09 March 2021

News Flash

विमला

विमलाचा पती निखिल हा बंगालमधील एका राजघराण्याचा एकुलता वारस आहे.

प्रभा गणोरकर prganorkar45@gmail.com

‘विमला’ ही रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘घरेबाइरे’ या कादंबरीचे केंद्र आहे. ही कादंबरी पात्रमुखी निवेदन पद्धतीने लिहिलेली आहे. नऊ वर्षे घरातल्या शांत, निश्चल वातावरणात पतिसौख्याच्या सावलीत सुखाने विसावलेली विमला घराबाहेर पेटलेल्या वंगभंगाच्या चळवळीत कशी ओढली जाते आणि ते वादळ तिला कसे वेढीत विनाशाच्या, स्खलनाच्या मार्गावर खेचीत नेते ते तिच्याच निवेदनातून वाचकांना कळत जाते.

रवींद्रनाथ टागोर यांच्या, १९१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘घरेबाइरे’ या कादंबरीत रवींद्रनाथांची राजकीय भूमिका, त्यांचे ग्रामसेवा, स्वावलंबन, हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि स्वदेशी चळवळ या संदर्भातले विधायक विचार स्पष्टपणे प्रकटलेले आहेत.

या कादंबरीत निखिल, त्याची पत्नी विमला आणि निखिलचा मित्र संदीप अशी तीन पात्रे आहेत. निखिल आणि संदीप हे दोन परस्परविरोधी विचारांचे प्रतिनिधी आहेत आणि घराबाहेरच्या घोंघावणाऱ्या राजकीय-सामाजिक चळवळींच्या वादळात काही काळ भरकटत गेलेली ‘विमला’ ही या कादंबरीचे केंद्र आहे. ही कादंबरी पात्रमुखी निवेदन पद्धतीने लिहिलेली आहे. त्यामुळे नऊ वर्षे घरातल्या शांत, निश्चल वातावरणात पतिसौख्याच्या सावलीत सुखाने विसावलेली विमला घराबाहेर पेटलेल्या वंगभंगाच्या चळवळीत कशी ओढली जाते आणि ते वादळ तिला कसे वेढीत विनाशाच्या, स्खलनाच्या मार्गावर खेचीत नेते ते तिच्याच निवेदनातून वाचकांना कळत जाते.

