18 March 2019

News Flash

सुरंगा शिरोडकर

‘अकुलिना’ ही कादंबरी मी महाविद्यालयीन वयात वाचली.

‘अकुलिना’ ही कादंबरी मी महाविद्यालयीन वयात वाचली. ही पत्रात्मक कादंबरी त्या काळातले माझे आवडते लेखक पु. भा. भावे यांची. त्यांचे लेखन अतिशय उत्कट, पात्रचित्रण विलक्षण. कथा वाचकाला खेचून नेणारी. ‘अकुलिना’ पत्रात्मक आहे, पण एक प्रयोगशील कादंबरी म्हणून ती अनोखी आहे.

या कादंबरीतली सर्व पत्रे मधू बर्वे याने १९३७ ते १९४९ या बारा वर्षांच्या काळात लिहिलेली आहेत गोपू या आपल्या मित्राला. गोप्याने त्याला सुरुवातीला उत्तरे लिहिली, पण त्यांचे उल्लेख मधूच्या पत्रात फक्त येतात. या सर्व पत्रांतून गोपू, मधू आणि त्यांच्या त्या काळातल्या आयुष्यातली सर्व पात्रे जिवंत उभी राहतात. मधू हा मूळचा नागपूरचा, बुद्धिमान. पहिल्या श्रेणीत आला नि त्याला मुंबईच्या मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळाला. त्याने मुंबईहून गोपूला पहिले पत्र पाठवले, १९३७ च्या ६ जून रोजी. आता तो उत्साहात आहे. याच पत्रातून वाचकांना कळते की त्याचे कमूप्रधानवर प्रेम होते, पण तिने दुसऱ्याच एका गब्बर माणसाशी लग्न केले. त्या धक्क्याने हा हळवा, भावनाप्रधान मुलगा मुलींच्या संदर्भात कडवट झालेला आहे. त्याला मुंबईत नागपूरचाच पण मेडिकलमध्ये मुक्काम ठोकून बसलेला, आकर्षक, मोहक, दारू, पोरी, रमी, ब्रिज यात पारंगत असणारा मन्मथ बॅनर्जी हा गुरू भेटलेला आहे. दोनेक महिन्यांनंतरच्या त्याच्या पत्राने कळते की त्याच्या मुंबईच्या, बिऱ्हाडाच्या दारात एके दिवशी ‘ताज्या फुलासारखी टवटवीत’, मुलगी उभी राहते. सावळा रंग, लांब वेणी, रेखीव आणि वितळणारे टपोरे डोळे. घरोघर हिंडून ती स्नो, ब्रिलियन्टाइन, हेयर ऑईल अशी प्रसाधने विकत असते. तिची तो गंमत करतो. फिरक्या घेतो. त्याच्याशी बोलून ती जाते, पण त्याच्या घरी छत्री विसरते. त्या छत्रीवर तिचे नाव असते, कु. सुरंगा शिरोडकर! दुसऱ्या दिवशी ती पुन्हा येते, छत्रीसाठी. ती वेंधळी आहेच. गोपूला तो लिहितो, ती त्याला ‘इम्पल्सिव’, ‘सेन्टिमेन्टल’ वाटलेली असते. दोन वर्षे ती मॅट्रिक नापास होते आहे. थोडेफार पैसे मिळवण्यासाठी दारोदार हिंडून वस्तू विकण्याचे काम करते आहे. बोलण्याच्या नादात ती पुन्हा छत्री न्यायला विसरली आहे. पण मधूने गोपूला पत्रात सारे लिहिताना म्हटले आहे, ‘ती मूर्ख आहे की धूर्त?’ तो पुढे लिहितो, ‘या वाहत्या गंगेत आता मी हात धुतले नाहीत तर माझ्यासारखा गाढव मीच.’ आणि दोन-तीन दिवसांतच मधू सुरुवात करतो. उदबत्तीच्या धुराने तिला ठसका लागतो तेव्हा तो तिला पाणी देतो, तिच्या पाठीवरून हात फिरवतो. सुरंगा रडू लागते. ‘अशाने माझा सत्यानाश होईल’ म्हणते. पण त्याच्या दृष्टीने ही ‘दुसरी’ (म्हणजे पहिली कमू प्रधान.) आता हिच्याबाबतीत तो रोखठोक राहणार आहे. ‘या पोरीला मी एकटाच गिऱ्हाईक थोडाच असेन,’ एका पत्रात (१३ ऑगस्टच्या) तो गोप्याला त्याच्या, मन्मथबरोबर बीअर पिताना झालेल्या, गप्पा सांगतो. मन्मथला सुरंगा भेटलेली असते. पण त्याने ५० रुपये देऊन तिचा हात पकडून तिला जवळ ओढताच ती त्याला बोचकारते, फुसांडू लागते. ‘मोठी र्कुेबाज, तिच्या बाबतीत मी जरा घाईच केली.’ मन्मथ म्हणतो. ती ‘अकुलीन’ आहे, हेही मन्मथ त्याला सांगतो. ‘पावित्र्य सिद्ध करण्यासाठी ती नखरे करते. नाटकी पोर.’ मन्मथचे हे बोलणे. २२ ऑगस्टच्या पत्रात मधू बर्वे गोपूला कळवतो की, सुरंगा आठवडाभर आली नाही, पण ती आली तेव्हा मधूसाठी स्वत:च्या हाताने विणलेला पुलोव्हर आणि मोजे घेऊन आली. (इथे मधू लिहितो, ‘कमू प्रधाननेही आपल्या मोहिमेचा प्रारंभ पुलोव्हरनेच केला होता!) पुलोव्हर त्याच्या अंगात घालण्यासाठी ती जवळ येते तेव्हा तो तिला घट्ट कवळतो. तिच्या ओठांनी ती आवेगाने प्रतिसाद देते, पण ती रडत असते. तिची रडवी, अडखळती वाक्ये त्याला नाटकी वाटतात, सारे खोटे, हास्यास्पद वाटते. तिचे अश्रू, तिच्या शब्दांतला असहाय कंप याने तो क्षणभर हलून जातो, पण ‘बायकांचा हा पवित्रा ठरीव आहे. कमूने ही स्ट्रॅटेजी वापरली होती.’ तो गोप्याला सांगतो. ‘या बाजारू पोरी सगळ्या सारख्याच वाईट आहेत असं वाटणंच सर्वात सुरक्षित.’ मधूने सुरंगाला ‘बाजारू’ ठरवली आहे. दारोदार हिंडताना तिला असे अनुभव पुष्कळदा आलेले असतात. पण ती खरी भोळीच आहे. ती पुन: पुन्हा येत राहते, मनात स्वप्ने घेऊन. मधूसाठी बकुळीच्या फुलांची माळ आणणे, केवडा आणून त्याच्या कपडय़ांमध्ये ठेवणे, त्याच्यासाठी मासे तळून आणणे.. त्याच्या स्पर्शाविषयीचा संकोच तिने सोडला आहे. जेवण आणून ती त्याला घास देते. त्याच्या शर्टासाठी सोन्याच्या गुंडय़ा आणते. सुरंगा त्याच्या प्रेमात पडली आहे. पण मधूच्या मते, ‘तिची मोहीम जोरात सुरू आहे.’ सुरंगासारखी हिरा हीसुद्धा एक सेल्स गर्ल आहे. ती त्याला सुरंगाबद्दल माहिती देते. ‘तिला तिची जात सोडायची आहे. घर सोडायचं आहे. तिची लग्नासाठी धडपड सुरू आहे.’ सुरंगानेही त्याला सांगितले आहे, ‘घाणीनं माखलेल्या माणसाच्या अंगावर स्वच्छ पाण्याचे झोत पडावेत तसं मला तुमच्याकडे आल्यावर वाटतं.’ एकदा ती त्याला आपल्या घरी नेते. ‘नातलगांची भुतावळ, अंधाऱ्या खोल्यांचं, लहानसं, उकिरडय़ासारखं घर.. त्या शेवाळलेल्या पाश्र्वभूमीवर सुरंगा त्याला एखाद्या शुभ्र सुगंधी फुलासारखी वाटते. पण तो तिला फक्त मोहात अडकवत राहातो. तिलाही आपले ‘अकुलीन’ पण विसरायचे असते. मोठं कुंकू, केस मधोमध विंचरलेले, नऊवारी पातळ असा सोज्वळ पोशाख ती करते. त्याच्याकडे हिरा, पेरिन दस्तुर अशा मुलीही येत असतात. ‘मला तुम्ही फसवणार आहात का?’ ती विचारते. ‘पण तुम्ही माझे आहात. मी तुम्हाला सोडणार नाही.’ ती सांगते. मधूच्या स्वाधीन स्वत:चे शरीर करते, मनाने स्वत:ला त्याची पत्नी मानू लागते. आणि मधूच्या दृष्टीने, ‘लग्नाचे मूल्य दिल्याविना लग्नाचा लाभ’ त्याला मिळत असतो. सुरंगा त्याच्यावर प्रेमाचा वर्षांव करते आणि तो तिला कंटाळतो. ‘ती आली तरी मी तिच्याकडे पाहातच नाही.’, ‘माझं करिअर,’ माझी महत्त्वाकांक्षा, यश, कीर्ती यांचा मी बळी देऊ?’ ‘कमूनं मला प्रायश्चित्त दिलं, मी हिला दिलं,’ ‘हिचं कुळशील हे असं! धंदा असा दारोदार फिरण्याचा!’ ही मधूच्या पत्रातली वाक्ये आहेत. तिचे अश्रू त्याला चीड आणतात. रोज. अगदी वेड लागल्यासारखी ती त्याच्याकडे येते. तासन्तास बसून राहाते, रडते. तो तिला धुत्कारतो, ‘तू गळेपडू आहेस, वाईट आहेस,’ म्हणतो. आणि एक दिवस तो तिच्यावर क्रूर घाव घालतो. तिला म्हणतो, ‘तुझ्या हातून इथे जे जे झालं, त्यातच तुझं चरित्र दिसून येतं. लग्न न होताच एखाद्या परपुरुषाबरोबर जी मुलगी असं वागू शकते तिला काय म्हणतात, माहीत आहे?’ – सुरंगाला तोडलीच पाहिजे, लवकर आणि नेहमी करता’ असेच मधूने ठरवले होते. त्यामुळे तो तिच्या वर्मी घाव घालतो. सहा महिन्यांच्या आत मधूने सुरंगाला नादी लावले, खेळवले आणि अखेर उद्ध्वस्त करणारा, अपमानित करणारा घाव घातला. सुरंगा निघून गेली. १९४८ च्या पत्रात तो गोपूला आपल्या लग्नाचे निमंत्रण देतो. लग्नानंतर तो फ्रान्सला जाणार असतो. पत्नी बाळबोध, मॅट्रिक झालेली. लक्ष्मीसारखी. श्रीमंत घराण्यातली. फ्रान्सला जाऊन तो चर्मरोग आणि गुप्तरोग यांचा अभ्यास करतो. परतल्यावर यशस्वी डॉक्टर आणि संभावित मनुष्य बनून आयुष्य घालवू लागतो.

