News Flash

मृणाल

‘मृणाल’ ही विख्यात हिंदी साहित्यिक जैनेन्द्र कुमार यांच्या ‘त्यागपत्र’ या कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रभा गणोरकर

‘मृणाल’ ही विख्यात हिंदी साहित्यिक जैनेन्द्र कुमार यांच्या ‘त्यागपत्र’ या कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे. नवऱ्याने कुलटा म्हणून टाकून दिलेली मृणाल खरोखरच व्यभिचारी आहे का? तिला जे जीवन भोगावे लागले त्यामुळे ती कडवट होत नाही. उलट उदार, क्षमाशील बनते. वैभवाचे दिवस पाहिलेली मृणाल गलिच्छ वस्तीतले जीवन तुच्छ मानत नाही. उलट एक दिवस सेवा करता करता तिथेच  मरून जाते. ती कोण ठरते?

सध्या व्यभिचारासंबंधी चर्चा सुरू आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही या गुन्ह्य़ाची शिक्षा व्हावी, असे मत जोरदारपणे मांडले जाते आहे. मुळात पुरुषांचा व्यभिचार सिद्ध करणे कठीणच असते. बाईला सहजपणे व्यभिचारी ठरवले जाते, जाऊ  शकते, हे अगदी स्पष्ट आहे. गेल्या लेखांत फ्लॉबेरने रंगवलेली ‘एम्मा बोव्हारी’ व्यभिचारी आहे. तिचे नैतिक अध:पतन, स्वैर वर्तन, त्यामागची कारणे याचे बारकाईने केलेले चित्रण त्या कादंबरीत आहे, पण नवऱ्याने, समाजाने व्यभिचारी ठरवलेली ‘मृणाल’ खरोखरच व्यभिचारी आहे का?

‘मृणाल’ ही विख्यात हिंदी साहित्यिक जैनेन्द्र कुमार यांच्या ‘त्यागपत्र’ या कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे. आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन हरिद्वारला विरक्त वृत्तीने जीवन व्यतीत करणारे नामवंत चीफ जस्टिस सर दयाल यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांनी लिहून ठेवलेली ही कथा आहे. ‘मृणाल’ या त्यांच्या हतभागी आत्याची. समाजात प्रतिष्ठित विद्वान म्हणून मान्यता लाभलेल्या या हळव्या, भावनाप्रधान माणसाला, प्रमोदला, त्याच्या आत्याच्या मृत्यूने कातर केले आहे. तिच्या आठवणींनी त्याचे मन भरून आले आहे. अतिशय रूपवान असणारी ही आत्या त्याची बालपणीची मैत्रीणच असते जणू. तिच्या प्रेमळ, आनंदी स्वभावाने, मायेच्या वर्षांवाने, त्याचे बालपण सुखात गेलेले असते. प्रमोद बारा वर्षांचा आणि आत्या दहावीत असताना, मैत्रिणीकडून उशिरा आल्याने प्रमोदची आई मृणालला वेताने बदडून काढते. त्या दिवसापासून आत्याचे खळखळून हसणे संपते. तिच्यासाठी स्थळे पाहणे सुरू होते आणि लवकरच तिचे लग्नही उरकून टाकले जाते. तिचा नवरा तिच्याहून पुष्कळ मोठा, एक लग्न झालेला, मिशाळ आणि आपली ऐट मिरवणारा. लग्नानंतर चार दिवसांनी ती माहेरी येते तेव्हा आपण आता या घराला कायमचे दुरावल्याची खंत ती व्यक्त करते. त्या वेळी ती मैत्रिणीच्या भावाला, तो डॉक्टर असतो, चार ओळींचे पत्र देऊन प्रमोदला पाठवते. तोही तिच्या पत्राला उत्तर पाठवतो. पण मृणालला त्याची भेट नको असते. त्याचा काही निरोप जरी आला तरी मी गच्चीवरून उडी मारून जीव देईन हे तिचे निर्वाणीचे शब्द असतात. त्याच्याविषयीचे प्रेम ती मनात गाडून टाकते.

