News Flash

कला हाच जीवनोत्सव

स्वत: चित्र काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच चित्रकार समजून घेणंही अत्यावश्यक आहे.

मुलांना जर दर्जेदार कला शिक्षणाची गोडी शालेय वयापासूनच लावली तर मुलं शिक्षणाच्या दर्जात कोणतीही तडजोड मान्य करणार नाहीत.

‘सृजनरंग’ या सदरातील चित्रकलेवरचा हा अंतिम लेख. मुलांच्या विकासामध्ये चित्रकला या कला प्रकाराचे महत्त्व सांगणारी ही मालिका समाप्त होत असली तरी मुलांमधला कलेचा प्रवास अविरत सुरूच राहणार आहे. पालक म्हणून तो अधिक समृद्ध कसा करता येईल हे तुम्ही पाहायला हवं. आपल्याकडचे शिक्षक का कमी पडतात मुलांना प्रोत्साहन द्यायला, दिशा दाखवायला हे खोलात जाऊन शोधायला हवं आणि बदलायला हवं. कला हाच जीवनोत्सव कसा होईल हे पाहायला हवं.

कलाशिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट सौंदर्यदृष्टी निर्माण व जतन करणे हे आहे. सौंदर्य नेमकं कशात आहे? रंग, रेषा, आकार, पोत, छाया-प्रकाश, रचना यांत तर आहेच, पण त्याहून गहन सौंदर्य आहे विचारांमध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये. एखादं चित्र कसं काढलं यापेक्षा ते का काढलं, त्यामागे काय विचार केला हे जास्त महत्त्वाचं आहे. हा विचार अमूर्त असतो आणि कलाकृती बघताना, अनुभवताना त्याचा आभास होतो, तो जाणवतो; पण प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही. कलांचा विचार, मीमांसा, विश्लेषण करताना असंख्य अमूर्त संकल्पना जाणून घेणं गरजेचं ठरतं. त्यामुळेच ती अमूर्तता शब्दातच काय, पण कुठल्याही कलेच्या दृश्य स्वरूपात कशी बद्ध केली जाते यावर बंधनं येतात, कारण अमूर्तता जेव्हा मूर्त स्वरूपात रूपांतरित होते, तेव्हा तिचा काही अंश गळून पडतोच.

थोडक्यात, लिखाणातून कला समजावून देणं आणि प्रत्यक्ष कलानिर्मिती करणं यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. कलानिर्मितीची प्रक्रिया ही त्यामुळेच सर्वात महत्त्वाची ठरते. जो प्रक्रिया अनुभवतो आणि सातत्याने अनुभवत राहतो त्याला शब्दांच्या खूप पलीकडच्या अनेक गोष्टी जाणवतात. तरीही कलासमीक्षेचं स्थान वेगळ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण शब्दांची भाषा समजू शकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कलेची भाषा ही थेट हृदयाला भिडते. ती शब्दांतून नेहमीच व्यक्त करता येत नाही. कलाकृती समजून घेण्यासाठी संवेदनशीलता जागृत करावी लागते. काही जणांकडे ती उपजत असते, ती जतन करावी लागते. एवढी सगळी उद्दिष्टं डोळ्यांसमोर ठेवून लहान मुलांच्याच काय, पण महाविद्यालयीन कलाशिक्षणातही काही महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे.

स्वत: चित्र काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच चित्रकार समजून घेणंही अत्यावश्यक आहे. तेही फक्त हुबेहूब चित्र काढणारे चित्रकार नव्हे तर अमूर्त चित्रकार, इंस्टॉलेशन करणारे कलाकार, लोककलाकार आणि इतर शैलींमध्ये चित्र काढणाऱ्या चित्रकारांची मानसिकता, चित्रांमागचा विचार समजून घेतला पाहिजे. मोठे चित्रकार आणि त्यांची चित्रं लहानपणापासूनच मुलांनी पाहिलेली पाहिजेत. १९९९ मध्ये फ्रान्सला गेलेले असताना ज्या फ्रेंच बाईंकडे माझं वास्तव्य होतं त्या एका शाळेत कलाशिक्षिका होत्या. त्यांचे उपक्रम पाहण्यासाठी शाळेत गेलेली असताना मोने या फ्रेंच चित्रकारावरचं त्यांचं अतोनात प्रेम किती लहान वयापासून जपलं जातं याचं नवल आजही वाटत राहातं. दुसरीच्या मुलांची एक दिवसाची सहल मोने या चित्रकाराचं घर, बगिचा आणि त्याने केलेल्या चित्रांचं प्रदर्शन बघायला जाते. जाण्यापूर्वी मुलांना मोनेची छापील चित्रं, पुस्तकं, गोष्टी, शिक्षकांना भावलेल्या गोष्टी यांची काही दिवस चर्चा होते. घर पाहून परतल्यावर मुलांना विविधरंगी कागद देऊन त्या सहलीबद्दलची चित्रं काढायला सांगतात. त्याबद्दल बोलायला सांगतात. मुलं अजून लहान असल्यामुळे लिहिण्याचा आग्रह नसतो. मोनेच्या चित्रांच्या प्रिंट्स घेऊन, त्याचे छोटे तुकडे कापून, कागदावर चिकटवून मुलांनी आपापल्या पद्धतीने ते चित्र पूर्ण करण्याचा एक उपक्रम असतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुलं एक चित्रकार इतका भरभरून अनुभवतात. माझ्या विद्यार्थ्यांसोबत मीही साधारण असा उपक्रम इतर अनेक चित्रकार आणि त्यांची शैली, आयुष्य मुलांना समजावी याकरिता घेते. यातून मुलं स्फूर्ती घेतात आणि खूप सर्जनशील बनतात. कलेचं सौंदर्य विद्यार्थ्यांमध्ये अगदी सहज मुरायला लागतं.