विमलाचा पती निखिल हा बंगालमधील एका राजघराण्याचा एकुलता वारस आहे. त्याचे दोन्ही भाऊ व्यसनाधीन होऊन मरण पावलेले आहेत; पण निखिल पूर्ण निव्र्यसनी, शुद्ध आचरणाचा, सुशिक्षित आणि आधुनिक विचारांचा आहे. विमला त्याची पूजा करीत असते. तेव्हाच्या राजघराण्यातल्या पद्धतीप्रमाणे पडद्यात राहणाऱ्या आणि कौटुंबिक हेवेदावे, मत्सर यांच्या संकुचित वातावरणात जगणाऱ्या आपल्या पत्नीने मोकळ्या वातावरणात यावे असे निखिलला वाटत असते. घरी तुला माझ्याशिवाय काही दिसत नाही आणि तुझे असे काय आहे आणि तुला कशाची कमतरता आहे हे तुला काहीच कळत नाही हे त्याचे म्हणणे विमल धुडकावून लावी; पण बंगालमध्ये सुरू असलेल्या स्वदेशीच्या चळवळीने ती थोडी बाहेर पाहू लागली. निखिल स्वदेशीचा पुरस्कर्ता होता. स्वदेशीचे वारे तिच्या रक्तात सळसळू लागले. त्या भरात ती निखिलला म्हणते, ‘‘माझे सर्व विलायती कपडे जाळून टाकले पाहिजेत.’’ पण त्यावर निखिल म्हणतो, ‘‘तुला वापरायचे नसतील तर वापरू नकोस, पण हा जाळपोळीचा धंदा कशाला?’’ निखिलला विघातक राजकारण अमान्य होते. याच ठिकाणी हे सांगितले पाहिजे की, निखिल या पात्राच्या रूपाने रवींद्रनाथांनी त्यांचे स्वत:चे राजकीय विचार प्रकट केले आहेत. संघटना उभी करणे, विरोधी मतांच्या लोकांचा तिरस्कार न करणे, खेडय़ातल्या समाजात मिसळून त्यांची सेवा करणे, त्यांच्या उद्योगांना प्रगतीकारक वळण लावणे हे त्यांचे वंगभंगाच्या चळवळीच्या काळातले विचार ‘घरेबाइरे’तील निखिलच्या रूपाने साक्षात झाले आहेत. नकारात्मक दृष्टी न ठेवता संघशक्ती वाढवून स्वावलंबनाने आणि सहकार्याने स्वदेशी सृष्टी निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या निखिलच्या विरुद्ध मते असणारा त्याचा मित्र संदीप स्वदेशीचा प्रचार करण्यासाठी निखिलच्या घरातच मुक्काम ठोकतो. निखिलच्या वाडय़ातील देवालयात सभा भरवली जाते. त्या वेळी ‘वंदे मातरम्’च्या विजयी आरोळ्यांनी विमलाचे रोमरोम शहारून येते. संदीपच्या भाषणाने जमलेल्या हजारो लोकांप्रमाणेच विमलाचे मनही प्रस्फुरित होते. तिच्या अंतरंगात तुफान उसळते आणि मन भटकू लागते. निखिल संदीपला दुसऱ्या दिवशी जेवायला थांबवून घेतो. त्या वेळी विमला विशेष वेणीफणी करते, सुंदर पातळ परिधान करते. त्या दिवशी संदीप तिची स्तुती करतो, तिला विशेष आदराने संबोधितो. ती स्वत:च्या देशभक्तीची ग्वाही देते. तेव्हा तो तिला प्रोत्साहन देतो आणि तुम्ही लख्ख उजेड पाडणाऱ्या अग्नीची देवता आहात, सार्वत्रिक नाशाची अमोघ शक्ती आम्हाला द्या, असे म्हणत तिला आपल्या चळवळीचे नेतृत्व जणू बहाल करतो. खरे तर संदीपच्या आत असलेली हलकी लालसा, शारीरिक सुखासंबंधीच्या भावना, त्याचे असंस्कृत असणे, पशांची हाव हे सारे निखिलला जाणवले आहे; पण संदीपची देशप्रीती म्हणजे त्याच्या हीन आत्मप्रीतीचेच एक स्वरूप आहे हे विमलाला समजावून सांगणे त्याला जमत नाही. तो तिच्यावर सत्ता गाजवत नाही. तिच्या मनात संदीपविषयी रुजलेली वीरपूजेची भावना काढून टाकायला तो धजत नाही. आपल्या मनात मत्सर तर नाही ना, असे वाटून तो शांत राहतो. वास्तविक संदीप लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी जाणार असतो; पण तो जात नाही. ‘‘तुम्हीच आमची प्रेरणाशक्ती आहात, तुम्हीच आमचे कार्यकेंद्र आहात, आमच्या मधाच्या पोळ्यातील तुम्ही राणी-मधुराणी आहात,’’ असे तो विमलाला म्हणतो. सर्व राष्ट्राला आपली मोठी जरुरी आहे, या भावनेने विमला भारावून जाते. आपल्यात काही तरी अज्ञात शक्ती संचारित झाली असे तिला वाटू लागते. संदीप वेळोवेळी तिचा सल्ला घेऊ लागतो. वास्तविक तिच्या जीवनातील अत्यंत गाढ अशा बंधनावर सुरी चालवणे सुरू झाले होते; पण ‘अमली वायूच्या धुराने मी इतकी व्याप्त होऊन गेले होते की कसली दुष्ट गोष्ट घडून येत आहे याची मला तिळभरही वार्ता नव्हती’, हे विमलाला नंतर जाणवते. संदीपच्या वर्तनातील कामविकार तिला हळूहळू जाणवू लागतो; पण माझ्या नजीकची भवितव्यता किती लज्जास्पद, किती भयप्रद आणि तरीही किती भयंकर मोहक होती हेही कळू लागले. तिचे हेलकावे खाणारे मन रवींद्रनाथांनी क्षणाक्षणाच्या तपशिलातून आविष्कृत केले आहे. तिच्या मनात काहूर माजते. आपला मार्ग चुकतो आहे या जाणिवेने ती व्याकूळ होते; पण संदीप तिच्या मनातील भ्रांती वाढवीत राहतो. देशाच्या कामासाठी तिच्याकडून पैसे मागतो, ते देण्याचे ती मान्य करते, घरातल्यांच्या नकळत ती तिजोरीतून सोन्याची नाणी घेते. स्वत:च्या या अपकृत्याने ती स्वत:च विकल होते. तिच्याकडून ती नाणी घेताना संदीपचा आनंद ती पाहते; पण संदीप तिला देवी म्हणतो, तिची स्तुती करतो तेव्हा तिला आपले पाप उजळून निघाल्यासारखे वाटते. स्तुतीच्या मद्याचा पेला तिला जीविताच्या अस्तित्वासाठी हवासा वाटतो.

