आजच्या आधुनिक जगात आणि वातावरणात लोंबकळणं, झोका घेणं, टांगणं, मातीत मस्ती करणं, मनमोकळेपणे धावणं-पळणं आदीच्या संधी दुर्मीळ होत चालल्या आहे, मात्र या शारीरिक हालचालींची नैसर्गिक भूक मात्र तशीच आहे. खेळाचं माध्यम हे मुलांना जीवन कौशल्यांचं मार्गदर्शन देणारं एक प्रभावी माध्यम आहे. संपूर्ण शारीरिक, मानसिक व व्यक्तिमत्त्वविकास करण्याचं एकमेवाद्वितीय साधन आहे.

जन्मल्यानंतर पहिली ३ वर्ष व १० ते १४ ही तारुण्यात पदार्पण करणारी वर्ष ही अत्यंत महत्त्वाची अन् बऱ्याच वेळेला आयुष्याला वळण देणारी निर्णायवर्ष असतात. दुर्दैवाने हीच मोलाची वर्ष दर्जेदार वाढीच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षितच राहतात. मूल एकुलतं एक, लाडावलेलं, सुखवस्तू घरातलं असलं तर विकतच्या भरपूर खेळण्यांच्या ओझ्याखाली दडपलेलं, आई-वडिलांच्या करिअर वा नोकरीच्या धकाधकीमध्ये अडकलेलं त्याचं बालपण हे तसं दुर्लक्षितच राहतं. मुलांना हळूवारपणे उठवावं, त्यांच्याशी भरपूर मस्ती करावी, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी या माध्यमांशिवाय त्यांना जेवण भरवावं, घरात येणाऱ्या भाज्या, वाणसामान यांच्या माध्यमातून त्यांना रंग, रूप, गंध यांची ओळख करून द्यावी, असं खरंच किती जणांना जमतं?

१० ते १४ वर्षांच्या वयात तर अभ्यास, शिकवणी, परीक्षा आणि त्यात मिळालेले गुण या पलीकडेही मुलांचं एक वेगळं स्वप्नाळू, रंगबेरंगी, आशा-आकांक्षाचं एक विश्व असतं, असं बहुसंख्य पालकांना वाटतंच नाही. याच दोन वयोगटांमध्ये जैविक वाढ व मेंदूची वाढ झपाटय़ाने होते, मात्र विचारांची प्रगल्भता आली नसते आणि म्हणूनच या वयात मुलं-मुली खूप सहज धोकादायक, भावनातिरेकी आणि अश्लीलतेकडे झुकणारी वर्तणूक दाखवितात.

या मुलांच्या नक्की गरजा तरी काय असतात? ही मुलं आसुसलेली असतात स्वत:चं एक स्थान निर्माण करण्यासाठी, त्यांना गरज असते आपलेपणा मिळण्याची, ‘तूपण कोणी तरी आहेस’ ही भावना जपली जाण्याची. त्यांना सुरक्षित वाटेल, असा एक आधार त्यांना हवाहवासा वाटतो, वास्तवाचा पाया असलेलं पण तरीसुद्धा एक स्वप्नाळू जग त्यांना खुणावत असतं, ‘आता आपण मोठे झालो’, ‘आपल्याला निर्णय घेता यायला पाहिजेत’, ‘स्वत:च कोणी तरी बनलं पाहिजे’ हेही त्यांना जाणवायला लागलेलं असतं आणि त्याचं दडपणही यायला लागलेलं असतं. या त्यांच्या प्रमुख गरजा कुटुंब, शैक्षणिक संस्था वा समाजाकडून क्वचितच भागविल्या जातात. कारण हे तिन्ही घटक मुलांचं मुख्य मूल्यमापन करतात त्यांच्या अभ्यास वा परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरूनच. गायन, वादन, नृत्य, नाटक, खेळ काहीही करा, पण अभ्यास सांभाळूनच अशी तंबी बहुसंख्य घरांमधून दिली जाते आणि अभ्यासाचं माध्यम हे जीवनकौशल्यं शिकविण्यासाठी, आत्मसन्मान वाढविण्यासाठी अत्यंत अपुरं साधन आहे, याची जाणीवच नसते.

