19 March 2019

News Flash

लेखकांचे मनस्वी स्त्रीचित्रण

मला वाटते, जेव्हा स्त्रिया स्त्रियांविषयी लिहितात तेव्हा

‘मुलांचा श्रीकृष्ण’, ‘गोड गोष्टी- भाग एक ते दहा’, ‘श्यामची आई’, ‘आनंद’चे मधून मधून हाती लागलेले अंक या वाचनातून मी बाहेर पडले ती वयाच्या तेराव्या वर्षी. एक दिवस अचानक बाहेरची झाल्याने चार दिवस शाळेत न जाता घरीच बसायचे होते म्हणून वडिलांनी शाळेच्या वाचनालयातून एकदम पाच-सहा कादंबऱ्या आणून दिल्या. फडके, खांडेकर, मुख्य म्हणजे वरेरकरांच्या ‘गोदू गोखले’ आणि ‘विधवाकुमारी’. दहावीनंतर अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे ग्रंथालय सापडले. आणि वाचनाचे व्यसन लागले.

पहिल्याच वर्षी मी गाडगीळांच्या एका कथेतला उतारा ‘अमृत’ मासिकाकडे पाठवून एक रुपया आणि एक अंक बक्षीस मिळवला! त्या काळात गंगाधर गाडगीळ, अरिवद गोखले, पु. भा. भावे यांच्या कथासंग्रहांचा फडशा पाडला. बोरकर, पाडगावकरही आवडायचे. पण कथांनी मन गुंगून जायचे. गोखल्यांची ‘शुभा’, भाव्यांची ‘सतरावे वर्ष’, ‘स्वप्न’, ‘मुक्ती’, ‘ध्यास’ या कथा नंतर कायम स्मरणात राहिल्या. भाव्यांच्या ‘अकुलिना’तली सुरंगा शिरोडकर चटका लावून गेली. हरी नारायण आपटय़ांची यमू आणि तिची बालमत्रीण दुर्गी, र. वा. दिघ्यांच्या ‘सराई’तली लाडी अशा स्त्रिया मनात कायमच्या ठाण मांडून बसल्या. हळूहळू लक्षात येऊ लागले की बव्हंशी लेखकांची पुरुषपात्रे मनातून निसटून जातात, पण त्यांनी रेखाटलेल्या स्त्रिया विसरल्या जात नाहीत. वामन मल्हारांच्या रागिणी, उत्तरा, सुशीला, इंदू काळे, सरला भोळे, काशी, केतकरांची कालिंदी, एस्तेर, अशा साऱ्याजणी आपापले प्रश्न, दुखे, व्यथावेदना, कुंठा हे सारे घेऊन माझ्या मनात ठाण मांडून बसल्या आहेत. पुढच्या काळात चिं. त्र्यं. खानोलकरांच्या एकेका कादंबरीतल्या स्त्रिया आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या विटंबना, जीएंच्या अनेक कथांतून आलेल्या बहिणी, आया, मावश्या, आणि त्यांची झिजून गेलेली, पण वाचकांच्या मनाला चंदनाच्या लेपाप्रमाणे चिकटून बसलेली आयुष्ये प्रत्यक्ष जिवंत होऊन अनुभवताना वाटत गेले की या पुरुषलेखकांनी बायकांच्या मनात प्रवेश करण्याची विलक्षण सिद्धी कशी मिळवली? स्त्रियांचेही लेखन मी काही कमी नाही वाचले. अगदी जुन्या काशीबाई कानिटकर इत्यादी वाचनातून सुटल्या, पण विभावरींची सगळी पुस्तके वाचली. ‘नि:श्वासातल्या कळ्या’, ‘हिंदोळ्यावर’मधली अचला, शबरी या नायिकाही लक्षात राहिल्या. पण वाटले, अचला पुरेशा ताकदीने व्यक्त झाली नाही. शबरी घरावरच्या मोरासारखी वीज झेलून घर वाचवायला परतते ते काही खरे नाही. शबरी ही शबरी नसून मालतीबाईच आहेत. नंतर सानिया, गौरी देशपांडे, आशा बगे या सगळ्यांच्या सगळ्या जणी ओळखीच्या झाल्या, पण मनात अढळपणे रुतून बसल्या नाहीत. असे का व्हावे?

