शाळेचं गॅदरिंग असो वा बालनाटय़ स्पर्धा अनेक मुलं त्यातून घडत असतात. आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी त्यांना इथेच मिळते. संघभावना ही सर्वात महत्त्वाची, एकमेकांना सांभाळून घेणं मुलं इथेच शिकतात. मलाही खूप वेगळे अनुभव या बालकलाकारांनी दिले. नाटकातून प्रेरणा घेऊन कुणी आज उद्योजक झालाय, कुणी नाटय़संस्था उभारलीय, कुणी स्वत: प्रसिद्ध अभिनेत्री झाली तर कुणी परदेशांत त्यांच्या मुलांना घेऊन नाटुकल्या बसवताहेत. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एकदा तरी नाटक यायलाच हवं.. खूप काही देणारा हा अनुभव अनुभवायलाच हवा..

हिरव्यागार पानांमागे असणारी सूक्ष्म अंडी, त्यातून हळुवार जन्मणारी अळी, तिने स्वत:भोवती निर्मिलेला रेशीम कोश आणि थोडय़ाच दिवसांत त्या कोशातून बाहेर पडणारं रंगी-बेरंगी फुलपाखरू! अशी अनेक फुलपाखरं अवती-भवती भिरभिरू लागतात.. नि निसर्गाच्या या किमयेने आपण अचंबित होतो! काय सांगू तुम्हाला? अशीच मी अचंबित झाले माझ्या बालनाटय़ातल्या बालकलाकारांचे अभिनय गुण पाहून! कित्येकदा वाटे यांना हे इतकं सहज जमतं तरी कसं? त्यांची भूमिकेसाठी झालेली निवड म्हणजे एक मानाचा शिरपेचच! आणि मग उत्कृष्ट काम करण्यासाठी घेतलेला परिश्रम.. बाईंच्या कोणत्याही गोष्टीचा ‘नाही’ न म्हणण्याची प्रतिज्ञा! असेच या मुलांबरोबरचे बालनाटय़ाच्या वेळचे काही अनुभव मनात कायमचे घर करून बसले आहेत.

१९७५ मध्ये ‘कुमार कला केंद्रा’च्या स्पर्धेत सादर केलेलं ‘पिपाणीचे सूर!’ तब्बल चाळीस बालकलाकार, जत्रेच्या पाश्र्वभूमीवर अजय आणि निमा या दोन बहीण-भावात घडलेलं हे नाटय़! प्रयोग साहित्य संघ मंदिरात! अंधेरी ते चर्नी रोड रेल्वेने प्रवास! इतकी मुलं, जत्रेचे नेपथ्य सामान, सहकारी शिक्षक, मदत करणारे शिपाई-सारे नाटय़प्रेमाने भारावलेले! विशेष म्हणजे मुलांमध्ये इतका समजूतदारपणा होता की स्वत:च त्यांनी सहा-सहा जणांचे गट करून मोठय़ा विद्यार्थ्यांने गटाचं नेतृत्व करून लहानांना सांभाळलं! इतकंच नाही तर नाटकाचं सामानही थोडं थोडं वाटून घेतलं. ज्याला जसं जमेल तसं!

त्या वेळी साधारण पाचवी ते नववीच्या मुलांना नाटकात घेत असू. कारण दहावीच्या मुलांचा अभ्यासाचा अमूल्य वेळ! पण दहावीतला राजेंद्र नाटकात काम करण्यासाठी हटून बसला. वडिलांची भूमिका त्याला करायची होती. मी म्हटलं, ‘आईबाबांची परवानगी आण. कारण खरंच खूप तास बुडतील तुझे!’ दुसऱ्या दिवशी माहिती पत्रकात परवानगी घेऊन राजेंद्र हजर! नाटकात तर त्याने सुंदर काम केलंच पण अभ्यासात गुणही उत्तम मिळवले. आमच्या सरांचा त्याच्यावर विश्वास होता तो त्याने सार्थकी लावला.