अभ्यासात हुशार असणारी मुलं ही सक्षमच असतील आणि ती आयुष्यातही नक्की यशस्वी होतील असा जरी सर्वसाधारण समज असला तरी प्रत्यक्षात तो खरा नाही. आपलं काम उत्कृष्टपणे करता येण्याबरोबरच वेळेचं नियोजन करता येणं, सर्व स्तरांवरील सहकाऱ्यांशी, मैत्रीचं आणि ते जमलं नाहीच तर व्यावसायिक तरी संबंध ठेवता येणं, ताणतणावाचं नियोजन करण्याबरोबरच तणावाच्या परिस्थितीत मानसिक संतुलन ढळू न देणं, ही कौशल्यं शिकायला आणि विकसित करायला खेळाच्या मैदानाकडेच वळायला हवं.

नापास होणं, अपयशी होणं यामुळे दैनंदिन जीवनात तर आकाशच कोसळल्याची भावना निर्माण होते. दहावी-बारावी आणि तत्सम महत्त्वाच्या वर्षांना नापास झालेल्या, हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळालेल्या मुलांचं प्रचंड प्रमाणात मानसिक खच्चीकरण होते. या अपयशाची वाट कधी तरी आत्महत्येपर्यंत नेते वा दूरगामी परिणाम करते. मात्र खेळाच्या मैदानावरचं अपयश सकारात्मक धडे देतं. जिंकता जिंकता हरणं वा हरता हरता जिंकणं हा तर खेळाचा जणू स्थायिभावच आहे. क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम करणारा सचिन तेंडुलकर त्याच्या पहिल्या दोन्ही एक दिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्याच बॉलवर शून्यावर बाद झाला होता. मैदानावर खेळणाऱ्यांकडे आपण पाहिलं तर दिसतील आपल्याला ‘हरणार आहोत’ हे माहिती असूनसुद्धा जीव तोडून पळणारी मुलं, ‘आज तुम्ही जिंकलात, उद्याचा दिवस आमचा असेल’ हा आशावाद दाखवणारी मुलं, हरण्यामुळे उफाळून आलेली विजिगीषु वृत्ती आणि मग कष्ट करण्यासाठी सरसावलेली मुलं, जीवनाचा फार मोठा धडा क्रीडांगणावर शिकतात. ‘आपण कायमच जिंकणार नाही, पण कायमच हरणारही नाही’ ही जाणीव खेळामधूनच मिळते.

खेळाचं तंत्र एका दिवसात शिकता येत नाही. त्याचा सराव लागतो. हा सराव कंटाळवाणा, रटाळ असू शकतो. आता सहजसाध्य असलेल्या ‘यू टय़ूब’वर बघितलं तरी कळेल की, आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूसुद्धा तंत्र घोटविण्यावर खूप भर देतात. आजचे माझे कष्ट, त्याचे दिसणारे दृश्य परिणाम, त्यातून अजून कष्ट, मग त्यातून यश वा अपयश, दोन्हीपैकी काही मिळालं तरी पुन्हा कष्ट.. याची एक साखळी तयार होते आणि मुलांना धडे मिळतात सातत्यपूर्ण प्रयत्नांचे व सरावाचे.

नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळामध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूबद्दल बोलताना तिचे प्रशिक्षक पी.गोपीचंद यांनी अत्यंत अभिमानाने सिंधूने केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचा उल्लेख केला होता आणि त्याचबरोबर या ध्येयप्राप्तीसाठी तिने खाण्याची बंधनंही कशी पाळली होती आणि स्वत:चा भ्रमणध्वनी कसा लांब ठेवला होता हेही सांगितलं. सिंधूच्या या जीवनशैलीला प्रसिद्धी मिळाली कारण आज ती क्रीडा क्षेत्रातील एक झळकता तारा आहे, मात्र खेळाचा नियमितपणे सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंची ही जीवनशैली आहे. ही आरोग्यपूर्ण जीवनशैली पुढेही टिकते आणि अनेक आजारांना प्रतिबंध करते.

