लहान मुलं जे वास्तव जगतायत, जी स्वप्नं पाहतायत, जे अनुभव घेतायत, ते त्यांना त्यांच्या जवळच्या वाटणाऱ्या माध्यमातून मांडता यायला हवं, व्यक्त होता यायला हवं आणि कुणी सांगावं ते माध्यम नाटक असू शकतं. त्यासाठीची जमीन तयार करणं नक्कीच आपल्या हातात आहे. नाटकाची प्रक्रिया नेमकी असते काय, कशी आणि लहान मुलांना ती नेमकं काय आणि कसं देऊ करते?

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा

गेल्या काही वर्षांत मराठी नाटकाचा प्रवास पाहिला तर सूक्ष्मपणे झालेला, पण अत्यंत महत्त्वाचा बदल लक्षात येतो तो हा.. की, मराठी नाटक, मग ते व्यावसायिक असो की अव्यावसायिक, एकुणातच दूरचित्रवाणी माध्यमाच्या प्रभावाखाली आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तीनही पातळ्यांवर, खासगी वाहिन्यांवरील मालिकांचा पडलेला प्रभाव कधी स्पष्टपणे, तर कधी नकळत लक्षात येतो. कलाकारांच्या निवडीपासून प्रेक्षकांच्या आवडीपर्यंत आणि अभिनय शैलीपासून – संवाद शैलीपर्यंत सगळीकडे त्याच्या खुणा सापडतात. त्यामुळे अनेक वेळा नाटक या जिवंत खेळामधलं नाटय़ शब्दबंबाळ आणि माहिती पुरवणारं असतं. नाटय़ानुभव कमी होत चालला आहे.

या बदलाची जबाबदारी जशी कलाकारांची आहे तशीच ती प्रेक्षकांचीसुद्धा आहे. नाटकाचा प्रेक्षक हळूहळू विरळ होत चाललाय. हा सगळा प्रेक्षक वर्ग मनोरंजनाच्या इतर अनेक उपलब्ध माध्यमांकडे खेचला जातो आहे. समोर चालू असलेल्या जिवंत खेळातल्या जादूपेक्षा डिजिटली जिवंत केलेल्या खेळाची जादू त्याला जास्त भुलवते आणि डिजिटल जग देऊ करत असलेल्या दृक्-श्राव्य मनोरंजनात तेवढी ताकदही निश्चितच आहे. मग तो चित्रपट असो, दूरचित्रवाणी असो, वेब सीरिज असोत की त्रिमितीय व्हच्र्युअल रिअॅलिटी असो. आजकाल सगळे विषय आणि आशय या माध्यमांमध्ये विखुरलेले आहेत. नवे विषय हाताळले जात आहेत आणि कमीजास्त प्रमाणात ते तिथे सशक्तपणे सादर होतायत. नवे प्रयोग आता या माध्यमांमध्ये होतायत.

ही गोष्ट आता अपरिहार्य आहे. त्यामुळे नाटक अनुभवणारा, त्यातल्या आभासी वास्तवाची नाटय़मय मजा लुटणारा प्रेक्षक हा, डिजिटल क्रांतीच्या अलीकडे जन्मलेला प्रेक्षक उरला आहे. म्हणजेच चाळिशीतला आणि त्यापुढचा प्रेक्षक. विशीतली आणि त्याही अलीकडची पिढी ही नव्या माध्यमांसकट आणि त्यातल्या नव्या तंत्रज्ञानासकट जन्माला आली आहे; येत आहे. कळीचा मुद्दा हा आहे की, मग अशा वेळी नाटक या माध्यमाचं स्थान या नव्या पिढीकरिता असेल का? असावं का आणि त्यात तथ्य काय?

