आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत ‘मला काय त्याचे’ अशी सरधोपट भूमिका न घेता काहीजण पाय रोवून उभे राहतात. परिस्थितीला टक्कर देतात आणि व्यवस्था बदलायला भाग पाडतात. कारण त्यांना माहीत असतं.. केल्याने होत आहे रे.. असे काही शिलेदार आणि त्यांच्या लढय़ांविषयी..

सध्या मेक इन इंडिया, स्टार्ट-अप अशा नवसंकल्पनांचं वारं वाहतं आहे. उद्योगधंद्यांना पोषक वातावरणनिर्मिती केली जाते आहे. या पाश्र्वभूमीवर गेली बारा वर्षे सुरू असलेल्या बिझनेस इनक्युबेटर या आगळ्यावेगळ्या संकल्पनेविषयी-

‘स्टार्ट-अप एनक्युबेटर’ असे म्हटल्यावर तुम्ही म्हणजे काय, हा प्रश्न नक्कीच विचाराल. कारण हॉस्पिटलमधल्या एनक्युबेटरबद्दल आपण ऐकलेले असते, पण बिझनेस एनक्युबेटर असे काही असते याबद्दल आपल्याला माहिती नसते. असे बिझनेस इनक्युबेटर गेली बारा वर्षे आयआयटी मुंबईत कार्यरत आहे आणि या इनक्युबेटरमध्ये जन्माला आलेली, वाढलेली ‘बिझनेस बाळं’ आता इनक्युबेटरमधून बाहेर येऊन उद्योग क्षेत्रात दुडुदुडु धावायला लागली आहेत.

काय आहे ही बिझनेस इनक्युबेटर ही संकल्पना? ‘स्टार्ट-अप’, ‘मेक इन इंडिया’चा बोलबाला असलेल्या आजच्या जमान्यात ही इनक्युबेटर्स कशी काम करतात? हे समजून घेण्याआधी मुळात या संकल्पनेचा उगम कुठे झाला ते पाहायला हवं.

अमेरिकेत १९८५-८६ दरम्यानच्या काळात नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांना वेगवेगळ्या प्रकारची मदत पुरवायची या हेतूतून ही संकल्पना पुढे आली. हे नेमके कसे केले जाते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूयात. समजा क्ष या व्यक्तीने स्वत:चे बुद्धिकौशल्य वापरून एक वेगळ्याच प्रकारचा पेन बनविला आहे. मग त्याने असे ठरवले की ही वेगळ्या पेनची कल्पना एखाद्या कंपनीला विकून आपल्या बौद्धिक कौशल्याचा मोबदला मिळवण्याऐवजी स्वत:च या पेनचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून विक्री करायची आणि त्यातून फायदा मिळवायचा. आता स्वत: एखाद्या वस्तूचे उत्पादन करायचे म्हटले की स्वत:ची कंपनी हवी, यंत्रणा हवी, भांडवल हवे. समजा या गरजा त्याने कशाबशा पूर्ण केल्या, तर त्यानंतरचा प्रश्न असतो योग्य जागा मिळणे. काम करण्यासाठी योग्य माणसे मिळणे, आपल्या उत्पादनासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभ्या करणे. या सगळ्यातून पेनचा प्रोटोटाइप तयार होतो. झाल्यावर मार्केटिंगचा प्रश्न येतो. त्यानंतर या पेनचे कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य तंत्रज्ञान विकसित करणे, या सगळ्यांसोबत कंपनी तयार करताना आवश्यक विधि अगर कायद्यांमधल्या तरतुदी, त्यासाठी योग्य लोकांचे मार्गदर्शन घेणे, मुळात आधी अशा लोकांना शोधणे हीदेखील मोठी मोहीम ठरू शकते. या साऱ्या प्रयत्नांनंतर एखादी कंपनी खऱ्या अर्थाने उभी राहते, परंतु अनेकविध कंपन्या या प्रवासामध्येच अडकून मध्येच आपले काम बंद करतात. नेमकी हीच निकड लक्षात घेऊन एनक्युबेटर या संकल्पनेची निर्मिती झाली.

