19 October 2019

News Flash

सर्जनशील आनंद

प्रत्येक मुलाची चित्रकला वेगळ्या प्रकारे फुलणार असते आणि तेच नैसर्गिक आहे

चित्रसाहित्याची टापटीप, नीटनेटकेपणा, इतरांना अर्थ लागेल अशी चित्ररचना या मुलांच्या दृष्टीने अत्यंत गौण गोष्टी असतात. मुलांनी आपली सर्व ऊर्जा त्या चित्रात वापरलेली असते. या चित्र काढण्याच्या अनुभवातून मुलांना असंख्य नव्या गोष्टी सुचणार असतात आणि मूल अधिकाधिक सर्जनशील, आनंदी होणार असतं. त्यासाठी बालचित्रकलेत विकासाचे पाच टप्पे समजून घेणं गरजेचं आहे.

लहान मुलं म्हणजे मोठय़ांची छोटी प्रतिकृती नाहीत, हे लक्षात येतं तेव्हा त्यांच्यातील कलागुणांकडेही वेगळ्या दृष्टीने बघणं अत्यावश्यक होऊन जातं. मोठय़ांना असणारी चित्रकलेची भीती, वास्तववादी चित्रकलेतून होणारं कारागिरीचं प्रदर्शन, चित्रांतून होणारी सांकेतिक अभिव्यक्ती, चित्राचा परिणाम उत्तमच असला पाहिजे याचं दडपण, अशा सर्व ‘अडल्ट’ आशयाच्या पडद्याआड दडलेली बालचित्रकला समजून घेण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी आपली नजर तयार करणं हा मुलांचा हक्क आहे. हा मुलांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी मोठय़ांनीच बाल चित्रकला खोलात जाऊन समजून घ्यायला हवी.

बालचित्रकलेत विकासाचे पाच टप्पे आढळतात. यालाच बालचित्रकलेतील विकासाच्या टप्प्यांचा सिद्धांत (डेव्हल्पमेंटल -स्टेज थिअरी) असं संबोधलं जातं. हे पाचही टप्पे नमूद केलेल्या क्रमानेच येतात; परंतु त्या टप्प्यांसाठी अचूक वयोमान सांगणं अवघड आहे. साधारण कुठल्या वयात हे टप्पे येतात हे अभ्यासलेलं असलं, तरीही सर्वच टप्पे प्रत्येक मूल पार करील असं नाही. काही वेळा असंही आढळून येतं की, बरीच मुलं प्रतीकात्मक चित्रांच्या पुढचा टप्पा कधीही गाठत नाहीत. जसं एका वयाच्या मुलांची शारीरिक वाढ वेगवेगळी असते तसंच त्यांचा मानसिक व सर्जनशील विकास वेगवेगळ्या गतीने होताना दिसतो. त्यामुळे एका वर्गाला एका वेळी एकाच प्रकारची चित्रं काढायला देऊन त्यावरून मूल्यमापन करणं हा मुलांवरील अन्याय आहे. प्रत्येक मुलाची चित्रकला वेगळ्या प्रकारे फुलणार असते आणि तेच नैसर्गिक आहे.

आता बालचित्रकलेतील विकासाचे टप्पे पाहू-

१. पहिला टप्पा आहे रेघोटय़ांचा –

मुलाचा जेव्हा हाताच्या स्नायूंवर ताबा येऊ  लागतो, पकड पक्की होते तेव्हा बालचित्रकलेचा पहिला टप्पा मूल अनुभवू लागतं. यात मूल हवे तसे ठिपके, रेघा यांचा वापर करून दिलेल्या पृष्ठभागावर जे उमटेल त्याची मजा लुटतं. ते पूर्ण झाल्यावर कसं दिसेल हा विचार त्यामागे अजिबात नसतो, तर प्रक्रियेचा आनंद लुटण्यासाठी, दोन वस्तू एकमेकांवर घासल्याने काय परिणाम साधतो हे पाहण्यासाठी मूल नैसर्गिकत: या रेघोटय़ा मारत असतं. यातही तीन टप्प्यांत रेघोटय़ा बदलत जातात.

अनियंत्रित किंवा मुक्त रेघोटय़ा.

नियंत्रित रेघोटय़ा म्हणजेच हव्या तशा, ठरवून रेघोटय़ा.

