प्रभा गणोरकर

फ्लॉबेरने रंगवलेले चरित्रहीन स्त्रीचे एक रूप म्हणजे एम्मा बोव्हारी. भ्रामक कल्पनांनी खुळी झालेली एम्मा परपुरुषांकडून प्रणयाचे सुख मिळवताना कुणाचीही पर्वा करीत नाही. ती स्वार्थी आहे, आत्ममग्न आहे आणि मूर्खही आहे. या सर्व शोकात्मिकेला एम्मा जबाबदार आहे. म्हणूनच वाचक एम्मापेक्षाही तिच्या नवऱ्याच्या मृत्यूने आणि मुलीच्या दुर्दैवाने गलबलून जातो. ‘एम्मा बोव्हारी’ या लेखाचा हा भाग दुसरा.

गुस्ताव फ्लॉबेरने ‘मादाम बोव्हारी’ या कादंबरीत एम्मा बोव्हारीचे द्विधा मन तिच्या मनाशी एकरूप होऊन रंगवले आहे. एम्माची वागणूक, तिच्या जगण्याविषयीच्या अवास्तव कल्पना, नवरा चार्ल्सच्या प्रेमाची दखल न घेणे, ढोंगीपणा, स्वत:च्या मुलीकडे, बर्थकडे, संसाराकडे दुर्लक्ष करणे, तिची घालमेल हे सारे फ्लॉबेरने प्रत्ययकारी पद्धतीने चित्रित केले आहे. ती आता लिऑनच्या प्रेमात होती, मात्र त्याला जे हवे होते ते मिळेल की नाही याविषयी त्यालाच खात्री नव्हती. एम्मा नवऱ्यावर प्रेम करते, त्याची काळजी घेते हे तो पाहात होता. ती फार दूर आहे असे त्याला वाटत असे. पण प्रत्यक्षात तसे नव्हते. एम्मा आपल्या इच्छा मनात खोलवर दडवून ठेवत होती. तिचे लिऑनवर प्रेम बसले होते. ती त्याला भेटायला तळमळत असे. त्याच्याबरोबर पळून जावे असे तिला तीव्रतेने वाटत होते.

कायद्याचे पुढचे शिक्षण घेण्याचे निमित्त करून लिऑन त्या सर्वाचा निरोप घेऊन पॅरिसला रवाना झाला. तो गेल्याने आपल्या आयुष्यातली एकमेव आशा नाहीशी झाली असे तिला वाटू लागले. तिचा चंचल स्वभाव पुन्हा उफाळून आला. नटणे, मुरडणे, उंची वस्त्रे विकत घेणे सुरू झाले. मध्येच इटॅलियन भाषा शिकण्यासाठी तिने डिक्शनरी, पुस्तके आणली. थोडय़ा दिवसांतच सारे तिने कपाटात कोंबले. ती फिक्कट दिसू लागली. तिला भोवळ येऊ लागली. चार्ल्स तिच्या काळजीने हैराण झाला. पण उपचारांची ती दखल घेईना. एक दिवस गावात भरलेल्या आठवडी बाजाराची गर्दी पाहात एम्मा खिडकीशी उभी असताना एक नवाच माणूस चार्ल्सची चौकशी करत आला. रोडाल्फ बूलँग. काही अंतरावर असणाऱ्या इस्टेटीवर त्याने दोन फार्म, बंगला विकत घेतलेला असतो. त्याच्या नोकरावर उपचार केले जात असताना एम्मा चार्ल्सला मदत करत असते. तेव्हा तिचे रूप त्याच्या नजरेत भरते. त्याचबरोबर त्या धूर्त, कावेबाज, बायकांचा बराच अनुभव असलेल्या माणसाच्या हेही लक्षात येते की या गचाळ, नखे वाढलेल्या, दाढी न केलेल्या डॉक्टरला त्याची बायको कंटाळली आहे. तिला खूश करण्यासाठी चार शब्ददेखील पुरतील. तिच्याबरोबरच्या प्रणयाची चित्रे मनाशी रंगवताना त्याला त्याच्या ठेवलेल्या बाईचे विरोधी चित्र दिसले. एम्माला मिळवायचेच असे मनाशी योजून तो पुढचे बेत आखू लागला. मधूनमधून त्यांच्याकडे जायचे किंवा त्यांना आपल्या फार्मवर बोलवायचे. त्यांच्याकडे हरणाचे मांस, कोंबडय़ा पाठवायच्या, त्यांच्याशी मत्री करायची असे त्याने ठरवले आणि ते अमलातही आणले. चार्ल्सशी मत्री करून एक दिवस तो एम्माला घोडय़ावर रपेट करायला घेऊन गेला, त्याने पद्धतशीरपणे तिच्यावर मोहाचे जाळे टाकले. एम्माला हवा तसा प्रियकर मिळाल्याचा हर्ष झाला. प्रणयाचा उत्कट आनंद मिळणार या कल्पनेची, तारुण्यात तिने पाहिलेली प्रीतीची स्वप्ने प्रत्यक्षात येणार याची धुंदी चढली.