इथे काय होते? तर, क्ष ही व्यक्ती आपल्या पेनची संकल्पना घेऊन या एनक्युबेटर सेंटरकडे जाते. तिची काही प्रमाणात स्वत:चे भांडवल गुंतविण्याची व मनापासून काम करण्याची तयारी असणे अपेक्षित असते. मग एनक्युबेटर सेंटर्स त्यांच्याकडे असणारा निधी या कंपनीला उपलब्ध करून देतील अगर पसे गुंतवू इच्छिणाऱ्या लोकांशी या ‘क्ष’ व्यक्तीची गाठ घालून भांडवल मिळविण्यासाठी मदत करतील. यानंतरची पुढची महत्त्वाची बाब म्हणजे जागा. एनक्युबेटर सेंटरकडे स्वत:ची मुबलक जागा असते त्यातीलच काही या पेन कंपनीसाठी अतिशय कमी दरात उपलब्ध करून दिली जाते. हे एनक्युबेटर सेंटर्स बहुधा तंत्रज्ञान महाविद्यालये, विद्यापीठांशी किंवा अद्ययावत कंपन्यांशी संलग्न असतात; त्यामुळे या विद्यापीठांची किंवा कंपन्यांची अद्ययावत प्रयोगशाळा एनक्युबेटर सेंटरमध्ये येणाऱ्या कंपनीला वापरायला मिळते, तसेच विधिविषयक किंवा मार्केटिंग आणि बाजारातील गुंतवणुकीच्या सल्ल्यांसाठी एनक्युबेटर सेंटरतर्फे योग्य व अनुभवी सल्लागार कंपनीसाठी नेमण्यात येतात. या सगळ्या सुविधा सहज उपलब्ध झाल्यामुळे ‘क्ष’ या व्यक्तीला आपला पेन अधिकाधिक कुशल पद्धतीने निर्माण करण्यावर भर देता येतो व कंपनी उत्तमरीत्या कार्यरत होते. ही कंपनी स्वत:च्या गरजा नीट भागवू शकली, बाजारात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी झाली, की मग कंपनी एनक्युबेटर सेंटरमधून बाहेर पडते. १९८६ नंतर अमेरिकेत खूप मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारच्या नवीन उद्योगांना सुरुवात झाली आणि त्याचे बरेच मोठे श्रेय हे बिझनेस एनक्युबेटर सेंटर्सना जाते.

भारतामध्येही गेल्या काही वर्षांत लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे. उद्योगांच्या दिशेने लोकांचा ओढा सध्या वाढताना दिसतोय. नेमकी हीच गोष्ट ध्यानात ठेवून २००४ मध्ये आयआयटी मुंबईअंतर्गत अशाच एका एनक्युबेटर सेंटरची निर्मिती झाली. ‘साईन’ (सोसायटी फॉर इनोव्हेशन अ‍ॅन्ड आंत्रप्रेनरशीप) असे तिचे नाव. अमेरिकेत, युरोपमध्ये अनेक मोठय़ा तंत्रज्ञान संस्थांशी संलग्न असणाऱ्या बिझनेस इनक्युबेटरचा, त्यांच्या प्रणालीचा अभ्यास केल्यानंतर त्या प्रणालीमध्ये भारतीय गरजेनुसार फेरबदल करून बिझनेस एनक्युबेटर सेंटरसाठी विशेष कार्यप्रणाली ठरविण्यात आली. आयआयटी माजी विद्यार्थी संघाचा यामध्ये मोठा सहभाग आहे. हे सेंटर व तेथे काम करणारी मंडळी आयआयटीअंतर्गत येत नाहीत. परंतु आयआयटी मुंबईतील अनेक मानद प्राध्यापक या सेंटरच्या संचालक मंडळात सहभागी असल्याचे दिसते.

आआयटीमधील सीएसआरईच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर वेगळ्याच वास्तूत प्रवेश केल्याची जाणीव आपल्याला होते. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाला शोभतील अशा मीटिंग आणि कॉन्फरन्स रूम्स, अद्ययावत सुविधांनी सज्ज असणारी कंपन्यांसाठीची कार्यालये आणि त्यात काम करणारी तरुण मंडळी. साधारण दहा हजार स्क्वेअर फुटांच्या या इनक्युबेटर सेंटरमध्ये सध्या २५ वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या कंपन्या (इनक्युबिटीज) कार्यरत आहेत.