या नाटकात जत्रेतील वेगवेगळी दुकाने थाटली होती. जत्रेतील (मेरी गो राऊंड) प्राण्यांचे फिरते चक्र, ज्यावर मुले दांडीला पकडून बसतात- ते मागील पडद्यावर मिनिटभरासाठी मला दाखवायचं होतं! काय करता येईल या विचारात होते. तर सहावीतल्या शशांकला एक कल्पना सुचली. म्हणाला, ‘बाई मी सांगू?’ त्याने एका तबकडीला चार ठिकाणी छिद्र पाडून त्याला खेळातील चार वेगवेगळे प्राणी- हत्ती, घोडा, वाघ, सिंह टांगले. मध्यभागी एक लांब खिळा घातला. तो ड्रिलिंग मशीनच अडकवला. एका कोपऱ्यात स्पॉट लाइटपुढे ही तबकडी धरून मशीन फिरवले. तबकडी गोलाकार फिरली. सर्व प्राण्यांचे चक्र मिनिटभर पडद्यावर साकारले (इतर दिवे मंद करून). ही कल्पना एवढय़ा लहान मुलाला सुचणं नि तो प्रत्यक्षात साकार होणं- खूप आनंद झाला! पुढेही कधी अडचण आली तर शशांक तोडगा काढायचा! हा गुणी विद्यार्थी आज स्वत:ची मशीन निर्मितीची कंपनी काढून उद्योजक झाला आहे!

आणखी एक वेगळाच प्रसंग! ‘स्वप्न’ नाटिकेत कृषी संशोधन करून एक मुलगा किती मोठा होतो याची कथा होती. मुलं होती सातवी-आठवीचीच! पण मुजुमदार नावाच्या मुलाच्या मनावर कृषी संशोधन इतकं बिंबलं की पुढे तो खरंच या क्षेत्रात गेला. मलाही अभिमान वाटला. एका नाटिकेत एक वाढदिवसाची पार्टीचा प्रसंग होता. यातील मुलाची आई इतर मुलां-बाळांवरच त्याच्या सोसायटीत रोज कचरा गोळा करायला येणाऱ्या रघूलाही बोलावते. तो पार्टीत संकोचून जातो. पण आई त्याला धीर देऊन रात्र शाळेत शिक्षण घेण्यास प्रवृत्त करते. या रघूचं काम करणारा अमित, याच्या डोक्यात वेगळे विचार घोळू लागले. त्या वर्षी त्यांच्या वर्गाला हस्तलिखिताचा विषय दिला होता ‘मुलाखती’ मुलांनी आसपासच्या कोणाचीही मुलाखत घ्यायची नि लेख तयार करायचा! अमितने दोन कचरा वेचक  मुलांची भेट घेऊन त्यांची जीवनकहाणी जाणून घेतली आणि सुंदर लेख लिहिला!

दूरदर्शनवरील ‘किलबिल’मध्ये केलेल्या ‘मला न्याय हवाय!’ नाटिकेत संतोषने अंध पिंटूची भूमिका केली होती. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं! मग आणखीही काही एकांकिकेत त्याला संधी दिली. मोठा झाल्यावर मला मदत करायला तो आपणहून येऊ लागला. या छंदाचं रूपांतर व्यवसायात झालं. आज त्याची स्वत:ची संस्था असून, मोठमोठय़ा कलाकारांच्या कार्यक्रमाचं आयोजन तो करतो. लहानपणीचा ‘अंध पिंटू’ आपलं प्रेरणास्थान असल्याचं तो आवर्जून सांगतो.

आणखी एक अनुभव तर आयुष्यभर पुरून उरलेला. एकांकिकेचा प्रयोग उद्यावर आला असताना सुप्रिया तापाने फणफणली! महत्त्वाची भूमिका होती तिची! तिच्या आईचा फोन आला, ‘आज तालमीला नाही पाठवत सुप्रियाला- पण औषध देऊन उद्या नक्की घेऊन येते मी!’ प्रयोगाच्या दिवशीही अंगात दोन ताप – पण स्वत:ची म्हातारीची भूमिका अगदी उत्कृष्ट करून अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळवलं तिने! ‘सुखाची गुहा’मधील तिची अंजूही अविस्मरणीय ‘ठरली’.पुढे अभिनय क्षेत्रात या सुप्रियाने (पिळगांवकर) घेतलेली गरुडझेप पाहून ऊर अभिमानाने भरून येतो!