लग्नानंतर सात-आठ महिन्यांनी मृणालला नोकराच्या सोबतीने माहेरी पाठवले जाते, तेव्हा ती अशक्त, पिवळी पडलेली, शिवाय गरोदर. सहज बोलता बोलता प्रमोदला कळते की तिला रोज मारझोड होत असते. तिचा नवरा आणि प्रमोदचा पिता म्हणजेच मृणालचा भाऊ यांच्यात पत्रव्यवहार सुरू असतो. तीन महिने ती माहेरीच असते. मृणाल या वेळी नवऱ्याच्या मर्जीविरुद्ध माहेरी आलेली असते तशी जर ती पुन्हा आली तर माहेर तिला थारा देणार नाही, अशी तिला ताकीद मिळते. नवरा तिला न्यायला येणार असतो, पण तिला परत जायचे नसते. आता आपले कोणी नाही या जाणिवेने  खचून गेलेली मृणाल परत जाते. नवरा आपल्या घरी तिला मिळणाऱ्या सुखाच्या, वैभवाच्या बाता मारत असतो. अनावर दु:खाने विकल झालेली मृणाल सासरी जाते, त्यानंतर खूप दिवस तिची हालहवाल कळत नाही. घरात तिचे नाव घेण्याचीसुद्धा प्रमोदला मनाई असते. मृणालच्या नवऱ्याने तिला टाकून दिलेले असते. मृणाल दुश्चरित्र आहे, नेहमीच तशी होती म्हणून तिला घराबाहेर काढून दूरच्या वस्तीत लहानशा खोलीत ठेवलेले असते. मारझोड होऊनही माहेरी जाणे ती कबूल करीत नाही म्हणून ही व्यवस्था. इकडे प्रमोद मोठा होतो, पदव्या मिळवतो. आत्या कोळशाचा व्यापार करणाऱ्या एका माणसाबरोबर राहते आहे हे त्याच्या कानावर येते. तो तिचा शोध घेत तिच्या घरापर्यंत पोचतो, तेव्हा बाहेर कोळसा मोजून देणारा माणूस असतो आणि आतल्या लहानशा खोलीत मृणाल पोळ्या भाजत असते. ज्याने तिला आधार दिला त्याला तिने आपले जीवन, आपले शरीर समर्पित केलेले असते. ती गर्भवती असते. प्रमोद तिला आपल्याबरोबर घेऊन जाण्याचे ठरवून आलेला असतो, पण मृणाल नकार देते. ज्याच्या दयेवर जगत असते त्याला सोडून जाणे तिला निर्लज्जपणाचे वाटते. त्याचे जेवण झाल्याशिवाय ती जेवत नाही. त्याचे घर सांभाळते. त्या गलिच्छ वस्तीत ती सहजपणे वावरते. वास्तविक अशा जीवनाची तिला सवय नसते, इथे आपण फार काळ राहणार नाही. तो माणूस तिला सोडून जाईल हे तिने जाणलेले असते. पण आपण वेश्या होणार नाही, शरीर विकणार नाही याची ती प्रमोदला खात्री देते.

नवऱ्याने टाकून देण्याचे कारण ती प्रमोदला सांगते. तिला मैत्रिणींच्या त्या डॉक्टर भावाचे चार ओळींचे पत्र आले होते, तो आता सिव्हिल सर्जन असतो. त्याने लग्न केलेले नसते. ‘तू सुखी राहा, काही गरज पडली तर कळव’ हे सांगणारं त्याचं पत्र ती नवऱ्याला दाखवते. आणि तिची दुरवस्था होते. तो शिव्या देतो, बेपर्वा होतो आणि इतकं करूनही ती माहेरी जाण्याला नकार देते म्हणून तिचा नवरा तिला या गलिच्छ वस्तीत सोडून जातो.