प्राध्यापक मिलिंद अत्रे ‘साईन’चे अध्यक्ष म्हणून सध्या काम पाहतात. त्यांनी सांगितले की ‘साईन’मध्ये कंपन्यांना ‘इनक्युबिटी’, ‘प्री इनक्युबिटी’ किंवा ‘व्हच्र्युअल इनक्युबिटी’ म्हणून प्रवेश मिळू शकतो. ‘प्री इनक्युबिटी’ म्हणजे अनेकदा लोक वेगवेगळ्या उद्योग संकल्पना घेऊन ‘साईन’कडे येतात, परंतु त्या संकल्पनांबाबत ‘साईन’ आणि तो उद्योग घेऊन येणारे काही प्रमाणात साशंक असतात. मग अशांना तात्पुरती मदत करून काही काळ त्यांच्या कार्याचे निरीक्षण केले जाते. हा कालावधी साधारण तीन महिने असू शकतो. त्यादरम्यान त्या कंपनीची वाटचाल समाधानकारक वाटली तर अशा कंपन्यांना ‘इनक्युबिटी साईन’अंतर्गत समाविष्ट करून घेण्यात येते. मग इतर ‘इनक्युबिटीज’प्रमाणे या कंपन्यांनाही सर्व सुविधा दिल्या जातात.

सर्वात पहिली आणि महत्त्वाची सुविधा म्हणजे जागा. ‘साईन’ इनक्युबिटीजना उत्तम ऑफिस उपलब्ध करून देते. पवईसारख्या मध्यवर्ती परिसरात ज्या ऑफिसचे भाडे साधारण ७० ते ८० हजार रुपये महिना आकारले जाऊ शकते, त्याच ठिकाणी अतिशय साधारण किमतीत उत्तम फíनचर आणि अद्ययावत सुविधांनी सजलेली कार्यालये ‘साईन’ या कंपन्यांना उपलब्ध करून देते. शिवाय इतर कार्यालयोपयोगी गोष्टींच्या खरेदीसाठी ५ लाख रुपयांपर्यंतची मदतदेखील पुरविली जाते. ‘साईन’मधील सेमिनार रूम्स, मीटिंग रूम्स, कॅफेटेरियादेखील हे इनक्युबिटीज वापरू शकतात.

जागेनंतरची सर्वात मोठी सुविधा म्हणजे त्यांना वापरायला मिळणारी आयआयटीची अद्ययावत प्रयोगशाळा. त्यानंतर प्रश्न असतो, भांडवलाचा. आयआयटी मुंबई हे नवनवीन तंत्रज्ञान निर्मिती आणि संशोधनासाठी ओळखले जाते. त्यामुळे येथे नवीन क्षेत्रात पसे गुंतवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांचा चांगलाच राबता असतो. ‘साईन’ अशा गुंतवणूकदारांना त्यांच्या इनक्युबिटीजशी जोडून देण्याचे काम करते, जेणेकरून गुंतवणूकदार आणि इनक्युबिटीज दोहोंना याचा फायदा होतो. तसेच भारत सरकारतर्फे येणारे अनेक निधी या कंपन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात.

भांडवलानंतर गरज असते योग्य मार्गदर्शकाची. ‘साईन’च्या उभारणीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या आयआयटी मुंबईचा माजी विद्यार्थी संघ हा भार हलका करतो. आयआयटी मुंबईतील गुणी विद्यार्थी जगभरातल्या मोठमोठय़ा कंपन्यांत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. आपला अनुभव या इनक्युबिटीजसोबत वाटून घेण्यासाठी ते सदैव तयार असतात. त्यामुळे अतिशय कमी फीमध्ये येथील इनक्युबिटीजना आपल्या कंपनीसाठी उत्तम मार्गदर्शक सहज उपलब्ध होतात. शासकीय आणि विधि व्यवहार हा थोडा किचकट विषय हाताळण्यासाठीही साईन उत्तमोत्तम मार्गदर्शक या कंपन्यांना उपलब्ध करून देते. या सगळ्या प्रवासात साईन या इनक्युबिटीजसोबत खंबीरपणे उभी असते. या अशा अतिशय पोषक वातावरणामुळे साधारण तीन वर्षांत कंपन्या समाधानकारक प्रगती करू शकतात. तीन वर्षांनंतर या कंपन्यांना ‘साईन’ची जागा सोडावी लागते, परंतु नुकत्याच जन्मलेल्या या आपल्या अपत्याला पुढील वाटचालीसाठीही ‘साईन’ मोलाची मदत करते. त्यामुळे या कंपन्या अलगद बाजारातल्या मुख्य कंपन्यांच्या प्रवाहात येऊन सामील होतात. यानंतरचा ‘साईन’मध्ये समाविष्ट होण्याचा तिसरा प्रकार म्हणजे ‘व्हच्र्युअल इनक्युबिटी’. म्हणजे बऱ्याचदा काही नवउद्योजकांकडे स्वत:ची जागा असते, परंतु बाकीच्या अडचणी पेलण्याची क्षमता त्यांच्यात नसते. अशांना ‘साईन’ आपल्याकडे व्हच्र्युअल इनक्युबिटी म्हणून समाविष्ट करून घेते व त्यांना जागेखेरीज इतर सुविधा पुरविल्या जातात.