आणि ती त्याला दिसते अचानक. त्याच्याच हॉस्पिटलमध्ये बारा क्रमांकाच्या बिछान्यावर. तिचा केसपेपर तो पाहतो, ‘सुरंगा शिरोडकर, वय अठ्ठावीस, आजारचे निदान : शँकॉईड, उपदंश प्रमेह. तो तिच्या बिछान्याजवळ उभा असताना तिने त्याला ओळखले आहे. दुसरे दिवशी ती हॉस्पिटलच्या गच्चीवरून उडी मारून जीव देते. सुंदर, भोळ्या, स्वप्नाळू सुरंगाच्या उमलत्या आयुष्यावर वासनेची पहिली चूळ तो थुंकला होता. तोच तिच्या आयुष्याचा भयानक प्रारंभ आणि भीषण शेवट होता. त्याने केलेल्या वंचनेने तिचे सारे आयुष्य कुजून गेले होते. शरीर सडले होते.

लग्नाच्या, सुखी संसाराच्या, खातेऱ्यासारख्या जगण्यातून सुटण्याच्या स्वप्नाने भुलून शरीरसंबंधाला मान तुकवणाऱ्या हजारो मुलींमधली एक अशी ही सुरंगा भाव्यांच्या कादंबरीत पहिल्यांदाच भेटली आणि तशी पुन्हा कुणी भेटली नाही दुसरी. तिची धडपड, हातातले, येऊ पाहिलेले स्वप्न विरू न देण्याची तिची करुण, असहाय मूर्ती आणि शेवटी गुप्त रोगांनी सडलेले नि दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलच्या आवारातून शीतघरात पोचलेले तिचे शरीर मधूला स्वत:च्या अपराधाची कधीही न पुसली जाणारी भीषण जाणीव करून देते नि वाचकाला कोवळ्या निरागस मुलीच्या जीवनाच्या हृदयस्पर्शी शोकांतिकेची!

– प्रभा गणोरकर

prganorkar45@gmail.com

 

First Published on March 10, 2018 12:30 am

Web Title: articles in marathi on prabha ganorkar