19 October 2020

News Flash

स्वातंत्र्याचा उद्गार

नाटकाच्या आरंभी नोरा घरात प्रवेश करते ती गाणे गुणगुणत.

घर सोडून जाताना तिने पाठीमागे बंद केलेल्या दाराचा आवाज साऱ्या युरोपमध्ये घुमला, असे जिच्याबाबत म्हटले गेले ती नोरा हेल्मर, हेन्रिक इब्सेन या नॉर्वेच्या नाटककाराच्या ‘डॉल्स हाऊस’ (१८७९) या नाटकाची नायिका. इब्सेन हा आपल्या मराठीतल्या वरेरकर, अत्रे, वर्तक, रांगणेकर या नाटककारांना तंत्रदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा प्रेरणा देणारा नाटककार.

नाटकाच्या आरंभी नोरा घरात प्रवेश करते ती गाणे गुणगुणत. हातात ख्रिसमसच्या खरेदीची पुडकी आहेत. तिने बाजारातून तिच्या आवडीची बदाम बिस्किटे आणलेली असतात, त्यातली काही तोंडातही टाकलेली असतात. ती आल्याची चाहूल लागताच अभ्यासिकेत काम करीत बसलेला तिचा नवरा म्हणतो, ‘आले का माझे गाणारे पाखरू?’ तिने आणलेल्या वस्तू त्याला दाखवायच्या असतात.  मुलांसाठी खेळणी, भेटवस्तू, ख्रिसमस ट्री सजवणे, नवऱ्याबरोबर सुंदर ड्रेस घालून नृत्याला जाणे.. नाताळचा सारा उत्साह तिच्या बोलण्यातून, हावभावातून सांडत असतो. नवरा बाहेर येतो आणि तिची खरेदी पाहून चिडचिड करतो, ‘झाली का उधळपट्टी करून!’ ती म्हणते, ‘काय झालं जरा जास्त पैसे खर्च झाले तर या नाताळात’- तिला स्वाभाविकच तसे वाटते. कारण नवऱ्याला बढती मिळून तो बँक मॅनेजर होणार असतो. त्याची कुरकुर ती उडवून लावते. त्यात काय, आपण कर्ज काढू! – तिचे हे बोलणे त्याची चिडचिड वाढवणारेच असते. पण तरीही आपल्या बायकोला लाडाने चुचकारत तो खर्चासाठी काही थोडे पैसे तिला देतो. तिने उधळपट्टी करू नये, गरज नसताना खरेदी करीत सुटू नये, आदी सुनावणे सुरूच असते. तिने आज पेस्ट्रीच्या दुकानाकडे चक्करबिक्कर तर नाहीना टाकली याची शंका येताच तो ते विचारतो. त्यावर ती चक्क खोटे बोलते, ‘छे! छे! काहीतरीच काय!’ बदाम बिस्किटांचे पुडके तिने आधीच बाजूला लपवलेले होतेच.

दुपारी तिला भेटायला तिची मत्रीण क्रिस्टीन येते. आजारी आईसाठी आणि लहान भावंडासाठी आपण या वयस्क पुरुषाशी कसे लग्न केले हे ती सांगते, आता तिला वैधव्य आलेले आहे. तेव्हा नोराही आपण आपल्या नवऱ्याचा जीव कसा वाचवला ते सांगते. काही वर्षांपूर्वी तो गंभीर आजारी असताना त्याला हवापालटासाठी न्यावे, असा डॉक्टरचा सल्ला असतो. हाताशी पसा नाही. वडिलांकडून काही मदत मिळणे शक्य नव्हते. नवऱ्याला तो इतका आजारी असताना मोठय़ा रकमेची गरज आहे हे सांगणे अशक्य होते. त्या वेळी नोरा नवऱ्याला न सांगता त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका माणसाकडून कर्ज घेते. नवऱ्याला हवापालट करायला घेऊन जाते व त्यामुळेच त्याची प्रकृती सावरते. क्रॉगस्टॅडकडून घेतलेले ते कर्ज नोराने चुकवतही आणलेले असते. पैसे वाचवून, विणकाम, शिवणकाम करून तिने थोडे पैसे कमावलेले असतात. मत्रिणीला हे सांगताना नोराला अभिमान वाटतो. आता या गरजू मत्रिणीच्या विनंतीवरून नोरा नवऱ्याकडे त्याने त्याच्या ऑफिसात तिला कामावर घ्यावे असा शब्द टाकते व तो मान्यही करतो.