एम्माला आपल्या नादी लावायला रोडॉल्फला काहीही वेळ लागला नाही. लवकरच त्यांनी एकमेकांना प्रेमाच्या आणाभाका दिल्या. तिने हुंदके देत त्याला आपले दुख सांगितले. त्याने तिला जवळ घेऊन तिची समजूत काढली. ती त्याला प्रेमभरली लांबच लांब पत्रे लिहू लागली. त्याचीही तिला पत्रे येऊ लागली. मनात येईल तेव्हा ती त्याच्या फार्मकडे धाव घेऊ लागली. एकदा भल्या पहाटे चार्ल्स झोपलेला असताना ती रोडॉल्फला भेटायला निघाली असताना तिला कपडय़ाच्या व्यापाऱ्याने पाहिलेदेखील. पण आता तिला कशाचीही पर्वा नव्हती. एम्माला खेळवण्यासाठी रोडॉल्फने काही दिवस तिची भेट घेणे टाळले. परिणाम हवा तसा झाला. ती त्याच्यासाठी किती वेडी झाली आहे हे तिने दाखवून दिले. इतकेच नव्हे तर आपण दूर कुठेतरी जाऊन राहू असा आग्रह नव्हे हट्ट ती करू लागली. त्यांच्या भेटीनंतर चार्ल्सचा सहवास तिला नको वाटू लागला. तिच्या त्याच्याशी वागण्यात झालेल्या बदलाने तो खिन्न झाला. पण त्याने तिचा संशय घेणे शक्यच नव्हते. रोडॉल्फकडे तिचा हट्ट सुरूच होता. एकदा त्यावर त्याने करवादून म्हटले, ‘कसे शक्य आहे ते? तुझी मुलगी आहे ना?’ ‘तिला घेऊन जाऊ ना आपण’, ती सहज उद्गारली. त्याच्याबरोबर करायच्या प्रवासाचे बेत ती त्याला ऐकवू लागली. तिचे हे सदाबहार स्वप्नरंजन, तिचा सौख्याचा अनुभव, तिच्या इच्छा या साऱ्यांमुळे तिचे सौंदर्य अधिकाधिक खुलू लागले. चार्ल्सला ती सुरुवातीच्या काळात वाटत होती तशीच हवीशी वाटू लागली. एम्मा रोडॉल्फबरोबर केलेल्या बग्गीतल्या रपेटीची, गोंडोलान सफरींची, झाडाला टांगलेल्या झुल्यात पडून हळुवारपणे झुलण्याची स्वप्ने पाहू लागली. इतकेच नव्हे तर तिने प्रवासाची तयारीही सुरू केली. मोठी ट्रंक, प्रवासी बॅगा, फॅशनेबल कपडे- सारे उधारीवर. पुढच्याच महिन्यात पळून जाण्यासाठी सारी जय्यत तयारी सुरू झाली. त्याच्याकडून पुन्हा पुन्हा प्रेमाची कबुली घेत, त्याची सर्व तयारी झाली ना हे जाणून घेत ती उद्याचा दिवस उजाडण्याची वाट पाहू लागली. छंदीफंदी असला तरी रोडॉल्फ हिशेबी होता. तिच्या बोलण्यातून तिच्या चनीच्या, सुखाच्या अपेक्षा व्यक्त होत होत्या. त्यात शिवाय तिची मुलगी. हे महागडे प्रकरण अंगावर घेणे परवडणारे नाही हे त्याला समजून चुकले. त्याने तिला भावपूर्ण असे भलेमोठे पत्र लिहून आपली असमर्थता व्यक्त केली. मला विसरून जा, सारा दोष आपल्या नशिबाचा आहे असे सविस्तर लिहून तुला हे पत्र मिळेल तेव्हा मी फार दूर कुठेतरी गेलेला असेन असे लिहून पत्र पूर्ण केले. फळांच्या परडीत तिला दिसेलसे ठेवून तिच्याकडे रवाना केले.

ते पत्र वाचल्यावर एम्माला पायाखालची जमीन दुभंगल्यासारखे वाटले. ती भोवळ येऊन पडली. चार्ल्सने धावपळ केली. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पुढचा दीडेक महिना त्याने आपला व्यवसाय बाजूला ठेवून तिची दिवस-रात्र सेवा केली. त्याला भवितव्यात वाढून ठेवलेल्या आर्थिक चणचणीने व्यग्रता येई. पण एम्मासाठी तो काहीही करायला तयार होता. ईश्वरकृपेनेच जणू ती दुखण्यातून सावरली. रोडॉल्फची स्मृती तिने हृदयाच्या अंतर्हृदयात पुरून ठेवली आणि लोकोपयोगी कामे, दानधर्म, वाचन करीत वेळ घालवू लागली.