संदीपसाठी पतीच्या तिजोरीतील पैसे चोरून घेतल्याच्या प्रसंगानंतर आपण स्वत:ला स्वस्तात विकले, आपली किंमत कमी करून घेतली, असे भान तिला येते. त्याच्या डोळ्यांतली वासना तिला स्पष्ट दिसते. स्वत:च्या स्खलनाच्या जाणिवेने ती भयभीत होते. परमेश्वरा, मला शुद्ध कर आणि मला आणखी एक वेळ संधी दे, अशी करुणा भाकते. संदीपविषयी तिला तिरस्कार वाटू लागतो. ज्या सर्परूपी वेष्टनांनी त्यांनी मला विळखे घातले होते ती सगळी तुटून गेली आहेत. मी स्वतंत्र झाले, माझे संरक्षण झाले असे तिला कळून येते. संदीपने तिला आपल्या मोहजालात फसविण्याचा प्रयत्न केला, पण तिचे हृदय त्याला जिंकता आले नाही. चाकोरीतल्या जीवनाला कंटाळलेल्या विमलाला त्या काळच्या बंगालमधल्या चळवळींमध्ये भाग घेण्यासाठी पुढे व्हायचे असते; पण संदीपच्या रूपाने तिच्या जीवनात वेगळेच वादळ येते. त्यात ती हेलकावे खाते; पण तिची आंतरिक शक्ती तिला त्या वादळातून सावरते. तिचा उदार, संयमी, प्रेमळ आणि विवेकी पती निखिल एखाद्या दीपस्तंभाकडून येणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तिला सावरतो. निखिलची स्वत:च्या तत्त्वांवर अविचल निष्ठा असते. त्याला तिचे हेलकावणे कळत असते. चांगुलपणा, क्षमाशीलता हेच त्याचे बळ असते. कादंबरीतल्या या नाटय़ाचा संदीपच्या पश्चात्तापाने शेवट होतो. स्वत:ला पूर्ण कफल्लक बनवून तो विमलचा निरोप घेतो.

ही कादंबरी राजकीय विचारसरणीच्या द्वंद्वांनी धारदार झालेली आहे. तशी निखिल, विमला, संदीप या पात्रांच्या निवेदनातून खेळवल्या गेलेल्या भावनांच्या संघर्षांनी विलक्षण गहिरी झालेली आहे. या कादंबरीचा जैनेंद्रकुमार यांच्या ‘सुनीता’ या कादंबरीवर दाट प्रभाव आहे असे माझे मत आहे. शिवराम गोिवद भावे यांनी या कादंबरीचा अनुवाद ‘मधुराणी’ या नावाने केलेला आहे व त्याला सविस्तर विवेचक प्रस्तावना लिहिलेली आहे. देशाच्या राजकीय पुनरुत्थानाच्या प्रयत्नात साधनशुचिता, स्वावलंबन आणि आंतरिक ऐक्य यांच्या अभावी केवढे विनाशकारी वादळ उत्पन्न होते, हे या कादंबरीतून प्रत्ययाला येते, असे शि. गो. भावे यांनी म्हटले आहे.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:01 am

Web Title: article about character vimla from novel ghare baire of rabindranath tagore
Next Stories
1 सुनीता
2 भारती
3 चित्रलेखा
Just Now!
X