नाताळची आनंदी संध्याकाळ. ख्रिसमसचे सजवलेले झाड दिवाणखान्यात ठेवण्यात आले आहे. नोरा मुलांशी खेळते आहे. लाडेलाडे त्यांच्याशी बोलते आहे. अशा वेळी क्रॉगस्टॅड अचानक दारात उभा राहतो. त्याने क्रिस्टीनला नोराच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेले असते. तिला आपल्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम देण्यासाठी आपण शब्द टाकला आहे हे नोरा सांगते. नोराचा नवरा आपल्याला कामावरून काढून टाकून त्या जागी क्रिस्टीनला नेमणार हे हेरून क्रॉगस्टॅड नोराला नवऱ्याकडे त्याच्यासाठी रदबदली करायला सांगतो. तो आता नोराला ब्लॅकमेल करतो आहे. ‘नाताळचा हा सण कसा घालवायचा हे आता सर्वस्वी तुझ्या हाती आहे’, तो म्हणतो. नोरा चिडून म्हणते, ‘तुझ्यासारख्या माणसाकडून मी कर्ज घेतले होते हे गुपित त्याला कळणे चांगले नाहीच. पण तुला सांगायचे असेल तर सांग. त्याला हे कळल्यावर तो तुझे राहिलेले कर्ज चुकते करील व तुला नक्कीच कामावरून काढून टाकेल. मग तुझा आमच्याशी काहीच संबंध उरणार नाही.’ नवरा आपल्या बाजूने उभा राहील अशी नोराला खात्री आहे. पण क्रॉगस्टॅडच्या हाती हुकमाचा एक्का आहे. प्रश्न नुसत्या कर्जाचा नाही. नोराला तो आठवण करून देतो की, तिने कर्ज फेडण्याच्या हमीपत्रावर आपल्या वडिलांची सही घेतलेली असते. ज्या कागदावर सही असते त्या कागदावरची तारीख तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतरची असते. याचा अर्थ असा की नोराने वडिलांची खोटी सही केलेली असते. क्रॉगस्टॅड म्हणतो, ‘हा गंभीर गुन्हा आहे. हा कागद तुझ्या नवऱ्याला मिळाला तर काय होईल याचा विचार कर. त्यापेक्षा मला नोकरीवरून काढून टाकू नये यासाठी नवऱ्याकडे शब्द टाकणे अधिक चांगले नाही का?’

