प्रभा गणोरकर prganorkar45@gmail.com

भगवतीचरण वर्मा यांची ‘चित्रलेखा’ ही कादंबरी एका उत्कट प्रेमाची कथा आहे. चित्रलेखा स्वत:शी अतिशय प्रामाणिक आहे. स्वत:च्या जीवनावर तिची पकड आहे. ती एक खंबीर, सशक्त, समर्थ आणि आत्मनिर्भर स्त्री आहे. बीजगुप्तचे तिच्यावर अतिशय प्रेम आहे. परंतु बीजगुप्तशी आपला विवाह होणे शक्य नाही हे चित्रलेखाला ठाऊक आहे. ती दूर निघून जाते. प्रेमाचा सर्वोच्च आदर्श त्याग हाच आहे हे चित्रलेखा दाखवून देते.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

‘‘..आणि पाप कशाला म्हणतात?’’ महाप्रभु रत्नांबरांना श्वेतांक या शिष्याने विचारलेल्या प्रश्नाने ते किंचित थबकले, म्हणाले, ‘‘पाप कशाला म्हणावे, पापाची व्याख्या कशी करावी याचा प्रयत्न मी खूपदा केला आहे. पण हा प्रश्न मला अद्याप सुटलेला नाही. पण तुला जाणून घ्यावयाचे असेल, तर ते शोधावे लागेल. तयार आहेस? आणि विशालदेव, तू पण आहेस तयार?’’ दोन्ही शिष्यांनी होकारार्थी मान हलवल्यावर प्रभु रत्नांबर म्हणाले, ‘‘त्यापूर्वी मी तुम्हाला दोन व्यक्तींचा परिचय करून देतो, एक आहे योगी आणि दुसरा भोगी. योगीचे नाव आहे कुमारगिरी आणि भोगीचे नाव आहे बीजगुप्त. तुम्ही त्यांच्याकडे जावे कारण उपासनेएवढेच अनुभवालाही महत्त्व असते.’’

भगवतीचरण वर्मा यांच्या ‘चित्रलेखा’ (१९३४) या कादंबरीची ही सुरुवात आपल्यात पुढे वाचत जाण्याची उत्सुकता निर्माण करते. तरुण, उमदा, रत्नजडित पात्रातल्या मदिरेला सुख मानणारा बीजगुप्त ऐश्वर्यसंपन्न असतो. पाटलीपुत्र नगरीत त्याला मोठा मान असतो. चित्रलेखा ही बीजगुप्तची प्रेयसी. एकदा बीजगुप्त विचारतो, ‘‘जीवनाचे सुख कशात आहे, चित्रलेखा?’’ त्यावर ती उत्तरते, ‘‘मौजमजा, मस्ती!’’ चित्रलेखा वेश्या नाही, नर्तकी आहे. वेश्यावृत्तीपासून ती दूर आहे. याला कारणे आहेत. ती ब्राह्मण विधवा होती. अठराव्या वर्षी वैधव्य आल्यावर ती विरक्त झाली, संयमाने जगू लागली. पण तिला कृष्णादित्य भेटतो. त्याला पाहून तिचा संयम सुटतो. यौवन पुन्हा फुलून येते. जीवनाचा स्रोत बदलून जातो. पण ती गर्भवती होते. त्यांचे प्रेम जगजाहीर होते. कृष्णादित्यचा पिता त्याला व चित्रलेखाचा पिता तिला घराबाहेर काढतो. समाजाची निर्भर्त्सना आणि अपमान यापेक्षा कृष्णादित्यला मृत्यू जवळ करावासा वाटतो. चित्रलेखाला एका नर्तकीने आश्रय दिला. नृत्य आणि संगीत कलेत चित्रलेखा पारंगत झाली. चित्रलेखाने पुन्हा संयमित जीवन घालवायचा निश्चय केला. पण एकदा नृत्याच्या कार्यक्रमात तिने बीजगुप्तला पाहिले आणि तीही भान हरवून बसली. बीजगुप्तने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तिने प्रथम प्रतिसाद दिला नाही. पण हळूहळू तिला कळून चुकले की फक्त बीजगुप्तच तिच्या जीवनात येऊ शकतो. तिने स्वत:ला बीजगुप्तच्या स्वाधीन केले.