कलाशिक्षक कसे असावेत हेही मी अमेरिकेत ‘मास्टर्स ऑफ फाइन आर्ट’चा अभ्यास  करत असताना अनुभवलं. माझे सर्व शिक्षक मुख्य प्रवाहात कामाचा अनुभव असणारे होते. शिकवणं हा त्यांचा पूर्णवेळ उपजीविकेचा व्यवसाय नव्हता, तर ते विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी सक्षम शिक्षक हवेत या भावनेने शिकवायला येत. त्यामुळे कलाइतिहासाच्या सखोल अभ्यासाबरोबर अत्यंत नवा विचार, नवी तंत्रं, नवे प्रवाह, नवे कलाकार यांच्या माहितीचे जणू ते विद्यार्थ्यांना जोडणारे पूल होते. केवळ पुस्तकातील माहिती वाचून दाखवणे ही शिकवण्याची पद्धत नसून, स्वत: अभ्यास करून, स्वत:ला काय वाटतं याची चर्चा आणि प्रश्न उभे करण्याची क्षमता असणारे ते शिक्षक होते. त्यांना विद्यार्थ्यांबद्दल केवळ आस्था होती एवढंच नव्हे तर परस्परांबद्दल आदरही होता. आज १३ वर्षांनंतरही मला त्यातून तेवढीच स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते, कारण त्या शिक्षकांनी कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण केला.

आपल्याकडचे शिक्षक का कमी पडतात मुलांना प्रोत्साहन द्यायला, दिशा दाखवायला हे खोलात जाऊन शोधायला हवं आणि बदलायला हवं. एका वर्षी मी सर्वात जास्त मार्क मिळवले असताना भारावून जाऊन एका शिक्षकांशी चर्चा करत होते, ‘‘माझा विश्वासच नाही बसत, की मी पहिली आले.’’ यावर ते शिक्षक म्हणाले होते, ‘‘तू जे म्हणते आहेस ते मला आत्ता लिहून दे, मी कला संचालनालयाला पत्र पाठवतो.’’ कौतुक, विद्यार्थ्यांच्या कुवतीची जाण, विश्वास या गोष्टी दूरच, वर पाय खेचायला तयार? अजून एका मित्राच्या चित्रांना कधीही दहापैकी पाचसुद्धा मार्क न देणाऱ्या एका शिक्षकाने काही तरी दोन रेघांची चित्रात भर घालून एकदम आठ मार्क देणं हेही याच मनोवृत्तीचा भाग. उत्तम चित्र काढणाऱ्या एका मैत्रिणीला बाहेरची इतकी कामं मिळायची की, कॉलेजमध्ये यायला तिला वेळ नसायचा, त्यामुळे तिला अनेक र्वष नापास केलं जायचं. प्रत्यक्षात ती उत्तम चित्रं काढायची, हे शिक्षकही जाणून होते. स्पर्धा मनात भरल्यामुळे आपल्याच वर्गातील जवळच्या वाटणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी न सांगता परस्पर अभ्यास सहल ठरवणं, अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचा दुस्वास करणं, वर्षभर सौंदर्यशास्त्र, कलाइतिहास यांसारख्या सुंदर विषयांचे तास बुडवणं आणि परीक्षेत कॉपी करून पास होणं, या आणि अशा असंख्य गोष्टी चित्रकार म्हणून घडताना महाविद्यालयात आजूबाजूला घडत असतात. हे असंच चालायचं, असं म्हणून सर्व जण हेच चालू देतात. इतक्या ढिसाळ पद्धतीने जर उच्च कलाशिक्षण दिलं जात असेल तर आपली मुलं या महाविद्यालयात शिकावीत असं कोणा पालकांना वाटेल? आणि मग अर्थात चित्रकला महाविद्यालयात शिकण्यापेक्षा इतर बऱ्या महाविद्यालयांमध्ये वेगळा विषय घेऊन शिकण्याला प्राधान्य दिलं जातं.

