आजपर्यंत आपण स्टार्टअपच्या अनेक पायऱ्यांची ओळख करून घेतली. अधूनमधून काही स्टार्टअप उद्योजकांशीही ओळख करून घेऊ यात. त्यांच्या उद्योगाविषयी त्यांनी सांगितलेली गोष्ट वाचकांसाठी.

दागिने.. समस्त महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय. सुंदर कपडय़ांवर शोभून दिसण्यासाठी आपल्याकडे नेमके कुठले दागिने असावेत, याविषयी अनेक स्त्रिया चोखंदळ असतात. शुभकार्यप्रसंगी घालायचे दागिने, छोटेखानी समारंभासाठी घालायचे दागिने आणि अगदी ऑफिसला जाताना प्रत्येक ड्रेसवर मॅच होतील, यासाठी घालायचे नाजूक दागिन्यांचे जोड अनेकींकडे असतात तरीही प्रत्येक वेळी दागिने खरेदी करताना स्वत:च्या मनासारखी डिझाइन मिळतेच असे नाही किंवा आपल्याला हवी तशी डिझाइन घडवून घेणे हे बऱ्याचदा खर्चीक असते. अशा वेळी मनाप्रमाणे आणि सहज परवडेल अशा किमतीत दागिने घडवून देणारे कोणी भेटले तर;  हा प्रश्न ज्यांच्या मनात आहे त्यांच्यासाठी ‘आद्या’ ब्रॅण्ड हा खात्रीशीर आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध आहे. कस्टमाइज्ड हॅण्डमेड ज्वेलरीच्या क्षेत्रात आज ‘आद्या’ फक्त उदयोन्मुख नाही तर विश्वासार्ह आणि लोकप्रिय नाव आहे.

हा ज्वेलरी ब्रॅण्ड म्हणजे एक स्टार्टअप आहे. सायली मराठे हिने ‘आद्या’ची सुरुवात केली. आपल्या नवोद्योगाचा अनुभव तिने ‘लोकप्रभा’कडे मांडला. सायलीची शैक्षणिक पाश्र्वभूमी ही संगणक अभियांत्रिकीची. शिक्षण पूर्ण झाल्यावर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये तिने काम केले. नोकरीच्या निमित्ताने काही काळ परदेशी वास्तव्यसुद्धा होते. तिथे फावल्या वेळात काय करायचे म्हणून तिने बाजारातून बिड्स आणून अगदी घरच्या घरी काही दागिने तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला हा सगळा उद्योग हौसेखातर आणि निव्वळ आवड म्हणून सुरू होता. मात्र तिच्या एका मत्रिणीला सायलीने केलेल्या दागिन्यांची कलाकुसर फार आवडली. तिने सायलीला हे दागिने हळूहळू विकायचा सल्ला दिला. सुरुवातीला तिने एका मॉलमध्ये फक्त एका ट्रेमध्ये नेमके आणि मोजके असे हॅण्डमेड दागिन्यांचे जोड ठेवून विकले तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आपले काम लोकांना आवडत आहे, हे तिला कळले. दागिन्यांचा खप वाढावा, यासाठी तिने फेसबुक पेज तयार केले. त्यालाही अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळू लागला. ऑर्डर्स वाढू लागल्या तशा रात्री उशिरापर्यंत जागून सायलीला ऑर्डर्स पूर्ण कराव्या लागत, कारण हे सगळे तोवर नोकरी सांभाळूनच सुरू होते. आपल्या कामातील चोखपणा, नावीन्य आणि गुणवत्तेमुळे सायलीला चांगला प्रतिसाद मिळत होता. हे पाहून तिने आणि तिच्या नवऱ्याने हे काम गांभीर्याने करायचे, त्यासाठी स्वत:चा उद्योग सुरू करायचा, हे मनाशी पक्के ठरवले. कुठलाही उद्योग पूर्णवेळ करण्यासाठी नोकरी सोडणे ओघाने आलेच. सायलीच्या बाबतीत हा निर्णयच तिच्या स्टार्टअपसाठी चांगले वळण देणारा ठरला आणि त्यातूनच २०१३ साली ‘आद्या’ची सुरुवात झाली. आपल्या दागिन्यांना ओळख असावी, उद्योगाला एक नाव असावे, या हेतूने तिने ‘आद्य’ हे नाव विचारपूर्वक निवडले. कस्टमाइज्ड हॅण्डमेड ज्वेलरीच्या निर्मितीची सुरुवात करणारे ते ‘आद्य’; मात्र इंग्रजी उच्चाराच्या प्रभावामुळे ‘आद्य’चे ‘आद्या’ झाले. तेच लोकांच्या तोंडी रुळले आणि मग त्याच नावाचे संकेतस्थळ सायलीने सुरू केले. या संकेतस्थळामुळे तिला खूप फायदा झाला आणि त्याद्वारे परदेशातील ग्राहकांपर्यंतही पोहोचता आले.