या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असू शकतो तो म्हणजे, ‘साईन’ची मदत कुणाला मिळू शकते? तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता अगर अट म्हणजे संबंधित कंपनीच्या टीममध्ये आयआयटी मुंबईचा किमान एक आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक असणे आवश्यक आहे. ही अट थोडी जाचक वाटत असली तरी याबद्दल बोलताना मिलिंद अत्रे म्हणतात की, ही अट नसती तर ‘साईन’च्या बाहेर कंपन्यांची रांग लागली असती, ज्यांना समाविष्ट करून घेणे सध्याच्या जागेत ‘साईन’ला शक्य नाही. ते म्हणतात, ‘आमच्याकडे अनेक मुलं साध्यासाध्या संकल्पना घेऊन येतात. त्यात नावीन्य असते, परंतु त्यातून मोठा उद्योग उभा राहण्याची शक्यता फारच कमी असते. त्यामुळे आयआयटी मुंबईमध्ये असणाऱ्या तंत्रज्ञानावरील कोणत्याही विषयातील उद्योगाला आम्ही स्वीकारतो. फक्त त्यामध्ये स्वत:चे वेगळेपण आणि यशस्वी उद्योग होण्याची क्षमता असायला हवी. दुसरे म्हणजे तुमच्या कंपनीत आयआयटी मुंबईतील कोणीही नसेल, पण तुमची कंपनी आयआयटी मुंबईमध्ये होणाऱ्या संशोधनावर आधारित असेल आणि तुमची उद्योग संकल्पना अतिशय चांगली असेल तरी ‘साईन’मध्ये अंतर्भूत करण्याविषयी विचार केला जातो.

अर्थात ही अट पूर्ण केली तरी लागलीच ‘साईन’मध्ये समावेश होत नाही. तर संबंधिताला आपल्या उद्योग संकल्पना ‘साईन’च्या मातब्बर आणि उद्योग क्षेत्रातील उत्तम जाण असणाऱ्या मंडळासमोर प्रभावीपणे मांडता यायला हव्या व त्यांचे होकारार्थी मत मिळविता यायला हवे. यामध्ये आपला उद्योग हा विज्ञान तंत्रज्ञान विभागात मोडतोय का, त्यात नवीन संकल्पना आणि संशोधन कितपत आहे, कंपनीतर्फे तयार होणारी वस्तू (प्रॉडक्ट) बाजारात कितपत गरजेचे आहे, त्याचा ग्राहक वर्ग कोणता असेल, ते बाजारात कितपत टिकाव धरू शकेल या आणि अशा अनेक पातळ्यांवर ज्यांची उद्योग संकल्पना टिकणारी असेल अशांना त्यांचा बिझनेस आराखडा देण्याबद्दल सांगितले जाते.