रत्नांबर, श्वेतांकला बीजगुप्तकडे घेऊन येतात. बीजगुप्त स्वत:ची ओळख करून देतो. त्याच वेळी चित्रलेखाचीही ओळख करून देतो. श्वेतांकला कधीच ठाऊक नसलेल्या अनोख्या जीवनात पहिल्यांदाच आल्याबद्दल त्याचे स्वागत करतो आणि डगमगत्या पायांनी तोल सावरत उभ्या असलेल्या चित्रलेखाला तिच्या महालात पोचवून देण्याची कामगिरी सोपवतो. बीजगुप्तच्या सहवासात चित्रलेखा जीवनाचा उन्मुक्त आनंद अनुभवत असली तरी ती विचार करणारी स्त्री आहे. तारुण्याचा उन्माद भोगत असतानाही स्वत:च्या जगण्याचा अर्थ तिला कळून घ्यायचा आहे. जीवन ही एक न विरणारी पिपासा आहे. ते सतत बदलत असते आणि सतत रंग बदलणाऱ्या जीवनात सुख आणि शांती मिळू शकत नाही याची तिला जाणीव आहे. तिच्या बुद्धिमत्तेने आणि तर्कशुद्ध बोलण्याने, राजसभेत आलेला योगी कुमारगिरीदेखील प्रभावित होतो. त्याला ती शांती आणि सुख यांचा अर्थ समजावून सांगताना म्हणते, ‘शांती अकर्मण्यता आहे आणि सुखाची एक निश्चित व्याख्या करता येणार नाही.’ कुमारगिरीच्या शून्यासंबंधीच्या विवेचनावर ती म्हणते, ‘तुमच्या या शून्य कल्पनेवर कोण विश्वास ठेवील? जे प्रत्यक्ष आहे, समोर दिसते, तेच सत्य आहे. शून्य हे कल्पित आहे. ज्ञान आणि अंध:कार, सुख आणि दु:ख, स्त्री आणि पुरुष, पाप आणि पुण्य यांच्यात तुम्ही करीत असलेला भेद मिथ्या आहे. तपस्या ही जीवनातली चूक आहे. तपस्या म्हणजे आत्म्याचे हनन.’ कुमारगिरीशी ती वाद घालते, पण त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने ती मोहितही झाली आहे. एके दिवशी त्याच्या कुटीत जाऊन ती त्याला दीक्षा देण्याची विनंती करते. तेव्हा तो नकार देतो. त्यावर ती म्हणते, ‘स्त्री अंधकारमय आहे आणि मायारूप आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर योगी तुम्ही चूक करताहात. स्त्री शक्ती आहे, स्त्री सृष्टी आहे. जो पुरुष स्त्रीला भितो तो दुर्बल, भित्रा आहे, अयोग्य आहे. मी अंध:कार असेल तर मला प्रकाशाची आस आहे. तुम्ही वासनेवर विजय मिळवला आहे. तुम्ही मला दीक्षा द्या.’