हौसेखातर दागिने तयार करण्याची सुरुवात झाली असली तरी त्याचे वैविध्य आणि वैशिष्टय़ जपण्यासाठी सायली विचार करत होती. तिच्या मुख्य ग्राहक या स्त्रिया. प्रामुख्याने ऑफिसगोअर्स स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवत तिने दागिने घडवायला सुरुवात केली. आपले दागिने हाताळायला सोपे, वजनाला हलके असावेत, त्यांच्यावर पाण्याचा किंवा इतर रसायनांचा दुष्परिणाम होऊ नये, ही काळजी ती घेते. ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे दागिने तयार करणे हे तिचे वैशिष्टय़. तेव्हा त्यांच्या शरीरयष्टीचा, चेहऱ्याचा विचार करत किंवा त्यांना ज्या कपडय़ांवर ते दागिने घालायचे आहेत, त्यांच्या रंगसंगती आणि डिझाइनचा विचार करत योग्य लांबी-जाडीचे, वजनाचे दागिने सायली डिझाइन करून देते. त्यासाठी तिला स्केचेसवर फार काम करावे लागते. त्यासाठी चांदी, तांबे, जर्मन सिल्व्हर इ. धातूंचा ती वापर करते. दागिन्यांचे काम कलात्मक असल्यामुळे आपल्या डिझाइन्सची नक्कल होऊ नये यासाठी संकेतस्थळांवर त्या दागिन्यांच्या छायाचित्रांवर वॉटरमार्क टाकणे, विशिष्ट डिझाइनची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून धातुकाम करणाऱ्या कारागीरांसोबत करार करणे इ. गोष्टी कराव्या लागतात, असे सायली सांगते. सायलीकडे अगदी ३०० रुपयांपासून ते १५ हजारांपर्यंत किंमत असणारे दागिने उपलब्ध आहेत. त्यामुळे नुकत्याच कमावू लागलेल्या मुली ते अगदी ६० वर्षांपर्यंतच्या स्त्रिया सायलीकडून दागिने घडवून घेतात.

या स्टार्टअपसाठी सुरुवातीला तिने ५० हजारांपर्यंतची रक्कम गुंतवली होती. त्याचा उपयोग हॅण्डमेड दागिने करण्यासाठी लागणारा कच्चा माल विकत घेणे, संकेतस्थळ तयार करणे इत्यादीकरिता झाला. प्रतिसाद चांगला असल्यामुळे सुरुवातीच्या दोनेक महिन्यांतच तिची सुरुवातीची रक्कम वसूल होऊन फायदा झाला. हीच रक्कम ती उद्योगाच्या इतर गरजांसाठी गुंतवत गेली. ऑर्डर्सची संख्या वाढल्याने तिला एकटीला त्या ऑर्डर्स पूर्ण करणे शक्य नव्हते. म्हणून तिने टीम तयार करण्याचे ठरवले. मात्र आपल्याच एखाद्या मत्रिणीला घेऊन उद्योग करण्यापेक्षा सायलीने वेगळा विचार केला. आíथकदृष्टय़ा निम्नस्तरातील काही बायकांना तिने दागिने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला तिने अशा पाच बायकांची टीम तयार केली. आज तिच्याकडे सुमारे १५जणांची टीम असून उद्योगाची वार्षकि उलाढाल सुमारे ५० लाख आहे. अल्पावधीत दागिन्यांच्या क्षेत्रातील तिची ही झेप कौतुकास्पद आहे.