आपण ही सही कोणत्या परिस्थितीत केली हे नोरा सांगते. वडील अतिशय आजारी होते आणि नवऱ्याला ताबडतोब प्रवासाला घेऊन जाणे आवश्यक होते. यावर गुन्हा तो गुन्हाच, असे क्रॉगस्टॅड सूचित करतो आणि निघून जातो. नोरा अतिशय अस्वस्थ होते. ती नवऱ्याकडे क्रॉगस्टॅडसाठी शब्द टाकून पाहते. पण त्याचे क्रॉगस्टॅडविषयी कमालीचे वाईट मत असते. नाताळची रात्र असल्याने          आपण खूप आनंदात असल्यासारखे ती दाखवते. पण क्रॉगस्टॅडने तो कागद नवऱ्याच्या पत्रपेटीत टाकला तर नसेल ना याची धास्ती तिला वाटत राहते. आपण नसताना आपल्या मुलांचे कसे होईल या विचाराने ती सरभर होते. अखेर होऊ नये ते होते. नवरा क्रॉगस्टॅडला कामावरून काढून टाकल्याचे पत्र रवाना करतो. आणि क्रॉगस्टॅड एक पत्र नवऱ्याच्या पत्रपेटीत टाकतो. तो ते वाचतो आणि तिची अतिशय कटू शब्दांत निर्भर्त्सना करतो. तू मला बरबाद केलेस, माझे पुढचे आयुष्य उद्ध्वस्त केलेस अशी दूषणे देतो. तू या घरी रहा, पण माझी मुले मी तुझ्याकडे सोपवू शकत नाही- असा अखेरचा घाव घालतो. त्याला तिच्याबद्दल एवढा तिरस्कार वाटत असूनही आपले सारे व्यवस्थित सुरू आहे हे त्याला लोकांना दाखवायचे असते. म्हणून तो तिला घरी राहण्याची परवानगी देतो. दरम्यानच्या काळात क्रिस्टीनने क्रॉगस्टॅड या तिच्या पूर्वीच्या प्रियकराचे मन वळवलेले असते, त्यामुळे नोराने खोटी सही केलेला कागद क्रॉगस्टॅड परत पाठवतो. तो कागद पाहिल्यावर नोराचा नवरा आनंदाने उसळतो. तो बोलू लागतो, ‘त्याने क्षमायाचना केली, कागद परत केला, मी वाचलो, आपण दोघेही बचावलो. एखाद्या दु:स्वप्नासारखे हे संकट आले नि नाहीसे झाले. मी तुला क्षमा केली आहे. मला ठाऊक आहे हे सारे तू माझ्यावरच्या प्रेमानेच केलेले आहेस. फक्त तुला कळले नाही की व्यवहार कसा सांभाळला पाहिजे. मी तुला शिकवीन कसे वागायचे ते. तू बाई आहेस. म्हणून तू अशी असहाय आहेस आणि म्हणून माझे तुझ्यावरचे प्रेम उलट वाढेलच, द्विगुणित होईल. मी तुला शपथेवर सांगतो, नोरा, मी तुला खरोखरच माफ केले आहे.’

त्याचे हे बोलणे सुरू असतानाच नोरा नृत्याचा पोशाख बदलून साधे कपडे घालून आली आहे. तो तिला चुचकारतोच आहे, ‘माझी चिवचिवणारी चिमणी. किती तू घाबरली होतीस मघाशी. घाबरू नकोस, आपले हे सुंदर उबदार घर आहे. इथे मी तुला सुरक्षित ठेवीन. मी तुला टाकून देईन असे तुला वाटले तरी कसे?’ उदार अंत:करणाने आपल्या बायकोला क्षमा केल्याचे जाणवताच पुरुषाला समाधान वाटते. त्याने जणू तिला पुनर्जन्म दिला आहे. अशी त्याचा अविर्भाव आहे. नवऱ्याचे हे बोलणे ऐकल्यावर नोरा म्हणते, ‘आता मला जाणवले आहे की आपण एकमेकांना कळलोच नव्हतो. आणि तुझे माझ्यावर कधीच प्रेम नव्हते. माझे वडीलही माझ्याशी असेच वागले. त्यांचे म्हणणे पटले नाही तरी मी त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ते सारे सहन केले. मग मी तुझ्या आयुष्यात आले. सारे काही तू ठरवायचास. तुझ्या आवडीनिवडीप्रमाणे, तुला हवे तसेच सारे सुरू असायचे. खरे तर मी सुखी होते का? नव्हते. आपले घर हे एक जणू खेळघर होते आणि त्यात मी तुझी बाहुली असणारी बायको होते आणि आपली मुले माझ्या बाहुल्या होत्या. आताच तू म्हणालास की मी तुझी मुले वाढवायला नालायक आहे. खरेच आहे ते. मुळात मीच पुरेशी वाढलेली नाही, मला जगाचे व्यवहार कळत नाहीत, मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी काही करण्याचाही हक्क बायकोला नसतो. यावर माझा विश्वास बसत नाही. हा समाज, त्याचे व्यवहार कळण्यासाठी आता मला बाहेर पडले पाहिजे. म्हणजे समाज चूक आहे की मी, हे मला कळेल. आता माझ्या मनात काही गोंधळ नाही. मलाच स्वत:ला आधी मोठे केले पाहिजे. त्यासाठी मी आधी या घराबाहेर पडले पाहिजे.’