मुळात नाटक काय करतं? तर ते अनुभव देतं आणि अनुभव घेण्याची, घेतलेले अनुभव साठवण्याची आणि सर्जनाच्या (निर्मितीच्या) पातळीवर त्यांची पुनर्निर्मिती करून प्रेक्षकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देण्याचं काम करतं. कल्पनेच्या पातळीवर जसं ते कलाकारांना आव्हान देतं तसंच प्रेक्षकांच्या आकलन आणि ग्रहणशक्तीलाही चालना देतं. त्याकरिता आपली अनुभव टिपणारी इंद्रिय (डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ) तीक्ष्ण असावी लागतात आणि अनुभव साठवणारा, त्याची जाणीव करून देणारा मेंदू तल्लख आणि सर्व पातळ्यांवर कार्यरत असावा लागतो. यामुळे संवेदना जागी राहते. या इंद्रियांचा वापर हेतुपुरस्सर केला नाही, त्याचा आळस केला किंवा त्यांनी दिलेल्या अनुभूतीकडे दुर्लक्ष केलं तर ही इंद्रिय आणि त्यांच्या संवेदना बोथट होत असतात. अशा बोथट संवेदना नाटक किंवा कुठलीही कलाकृती सोडाच, कुठल्याच नवनिर्मितीकरिता तयार नसतात. मग फक्त माहिती घेणे आणि ती पसरवणे इतकंच केलं जातं. हळूहळू ती माहिती आणि त्याआधारे केलेलं भाष्य इतकीच कार्यक्षमता उरते. बथ्थडपणा वाढत जातो. आपल्या सगळ्यांचंच कमी-जास्त प्रमाणात हेच झालेलं दिसतं.

नाटक हे एकापेक्षा अनेक घटकांचं एकत्रीकरण आहे. रंग-रेषा, अवकाश, स्थळ-काल, गंध, पोत, ध्वनी, दृश्यात्मकता, आकार, ताल-सूर हे सगळं एका नाटक नावाच्या खेळात सामावलेलं असतं. याखेरीज, शब्द, त्याचा नाद, अर्थ, काव्य, व्यक्तिरेखा, परस्परसंबंध, संवाद, साहित्य हे सगळे घटकही नाटकात दिसतात आणि हे सगळं एकत्र एकजिनसी होऊन थेट आणि जिवंतपणे, प्रत्यक्ष एका मोठय़ा प्रेक्षक समूहासमोर सादर होतं. समोर चाललेल्या खेळाशी ते एकरूप होऊ शकतात. सादर करणारे आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक अप्रत्यक्ष संवाद सुरू असतो. हशा, टाळ्या, उद्गार, शांतता, स्तब्धता, ताण हे सगळं सादरकर्ते आणि प्रेक्षक एकाच वेळी एकाच अवकाशात एकमेकांसोबत अनुभवत असतात. प्रेक्षकांमध्ये एकमेकांतही संवाद घडत असतो. आस्वाद घेताना तो समूहानं घेतला जातो. (चित्रपट किंवा इतर कुठलंही मनोरंजन माध्यम हे एकटय़ानंदेखील अनुभवता येतं.) हा नाटक आणि इतर माध्यमांतला मुख्य फरक.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नाटकाचा प्रत्यक्ष प्रयोग आणि त्यापूर्वीची, नाटक आकार घेतं, घडत जातं ती तालमीची संपूर्ण प्रक्रिया, कलाकारांची पूर्वतयारी ही सगळ्या संवेदनांना आवाहन करणारी असते. नाटक आकार घेतं त्या काळातही वेगवेगळे नवे अनुभव प्रत्येक दिवशी नव्यानं मिळतात आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक प्रयोगाच्या वेळी नवे प्रेक्षक या अनुभवाला नव्यानं सामोरे जातात. नाटक त्याच्या प्रेक्षकाला विचार करायला लावतं. मी समोर जे घडताना पाहतोय त्याचा आनंद घेण्याबरोबरच एका बाजूला ते मी माझ्याशी, माझ्या आजूबाजूच्या जगण्याशी, माझ्या भवतालाशी ताडून पाहात असतो. हे करताना नाटकीय शक्यतांबरोबरच मर्यादाही मला कल्पना करायला भाग पाडतात. (चित्रपटात समुद्र प्रत्यक्ष दिसत असतो. नाटकात समुद्राची माझी अनुभवाची स्मृती मला चाळवावी लागते. नाटकातला समुद्र मला माझ्या मनाच्या पातळीवर कल्पना करून अनुभवावा लागतो. माझी कल्पनाशक्ती, माझ्या अनुभवांची सगळी ताकद इथे पणाला लागते.) त्यामुळे माझ्या दाबल्या गेलेल्या, तळाशी गेलेल्या भावनांचा, स्मृतीचा निचरा होतो आणि कलाकारांबरोबरच प्रेक्षक म्हणून माझ्याही कल्पनाशक्तीला ला आवाहन केलं जाऊ शकतं. नेमकं याचाच कंटाळा आता प्रेक्षक म्हणून मी करतो.

