15 October 2019

News Flash

नियोजित ते वास्तववादी चित्र

या वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही.

स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. ते समजून घेणं गरजेचं आहे.

बालचित्रकलेतील टप्पे हे सर्वाना माहीत असणं आणि पालक व शिक्षकांनी मुलाचं निरीक्षण करताना ते लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं ठरतं. एकाच वर्गातील दोन समवयस्क मुलं वेगवेगळी चित्रं का काढतात हे समजून घेण्यात याचा उपयोग होतो. एखादं मूल त्या टप्प्याच्या ढोबळ आराखडय़ापेक्षा खूपच निराळं काही करत असेल तर ते लक्षात येणं आणि त्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळणं हेही यातून घडू शकतं किंवा आपलं मूल कसं सर्वसामान्य आहे हेही समजू शकतं. ‘तारे जमीं पर’मधल्या ईशानच्या पात्राप्रमाणे एखादा जन्मजात चित्रकार असेल तर ते वेळीच लक्षात आलेलं केव्हाही चांगलंच ना? बालकाची नैसर्गिक वाढ – शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बोधनिक तसंच सांस्कृतिक पाश्र्वभूमी आणि मिळणारं शिक्षण अथवा प्रशिक्षण या सर्वाचा बालचित्रकलेवर मोठा प्रभाव असतो.

बालचित्रकलेतील तिसरा टप्पा ‘नियोजित चित्र’ या नावाने ओळखला जातो. यामध्ये मूल स्वयं ऊर्मीने काही प्रतीकं चित्रित करू लागतं. ही प्रतीकं म्हणजे मुलाच्या मनात, डोक्यात जे विचार चालू आहेत त्यांचं दृश्य प्रदर्शनच असतं. तुम्ही पाहिलं असेल की सातव्या वर्षांच्या आसपास अनेक मुलं एकाच प्रकारची असंख्य चित्रं पुन:पुन्हा अथकपणे काढतात. बुजगावणं वाटावं असे हातपाय, ताठ असणाऱ्या असंख्य मानवाकृती किंवा मोटारी आवडत असतील तर मोटारीच, विमानं आवडत असतील तर विमानंच, असं नियोजन चित्रात दिसतं. मुलांची निरीक्षणशक्ती या वयात वाढलेली असते, त्यांना प्रश्न पडत असतात, उत्तरं सापडत असतात. हा सर्व सृजनाचा खेळ त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत असतो. माहितीमध्ये एक महत्त्वाची भर पडलेली असते ती म्हणजे आपण आईच्या पोटात होतो. आणि आजूबाजूच्या अनेक गर्भवती आया आणि प्राणी यांचं निरीक्षण मूल करू लागतं. आपल्या डोळ्याला दिसत नाहीत अशा कित्येक गोष्टी या जगात आहेत याची जाण हळूहळू याच वयात येऊ लागते. आणि त्याची विलक्षण चित्र अभिव्यक्ती म्हणून मूल एक्स-रे चित्र काढू लागतं. मोठय़ा माशाने खाल्लेले छोटे मासे, मोठय़ा प्राण्याच्या पोटात छोटा प्राणी, प्राणी आणि आत सांगाडा, झाडाच्या खोडामध्ये किडय़ांचं घर, मातीच्या खाली लपलेली झाडाची मुळं, मुंग्यांच्या वारुळाच्या आतली रचना असे मजेदार विषय मुलं हाताळू लागतात.

अजून एक निरीक्षण असं आहे, की स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. एका मुलाला समुद्राच्या तळाशी काय असतं याची खूप उत्सुकता असे. काही पुस्तकांतून, गोष्टींतून, फिल्म्समधून त्याने ते समजून घेतलं होतं. आणि जवळजवळ तीन र्वष तो फक्त समुद्राखालचे वेगवेगळे मासे काढत होता. मित्रांसोबतही याच गप्पा होत आणि असं लक्षात आलं की त्याच्या मित्रांचा पाच- सहा जणांचा गट चित्रात फक्त मासेच काढत असतो आणि माशांची माहिती गोळा करकरून एकमेकांना सांगत असतो. ही नुसती उत्सुकता किंवा आकर्षण नव्हतं. रागावणाऱ्या मोठय़ा माणसांची भीती, अंधाराची भीती, खोल पाण्याची भीती आणि न समजणारी असंख्य प्रकारची भीती यांवर वर्चस्व मिळवायचा तो चिमुकला प्रयत्न होता. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. या स्वयंउपचाराच्या चित्रपद्धतीत ‘हे काय तेच तेच चित्र काढतोयस’ असं म्हणून आपण त्या मुलाने शोधलेल्या थेरपीला नाकारत असतो. त्यामुळे त्या मुलाला हवी तशी चित्रं काढू देण्याचं स्वातंत्र्य मिळालं तरच आपोआप ते मूल स्वत:ची काळजी स्वत: कशी घ्यायची हे शोधून काढतं आणि स्वतंत्र झाल्यामुळे अर्थातच समाधानी होतं.

या वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही. तरीही पाठवायचंच असेल तर ज्या क्लासेसमध्ये चित्रं काढायची मोकळीक दिली जाते तिथेच मुलांना पाठवावं. जिथे असं असं चित्र काढ, आकारात नीट रंग भर असा आग्रह धरला जातो त्या चित्रकलावर्गात मुलाचं भरपूर नुकसान होतं. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता यातून मारली जाऊ शकते. मूल कोमेजू लागतं आणि अकाली चित्र काढेनासं देखील होऊ शकतं. शाळांनी देखील ही गरज लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.

