हणजे, सरळ, ढोबळ आणि थेट असण्यापेक्षा ती वळण घेत, सुचवत आणि विचार करायला लावत पुढे जाऊ  शकते. या मुलांना स्थळ-काळाचं ही भान नीटच येऊ  लागलेलं असतं आणि त्यांचा गोंधळ उडाला तरी ती कावरीबावरी होत नाहीत. त्यामुळे नाटकाची गोष्ट मागच्या-पुढच्या काळात हलत राहिली तरी त्यांना त्याची संगती लागते. तात्काळ नसेल तरी त्यावर विचार करून ती लावून घेऊ  शकतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी आणि समोर चालू असलेला नाटकातला प्रसंग याची संगती त्यांच्या मनात लागत असते. किंबहुना बऱ्याचदा, प्राथमिक शाळेतल्या मुलांचा विचार करून बसवलेल्या नाटकातील प्रसंगाचा ढोबळपणा त्यांना पसंत पडला नाही असं होऊ  शकतं. ‘आपण आता मोठे झालेलो आहोत’ ही जाणीवही मूळ धरू लागलेली असते.

आपण मात्र या वयोगटातल्या मुलांना नेमकं किती आणि काय कळत असेल या संभ्रमात असतोच. पण खरंतर, या वयातल्या मुलांना मोठय़ांची नाटकंही दाखवली पाहिजेत. कदाचित त्यातला काही भाग त्यांना समजणार नाही; समजेल पण त्याचं नेमकं भान येणार नाही. तरीही त्यांच्या मेंदूमध्ये त्या वरची प्रक्रिया नक्की सुरू होत असते आणि ती होऊ  दिली पाहिजे.

या वयोगटातली मुलं जशी वेगवेगळी नाटकं पाहू शकतात तसंच ते नाटक लिहायला सुरुवातही करू शकतात. कारण या आधी उल्लेख केल्याप्रमाणे रचना कौशल्य आता त्यांना जमू शकतं आणि आवडूही शकतं. व्यक्त होण्यासाठी, मनात नेमकं काय वाटतं हे मांडण्यासाठी नाटक हे एक प्रभावी माध्यम आहे याची जाणीव त्यांना होऊ  शकते.

सोनाळ्यामध्ये ‘तारपा’साठी काम करत असतानाचा एक छोटासा अनुभव. नाटक उभं करत असताना मला एका प्रसंगात, नाटकातल्या एका व्यक्तिरेखेला दुसऱ्या व्यक्तिरेखेचा राग येणं अपेक्षित होतं. पण ती व्यक्तिरेखा साकारणारा आमचा नट, त्याला राग व्यक्तच करता येत नव्हता. म्हणजे, तो फक्त वाक्य बोलत होता. रागावत नव्हता. मीही वैतागलो. हरतऱ्हेनं त्याला समजावलं तरीही तो राग व्यक्त करू शकला नाही. मग मी त्याला विचारलं, ‘‘तुला स्वत:ला दुसऱ्याच्या कुठल्या गोष्टीचा राग येतो?’’ त्यावर त्यानं काही वेळ आठवायला घेतला, मग म्हणाला, ‘‘नाही, मला दुसऱ्याच्या कुठल्या गोष्टीचा राग आलाय असं कधीतरीच होतं. मला कशाचाच राग येत नाही.’’ मला त्याचा हेवाही वाटला आणि आश्चर्यही.

तर.. नाटक करताना आपल्याला कलाकार म्हणून भावना समजून घ्यावी लागते. ती तशी, तितक्या तीव्रतेची का आहे? या मागचं कारणही समजून घ्यावं लागतं. वेगवेगळ्या प्रसंगांचा अनुभव येतो जे आपण कधीच अनुभवलेले नसतात. त्या प्रसंगांमध्ये त्या त्या स्वभावाची व्यक्ती वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ शकते. एकाच कृतीला प्रत्येकाचा वेगळा प्रतिसाद असू शकतो; नव्हे असतोच. याचं भान प्रकर्षांनं येतं. त्यामुळे सहभावना तयार व्हायला मदत होते. जी एरवी जगतानाही आवश्यक आहे आणि आता दुर्मीळ होत चालली आहे.

पाचवी ते सातवी या वयोगटांतच अशा प्रकारच्या देवाण-घेवाणीला सुरुवात झाली तर पुढे जाऊन ‘वयात’ आल्यानंतर आपल्या आजूबाजूचं, इतरांचं जगणं समजून घेणं थोडं सोपं जातं. भेद, भेदामुळे निर्माण होणारे रोगट विचार, विकार याचा निदान पुनर्विचार करावासा वाटतो आणि ते ही नाही तर निदान आपण कसा विचार करतो याचं आपलं आपल्यालाच भान यायला मदत होते.

माझा वैयक्तिक अनुभव अगदी असा आहे. या वयात मी असतानाच मला पुस्तकं आपल्याला काय देतात ते कळलं. आपल्या आजूबाजूला असलेल्या, नसलेल्या माणसांमधली, निसर्गामधली विविधता कळली किंवा निदान ती डोळे उघडे ठेवून पाहावीशी वाटली. आणि याला एक महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे नाटक.

जे अनुभव मला प्रत्यक्ष घेता आले नाहीत, जी माणसं माझ्या वर्तुळात मला कधी भेटली नाहीत, जो विचार सहजपणे माझ्या डोक्यात कधी आला नाही, जी भावना मला अनुभवायला मिळाली नव्हती ते सगळं मला नाटकानं दिलं. माझा परीघ वाढवला आणि माझं निरीक्षण असं आहे की कमी जास्त प्रमाणात हे प्रत्येकाचंच होतं. याशिवाय माझ्या अव्यक्त भावनांचा निचरा नाटकांतूनच झाला. मला निश्चितपणे वाटतं की हेच वय आहे जिथे माणूस म्हणून माझी वाढ होणार असते, त्या वयात नाटक माझ्या आयुष्यात आलं पाहिजे.

चिन्मय केळकर ckelkar@gmail.com

First Published on May 20, 2017 1:44 am

Web Title: drama for adolescents to keep sensitivities in children