मला वाटते, जेव्हा स्त्रिया स्त्रियांविषयी लिहितात तेव्हा, त्यांनी स्वत: जे अनुभवलेले असते किंवा भोवती पाहिलेले असते, किंवा काही गृहीते धरून वाटते त्याविषयी त्या लिहितात. त्या स्त्रियांवर आरोपित झालेल्या भूमिकांविषयी आणि त्यांच्या साचेबंद रूपांविषयी भाष्य करतात. पुष्कळदा पुरुषही जेव्हा स्त्रियांविषयी लिहितात, तेव्हा त्यांच्या नेणिवेत आपण पुरुष आहोत ही गोष्ट पक्की बसलेली असते. त्यामुळे त्यांच्या लेखनात तो साचेबंदपणा व स्त्रियांची स्त्री म्हणून असलेली भूमिका आणि अपेक्षा स्पष्ट दिसून येते. मग पुरुषांनी स्त्रियांसंबंधी केलेले लेखन चांगले केव्हा होते? तर जेव्हा त्यांच्या मनात स्त्रीविषयी काही पूर्वकल्पित, आधीच मनाशी पक्के झालेले रूप नसते; ते जेव्हा स्त्रियांविषयी लिहितात तेव्हा ते पुरुष नसतात, तर माणूस असतात. त्यांना स्त्रियांबद्दल सहानुभाव असतो, तिच्या सुखदु:खांशी ते एकरूप होतात. ते त्यांना नुसते वरवर समजून घेत नाहीत, तर स्त्रीच्या आंतरिक भावना ते समजू शकतात. ती काय अनुभवत असते ते त्यांना आतून, मनोमन जाणवत असते. त्यांच्या लेखनात स्त्रीचे कल्पित रूप नसते. तर ती एक व्यक्ती असते. विशिष्ट स्थितीतून, भावावस्थेतून जाणारी व्यक्ती असते. श्रेष्ठ लेखक प्रत्येक व्यक्तीला येणारा विशिष्ट अनुभव जाणून घेतो, कल्पितो, आणि त्याच्याशी एकरूप होऊन तो व्यक्त करतो. त्यातूनच तो ती संपूर्ण व्यक्तिरेखा जिवंत करतो. पुरुष लेखकांनी साकारलेल्या स्त्रियांच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखा वाचताना वाटत राहते, कसे यांना हे सुचले असेल, नव्हे कळले असेल? मला तर असे वाटले की, अचलेचे हिंदोळे, तगमग, तडफड विभावरींपेक्षा विश्राम बेडेकरांनी अधिक उत्कटपणे व्यक्त केली असती. शबरी अशी घरी परतलीच नसती. वनमाळीने पदरात टाकलेल्या वंचनेनंतर नमू घर सोडून जाते, पण उद्ध्वस्त होत नाही. आपल्याला मूल होण्याची शक्यताच वनमाळीने खुडून टाकल्याचे कळल्यावर ती ही गोष्ट सहज बाजूला करू शकते? नमू रंगवण्यात गौरी कमी पडते आहे काय?  तिथे पु. भा. भावे हवे होते.. त्यांनी तिचा आकांत ओंजळीत घेऊन वाचकापुढे ठेवला असता..