‘साईन’कडे येणाऱ्या उद्योगकल्पनांबद्दल अत्रे म्हणतात की, लोक नवनवीन गोष्टी घेऊन येतात, परंतु त्यांना बिझनेस आराखडा लिहिता येत नाही. मग त्यांना त्यासाठी उद्युक्त केले जाते. यामध्ये सुरुवातीला उद्योजकाने काही प्रमाणात स्वत:चे पसे गुंतविणे अपेक्षित असते. अशा सगळ्या गोष्टींनंतर एखाद्या नवीन उद्योजकाला ‘साईन’तर्फे संधी देण्यात येते. यासाठीचा कालावधी साधारण दोन-तीन महिने असतो. या सर्व सुविधा पुरविताना या कंपन्यांना काही पसेदेखील आकारले जातात, ज्यामागची भावना कोठेही पसे कमावणे ही नसते. सध्या साईनमध्ये साधारण २५ कंपन्या इनक्युबिटी म्हणून समाविष्ट आहेत. ज्या सर्वच विविध क्षेत्रांतल्या आहेत. ऊर्जा विभागात काम करणारी सोलार एनर्जी, एव्हिएशन क्षेत्रात काम करणारी ड्रोन आणि एव्हिएशन, शिक्षण क्षेत्रात काम करणारी पर्पल स्क्वेरल अशा वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश आहे.  ‘नॅनोस्नीफ’ हे त्यातलेच एक नाव. मायक्रो कॅन्टिलिव्हर आणि मायक्रो हीटिंग सेन्सर बनविणारी एकमेव कंपनी आहे. यातील मायक्रो हीटर हे अतिशय लहान आकाराचे (मायक्रोमीटर एका मिलिमीटरचा हजारावा भाग) हीटर तसेच मायक्रो कॅन्टिलिव्हर म्हणजे वजन करू शकणारे लहानात लहान संसाधनं आहे. या मायक्रो कॅन्टिलिव्हरचा वापर करून मायोकार्डियल इनफ्रॅक्शन (सोप्या भाषेत हार्ट अटॅक) या आजाराचे वेळीच निदान करू शकणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा वापर सामान्य माणसेदेखील करू शकतील. अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांचे लवकरात लवकर निदान होऊ शकेल. याशिवायही एम-७६ यांसारख्या सांख्यिकी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यादेखील सध्या ‘साईन’अंतर्गत इनक्युबेट केल्या जात आहेत. अर्थातच या सगळ्या कंपन्या येत्या काही काळात आपल्याला उत्तमोत्तम स्टार्ट-अप सक्सेस स्टोरीज म्हणून वाचायला मिळतील यात तिळमात्र शंका नाही.

आयआयटी मुंबईसारख्या मोठय़ा संस्थेमधील विद्यार्थ्यांना बाहेर लाखोंचे पॅकेज मिळत असताना हे सुपरब्रेन्स उद्योग क्षेत्रात वळविण्यात कसे काय यश मिळालं, याबाबत बोलताना मिलिंद अत्रे यांनी सांगितले की, आम्ही साधारण पहिल्या-दुसऱ्या वर्षांपासूनच मुलांना या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत असतो. त्यामुळे आता आमच्याकडे स्वत:च्या उद्योग संकल्पना घेऊन येणाऱ्या मुलांची संख्या कमालीची वाढली आहे. शिवाय याचे श्रेय काही प्रमाणात सध्याच्या लोकांच्या बदलत्या मानसिकतेलाही द्यायला हवे, असे ते म्हणतात. पूर्वी सरकारी नोकरी आणि सुरक्षित भविष्याचा विचार करणारे लोक हल्ली स्टार्टअप करणाऱ्या नवीन उद्योजकांनाही आदराची वागणूक देताना दिसतात. शिवाय या मुलांचा स्टार्ट-अपचा प्रयत्न अयशस्वी झाला तर त्यांना त्या वर्षी होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटला संधी देण्यात येते. याशिवाय सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतर्फे उद्योजकता विषयातील विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यातून येत्या काळात उत्तमोत्तम उद्योजक निर्माण होऊ शकतील अशी आशा आहे. सध्याची भारतातील आíथक व उद्योग क्षेत्रातील स्थिती पाहता या नव्याने येणाऱ्या कंपन्या भारतातील उद्योग क्षेत्रांचे भवितव्य ठरवतील.

साईनची कारकीर्द
स्थापनेपासून आजवर तब्बल ७८ उद्योग एनक्युबेट करण्यात आले आहेत.  आज २८ उद्योग एनक्युबेट सेंटरमध्ये कार्यरत आहेत, तर ३६ उद्योगांची एनक्युबेशन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून ते स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आजवर ३६ उद्योगांना मोठय़ा उद्योजकांचे अर्थसहाय लाभले, तर १६ उद्योगांना बँका आणि सरकारी निधी मिळाला आहे.
साईनचे अध्यक्ष – प्रा. मिलिंद अत्रे

