प्रभा गणोरकर

‘ऑथेल्लो’मधील निष्पाप डेस्डेमोनाची शोकांतिका आपल्याला चटका लावून जाते. डेस्डेमोनाचा विचार करताना समाजमनात हजारो वर्षांपासून दृढमूल झालेल्या धारणा या विशिष्ट कलाकृतीतही आढळतात हे जाणवते. स्त्रीची लैंगिकता हाच जणू तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे कुणा पुरुषावर सूड उगवण्यासाठी त्याच्या परिवारातील स्त्रीचे चारित्र्यहनन पुरेसे ठरते. चारशे वर्षांपूर्वीही आणि आताही त्यात बदल नाही.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
man arrested for booking cab from Salman Khan house
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या पत्त्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बूक केली कॅब, एकाला अटक
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून

‘डेस्डेमोना’ ही विख्यात ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपिअर याच्या ‘ऑथेल्लो’ (१६०४) या जगप्रसिद्ध शोकात्मिकेतील व्यक्तिरेखा आहे. व्हेनिसमधल्या ब्रॅबॅन्शियो या श्रीमंत सरदाराची ही रूपवती कन्या. ऐषआरामात वाढलेल्या या सुंदर तरुणीची अनेक तरुणांना अभिलाषा असते पण तिने घरातून पळून जाऊन ऑथेल्लो नावाच्या, परक्या देशातून आलेल्या काळ्या मूरशी लग्न केले आहे या बातमीने एकच खळबळ माजते.

आयागो ही बातमी तिच्या बापाच्या कानावर घालतो तेव्हा तो संतापाने वेडापिसा होतो. ऑथेल्लोने काहीतरी जादूटोणा करून डेस्डेमोनावर आपले जाळे टाकले अशी तक्रार तो व्हेनिसच्या डय़ूककडे करतो. ऑथेल्लोला राजाच्या दरबारात मान आहे. त्याच्या पराक्रमाने राज्याची अनेक युद्धांत सरशी झालेली आहे. आजच्या घटकेला डय़ूक ऑथेल्लोच्या सायप्रसच्या मोहिमेवर रवाना करण्याच्या बेतात आहे. ब्रॅबॅन्शियोच्या तक्रारीची दखल घेऊन तो ऑथेल्लोचे म्हणणे ऐकून घेतो. आपण आपल्या पराक्रमाने डेस्डेमोनाला जिंकले, माझ्या शौर्याच्या गाथांनी तिला मोहित केले आणि म्हणून तिने माझ्याशी लग्न केले, हवे तर तुम्हीच तिला विचारा असे ऑथेल्लोने सांगितल्यावर डय़ूक तिला पाचारण करतो. डेस्डेमोना दरबारात आपल्या पित्याला सांगते की, ‘तुम्ही मला जन्म दिलात, वाढवले, शिक्षण दिलेत, मला तुमच्याबद्दल आदर आहे, पण ऑथेल्लो माझा पती आहे. माझ्या आईने जसे तुम्हाला तिच्या पित्यापेक्षा जास्त महत्त्व दिले तसेच मी ऑथेल्लोला, माझ्या स्वामीला श्रेष्ठ मानते. डय़ूक, सर्वानुमते ऑथेल्लोला सायप्रसच्या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतो तेव्हा डेस्डेमोना व्हेनिसमध्ये पित्याच्या घरी राहण्याऐवजी ऑथेल्लोबरोबर जाण्याचा निर्णय घेते.