लॉन टेनिसमधल्या दोन जगज्जेत्या खेळाडूंचा हा किस्सा खेळातून वाढणाऱ्या खिलाडूवृतीचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. अमेरिकेची ख्रिस एव्हर्ट आपल्या नजाकतदार खेळासाठी प्रसिद्ध आणि समोर मार्टिना नवरातिलोव्हा. मूळची झेक रिपब्लिक या देशाची पण आता अमेरिकेचं नागरिकत्व घेतलेली, आपल्या दमदार पुरुषी खेळासाठी प्रसिद्ध. अमेरिकेतच एका आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अंतिम फेरीत या दोघी एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. प्रेक्षकांचा पाठिंबा जातो ख्रिसला, तिच्या प्रत्येक गुणाला टाळ्यांनी प्रतिसाद, मार्टिनाच्या गुणांना शांतता आणि चुकांची हुर्यो. होता होता मार्टिनाची एकाग्रता ढळायला लागते, तिच्या चुका व्हायला लागतात. खेळातल्या नियमानुसार थोडय़ा वेळाने, जेव्हा या दोघी खेळाडू छोटय़ा विश्रांतीसाठी बाजूला जाऊन बसतात, तेव्हा बॉलबॉय मार्टिनाला एक चिठ्ठी आणून देतो. चिठ्ठीत लिहिले असते, ‘मार्टिना, हे प्रेक्षक तुझ्या विरोधात आहेत.. विसरून जा त्यांना, कदाचित हे जग तुझ्या विरोधात आहे, विसरून जा त्या जगाला.. आज या मैदानावर तुझी एक चाहती आहे, जिला तू जिंकायला हवी आहेस.. प्ले युवर गेम मार्टिना. तुझा खेळ, तुझी ताकद दाखव, मार्टिना..’ आणि खाली सही असते – ख्रिस एव्हर्ट! मार्टिनाला नवा हुरूप येतो, ती खरच तिचा ताकदवान खेळ खेळते आणि सामना जिंकते.

ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या स्पर्धेत जिंकल्यावर आपली रॅकेट फेकून देऊन विजय साजऱ्या करणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनपेक्षा, नम्रपणे तिची रॅकेट तिच्या हाती देणाऱ्या सिंधूने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकत्याच झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर स्पर्धेचा बादशहा उसेन बोल्टला हरवून प्रथम आलेल्या जस्टिन गॅटलिनचा गुडघ्यावर बसून बोल्टला अभिवादन करण्याचा समंजसपणा त्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. ही विनम्र मानसिकता तयार करणं, ही खेळाची खूप मोठी देणगी आहे.

भीष्मराज बाम सर सांगायचे ते उदाहरण मला कायम लक्षात राहील. क्रिकेटच्या मैदानावर चेंडूला तोंड देण्यासाठी सज्ज असलेला फलंदाज, चेंडू तटवल्यावर ‘रनर’च्या भूमिकेत शिरतो व धाव काढतो. दुसऱ्या बाजूला तो ‘न खेळणारा खेळाडू’ या भूमिकेत जातो, संधी मिळाली की पुन्हा ‘रनर’च्या भूमिकेत शिरून धाव काढतो. जर खेळताना या खेळाडूंनी अशा लवचीकपणे भूमिका पाळल्या, तरच ते यशस्वीपणे खेळू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा निश्चित ध्येय आणि त्या ध्येयाला अनुसरून भूमिका लवचीकपणे बदलल्या तरच यश मिळतं. खेळता खेळता जीवनातला हा एक मोठा धडादेखील सहजच शिकला जातो.

सगळ्याच खेळांमध्ये अंतर्भाव असतो तो क्षणार्धात योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेचा, जसं हँडबॉल किंवा बास्केटबॉलमध्ये चेंडू कुठे, कोणाकडे, किती जोरात द्यायचा याचा निर्णय घेताना, आजूबाजूला कोण आहेत, कोणाचा अडथळा येऊ  शकतो, त्याला चकवायाचं कसं या सगळ्याचं अवधानही ठेवायला लागतं, खेळाचा वेगही जपावा लागतो, भावनांवर ताबा आणि तर्कशुद्ध विचार यांची तर कसोटीच लागते. याच प्रकारे वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळ्या जीवनोपयोगी क्षमतांचा कस लागतो.

एक खेळ- त्याचे अमाप फायदे.. खरच गरज आहे क्रीडाभिमुख मानसिकतेची.. क्रीडाभिमुख समाजाची!

डॉ. नीता ताटके

neetatatke@gmail.com