स्पर्श जो आपल्या समाजात बऱ्याचदा आणि विनाकारण टाळला जातो, सरमिसळ जी शुद्धतेच्या आग्रहापोटी नाकारली जाते; भाषिक वैविध्य ज्याकडे दुर्लक्ष होतं; परस्परसंवाद (भाषेसकट आणि भाषेविना) जो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे; हे सगळे व्यवहार नाटकाच्या परिघात पूर्ण होतात. आपण सामाजिक प्राणी आहोत याचा आनंद आणि समाधान मिळवून देतात. त्या अर्थानं नाटकाची प्रक्रिया ही आजही माणूस म्हणून घडण्याकरिता अतिशय अनुकूल आणि पूरक असू शकते; असते.

परंतु नाटक नावाचा खेळ आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या समाजात अगदी वेगळा आहे. एक तर बराच मोठा काळ आपण या खेळाकडे तुच्छतेनं किंवा अचंब्यानं पाहण्यात घालवला. गेल्या काही वर्षांत त्यात बदल झाला तो असा की, नाटकाकडे व्यवसाय, करिअरचा एक पर्याय, काही मोजक्या लोकांची हौस म्हणून पाहायला सुरुवात झाली; पण नाटक हे संवेदनशील, सर्जकता, कल्पकता याची पूर्वतयारी करणारं माध्यम असू शकतं असं त्याकडे पाहिलं गेलं नाही.

वास्तविक पाहता, हे सगळंच चांगलं, सकस, निरोगी आणि दर्जेदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकच मनुष्याकरिता आवश्यक नाही का?

डॉ. अशोक दा. रानडे एका कार्यशाळेत म्हणाले होते तसं, ‘सर्जकता, कल्पकता आणि संवेदनशीलता ही काही फक्त कलाकारांचीच मक्तेदारी नाही हे आपण पक्कं समजून घेतलं पाहिजे आणि त्या दोन्ही गुणांना आत्मसात करण्याची, जोपासण्याची तीव्र आसक्ती आपल्यात असायला हवी. या सगळ्याची सुरुवात अगदी योग्य वयात म्हणजे ग्रहणशक्ती सक्षम होत असताना व्हायला हवी, कारण पुढे पुढे कामाच्या, ताणाच्या, नात्यांच्या स्पर्धेच्या, व्यावसायिकतेच्या, दुनियादारीच्या रेटय़ात संवेदना बोथट तरी होतात किंवा अतितीव्र. अनुभव घ्यायला वेळच राहात नाही आणि मग आपल्या सगळ्या प्रतिक्रिया; आपल्या जगण्याला दिलेल्या या माहितीच्या आधारावर असतात. आपण केवळ जिवंत बुजगावणी होऊन जातो अपरिहार्यपणे.

त्यामुळे परत एकदा लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांच्यापुढे आज अनेक पर्याय आहेत हे खरंच; पण म्हणून त्यांना कुठलाही पर्याय नाकारण्यात काय अर्थ आहे? किंबहुना सगळ्या पर्यायांची त्यांना नीट ओळख करून दिली तर त्यांना हवा तो पर्याय निवडणं त्यांच्यासाठी अधिक आनंदाचं असेल. लहान मुलं जे वास्तव जगतायत, जी स्वप्नं पाहतायत, जे अनुभव घेतायत, ते त्यांना त्यांच्या जवळच्या वाटणाऱ्या माध्यमातून मांडता यायला हवं, व्यक्त होता यायला हवं आणि कुणी सांगावं ते माध्यम नाटक असू शकतं. त्यासाठीची जमीन तयार करणं नक्कीच आपल्या हातात आहे. नाटकाची प्रक्रिया नेमकी असते काय, कशी आणि लहान मुलांना ती नेमकं काय आणि कसं देऊ करते?    मला स्वत:ला पालघर जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल भागात काम करताना, लहान मुलांसाठी नाटक उभं करताना आणि त्याचे प्रयोग केल्यावर नेमके काय अनुभव आले? हे पुढील (६ मेच्या) लेखात.

ckelkar@gmail.com