‘आद्या’कडे स्वत:ची ऑफिसस्पेस अशी नव्हती. सगळी भिस्त संकेतस्थळ, फेसबुक पेज, प्रदर्शने आणि मौखिक प्रसिद्धीवर होती. काही काळाने तिला पुण्यात एके ठिकाणी एका बंगल्याचे आऊटहाऊस मिळाले मात्र तो बंगला काही मोक्याच्या ठिकाणी नव्हता. मात्र जागेची अडचण सुटणार होती. कारण तयार दागिन्यांचे पॅकिंग, ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवता यावे, यासाठी कुरिअर करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी सायलीने तीच जागा निश्चित केली आणि त्याच जागेत आपला स्टुडिओ सुरू केला. हळूहळू ग्राहकांची पावले तिकडे वळायला लागली. सायलीच्या दर्जेदार कामामुळे तिचा स्टुडिओ कसा आहे, हे पाहण्यासाठीही ग्राहक येऊ लागले. त्यांना मनपसंत दागिन्यांच्या खरेदीसाठी चांगला पर्याय मिळाला.

कुठलाही उद्योग म्हटला की त्यात कष्ट आलेच. दागिन्यांच्या विक्रीसाठी ग्राहक पेठांमध्ये सायली सहभागी व्हायची. तिथल्या प्रदर्शनात ठेवण्यासाठी दागिन्यांच्या २०-२२ पिशव्या उचलण्यासाठी ती आणि तिचा नवरा असे दोघेच असायचे. प्रदर्शनात आपला स्टॉल लावण्यापूर्वी फार तयारी करावी लागायची. शिवाय दागिने नाजूक असल्याने त्यांच्या पॅकिंगकडे, मांडणीकडे लक्ष द्यावे लागायचे. या स्टॉलसाठी लागणारे भाडे, प्रदर्शनात होणारी प्रत्यक्ष विक्री यांचं गणित लक्षात घेत त्यातून मिळणाऱ्या पशांचे कसे नियोजन करावे लागते, याचे प्रत्यक्ष धडे तिला मिळाले. काम करताना तिला एक अडचण अशी यायची की विशेषत: चांदी किंवा इतर धातूंचे दागिने घडवताना कारागीर अनुत्सुक असायचे कारण कस्टमाइज्ड ऑर्डरचे मोजके चार-पाच पीसेस तयार करणे, हे त्यांना आíथकदृष्टय़ा न जमणारे गणित असायचे. अशा वेळी सायलीला कौशल्याने ते काम करवून घ्यावे लागायचे. आज परिस्थिती उलट आहे. किती दागिने घडवायचे आहेत, अशी विचारणा धातूचे दागिने करणाऱ्या मॅन्युफॅक्चर्सकडून होते. सायलीचे एखादे डिझाइन आवडले तर तिची परवानगी घेऊन ते त्यांच्या दुकानात मांडूनही ठेवतात. व्यावसायिक स्पध्रेविषयी बोलताना सायली म्हणते की हॅण्डमेड ज्वेलरी करणारे पुष्कळ आहेत मात्र ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार, मागणीनुसार कलाकुसरीचे दागिने घडवून देणारे कमी आहेत त्यामुळे तशी स्पर्धा जाणवत नाही. मात्र नावीन्यपूर्ण डिझाइन्स घडवत पुढे जाणे महत्त्वाचे आहे. माझा ग्राहकवर्ग हा ‘आद्या’शी जोडला गेला आहे. त्यामुळे एकीला डिझाइन्स आवडले की ती तिच्या चार मत्रिणींना सांगते आणि त्या मत्रिणीसुद्धा ‘आद्या’च्या ग्राहक होतात.