‘पंखाविना पाखरू’ची कथाच वेगळी! त्यातील मेधाचं अपंग मुलीचं काम इतकं अप्रतिम झालं की काही पालक विचारून गेले. खरंच ती अपंग आहे का हो? या प्रयोगातील आणखी एक वेगळा अनुभव.. अपंग शामलीच्या मैत्रिणी तिला कशी मदत करतात याचा परिणाम प्रेक्षक मुलांवर झालाच! त्यानंतर दोनच वर्षांनी आमच्या शाळेतल्या एका मुलाला अचानक मोठं आजारपण येऊन अपंगत्व आलं.. दोन मुलांच्या आधाराशिवाय तो जिना चढू-उतरू शकत नसे. तेव्हा त्याच्या वर्गातील चार मुलं रोज त्याला वर्गात आणणं, खाली नेणं, त्याचं दप्तर घेणं, त्याला इतरही मदत करणं इतक्या प्रेमाने करीत की त्यांची सेवा पाहून मन भरून येई!

बालनाटय़ातील कलाकारांची ‘देणगी’ खूप मोठी आहे. अमिताने एकदा केलेली कमाल मला सांगायलाच हवी! लिटिल थिएटर स्पर्धेतील एक नाटिका, त्याच वेळी ‘आकाशवाणी- बालदरबार’ कार्यक्रमात दुसरी नाटिका आणि शालेय चित्रवाणीच्या एका कार्यक्रमाचे चित्रीकरण- तिन्ही ठिकाणी वेगळा अभिनय, वेगळे संवाद.. अकरा वर्षांच्या अमिताने सगळीकडे वाहवा मिळवली!

सातासमुद्रापार अमेरिकेत स्थायिक झालेल्या माझ्या बालअभिनेत्री संपदा, दीपश्री, आरती.. तेथील छोटय़ा मुलांचे नृत्य नाटय़ाचे कार्यक्रम बसविण्यात मग्न असतात. न्यूयॉर्कला स्थायिक झालेल्या आजीने गेल्याच वर्षी तेथील महाराष्ट्र मंडळात बाल शिवाजीवर छोटंसं नाटुकलं बसवलं! तिच्या मनात कल्पना आली, बाल शिवाजीने मावळ्यांच्या साथीने जिंकलेला पहिला गड.. तोरण. पण यावर संहिता कुठे मिळणार? तिने मला फोन करून, चर्चा करून माझ्याकडून नाटुकलं लिहून घेतलंच! त्या मुलाकडून अगदी, साधे सोपं संवाद करून घेणंही अवघड होतं! पण आरतीची जिद्द आणि नाटकवेड! तिनं यश मिळवलंच!

संगीत आणि गाणी बालनाटय़ांना एका वेगळ्याच उंचीवर नेतात! संजीवजी, अमिता, दीपश्री, कांचन, निशिकांत, मिलिंद एकापेक्षा एक सुंदर गाणाऱ्या मुलांनी या बालनाटय़ांना श्रीमंत केलं! नाटकांच्या नेपथ्यासाठी झटणारे शिक्षक.. त्याचे सहकार्याचे हात ‘आपलं नाटक.. एक वैभव’ समजत असतं! दरवर्षी शाळेसाठी नवं नाटक लिहायचंच असा आग्रह करणारे मुख्याध्यापक, कौतुकाने ती विश्वासाने माझ्याकडे मुलांना पाठवणारे पालक आणि गुणी समंजस मुलं या साऱ्यांनी हे वैभव निर्मिलं. अनेकांना आनंद दिला.. आज इतक्या वर्षांनंतरही हे आनंद तरंग मनी आहेत.. तसेच राहणार आहेत!..

प्रतिभा निमकर

chaturang@expressindia.com