25 March 2019

News Flash

आत्मानंद अन् विकासही

आपल्याला संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच.

आपल्याला संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच. अंगाईगीताने धरलेलं आपलं संगीताचं बोट मग आयुष्यभर अधिकाधिक  घट्ट होत जातं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हे संगीत आपल्या वाढण्यात भर टाकत जातं. याचा फायदा संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. म्हणूनच लहानपणातच संगीत शिकलं, ऐकलं तर त्याचे अनेक फायदे असतात. मुलांच्या विकासातले संगीताचे महत्त्व सांगणारे चार लेख दर पंधरवडय़ाने.

मानसी केळकर-तांबे या संगीत, नृत्य, नाटय़, समुपदेशन या क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक आहेत.  ‘संगीतातून समुपदेशन’ या क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव असून ‘एनिबडी कॅन सिंग’ हे घोषवाक्य असलेल्या ‘स्वरमानस’ या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. अडीच वर्षे ते पंचाहत्तर वर्षांपर्यंतच्या वयोगटात सुगम संगीत शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाचे नेतृत्व त्यांनी केले असून सुवर्णपदकांच्या मानकरी आहेत. रूपारेल महाविद्यालयाचा ‘आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे.

अभिनेत्री रेखाचा ‘खूबसूरत’ हा चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेलच. त्याचा मुख्य आशय होता की, जगात वेगवेगळ्या स्वभावांची, वेगवेगळ्या परिस्थितींतून घडलेली माणसं असतात. संगीत ही अशी एक कला आहे जी सर्वाना एकत्र आणते. या चित्रपटात रेखा म्हणते की, ‘‘रोजच्या शिस्तबद्ध, घाई-गडबड, तणावाच्या आयुष्यात संगीत, नाटय़, नृत्य हे आपल्याला ‘निर्मळ आनंद’ देतात.’’ ते अगदी खरं आहे. थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की, आपल्या आयुष्याला या संगीताने व्यापून टाकलेले आहे. आपल्याला या संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच. अंगाईगीताने धरलेलं आपलं संगीताचं बोट मग आयुष्यभर अधिकाधिक  घट्ट होत जातं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हे संगीत जादू करत जातं. आपल्या वाढण्यात भर टाकत जातं. या सदरातील पुढील चार लेखांतून आपण तेच पाहाणार आहोत, संगीत, गाणं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं योगदान देतं ते..

संगीताची भुरळ पडत नाही, असं फारच क्वचित कोणी असतील. संगीत आसमंत व्यापून उरलं आहे. पावसाची रिमझिम असो वा पक्ष्यांची कुहुकुहु, पानांची सळसळ असो की नदीचं वाहणं असो, एक ताल, लय साऱ्या चराचरात विरघळलेली जाणवते. निसर्गाने अगदी मुक्तहस्ताने उधळलेलं हे वरदान. या संगीताची जादूच अशी आहे की, ती आपल्याला सतत आनंदी तर ठेवतंच, पण  निराश झालेलं मन सहजी आनंदी करतं. मला आठवतंय, मी लहान असताना जर रुसले तर माझी आई मला एखादं मजेशीर गाणं ऐकवायची अन् मला खुद्कन हसू फुटायचं. मोठी झाल्यावर, महाविद्यालयात असताना तर माझा मूड गेला की, मी हमखास गझलांचा आधार घ्यायचे. आशाबाई, गुलाम अली, त्यातही त्यांची ‘मिराजे गझल’ किंवा जगजीत सिंग यांच्या गझला मला एका वेगळ्याच विश्वात नेऊन सोडायच्या की, माझा मूड गेला होता हेही आठवायचं नाही. मला खात्री आहे तुमचंही अगदी माझ्यासारखंच होत असणार! थोडक्यात काय, तर ‘म्युझिक वर्क्‍स अ‍ॅज अ थेरेपी’!