श्रेष्ठ पुरुषलेखकांनी स्त्रियांचे काल्पनिक वा खोटे उदात्तीकरण क्वचितच केले आहे. बाईकडे पाहताना तिचे गुणदोष, तिच्यातले हीण, स्खलनशीलता, छोटे छोटे स्वार्थ, निसरडय़ा मार्गावरून त्यांचे पाऊल घसरणे, त्यांची आत्मनिर्भर्त्सना, नराश्य, आत्मपीडा, असुरक्षिततेचे भय, संपूर्णतेने झोकून देणे, तिचा मनस्वीपणा, प्रेम करण्याची अफाट शक्ती, सहनशीलता, निमूट स्वीकार किंवा आत्मनाशाचे बळ अशा अनेक छटा पुरुषांच्या लेखनातल्या स्त्रियांच्या चित्रणात आढळतात. याशिवाय पुरुष असूनही पुरुषांनी स्त्रियांवर केलेले अन्याय, अत्याचार, अवहेलना, छळ यांची असंख्य चित्रेही त्यांनी स्त्रीव्यक्तिरेखांतून उभी केली आहेत. महाभारतात अशा पीडित स्त्रिया किती आहेत त्यासंबंधी इरावती कर्वे यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या पुस्तकातले विविध उल्लेख पाहण्याजोगे आहेत. एके ठिकाणी त्या म्हणतात : पितृप्रधान संस्कृतीत स्त्रियांचे काय स्थान होते ते महाभारतात अगदी स्पष्ट होते. मुली देवाणघेवाण करण्यासाठी असत. कुंती लहान असतानाच वसुदेवाने आपला मित्र जो कुन्तिभोज त्याला दिली. कुंती म्हणते, एखाद्या चोराने चोरीचा माल ज्याप्रमाणे आडगिऱ्हाइकी फुंकून टाकावा त्याप्रमाणे वसुदेवाने मला भोजाला देऊन टाकली. बापाने हाकललेली, सासऱ्यांनी काढून लावलेली अशी दु:खीकष्टी मी जगून तरी काय करू? लोक मेलेल्यांचे श्राद्ध करतात, पण वास्तविक आज चौदा वर्षे ते मला व मी त्यांना मेले आहे.. कुंती, पंडूकडे मुलासाठी याचना करणारी माद्री, भीष्माने भर मंडपातून आपल्या रोगी, निर्वीर्य भावासाठी ओढून नेलेली अंबा. द्रुपदाला द्रोणाचा सूड उगवायचा होता म्हणून द्रौपदीचे दान देऊन पराक्रमी जावई त्याला पाहिजे होता. सुभद्रा, द्रौपदी, दमयंती, सीता, सावित्री. पणाला लावल्या जाणाऱ्या, आंधळेपण पत्करणाऱ्या.. अशा विविध स्त्रियांचा त्यांनी उल्लेख केला आहे. (पाहा : मराठी लोकांची संस्कृती, १९५१. पृ. १८४ पासून पुढे). स्त्रियांची भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांपासून केलेली विटंबना पुरुषांनी जशी पाहिली आणि व्यक्त केली, तशी स्त्रियांना व्यक्त करता आलेली नाही. अरुण कोलटकर यांच्या ‘भिजकी वही’तील पाश्चात्त्य स्त्रियांचीही वर्णने मुळातून वाचण्याजोगी आहेत. कोलटकरांचा ‘भिजकी वही’ हा संग्रह म्हणजे स्त्रियांच्या वेदनांची गाथाच आहे. लोककथा, पुराणकथा, समकालीन जगातील घटना यांतून ज्या दु:खी, एकाकी, त्रस्त, छळ सोसलेल्या, आकांत करणाऱ्या, अविरत अश्रू ढाळणाऱ्या, होरपळून निघालेल्या, पराकोटीचे दु:ख आतल्याआत सोसणाऱ्या स्त्रिया कवीला जाणवल्या, त्या स्त्रिया या कवितांतून व्यक्त झालेल्या आहेत.

मला वाचनात भेटलेल्या आणि मनात कायमच्या रुतून बसलेल्या स्त्रिया मी या सदरातून आठवणार आहे. अशा स्त्रियांची मला दिसलेली प्राचीन रूपे लीळाचरित्र, एकांक, स्मृतिस्थळ या ग्रंथातली आहेत. एकांकातील बोणेबाई आणि पुढे भेटलेली बाईसा, स्मृतिस्थळमधली, दामोदरपंडितांना, ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीची राख खाणार का आता, असा कडक परखड निरोप पाठवणारी हिराइसा, नागदेवांना कधी तरी तहान लागेल त्यासाठी सहा महिने पाणी घालून लिंपून ठेवलेला नारळ ओटीत सांभाळणारी शिष्या आणि दीक्षा घेतल्यानंतर आपल्या मूळच्या गावी जाऊन भिक्षा मागायला नवऱ्याच्या दारात उभी राहणारी आणि मला ओळखलेत का असे म्हणणारी संन्यासिनी.. या खऱ्याखुऱ्या स्त्रिया आहेत, पण मला त्या भेटल्या पुस्तकांतूनच. आणि नंतरही अशा एकएक जणी भेटत गेल्या. त्या सर्व हातात हात घालून माझ्याभोवती फेर धरून असतात. पुरुषलेखकांनी उभे केलेले हे स्त्रीत्वाचे रूपबंध आहेत. तेच या सदरातून भेटणार आहेत.

प्रभा गणोरकर

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on January 13, 2018 5:55 am

Web Title: hari narayan apte and gangadhar gadgil wrote on women empowerment