यावर तिचा नवरा म्हणतो, ‘यासाठी तू तुझा नवरा आणि मुलांना सोडून जाणार?’ ती म्हणते, ‘हो.’ यावर नवरा म्हणतो, ‘म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम नाही?’ नोरा म्हणते, ‘नाही. तू माझ्याशी नेहमीच चांगले वागला आहेस, पण आता माझे तुझ्यावर प्रेम नाही, आणि म्हणूनच मी हे घर सोडून जाते आहे. आज या रात्री माझ्या लक्षात आले आहे की मला वाटत होते तसा तू नव्हतासच कधी. क्रॉगस्टॅडचे पत्र पाहिल्यावर  मला वाटले होते, तू म्हणशील, जा, तुला वाटेल ते कर. जगाला ओरडून सांग काय घडले होते ते. मला अपेक्षा होती ती अद्भुत गोष्ट घडली नाही. जेव्हा तुझ्यावरचे संकट टळले असे तुला वाटले तेव्हा जणू काही घडलेच नव्हते, असे तू बोलू लागलास. पुन्हा मी तुझी चिमुकली गाणारी, चिवचिवणारी चिमणी झाले. त्याक्षणी मला कळून चुकले की ही गेली आठ वर्षे मी एका अनोळखी माणसाबरोबर राहते आहे.  मी माझ्या जबाबदारीतून तुला पूर्ण मोकळे करते आहे. आपण दोघेही मोकळे आहोत. मला खात्री आहे की मुलांची चांगली काळजी घेतली जाईल.’

केवळ बायको म्हणून किंवा आई म्हणून असणारी पवित्र कर्तव्ये बाजूला ठेवून स्वत:संबंधीचीही काही कर्तव्ये असतात याची नोराला जाणीव झाली आहे. तिला आतून कळले आहे की ती प्रथम एक माणूस आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे. ती नवऱ्याला सरळ सांगते की त्याच्या पत्राची तिला गरज नाही किंवा

त्याने मदतीचा हातही पुढे करू नये. स्वत:चे स्वपण तिला जाणवले आहे. नवऱ्याचे तिला काहीही नको. स्वत:ला आणि स्वत:भोवतीच्या जगाला समजून घ्यायचे असेल तर ते तिने एकटीनेच करायचे आहे आणि आता तिला कोणीही रोखू शकणार नाही.

नोरा दिवाणखान्यातून बाहेर पडते. तिने जाताना लावून घेतलेल्या बाहेरच्या दाराचा आवाज घुमतो.. घर, संसार, मुले यांची सुखद ऊब सोडून, त्यांच्या मोहात न पडता भोवतीच्या जगात, कुणाचाही आधार न घेता, एक व्यक्ती म्हणून उभे राहण्यासाठी घराबाहेर पडलेली, कणखर मनाची नोरा, मला भेटलेली पहिली स्त्री म्हणून माझ्या लक्षात राहिलेली आहे. या नोराने जगातल्या असंख्य स्त्रियांना जागे केले. स्वातंत्र्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या वाटेवर चालायला बळ दिले. इब्सेनने उभी केलेली नोराची ही नाटकातली व्यक्तिरेखा समाजाला विचारांची नवी दिशा देणारी ठरली.

– प्रभा गणोरकर

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 5:16 am

Web Title: a dolls house nora helmer henrik ibsen
Next Stories
1 कणखर रमाबाई
2 सुरंगा शिरोडकर
3 इंदू काळे स्त्रीत्वाचे रूपबंध
Just Now!
X