या शोकात्मिकेत डेस्डेमोना आणि ऑथेल्लो यांच्याइतकेच महत्त्वाचे पात्र आहे, ‘आयागो’ हे. हा ऑथेल्लोच्या हाताखाली असणारा माणूस ऑथेल्लोच्या विश्वासातला, जवळजवळ उजवा हात आहे. पण मनातून ऑथेल्लोचा द्वेष करतो. ऑथेल्लो हा काळा, परका तरी आपल्याला त्याच्या हाताखाली काम करावे लागते. काळ्या गोऱ्यांच्या वंशवादातून येणारा तिरस्कार त्याच्या मनात भरून आहे. शिवाय ऑथेल्लोने आपल्या बायकोकडे वाईट नजरेने पाहिले आहे हे किल्मिष त्याच्या मनात आहे आणि आपण वरचढ असूनही ऑथेल्लोने कॅसिओला आपल्या वरचे पद दिले यानेही तो जळफळतो आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन तो सुडाचे राजकारण रचतो. ऑथेल्लोशी गोड बोलत, आपण त्याच्या विश्वासातले, सर्वात जवळचे, असे भासवत तो डेस्डेमोनाविषयी ऑथेल्लोचे कान भरतो, तिचे कॉसिओवरच प्रेम आहे. एकदा ऑथेल्लोने कॅसिओला कामावरून काढून टाकल्यावर डेस्डेमोना त्याच्यासाठी ऑथेल्लोकडे रदबदली करते, तीदेखील त्याच्यावर प्रेम असल्यानेच असे आयागो त्याला पटवून देतो. ऑथेल्लोने आपल्या प्रेमाची भेट म्हणून डेस्डेमोनाला दिलेला हातरुमाल चोरून आणण्याची कामगिरी तो आपल्या बायकोवर सोपवतो, तो हातरुमाल कॅसिओच्या खोलीत टाकतो आणि डेस्डेमोनानेच तो कॅसिओला दिला असा पुरावाही आयागो ऑथेल्लोला देतो. डेस्डिमोनाचे कॅसिओवर प्रेम आहे. त्यांचे प्रेमसंबंध आहेत असे संशयाचे विष तो ऑथेल्लोच्या मनात कालवतो. ऑथेल्लोचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि हा संशय पराकोटीच्या संतापाचे, तिच्याविषयीच्या तिरस्काराचे रूप घेऊन एक दिवस तो डेस्डेमोनाचा चारचौघांत अपमान करतो, तिच्यावर हात उगारतो आणि रात्री मनाचा निश्चय करून डेस्डेमोनाचा गळा दाबून तो तिचा खून करतो. ऑथेल्लोबद्दल आयागोच्या मनात असलेल्या द्वेषाची, अकारण सुडाची डेस्डेमोना बळी ठरते.

ही अभिजात शोकात्मिका, अभ्यासकांना, समीक्षकांना नाटय़ आणि चित्रपट दिग्दर्शकांना, अभिनेत्यांना खुणावत राहिली आहे. चारशेहून अधिक वर्षे ती चर्चेचा विषय ठरली आहे.

डेस्डेमोना साधी, सरळ, भोळी, निष्पाप आहे. ऑथेल्लोला फसवण्याचा विचार तिच्या मनाला शिवूही शकत नाही आणि ऑथेल्लोच्या मनात आपल्या निष्ठेविषयी संशय असू शकेल हे तर तिच्या कल्पनेपलीकडचे आहे. रात्री तिच्या रक्ताचा थेंबही न सांडता तिच्या दैवी सौंदर्यावर ओरखडाही उठू न देता तिला ठार करण्याच्या हेतूने ऑथेल्लो तिच्या शय्येवर येतो तेव्हा ती जागी होते. तू काही गुन्हा केला असशील तर या क्षणीच कबूल कर असे तो म्हणतो. तेव्हा ती गोंधळते, त्याचा आविर्भाव पाहून भयभीत होते. ऑथल्लो तिला हातरुमाल कुठे आहे, कॅसिओला तू तो का दिलास, असे विचारतो. गुन्हा कबूल कर. आता तुला मरावेच लागेल असे म्हणतो, तेव्हाही ती पुन:पुन्हा स्वत:च्या निष्ठेची, त्याच्यावरच्या प्रेमाची ग्वाही देत राहाते. आजची रात्र तरी मला जगू दे अशी याचना करते, पण तो तिचा गळा घोटून तिला ठार करतो. निष्पाप डेस्डेमोनाची ही शोकांतिका आपल्याला चटका लावून जाते. ‘डेस्डेमोना’मुळे माझ्या मनात विचार घोंगावू लागले..