रेघोटय़ांना नावं देणं, त्यात आकार शोधणं.

रेघोटय़ांच्या टप्प्यात व्याख्येनुसार २ ते ४ या वयोगटातील मुलं येतात. त्यासाठी ही बाळं कुठलीही प्रतीकं, खुणा चित्रात वापरत नसतात. एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर काही तरी उमटतं आहे यातच त्यांना खूप निर्मितीआनंद मिळत असतो. मोठय़ा पृष्ठभागावर मोकळेपणाने हात हलवण्यातूनही मूल खूप आनंद शोधत असतं. अनेक वेळा ज्या मुलांना रंग साहित्य लवकर हाताळायला मिळतं, त्यांचा हा टप्पा खूप लवकर अगदी १० व्या महिन्यातही सुरू होऊ  शकतो. छोटय़ा बाळाला रंग साहित्य देताना ते तोंडात गेलं तरी दुष्परिणाम होणार नाहीत, ते विषारी नसेल ही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी खाद्यरंग, भाज्यांचे व फळांचे रंग आणि तेली खडू मोठय़ांच्या देखरेखीखाली – जेणेकरून मूल खडू, कागद तोंडात घालत नाही यावर लक्ष ठेवता येईल असे वापरावेत.

वेगवेगळ्या आकारांत रंग भरायची पुस्तकं या बाळांना अजिबात उपयोगाची नसतात, त्यामुळे ती मुळीच देऊ  नयेत. उलट त्यामुळे मुलांच्या सर्जनशीलतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. मोठ्ठे पृष्ठभाग जसं भिंती, जमीन, शक्य असल्यास मोठे कागद, जुनी रद्दी वर्तमानपत्र आणि मोठ्ठे, गडद रंग एवढंच मुलांना या काळात पुरेसं असतं. मुलांच्या या रेघोटय़ांना प्रतिक्रिया काय द्यायची, हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. ‘छान आहे’ असं म्हणून अजून चित्र काढायला संधी उपलब्ध करून देणं हे आवर्जून करावं. जबरदस्ती अजिबात नसावी, कारण एखादं मूल चित्र काढायला नकारही देऊ  शकतं. हे काय काढलंय? नुसत्या घाणेरडय़ा रेघोटय़ा नको काढू, असं अजिबात म्हणू नये. मुलाला जे करायचं आहे ते करून बघण्याची संधी मिळू द्यावी.

‘रेघोटय़ा’ हा शब्द नकारार्थी वापरण्याची आपली सवयही मोडायला हवी, कारण लहान मुलासाठी रेघोटय़ा ही अत्यावश्यक गोष्ट आहे. यातून मूल स्वत:हून असंख्य नव्या गोष्टी शिकत असतं. ‘बालिश’ हा शब्दही फार वेळा नकारार्थी वापरला जातो. प्रत्यक्षात लहान मुलांचे हे खास बालिश गुण केवळ मोठय़ांना त्याचं मूल्य न समजल्यामुळे हिणवले गेले आहेत असं वाटतं.

२. दुसरा टप्पा आहे नियोजनपूर्व चित्रांचा- आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तूंच्या प्रतिमा जेव्हा मुलाच्या चित्रात उमटू लागतात तेव्हा रेघोटय़ांमधून बाहेर पडून मूल छोटे छोटे प्रयोग करून नियोजित चित्रांकडे प्रवास करू लागतं. चित्रात अचूक नियोजन जमू लागण्यापूर्वीचे हे प्रयोग असतात. यात मूल त्याला/ तिला नेहमी दिसणाऱ्या विशिष्ट गोष्टी प्रतीकात्मक आकारांत दाखवू लागतं. यासाठी मूल रेघा, वर्तुळं, चौकोन, त्रिकोण अशा सोप्या भौमितिक आकारांचा वापर करतं. मुलांचा चित्रातून शिकण्याचा, शोधण्याचा, समजून घेण्याचा वेग इतका प्रचंड असतो की, चित्रातील प्रतीकं सतत बदलत राहतात. सुरुवातीच्या काळात सर्व आकृती या दिलेल्या पृष्ठभागावर कुठेही तरंगत असतात. एकाच बाजूने कागद धरून मूल चित्र काढेल असं नाही, तर कागदाच्या सर्व दिशांनी चित्रं काढलेली असतात. हळूहळू विखुरलेल्या विविध आकृतींना एका सरळ क्षितिजरेषेत काही मुलं रचू लागतात. या टप्प्यात मुलांना अजूनही एक आकृतिबंध असावा असं सुचलेलं नसतं.