संगीतात अनेक प्रकार आहेत. त्यातले दोन प्रकार जे अगदी सर्वानाच माहीत आहेत. ते म्हणजे शास्त्रीय संगीत व सुगम संगीत. सुगम संगीताची ओळख मला वाटतं प्रत्येकाला आपल्या बालपणीच होते. वर म्हटल्याप्रमाणे, बाळाला झोपवण्यासाठी आई जे हळुवारपणे गाते, मग ते ‘लिंबोणीच्या झाडामागे’ असेल वा ‘नीज माझ्या नंदलाला’ आपल्या आयुष्यातली गाण्यांची, संगीताची ओळख या सुगम संगीतामुळे तिथूनच व्हायला सुरुवात होते, तर दुसरा प्रकार शास्त्रीय संगीत. त्यामध्ये वेगवेगळे राग असतात, ज्याच्यासाठी मात्र कान तयार करावा लागतो. प्रत्येक रागाला एक ठरावीक सुरावट असते आणि हे संगीत विशेष शिक्षण (संगीतात) घेणाऱ्यालाच येतं.

माझी आई, उत्तरा केळकर सुप्रसिद्ध गायिका असल्याने माझ्या जन्मापासून गाणं माझ्या अवतीभोवती आहे. संगीतातच मी वाढले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संगीताचा मी वेगवेगळा अनुभव घेतलाय. मी हेही अनुभवलंय की, संगीत ऐकल्यामुळे, मग ते गाण्यामुळे असो वा वादनामुळे, आपल्यात विशेष गुणकारक असे म्हणजे ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात जे आनंदी राहायला भाग पाडतात. जसं आपल्या (विशेषत: मुलांच्या) शारीरिक वाढीसाठी आपल्याला प्रथिने लागतात. तसंच आपल्या मानसिक प्रबळतेसाठी संगीत आवश्यक असते आणि त्यामुळे जर अगदी लहान वयापासून हे संगीत आपण आपल्या मुलांना ऐकवलं तर बाळाच्या मेंदूवर त्याचा विशेष चांगला परिणाम नक्कीच होतो. शास्त्रीय संगीतामधले विशिष्ट राग तर विशिष्ट व्याधींवर गुणकारक ठरतात. उदाहरणार्थ मधुमेह, अस्थमा, अतितणाव, स्थूलता, इनसोमनिया (झोप न लागणे) इत्यादी. अन् हे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध होऊन त्याचा ‘पर्यायी औषधोपचार’ (अल्टरनेटिव्ह मेडिसिन) म्हणून वापर केला जातो आहे.

लहानपणातच संगीत शिकलं, ऐकलं तर त्याचे अनेक फायदे असतात. त्याचा फायदा मेंदूच नव्हे तर मुलांच्या पूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो. वर सांगितल्याप्रमाणे साधारणपणे प्रत्येक आई अंगाईगीत तर गातेच. पूर्वीच्या काळी तर श्लोक म्हणणे, प्रार्थना म्हणणे सक्तीचं वाटत असलं तरी त्याचा उच्चारांवर होणारा दीर्घ परिणाम महत्त्वाचा होता. श्लोकांमुळे वाचा शुद्ध होण्यास मदत होते. त्याशिवाय बालगीतांमध्ये तात्पर्य दडलेलं असतं. त्यामुळे चांगलं काय, वाईट काय यातलाही फरक कळायला मदत होते. अलीकडे तर पाढेसुद्धा एका विशिष्ट चालीत आणि लयीत बांधलेले असतात. कारण नुसतं वाचण्यापेक्षा त्याची सुरावट, चालीमुळे ते पाढे लक्षात राहायला मदत होते. लहान वयात स्मरणशक्ती विकसित करता येते. वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ऐकली तर असं म्हणतात की, आपली भाषाही चांगली होते अन् शाळेत तर विषयांमध्ये ही विशेष प्रगती झालेली जाणवते. इतकंच नव्हे तर बोलण्यात जर अडथळा असेल जसा की तोतरेपणा तर तोही दूर होतो, गाणं शिकल्यामुळे.