प्रत्येक कलाकृती ही विशिष्ट आणि स्वयंपूर्ण असते. अनन्य असते. ऑथल्लोचे काळ्या वंशातील असणे, त्यामुळे सुंदर, गोऱ्या वंशाची डेस्डेमोना आपली प्रतारणा करू शकेल असा कदाचित त्याच्या मनात खोलवर असणारा गंड, दुष्ट आयागोने त्याच्यावर टाकलेली भूल आणि त्याने ऑथेल्लोशी सूचक बोलत पद्धतशीरपणे निर्माण केलेले संशयाचे भूत ही सारी या विशिष्ट कलाकृतीची बांधणी आहे. ती आपण इतर कुठेही वापरू शकणार नाही तरी डेस्डेमोनाचा विचार करताना समाजमनात हजारो वर्षांपासून दृढमूल झालेल्या धारणा या विशिष्ट कलाकृतीतही आढळतात हे जाणवते.

समाजाच्या प्राथमिक अवस्थेत स्त्रीला होणारे मूल हे तिच्या पतीपासून झाले असेल तरच ते त्याच्या संपत्तीचा वारस ठरणार या आर्थिक, सांपत्तिक वारशाच्या मुद्दय़ातून निर्माण झालेला नियम हा हळूहळू नैतिक मूल्यामध्ये बदलत गेला. स्त्रीने पतीशी एकनिष्ठ असलेच पाहिजे हा दंडक निर्माण झाला. किंबहुना पतीचा अपमान करायचा असेल, त्याच्या प्रतिष्ठेवर आघात करायचा असेल, त्याला समाजात तुच्छ ठरवायचे असेल तर त्याच्या पत्नीचे चारित्र्यहनन केले की पुरेसे ठरू लागले. रजकाने रामाची अप्रतिष्ठा केली, ती रावणाने आपल्या वनात ठेवलेल्या सीतेला रामाने स्वीकारले म्हणून. शिवाय सीतेला अग्निदिव्य करून स्वत:चे पावित्र्य सिद्ध करून दाखवावे लागले. स्त्रीची लैंगिकता हाच जणू तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. कुणाला सूड उगवायचा असेल तर पतीच्या पत्नीवर, बापाच्या मुलीवर, किंवा जातीतल्या बाईवर बलात्कार केला की झाले. किंवा तिच्या ‘शुचिते’बद्दल कुजबुजही पुरेशी होते. बलात्कारित स्त्रीला जगणे अशक्यप्राय होते. स्त्री ही पत्नी, सखी, प्रेयसी, मैत्रीण तसेच पुरुषाच्या प्रतिष्ठेचे प्रतीक असते. ‘शील’ या शब्दाचा अर्थ केवळ योनिशुचितेशी निगडित करण्यात आलेला आहे. या संदर्भातला आणखी एक विरोधाभास असा की शील, अब्रू इत्यादी शब्द हे फक्त बाईच्याच शुचितेशी निगडित आहेत. पुरुषाच्या लैंगिकतेशी नाहीत. उलट पुरुष इतर स्त्रियांशी संबंध ठेवीत असेल तर ते त्याच्या पौरुषाचे, ऐटीचे, दिमाखाचे प्रतीक ठरते.

प्राचीन काळापासून स्त्रीचा देह मन, बुद्धी, गुण, कर्तृत्व, स्वभाव यशस्विता नव्हे, तर तिचा फक्त देह हाच महत्त्वाचा मानला गेला. या ‘वस्तू’वर हक्क गाजवणे, वर्चस्व असणे, ताबा असणे किंवा त्याची विटंबना करणे हीच पुरुषाच्या कर्तृत्वाची खूण. तिच्या देहाचे प्रदर्शन हा एक प्रकार, तिच्या नग्नतेची जाहिरात करणे, उपयोग करून घेणे, अलीकडच्या तंत्रांनी तिची नग्न छायाचित्रे काढून ती समाजमाध्यमांवर टाकणे आणि त्यामुळे तिची अब्रू चव्हाटय़ावर आणली जाणार असल्याच्या धमक्या देणे.. त्यामुळे तिला तोंड वर करून, ताठ मानेने जगणे अशक्य करून टाकणे..

आणखी खूप लिहिता येईल, हजारो बायकांना सहन करावे लागते आहे असे हे भीषण वास्तव आहे. हजारो विद्रूप चेहऱ्यांचे.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com