उत्तम दर्जाच्या कलाशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांनीच रेटा लावायला हवा. मुलांना जर दर्जेदार कला शिक्षणाची गोडी शालेय वयापासूनच लावली तर मुलं शिक्षणाच्या दर्जात कोणतीही तडजोड मान्य करणार नाहीत. तडजोड मान्य का करायची नाही हेही शाळेतील कलाअनुभवातून शिकवायला हवं. नुसतंच कलाकुसर, आकारांत व्यवस्थित रंग भरता येणे, हुबेहूब नक्कल करणे या सापळ्यांतून जेव्हा कलाशिक्षक आणि पालक मुलाला बाहेर पडायला प्रोत्साहन देतील, मुलासमोर याव्यतिरिक्त उत्तमोत्तम कला उपक्रम ठेवतील, तेव्हाच मुलं नव्या वाटा शोधतील. तीच चांगल्या कलाशिक्षणाची सुरुवात होऊ  शकेल.

सोफी केली या फ्रेंच समकालीन कलाकर्तीच्या काही विलक्षण कलाकृती पुन:पुन्हा खुणावतात, त्यातील ‘क्रोमॅटिक डाएट’ म्हणजेच रंगीत आहार ही एक. आहारातल्या रंगांना कलाकृतीत गुंफणं हे मला फारच मजेदार आणि कोणालाही करता येण्यासारखं वाटतं. शाळकरी मुलांपासून आजी- आजोबांपर्यंत कोणीही करून पाहावं असं. सोफीने आठवडय़ाभरात दररोज एका रंगाचे पदार्थ खायचे-प्यायचे, या छोटय़ाशा कल्पनेवर आधारित सुंदर रचना करून त्याचे फोटो काढले. हे नवरात्रीला नेसायच्या नऊ रंगांच्या साडय़ांचे रंग जसे स्त्रियांनी आपल्या आयुष्याचा भाग बनवले आहेत तसंच काहीसं वाटतं. सोमवारी केशरी रंगाच्या बशी, वाटी, भांडय़ातून संत्र्याचा रस, केशरी गाजराचे तुकडे आणि इतर केशरी पदार्थ खायचे. मंगळवारी लाल रंगाचे डाळिंबाचे दाणे, कलिंगडाचे काप, बिटाचे पदार्थ, टोमॅटो खायचे. बुधवारी पांढरं अंडं, दूध, दही, भात यांचा समावेश. गुरुवारी हिरवा पालक, काकडी, पुदिना चटणी, कैरी इत्यादी. शुक्रवारी पिवळ्या रंगाचं आमलेट, हळद घालून केलेले पदार्थ, डाळ, भोपळ्याची भाजी वगैरे. शनिवारी गुलाबी रंगाचं स्ट्रॉबेरी शेक, लाल मुळा असे गुलाबी पदार्थ खायचे. सोफीने केलेल्या रंगीत आहारात युरोपमध्ये खाल्लय़ा जाणाऱ्या पदार्थाचा समावेश आहे. आपल्या शरीरामध्ये सामावल्या जाणाऱ्या अन्नपदार्थामधून असे रंग शोधून त्यातून कलाकृती तयार करण्याची कल्पना म्हणजे जीवनोत्सवच वाटतो. आयुष्यातल्या रंगांकडे लक्ष वेधून घेण्याचीच जणू ही कला. यातून हेही लक्षात येतं की, निळ्या रंगाचे पदार्थच नसतात. नुसत्या या कलाकृतीच्या निमित्ताने मुलांना रंग आणि पदार्थाच्या युतीची जाण येणं हेच विलक्षण ठरेल. अशाच रंगसंगती वापरून कपाटात ठेवलेली पुस्तकं असं चित्रही मी काही ठिकाणी काढलं आहे.

कलाकारांकडून स्फूर्ती घेऊन असंख्य गोष्टी मुलांसोबत करून पाहण्याजोग्या आहेत. आजच्या शेवटच्या लेखातून सर्वाना कलानिर्मितीसाठी शुभेच्छा देऊन माझी लेखमाला संपवते. धन्यवाद.

(समाप्त)

आभा भागवत abha.bhagwat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:14 am

Web Title: painting art and drawing importance for children development
Next Stories
1 चित्रांतून दिशा
2 प्रयोगशीलता हवी
3 नियोजित ते वास्तववादी चित्र
Just Now!
X