त्याला त्याचे कुटुंब असते, पण मृणालच्या रूपावर तो भाळतो. परिवार सोडून तिच्याकडे येतो आणि ती त्याला आपले सर्वस्व देते. पण त्याचे मन आता उडाले आहे. तो तिला सोडून स्वत:च्या बायकोकडे जाणार आहे, मग आपले, या पोटातल्या बाळाचे काय होणार हे ती ईश्वरावर सोपवते. पण जोवर या माणसाजवळ आहे तोवर ती त्यालाच आपले मानणार. हाच तिचा पातिव्रत्यधर्म आहे. तिच्याकडून हे सारे ऐकताना प्रमोद सुन्न, स्तब्ध होतो. तिला आता फक्त मनाची शक्ती हवी आहे. कोणी तिला तुडवले तरी त्यालादेखील क्षमा करण्याइतकी शक्ती. वर्षे निघून जातात, आत्याच्या जीवनकथेने आणि तिच्या तत्त्वज्ञानाने प्रमोद बदलून जातो. जगण्याचा पसारा अर्थशून्य आहे असे त्याला वाटू लागते. काही काळाने तो पुन्हा त्या वस्तीत जातो, पण आत्या तिथून निघून गेलेली असते. वस्तीतली माणसे तिच्या चांगुलपणाची तारीफ करत असतात. अधिक शोध घेतल्यावर तिला मुलगी झाल्याचे कळते, काही दिवसांनी ती योगायोगाने भेटते, ती समाजसेवेत जीवन घालवीत असते. मुलगी मृत्यू पावलेली असते. प्रमोदने तिला ओळख दाखवू नये, असे ती विनवते. जीवनाच्या या अथांग समुद्रात तिने स्वत:ला झोकून दिलेले असते. गरीब वस्तीत राहते, समाजाने ज्यांना उष्टावून फेकून दिलेले असते त्यांची, दुर्जनांची सेवा करण्यात आयुष्य घालवते. आता तिला काहीही नको असते. या वस्तीने तिला जीवनाचे वेगळे दर्शन घडवलेले असते, नवे भान दिले असते. तारुण्य गमावलेल्या वेश्या, बेकार मजूर, भीक मागण्याचा धंदा करणारे, कायद्याचा डोळा चुकवून लपून राहाणारे ज्या वस्तीत राहात होते तिथे जर्जर होऊन तिला मरण येते. तिच्या मृत्यूच्या वार्तेने प्रमोद, जो आता न्यायाधीश झालेला असतो, कासावीस होतो.

नवऱ्याने कुलटा म्हणून टाकून दिलेली, कुटुंबीयांनी आणि समाजाने चरित्रहीन ठरवलेली मृणाल व्यभिचारी आहे का? ती दुसऱ्या पुरुषाला शरीर देते, पण त्यात स्वार्थाची, स्वत:च्या सुखाची भावना नाही. जे जीवन तिला भोगावे लागले त्यात तिचा काहीही दोष नसतो, पण त्यामुळे ती कडवट, सूड घेऊ होत नाही. उलट उदार, क्षमाशील बनते. वैभवाचे दिवस पाहिलेली, प्रेमाच्या माणसांत वाढलेली मृणाल गलिच्छ वस्तीतल्या माणसांचे जीवन तुच्छ मानत नाही, त्यांच्याविषयीच्या करुणेने भरून जाते.

समाज, कुटुंबातील माणसे ज्याला व्यभिचार ठरवतात त्या वर्तनाची व्याख्या काय आहे? आणि जी स्त्री व्यभिचाराकडे वळते ती तरी का वळते? एम्माचे वागणे समजायला सोपे आहे, पण परपुरुषाकडे वळणाऱ्या स्त्रीचे वागणे असे सहजासहजी कोण उलगडू शकेल? आणि तिला शिक्षा कोणी द्यायची आहे? तिला शिक्षा देणारा समाज कोणत्या नैतिक अधिकाराने शिक्षा द्या म्हणतो आहे? आणि कोणती शिक्षा देऊ इच्छित आहे? याची उत्तरे समाजानेच द्यायला हवीत.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:01 am

Web Title: article about mrinal character in tyagpatra novel by hindi writer jainendra kumar
Next Stories
1 एम्मा बोव्हारी
2 एम्मा बोव्हारी
3 मंजुळा
Just Now!
X