एक दिवस अचानक चार्ल्स एम्माला जवळच्या शहरात ऑपेराला घेऊन जायचे ठरवतो. महागडी तिकिटे काढतो. सुंदर निळा पोषाख घालून बॉक्समधल्या मखमली गाद्यांच्या खुर्च्यावर बसताना एम्मा उल्हसित होते. संगीत झंकारत होते. व्हायलिनचे बो जणू तिच्या नसांवरून फिरू लागले. ऑपेरात एक उत्कट प्रेमकथा पाहताना तिला आपल्या आयुष्यातले धुंद प्रसंग आठवू लागले. पडदा पडल्यावर चार्ल्स बाहेर गेला आणि नंतर एम्माला म्हणाला, मला लिऑन भेटला होता. तो सध्या इथेच राहतो. तो तुला भेटायला येणार आहे. लिऑन येतो. त्याला पाहून तिचे देहभान हरपते. पूर्वी त्याच्याबरोबर रम्य क्षण घालवले त्या आठवणी तिच्याभोवती फेर धरतात. ऑपेरातला हाच गायक दुसऱ्या दिवशीही काही भाग सादर करणार असतो. म्हणून चार्ल्सच्या आग्रहावरून एम्मा तिथेच राहते. लिऑन तिला शहर दाखवायला नेतो. त्याची ओढ तिला जाणवत असते. त्याच्याबरोबर मजेत वेळ घालवल्यावर एम्माला त्याचा निरोप घेणे जड जाते. त्याचा वकिली सल्ला घेण्याच्या निमित्ताने चार्ल्सला सांगून पुन्हा येते व तीन दिवस त्याच्यासोबत घालवते.

आपण पियानोचे वर्ग सुरू केले आहेत असे चार्ल्सला सांगून आठवडय़ातून एक दिवस ती लिऑनबरोबर घालवते. जलविहार, महागडय़ा हॉटेलमध्ये मुक्काम, नव्या फॅशन्सचे कपडे, पार्लर्स अशा हौसमौजेसाठी लागणारा पसा ती चार्ल्सकडून ‘पॉवर ऑफ अटर्नी’ मिळवून उभा करते. अधिकाधिक खर्चासाठी लोकांकडून कर्जे घेत राहते. लिऑनसाठी ती वेडी झालेली असते. तिच्या प्रेमाचा आवेग, पुढच्या सहजीवनाची स्वप्ने, ती गाजवत असलेला अधिकार यांमुळे लिऑनला तिचा उबग येऊ लागतो. पशांची तंगी वाढते. तिला हवे तेवढे कर्ज देणारा व्यापारी आता तिला पशाचा तगादा लावतो. बेलिफकरवी आलेली नोटीस पाहून हादरलेली एम्मा सगळ्यांकडे हात पसरते. पण कोणाकडूनही तिला मदत मिळत नाही. शेवटी असहाय होऊन साऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी ती आस्रेनिक घेते आणि भीषण वेदनांमुळे तिचा मृत्यू होतो.

फ्लॉबेरने रंगवलेले चरित्रहीन स्त्रीचे हे एक रूप आहे. भ्रामक कल्पनांनी खुळी झालेली एम्मा परपुरुषांकडून प्रणयाचे सुख मिळवताना कुणाचीही पर्वा करीत नाही. चार्ल्सचे प्रेम तिला कधीच जाणवत नाही. स्वत:ला भारी वस्त्रे विकत घेताना मुलीचे कपडे फाटले आहेत याकडे तिचे लक्ष जात नाही. ती स्वार्थी आहे. चार्ल्सची ती वंचना करते. त्याच्या साधेपणाचा गैरफायदा घेते. ती आत्ममग्न आहे आणि मूर्खही आहे. चंगीभंगी रोडॉल्फ तिला फसवतो आहे हे तिला कळत नाही. आत्ममग्न वृत्तीने ती वाट्टेल त्या थराला जाते. तिच्या अनैतिक वर्तनाने तिने स्वत:चा विनाश ओढवून घेतला.

अखेर एकदा तिच्या प्रियकराची पत्रे हाती पडली आणि त्या धक्क्य़ाने चार्ल्सचा मृत्यू ओढवला. मुलगी बेवारस झाली. या सर्व शोकात्मिकेला एम्मा जबाबदार आहे.

अनेक लेखक-कवींनी स्त्रियांच्या व्यभिचाराचा विषय चित्रित केला आहे. स्त्रिया असे का वागतात याचे गूढ त्यांना पडले. त्यातून सूचक संदेशही ते देत असतात. फ्लॉबेरने उभी केलेली एम्माच्या अनैतिक वर्तनाची ही सविस्तर कथा वाचताना वाचकाला तिचा राग येत असतो. तो तिला क्षमा करू शकत नाही. तो कथेशी एकरूप होतो. आणि एम्मापेक्षाही चार्ल्सच्या मृत्यूने आणि बर्थच्या दुर्दैवाने गलबलून जातो.

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com