16 October 2019

News Flash

खेळातून सर्वांगीण विकासाकडे

केदार अतिशय चळवळ्या मुलगा आहे.

केदार अतिशय चळवळ्या मुलगा आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत त्याची पळापळ सुरू असते. तो झोपेल तेवढीच त्याला (व घरादाराला) विश्रांती असते. ‘‘याला सतत कशात तरी गुंतवावं लागतं’’, त्याची आई सांगते. केदारच्या अति उत्साहाचे पर्यवसान क्वचित वेडय़ावाकडय़ा मस्तीत वा मारामारीत होते. ‘‘काळजीचे काही कारण नाही, त्याच्या ऊर्जेला वाव देण्यासाठी त्याला खेळायला लावा,’’ डॉक्टर त्याच्या थकलेल्या आई-बाबांना सांगतात.

प्राची खूपच शांत मुलगी आहे. तिला स्वत:मध्येच रमायला, एकटीलाच खेळायला आवडतं. ती बोलतेही खूप कमी.. ‘‘अगं, कशाला चिंता करतेस, तिला खेळाच्या वर्गात भरती कर, लगेच फरक दिसेल’’, तिच्या चिंताग्रस्त आईला तिची मत्रीण सल्ला देते.

मधुरा खूप हुशार आहे, तिला वर्गात शिकविलेले पटकन् समजतं, पण तिला लगेचच ‘टेन्शन’ येतं, घाम फुटतो आणि मग तिच्या हातून खूप छोटय़ा छोटय़ा चुका होतात. ‘‘मधुराने जास्त खेळायला सुरुवात केली तर तिची एकाग्रता वाढायला व ताण कमी व्हायला खूप मदत होईल.’’, शाळेच्या मानसतज्ज्ञांचा शेरा येतो.

तीन वेगवेगळी मुलं, तीन वेगवेगळ्या समस्या, पण उपाय मात्र एकच.. ‘खेळामध्ये सहभाग’.

असं काय आहे या खेळामध्ये? शारीरिक हालचाल देणारा कुठलाही खेळ खेळला की भूक लागते, उंची वाढते, झोप चांगली लागते, तसेच रक्ताभिसरण सुधारते, पचनक्रिया चांगली होते हे सर्वसाधारण फायदे सर्वाना माहिती आहेतच. खेळामुळे शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढते, रोगनिवारक शक्ती वाढते, एकूणच शरीराच्या चयापचयाच्या क्रिया सुलभतेने होतात, स्नायूंची ताकद, हाडांची बळकटी वाढते व पेशीन्पेशी सुदृढ होतात हेही बऱ्याच जणांना माहिती असते, मात्र खेळांमधल्या सहभागाचे फायदे यापेक्षाही खूपच दूरगामी आहेत.

खेळामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांकडे आता जगभरातल्या आरोग्याशी निगडित असलेल्या सर्वच घटकांचे लक्ष वेधले गेले आहे. खेळातील सहभागामुळे असं काय होते? राहाते घर रस्त्याच्या बाजूला आणि इमारतीमध्ये खेळायला समवयस्क मुली नाहीत म्हणून अदितीच्या आईने तिला लहानपणीच व्यायामशाळेत खेळण्यासाठी पाठवलं. लहान वयातच अदितीला खेळायची गोडी लागली. तिथे वेळेत जायला मिळावं म्हणून शाळेतून आल्यावर अदिती पटापट स्वत:चे आवरायला लागली. खूप खेळायचे म्हणजे चांगली शक्ती हवी आणि ही शक्ती येण्यासाठी नीट, वेळेत व पौष्टिक खायला हवे हेही तिच्या मनावर लहान वयातच बिंबवलं गेलं. जसा जसा शाळेत अभ्यास वाढायला लागला, शिकवणी वर्गाला जाण्यातही वेळ जाऊ लागला तेव्हा अदितीने अभ्यासाचे वेळापत्रक बनवायला व ते पाळायला सुरुवात केली. कोणीही न शिकवता वेळेचे समायोजन (टाइम मॅनेजमेंट) तिला जमायला लागले. थोडक्यात, अदितीची जीवनशैली आरोग्यपूर्ण व्हायला सुरुवात झाली आणि यामुळे केवळ अदितीच्याच नव्हे तर तिच्या पालकांच्या आयुष्यातही एक सकारात्मक फरक पडला. आज १६-१७ वर्षांची ही महाविद्यालयीन मुलगी अभ्यास करते, खेळते, बक्षिसे मिळवते, मित्र-मत्रिणींबरोबर फिरायला जाते, अगदी टाइमपासही करते, थोडक्यात काय तर खेळाच्या माध्यमातून अदितीचे आयुष्य आरोग्यपूर्ण तर झालेच, शिवाय अतिशय उत्फुल्ल व आनंदीही झाले. आणखी कोणता फरक पडतो अदितीच्या आणि तिच्यासारखेच नियमित खेळणाऱ्या मुलांच्या आयुष्यात? खेळाचे माध्यम हे तणावाचे व नकारात्मक भावभावनांचा निचरा करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आजकालच्या मुलांना आजूबाजूच्या जगात, दूरचित्रवाणीवर, चित्रपटांमध्ये, बातम्यांमध्ये व संगणकीय खेळांमध्ये दिसणाऱ्या हिंसेचे प्रमाण खूपच मोठे आहे. ही हिंसा बऱ्याच वेळा बीभत्स स्वरूपात, भडकपणे समोर येते, तर काही वेळा ती खुसखुशीत, नर्मविनोदाच्या माध्यमातून येते.. पण शेवटी हिंसा ती हिंसाच आणि मग आजची तरुण पिढी क्षुल्लक कारणांवरूनही किती सहज आक्रमक होताना दिसते. ही आक्रमकता अगदी छोटय़ा छोटय़ा बाबींमध्येही टोकाचे स्वरूप गाठताना दिसते आणि मग खेळताना दोन संघांमध्ये भांडणं व त्याची परिणती मारामारीत, खुनात होण्याच्या बातम्या या अपवादात्मक राहत नाहीत. ‘ब्लू व्हेल’ या संगणकीय खेळाचे आत्महत्येपर्यंत आणि आता तर थेट हत्या करण्यापर्यंत पोहचणारे दुष्परिणाम आपल्याही दारात पोहोचले आहेत. ही हिंसा पाहणारी आणि मदानावर न जाणारी मुले लहान वयातच गुन्हेगारीकडे वळतात हे सिद्ध झाले आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’ने हे वर्ष नराश्यावर मात करण्याचे वर्ष जाहीर केले आहे. हे नराश्य अगदी मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत दिसून येत आहे. नराश्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. सतत थकवा, चिडचिडेपण, भूक मंदावणे वा अति खाणे, झोप न लागणे वा अति झोपणे या शारीरिक लक्षणांबरोबर एकाग्रता न होणे, हताशा, आगतिकपणा वाटणे, काम करावेसे न वाटणे ही मानसिक लक्षणेही दिसून येण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा या निराशेचे पर्यवसान आत्महत्येत होते. खेळाचे मदान याच्या प्रतिबंधासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. मानसतज्ज्ञदेखील अनेक मानसिक समस्यांसाठी खेळ, व्यायाम, ‘प्ले थेरपी’, ‘डान्स थेरपी’ अशा उपचारपद्धती मोठय़ा प्रमाणावर वापरू लागले आहेत.