माझ्या गेल्या पंधरा वर्षांच्या सुगम संगीत शिकवण्याच्या कारकीर्दीत मला दोन मुलांची उदाहरणं आठवत आहेत. माझ्याकडे एक आठ वर्षांची मुलगी गाणं शिकायला यायची अन् ती ‘सा रे ग म’ असं गाण्याऐवजी ‘ता रे ग म’ असं म्हणायची. त्यामुळे शाळेतली मुलं तर हसायचीच त्याशिवाय सर्वच आपल्याला हसतील या विचाराने ती नेहमीच दुखावलेली दिसायची. तिच्यात न्यूनगंड तयार झाला होता. त्यामुळे ती एरवी जास्त बोलत नसे. चेहऱ्यावरची सगळी रयाच गेली होती तिच्या. खरं तर या वयातली मुलं किती मोकळी असतात. हे तर तिचं बागडायचं वय! मी गाणं शिकवलं की प्रत्येकाकडून म्हणून घ्यायचं ही माझी पद्धत. त्याप्रमाणे तिला गाणं म्हणायला सांगितलं की, ती खाली मान करून गाणं म्हणायची. बरेच डॉक्टर, स्पीच थेरपी करून ती माझ्याकडे आली होती. मी ठरवलं, तिच्या या उच्चारांकडे लक्ष न देता तिला एखाद्या सर्वसामान्य मुलीसारखंच वागवायचं. तिला अवास्तव महत्त्व किंवा सहानुभूती न दाखवता तिच्या गाण्यावर काम करायला सुरुवात केली. म्हणजेच तिच्या उच्चारांवर नाही तर सूर, ताल, लय यावरच बोलायचं. जी वागणूक इतरांना तशीच तिला. गाण्याबरोबर भरपूर हसणं, सकारात्मक बोलणं, विनोद सांगणं हेसुद्धा असायचंच. ज्यामुळे मूल सकारात्मक तर होतातच, पण मनमोकळीपण होतात. तशीच तीही मोकळी झाली, व्यक्त व्हायला लागली अन् काही दिवसांत तिचं तिलादेखील कळलं नाही की, तिच्या ‘ता’चा कधी ‘सा’ झाला ते! तिच्या आईवडिलांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.

माझ्याकडे गाणं शिकायला एक साधारण ५-६ वर्षांचा मुलगा यायचा. तो तोतरं बोलायचा. त्याची आई मोठय़ा हुद्दय़ावर असल्यामुळे तिची नोकरी फिरतीची असे. त्यामुळे कदाचित त्यांच्यातही संवाद कमी होता, पण संगीताच्या मदतीने त्याचा तोतरेपणा जायला मदत झाली. कारण असं की, मुलांना गाणी पाठ होतात व त्यामुळे ते ती घडाघडा म्हणतात. त्यासाठी विचार करावा लागत नाही, त्यामुळे मेंदूवर ताण येत नाही, पण तेच एखाद्याचं मन जर काही कारणांनी अस्थिर असेल, तर विचारांना दिशा मिळत नाही. शब्दांची जुळवाजुळव करायला लागते. मेंदूवर ताण येतो आणि त्यामुळे बोलताना अडखळणे म्हणजेच तोतरेपणा ही प्रक्रिया घडते.

तर या दोन्ही मुलांना संगीतामुळे, गाणं शिकल्यामुळे त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी उपयोग झाला. थोडक्यात, संगीत ही थेरपी पर्यायी औषधासारखी लागू पडली. आज त्या दोन्ही मुलांना मजेत गाताना, वावरताना पाहून मला फार आनंद होतो. त्यामुळे गुणवत्ता, आवड, आवाज याचा कसलाही विचार न करता लहान वयातच तुमच्या पाल्याला गाणं भरपूर ऐकवा व शिकवा! आणि त्यांचं एक छान व्यक्तिमत्त्व घडताना अनुभवा!

मानसी केळकर-तांबे

swarmanas@gmail.com

First Published on July 15, 2017 12:54 am

Web Title: marathi articles on childrens development and music