सायली सांगते की, कुठल्याही उद्योजकाने विशेषत: स्टार्टअप करणाऱ्या यंगस्टर्सनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की, उद्योग सुरू केल्यावर सुरुवातीचे काही महिने हे महत्त्वाचे असतात. आपल्याला जो वेग अपेक्षित असतो त्या वेगाने सुरुवातीला उद्योग विकसित होतोच असे नाही. एका टप्प्यावर तुम्हाला ‘हे सगळे सोडून द्यावे की काय’ असाही विचार येतो. हा विचार एकदा सायलीच्या मनातही आलेला, मात्र त्याचे कारण एवढेच होते की, नोकरी सांभाळून आणि व्यक्तिगत आवडीनिवडी मागे सारत ती ऑर्डर्स पूर्ण करण्याचा आटापिटा करत होती. वेळेवर त्या ऑर्डर्स पूर्ण होतील की नाही, या भीतीने आपण पुढे नको जायला, असाही विचार तिने केला होता. या पाश्र्वभूमीवर ती सांगते की, संयम राखणे खूप आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या उद्योगाविषयी अतिउत्साही आणि अतिमहत्त्वाकांक्षी असू नये. त्यापेक्षा लहान-लहान कालावधीसाठी उद्दिष्टे निश्चित करावी. ती पूर्ण करायचा ध्यास असावा. आपण रोपाला जसे रोज पाणी देतो, त्याप्रमाणे उद्योगासाठी रोज काहीना काही लहानशी पण महत्त्वाची गोष्ट आवर्जून करावी. हे सांगताना ती सातत्य आवश्यक असल्याचे अधोरेखित करते.

सायलीने गेल्या काही काळापासून मराठी चित्रपटांसाठी ज्वेलरी डिझायिनग सुरू केले आहे. ‘टाइमपास २’मधील प्रिया बापटच्या लुकचा विचार करून तिच्यासाठी सायलीने ज्वेलरी डिझायिनग केले होते. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘पोश्टर गर्ल’साठीही तिने ज्वेलरी डिझायिनगची जबाबदारी सांभाळली. चित्रपटासाठी दागिने तयार करताना अनेक लोकांशी चर्चा करूनच त्याचे डिझाइन निश्चित केले जात असल्याचे सायली सांगते. चित्रपटासाठी तयार केलेले दागिने विक्रीसाठी तिच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. मराठीतील काही नामांकित अभिनेत्री ‘आद्या’च्या ग्राहक असल्याने दागिन्यांची प्रसिद्धी आपसूकच होत असल्याचे ती सांगते. भविष्यात सायलीला परदेशांमध्येही प्रदर्शने आयोजित करायची आहेत आणि सातत्याने नावीन्यपूर्ण दागिने तयार करून या क्षेत्रात स्वत:चा, ‘आद्या’चा ठसा उमटवायचा आहे.

‘एकमेका साहाय्य करू’ या उक्तीप्रमाणे सायलीने पुण्यातील हस्तकला नवोद्योजिकांची ‘वुमन आंत्रप्रूनर्स पुणे’ या नावाची संघटना बांधली आहे. त्या सगळ्याजणी पहिल्याच पिढीच्या उद्योजिका आहेत. त्यात चॉकलेट्स, सौंदर्यप्रसाधने, कॅण्डल्स, डिझायनर वस्त्रे, फूटवेअर, इ. उत्पादने निर्माण करणाऱ्या उद्योजिकांचा समावेश आहे. एकत्र प्रदर्शने भरविल्यामुळे त्यांना आíथकदृष्टय़ा अधिक लाभ होतो. या सगळ्या उत्पादनांचा ग्राहकवर्गसुद्धा त्या त्या उत्पादनांशी एकनिष्ठ असल्याने प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळतो.
ओंकार पिंपळे – response.lokprabha@expressindia.com