१९८६ – शारजामध्ये सुरू असलेला ऑस्ट्रेएशिया कप. भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर. भारताची दमदार सुरुवात आणि चांगली धावसंख्या आणि पाकिस्तानची गडगडलेली सुरुवातीची फळी. ‘मैं पाकिस्तान को जीता दुंगा’ असे आपला कप्तान इम्रान खानला सांगत मदानात उतरलेला जावेद मियांदाद शेवटच्या बॉलला तोंड देण्यासाठी सज्ज आणि समोर चेतन शर्मा गोलंदाज. जिंकण्यासाठी हव्या फक्त ४ धावा. या दोघांबरोबर इतर भारतीय व पाकिस्तानी खेळाडू, उपस्थित प्रेक्षकवर्ग, दूरचित्रवाणीवर डोळे खिळवून बसलेले आणि रेडिओला कान लावून बसलेला असंख्य अदृश प्रेक्षकवर्ग- सर्वाच्याच मनावर प्रचंड ताण. आणि या क्षणाला आपले मानसिक संतुलन ढळू न देता ‘सिक्सिर’ ठोकून अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणणारा जावेद मियांदाद! कुठून आली ही प्रचंड मानसिक ताणाला तोंड देण्याची क्षमता? आणि कसा आला हा आत्मविश्वास? ही आहे खेळातल्या सहभागाची खासियत. हा असाच ताण अगदी गल्लीबोळातील खेळ खेळतानाही जाणवतो. अगदी माझ्या आवडीच्या मल्लखांब या खेळातही असाच अनुभव येतो. मल्लखांबाचा सुरुवातीचा धडा म्हणजे मल्लखांबावर चढून बसणे. आता जमिनीपासून आठ-साडेआठ फूट उंचीवर, त्या चिमुकल्या टोकावर बसायचे म्हणजे भीती वाटणारच. त्या भीतीवर मात करून वर बसायला यायला लागले की पुढचा धडा येतोच – उभे राहण्याचा.. म्हणजे परत भीतीवर मात करण्याचे प्रशिक्षणही. त्यामुळे भीती, ताण यांवर मात करायला शिकतानाच वाढीस लागतो मुलांचा आत्मविश्वास. ‘मला जमेल, अवघड आहे, पण मी सराव करीन, माझी कष्ट करायची तयारी आहे.’ असा एक अत्यंत सकारात्मक विचार करायला मुले शिकतात. याचाच  एक फायदा म्हणजे मुलांना स्वत:च्याच शारीरिक व मानसिक क्षमतेचा एक अंदाज यायला सुरुवात होतो, ज्यामुळे आत्मविश्वासाबरोबरच ‘आता मला काय करायला हवे’ असा विश्लेषण करायला उद्युक्त करणारी विचारसरणी वाढायला मदत होते.

खेळ सहकाऱ्यांबरोबर खेळला जातो. आज माझ्याबरोबर सराव करणारा माझा मित्र स्पध्रेच्या मदानावर प्रतिस्पर्धी होतो. वरच्या स्तरावर खेळताना प्रतिस्पर्धी संघातला खेळाडू सहकारी म्हणून वागवावा लागतो. आजच्या ‘लीग’च्या जमान्यात तर कट्टर शत्रुत्व असलेल्या वेगवेगळ्या संघातील खेळाडू एका संघाच्या झेंडय़ाखाली खेळतात. संघभावना, स्पर्धा, एकमेकांशी जुळवून घेण्याची लवचीकता, त्याचबरोबर लढण्याची विजिगीषू वृत्ती- काय आश्चर्य वाटेल अशी शिकवण हे खेळाचे मदानच देते.

मुलामुलांमध्ये चालणारा खेळ असो वा अगदी शिस्तबद्ध वातावरणात चालणारे प्रशिक्षण, नियमित खेळाचे फायदे आहेतच. बॉल पकडायचा आहे, दोरीवर चढायचे आहे, लपलेल्या मित्राला शोधायचे आहे किंवा खेळाचे विशिष्ट पद्धतीचे तंत्र शिकायचे आहे, या सगळ्यालाच लागते एक सातत्य आणि शिस्त. रोज शाळा, रोज अभ्यास म्हटलं की किती कंटाळा येतो, पण रोज खेळायचा कंटाळा येत नाही, त्यामुळे खेळाचे माध्यम हे अभ्यासाला लागणारी कौशल्ये व जीवन कौशल्ये शिकविण्याचे एक महत्त्वाचे मध्यम व्हायला हवे. विचार करा, विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक फायदे देणारी, हसत खेळत अगदी बाळांपासून आजी-आजोबांना म्हणजेच सर्व वयोगटांना रमवणारी, जात, धर्म, पंथ, देश, गरिबी व श्रीमंती या सर्वाच्या पलीकडे जाऊन निखळ आनंद देणारी अजून कुठली कृती/ क्रिया आहे का? तर मग चला, आजपासूनच सुरू करू या आता नियमितपणे खेळायला!

डॉ. नीता ताटके

neetatatke@gmail.com

 

First Published on November 18, 2017 12:04 am

Web Title: the benefits of outdoor games