या टप्प्याच्या शेवटी मुलांना ढोबळ मानवाकृती जमू लागतात. त्यात गोल, चौकोन, रेषा यांपासून बनलेली माणसं, त्यांचे बारकावे, मोजणी न आल्यामुळे हाताची आणि पायाची असंख्य बोटं, टकलू डोक्यावर काही केस, चेहऱ्यावरील दोन डोळे, एकच नाक आणि तोंड, हसरा चेहरा अशी बारीक निरीक्षणं चित्रात उमटू लागतात. प्रत्येक मूल वेगवेगळ्या पद्धतींनी मानवाकृती काढताना दिसतं, कारण त्यामागे त्या मुलाचा काही विचार असतो, निरीक्षण असतं, तर्क असतात.

बालचित्रकलेतील प्रत्येक टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे मोठय़ांनी मुलांच्या चित्रांची कधीही चेष्टा करायची नाही हे कायम ठरवलेलं असावं. आपल्या मुलाला स्वत:हून कित्येक गोष्टी किती सुंदर समजल्या आहेत याचं कौतुक करण्यासाठीची चित्र ही सुंदर संधी असते. चित्रसाहित्याची टापटीप, नीटनेटकेपणा, इतरांना अर्थ लागेल अशी चित्ररचना या मुलांच्या दृष्टीने अत्यंत गौण गोष्टी असतात. मुलाने आपली सर्व ऊर्जा त्या चित्रात वापरलेली असते. या चित्र काढण्याच्या अनुभवातून मुलाला असंख्य नव्या गोष्टी सुचणार असतात आणि मूल अधिकाधिक सर्जनशील, आनंदी होणार असतं.

छापलेल्या चित्रांमध्ये रंगभरण करायला दिल्याने मुलाचं अक्षरवळण चांगलं व्हायला पुढे मदत होईल म्हणून आकारात रंग भरायला चित्र देऊन सर्जनशीलता मारून टाकू नये. केवळ भरपूर विक्री या एकमेव उद्देशाने बाजारात आलेल्या पुस्तकांचा मारा मुलांवर करून मुलाच्या सर्जनशक्तीचा बळी देऊ  नये. अक्षर चांगलं येण्यासाठी मुलांना कातरकाम, साधं धावदोऱ्यासारखं शिवणकाम, इतर कार्यानुभवाच्या कृती, हस्त-नेत्र समन्वयाच्या कृती यांचा जास्त चांगला उपयोग होतो. चित्रातून मुलाला हवं ते, हवं तसं काढून बघायची मुक्त संधी मिळायला हवी. या वयात चित्रांना विशिष्ट आकारांत बांधायला गेलं तर मुलाचं खूप मोठं नुकसान होतं, ते कटाक्षाने टाळलं पाहिजे. मूल मोठं झाल्यावर आवड असेल तर आकारात सुंदर रंग नक्की भरू शकेल.

हा दुसरा टप्पा साधारणत: वय वर्षे ३ ते ७ या दरम्यान केव्हाही बघायला मिळतो. नियोजित आकृतिबंध काढता येण्याइतकी समज मुलात अजून निर्माण व्हायची असते. चित्र हे अभिव्यक्तीचं सुंदर माध्यम आहे. मुलाचा चित्रातील प्रवाही संवाद शाबूत ठेवण्यासाठी मुलाला संपूर्ण मोकळीक मिळणं फार आवश्यक आहे. अनेक शाळांमध्ये जिथे अंतिम निकालावर भर दिला जातो तिथे बालचित्रकलेतील विकासाचे टप्पे पूर्णपणे डावलले जातात, त्यामुळे मुलांचं खूप नुकसान होत आहे. स्पर्धेच्या युगात आपली मुलं शांत, समाधानी, आनंदी होण्यासाठी कलेचा मोठा आधार मुलांना मिळावा यासाठी धडपड करायची गरज आहे.

पुढील तीन टप्पे पुढच्या लेखात बघू.

आभा भागवत abha.bhagwat@gmail.com

First Published on January 28, 2017 2:05 am

Web Title: five stages in child painting development