गरज नव्या इनक्युबेटर्सची
आयआयटी मुंबईसारखीच कार्यप्रणाली असणारे बिझनेस एनक्युबेटर सेंटर बाकी आयआयटीद्वारेदेखील सुरू करण्यात आली आहेत. याखेरीजही अनेक खासगी कंपन्यांनीही आपला विस्तार वाढविण्यासाठी काही ठिकाणी एनक्युबेटर सेंटर्स सुरू केले आहेत, परंतु तरीही आपल्या देशात या बिझनेस एनक्युबेटरची संख्या अतिशय कमी आहे. अमेरिकेत सध्या साधारण चार हजारच्या आसपास एनक्युबेटर सेंटर्स आहेत. आपल्या देशात भविष्यात दोन-तीन इंजिनीअरिंग महाविद्यालयांनी मिळून तरी एक एनक्युबेटर सेंटर चालविले तरी उद्योगांना आणि विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला चालना मिळू शकेल.

‘साईन’चं अपत्य‘
साईन’मधून बाहेर पडून अनेक कंपन्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेल बचतीचे तंत्रज्ञान विकसित करून देणारी पुण्यातली सेडमॅक, अमेरिकास्थित सेक्योलर, संगीत तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर कंपनी सेन्सीबोल ही त्यांपकीच काही उदाहरणं. संगीतविषयक टीव्ही शोमध्ये संबंधित स्पर्धक गायक कसा गायला हे सांगणारी तज्ज्ञ माणसे शोमध्ये असतात. एरवीही असे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. पण कोण कसा गायला हे जर संगणक सांगू शकला तर? नेमका हाच विचार करून विश्व्ोश्वरा राव यांनी सेन्सीबोल ही कंपनी स्थापन केली. आज या कंपनीला जगभरातून मागणी आहे.संगीत क्षेत्रात विशेष रुची असणाऱ्या राव यांना तंत्रज्ञान आणि संगीत या क्षेत्रात करियर करायचे होते. त्यासाठी त्यांनी फ्लोरिडाला जाऊन म्युझिक इंजिनीअरिंग केलं. परत आल्यावर आयआयटी मुंबईमध्ये त्यांनी ऑडिओ टेक्नोलॉजी विषयात पीएच.डी. करण्याचे ठरविले. कोण किती चांगला गातो हे कसे ठरवायचे, याच प्रश्नापासून सुरू झालेल्या त्यांच्या संशोधनाची परिणती सध्याच्या ‘सेन्सीबोल’ या कंपनीमध्ये झाली आहे. यात काय केलं जातं, तर किशोर कुमारचा एका गाण्यातील आवाज आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलवून तो प्रमाण मानायचा आणि त्याच्या सुरांना, गाण्यातील त्याच्या भावार्थाना एक नंबर द्यायचा. आता त्यानुसार नवीन गायकाचे गाणे सूर आणि भावार्थाच्या कसोटीवर तपासून त्याला एक नंबर द्यायचा. त्यांच्यावरून आपल्याला नवीन गायकाचा दर्जा काही प्रमाणात तरी ठरविता येऊ शकतो. या संकल्पनेवर आधारित ‘गाओ ना’ नावाचे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्यामध्ये जुन्या गाण्यांच्या कराओकेसह गाऊन आपण आपल्या आवाजाची तुलना करू शकतो. आता राव यांच्या याच तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या ऑडिओ प्रोसेसिंगच्या कामात म्हणजेच उच्चार आणि भाषा तपासण्यासाठी, आवाज ओळखण्यासाठी, विविध भाषेतून संगणकाला इनपूट देण्यासाठी केला जात आहे.अन्ड्रॉईड विन्डोज या संगणकीय भाषांमध्येदेखील सेन्सीबोलने तंत्रज्ञान निर्माण केले आहे. ते व्हॉईस एनहान्समेंट, म्युझिक आयसोलेशन अशा अनेक कामांमधून वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करून देतात.  सेन्सीबोलसोबत काम करण्यासाठी जगभरातून कंपन्या भारतात येत असतात. काही कंपन्यांसाठी तर त्यांचे संपूर्ण म्युझिक सेट अप तयार करून दिले जात. सेन्सीबोल ही कंपनी २०१४ साली ‘साईन’मध्ये समाविष्ट करण्यात आली. सततच्या चढत्या आलेखानुसार ही कंपनी सध्या संगीत तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी बनली आहे. नुकतीच ही कंपनी साईनमधून बाहेर पडून आपल्या पायावर उभी राहिली आहे.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com