यापुढचा चौथा टप्पा आहे तो ‘बदलाचा काळ’. दहा ते बारा र्वष वयोगटातील मुलं, मोठय़ांनी काढलेल्या चित्रांच्या प्रभावाखाली असतात आणि मोठय़ांसारखी चित्रं काढायचा प्रयत्न करतात. तरीही नियोजित चित्रटप्प्यातील काही प्रतीकांचा मोह मुलाला आवरत नाही. त्यामुळे एखाद्या फ्रेम केलेल्या सूर्यास्ताच्या निसर्गचित्राची नक्कल करता करता अगदी निरागस, बालिश अशी मानवाकृती मुलांच्या चित्रात डोकावते. चित्रात जवळच्या वस्तू मोठय़ा तर लांबच्या लहान दिसू लागतात. क्षितिजरेषेचा अंतर्भाव होतो आणि तिसरी मिती दिसू लागते, अर्थात चित्र फक्त लांबी आणि रुंदीत द्विमितीय चपटं न वाटता खोली म्हणजेच डेप्थमुळे त्रिमितीय वाटू लागतं. वस्तू या शेजारी शेजारी मांडून ठेवलेल्या न वाटता काही मागे, काही पुढे, एकमेकांमागे झाकल्यामुळे काही भाग दिसतो असे सूक्ष्म बारकावे टिपून मुलं चित्रात उतरवतात. ज्या उत्स्फूर्ततेने, न बिचकता मूल यापूर्वी चित्र काढत असे ती कमी होऊ लागते. चित्र काढायचं तंत्र ज्यांना जमत नाही ती मुलं नाराज होऊन चित्र काढेनाशी होऊ लागतात. सुचतं खूप पण ते चित्रात उतरवता येत नाही, अशी या टप्प्यात अनेक मुलं असतात.

याच काळात मुलांचा चित्रातला रस टिकून राहावा यासाठी इतर विषयांशी सांगड घालून कलाकृती करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. ज्या मुलांना गोडी असते आणि चित्रकलेचं अंग असतं त्यांना नक्कल करण्यापासून परावृत्त करावं लागतं आणि जास्तीत जास्त ओरिजिनल, स्वत:ची चित्र काढायचा आग्रह धरावा लागतो. पण अनेक ठिकाणी तसं घडताना दिसत नाही. जे चांगलं जमतंय तेच ते काढायला प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे मूल बंदिस्त विचार करू लागतं. स्वत:च्या चित्र काढण्याच्या कक्षा अरुंद करून ठेवतं. या टप्प्यातील मुलांना विशिष्ट चित्रपद्धतीच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक माध्यमं देणं – जसं कोलाज, दोरा कागदाला शिवून चित्र, नैसर्गिक रंग तयार करून चित्र, मातीने चित्र, मोठे चित्रकार समजून घेऊन विविध शैलींचा अभ्यास करणं इत्यादी तसंच विज्ञान व कलेची सांगड घालणं – जसं रंग कसे तयार होतात, कागद कसे तयार होतात, कला अभ्यासण्यासाठी विज्ञानही कसं महत्त्वाचं आहे आणि कलाकुसरीचा चित्रात वापर करणं – जसं रांगोळीचे प्रकार, अलंकारणाचे विविध प्रकार इत्यादीमधून या विचारकक्षा रुंदावू शकतात.

चित्रांची गोडी टिकून राहिलेल्या मुलांचा बालचित्रकलेतील पाचवा टप्पा असतो ‘वास्तववादी’ चित्रांचा. साधारण तेरा ते सोळा वयोगटातील या मुलांच्या हातात चित्रं चांगली काढण्याचं कसब आलेलं असतं. तंत्र शिकून, सराव करून चित्रकलेतील मूलतत्त्व अभ्यासून या वयातील मुलं चांगली चित्र काढू शकतात. हात स्थिर होणं, साधनांशिवाय उत्तम आकार, रेषा, बिंदू परिणामकारक काढू शकणं, रंगांची समज येणं, काय सुंदर आहे याबद्दल मतं व्यक्त करता येणं, रचनामूल्य समजणं, प्रमाणबद्ध आकृती काढता येणं म्हणजेच सौंदर्यदृष्टी तयार होणं अशी अनेकांगानी चित्रकलेतील समज मुलं दाखवू लागतात. म्हणूनच या सुमारास चित्रकलेच्या परीक्षा मुलांनी द्याव्यात. रंगसंगती, रंगछटा, रेखाकृती, छाया-प्रकाशाचा अभ्यास अशा चित्रकलेतील मूलतत्त्वांवर या टप्प्यात प्रभुत्व मिळवता येते. ज्या मुलांच्या हातात कसब कमी आहे पण चित्रकलेची गोडी आहे त्यांनी चित्रं काढण्यापासून परावृत्त न होता नेटाने जी चित्रं आवडतात ती काढत राहिली पाहिजेत. कारण चित्रकला हे एक सहजसुंदर अभिव्यक्तीचं, आनंद अनुभवण्याचं माध्यम आहे. बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना चित्र काढण्याचा आनंद लोप पावू नये म्हणून आपणच प्रयत्न केले पाहिजेत.

आभा भागवत abha.bhagwat@gmail.com

First Published on February 11, 2017 1:28 am

Web Title: important stages of drawing development in children