चित्रलेखा स्वत:शी अतिशय प्रामाणिक आहे. स्वत:च्या जीवनावर तिची पकड आहे. ती एक खंबीर, सशक्त, समर्थ आणि आत्मनिर्भर स्त्री आहे. मनाने स्वच्छ आहे. बीजगुप्तचे तिच्यावर अतिशय प्रेम आहे. तो तिला आपली पत्नी मानतो. आपल्या प्रेमावर फक्त तिचा अधिकार आहे, असे तो स्पष्ट सांगतो. परंतु बीजगुप्तशी आपला विवाह होणे शक्य नाही हे चित्रलेखाला ठाऊक आहे. पाटलीपुत्र नगरीतील सामंत मृत्युंजय याच्या मुलीशी, यशोधरेशी त्याने लग्न करावे यासाठी ती पुढाकार घेते. बीजगुप्तला सुखी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यासाठी मला त्याग करावा लागेल, त्याला सोडून जावे लागेल हे जाणून ती स्वत:च्या आभूषणांचा, मूल्यवान वस्त्रांचा आणि ऐश्वर्यसंपन्न महालाचा त्याग करून कुमारगिरीकडे निघून जाते. बीजगुप्तला पत्र पाठवून ती कळवते की मी तुमच्यावर अजूनही प्रेम करते, पण मी तुमचे जीवन निर्थक केले आहे. मी तुमच्याजवळ असले तर तुम्ही विवाह करणार नाही, म्हणून मी दूर जाते आहे. मी कुमारगिरीकडून दीक्षा घेऊन संयमित जीवन व्यतीत करणार आहे. प्रेमाचा सर्वोच्च आदर्श त्याग हाच आहे हे चित्रलेखा दाखवून देते.

चित्रलेखाचे असाधारण व्यक्तित्व कुमारगिरीला प्रभावित करते. त्याला समजून चुकते की विराग मनुष्यासाठी अशक्यप्राय आहे, कारण जीवनाचे कार्य रचनात्मक आहे, विनाशात्मक नाही. त्याच वेळी चित्रलेखाच्या लक्षात येते की, आपल्याविषयीच्या शारीरिक आकर्षणाने, मोहाने योगी पथभ्रष्ट होतो आहे. त्याच्याकडे येऊन आपण स्वत:ला अध:पतित केले आणि त्यालाही याची जाणीव झाल्याने ती त्याला म्हणते, ‘मी तुमच्यावर आधिपत्य गाजवते आहे, तुम्ही निर्बळ झाला आहात. तुम्ही स्वत:वर पुन्हा विजय मिळवावा यासाठी मी येथून निघून गेले पाहिजे.’ पण कुमारगिरी वासनेने चळला आहे. तो तिला सांगतो, की तू बीजगुप्तकडे जाणार असशील तर ते शक्य नाही. त्याने यशोधरेशी विवाह केला आहे. हे ऐकून चित्रलेखा भावव्याकुळ होते, संतापते. या तिच्या स्थितीचा कुमारगिरी फायदा घेतो आणि तिला स्वत:च्या पाशात ओढतो. दुसरे दिवशी सकाळी विशालदेवाकडून तिला कळते की बीजगुप्तने श्वेतांकला दत्तक घेतले, आपली सर्व संपत्ती त्याला दिली आणि त्याचे यशोधरेवर प्रेम असल्याने त्याचा यशोधरेशी विवाह करून दिला. कुमारगिरीने असत्य बोलून आपल्याला त्याच्या वासनेचे साधन बनवले हे कळल्यामुळे तिला कुमारगिरीचा आत्यंतिक तिरस्कार वाटतो. ती त्याची निर्भर्त्सना करते आणि निर्धन, एकाकी झालेल्या बीजगुप्तकडे परत जाते.

‘चित्रलेखा’ ही कादंबरी एका उत्कट प्रेमाची कथा आहे. चित्रलेखा ही बीजगुप्तवरच खरे प्रेम करीत असते. कुमारगिरीवर विजय मिळविण्यासाठी ती त्याच्याकडे जाते. पण तिच्या बीजगुप्तवर असलेल्या प्रेमाचा आधार नाहीसा झाला असे भासवून कुमारगिरीने जरी तिला स्खलित केले असले तरी बीजगुप्तचे श्रेष्ठत्व, त्याचे औदार्य आणि त्याचे आपल्यावरचे अविचलित प्रेम याची खूण पटल्याने पुन्हा त्याच्याकडेच परत जाते.

चित्रलेखा या व्यक्तिमत्त्वावर ही संपूर्ण कादंबरी आधारलेली आहे. प्रेमाचे उत्कट आणि उदात्त रूप चित्रलेखाच्या व्यक्तिचित्रातून साकार झाले आहे.

chaturang@expressindia.com