24 November 2020

News Flash

दुर्गी

दुर्गी ही हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’

हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीतील यमू आजच्या काळात आढळणार नाही. नवे कायदे आले, परिस्थितीनुसार समाज बदलला, विधवा पुनर्विवाह करून किंवा स्वत: मिळवत्या होऊन स्वाभिमानाने जगू लागल्या. पण दुर्गी मात्र  आजही कुठेही सापडते.

दुर्गी ही हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ (१८९०-९३) या कादंबरीतली नायिका यमू हिची मत्रीण. दुर्गीचे बिऱ्हाड आणि यमूचे बिऱ्हाड एकाच वाडय़ात. दुर्गी यमूएवढीच, कदाचित थोडी लहानही असेल, पण तिचे लग्न झालेले होते.

त्या काळात, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही, मुलींची लग्ने बालपणीच होत. वास्तविक १८५० पासून मुलीचे लग्न इतक्या लहान वयात करणे योग्य नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय विधवांचा पुनर्विवाह इत्यादी स्त्रीविषयक सुधारणांच्या अनुषंगाने विचार मांडले जाऊ लागले होते. तथापि या सर्व सुधारणांचे केंद्र मुंबई शहर होते. पुण्यात सनातन्यांचे प्राबल्य होते आणि सुधारकांची निंदा होत असे. मुलीच्या लग्नाचे वय सुमारे आठ वर्षे. दुर्गीचे लग्न झाले असूनही ती आईच्या घरीच राहात होती आणि यमू आणि दुर्गी जिवाभावाच्या मत्रिणी बनून गेल्या होत्या. दुर्गी अल्लड, थट्टेखोर, यमूच्या शब्दांत वात्रट. एक दिवस दुर्गीचा नवरा त्यांच्याकडे जेवायला येणार होता तर ती केवढी आनंदात होती. यमूजवळ त्याचे सारखे गुण गात होती, तो कसा आपल्याकडे चोरून पाहतो, आपल्याला कशी लाज वाटते – एक ना दोन. शेवटी यमूला तो दुर्गीचा नवरा पाहायला मिळाला! चौदा-पंधरा वर्षांचा, हडकुळा नि काळा. दुर्गीच्या बापाची परिस्थिती यथातथाच, पण त्याने शेसव्वाशे रुपये हुंडा देऊन दुर्गीचे लग्न करून दिले. दुर्गीचा स्वभाव ताठय़ाचा, चारचौघात स्पष्ट बोलण्याचा, नवरा शाळेत शिकत होता इंग्रजी चौथ्या यत्तेत. लग्न लहानपणी झालेले असले तरी मंगळागौरी, वटपुनव साजऱ्या व्हावयाच्याच. त्या वेळी दुर्गी फार उल्हसित असे. मधून मधून तिची सासू तिला आपल्या घरी ठेवून घेई पण यमूच्या लग्नाच्या वेळी ती आईकडे राहायला आली, इतकेच नव्हे तर यमूची पाठराखीण म्हणून तिच्याबरोबर तिच्या सासरीही गेली. (कादंबरीचा कलात्म घाट याच दुर्गीला, यमूला वैधव्य येते त्या क्षणी, तिच्याजवळ असल्याचे दाखवतो).

हरी नारायणांच्या या कादंबरीत विरोधन्यासाचा अप्रतिम उपयोग केलेला आहे. यमूचा दुष्ट दुर्गुणी सासरा शंकरमामंजी. व्यसनी, बाहेरख्याली. ढोंगी. तर त्याची बायको उमासासूबाई अगदी गरीब गाय. दुसरा गोपाळमामंजी कमालीचा सज्जन, सुसंस्कृत, प्रेमळ. तर त्याची बायको कमालीची खाष्ट, कजाग. यमूची आई अत्यंत सुशील, सद्गुणी तर बाप संतापी, बापाशी भांडणारा. यमूची आई मृत्यू पावल्यानंतर तो लग्न करतो त्या माईसाहेब यमूच्या वयाच्या, पण तोरा, अधिकार गाजविणाऱ्या आणि अवगुणी. यमूचा दादा भावनाप्रधान, सुधारणावादी, तर त्याची बायको अडाणी, लावालाव्या करणारी, पाताळयंत्री. ही सर्व विषमविवाहाची उदाहरणे. पण जीवनातल्या विपरीततेचा आणखी एक नमुना म्हणजे  आनंदी, अल्लड दुर्गीला नवरा मिळतो तो कमालीचा संतापी, तिला मरेस्तो मारणारा. यमू नि दुर्गी माहेरी असताना सतत खेळत बागडत असणाऱ्या. पुढे या मत्रिणी सासरी गेल्यावर त्यांची सहासहा महिने भेट होत नसते. जेव्हा एकदा मोठय़ा मुश्कीलीने चत्रगौरीच्या हळदीकुंकू प्रसंगी ओझरती भेट होते, तेव्हा यमूला ती वाळलेली दिसते आणि त्याही वेळी दोघींचे काही हितगूज होऊ शकत नाही. दुर्गीला सासरचे बोलावणे येते, नव्हे नवराच स्वत: येऊन कोपऱ्यावर उभा असतो. दुर्गीला त्याचा एवढा धाक असतो की यमूने तिला रात्री राहण्याचा आग्रह केल्यावर ती म्हणते, माझा जीव राहावासा जर तुला वाटत असेल तर मला ठेवून घेण्याचं नावदेखील काढू नकोस. नवरा तिला कुठेही जाऊ देत नाही. माहेरी गेलीच तर चोरून तिला बोलावून घेतो. ती तावडीत सापडली की मारझोड करतो. दुर्गी स्पष्ट बोलू शकत नाही, पण एकदा सूचकपणे म्हणते, आज दोन-तीन महिने झाले एकसारखं माझ्या हात धुऊन पाठीस लागायचं.. मी एकटीशी दिसली की पुरे.. त्याने शाळाबिळा सोडून दिलेली असते, विडय़ा फुंकत रिकामटेकडा िहडत असतो. वाचकाच्या लक्षात येते की शरीरभोगापलीकडे त्याला दुसरे काहीच सुचत नाही. दुर्गीचे गुटगुटीत शरीर, तिचा पूर्वीचा ठसकेदारपणा, थट्टामस्करी जाऊन गालांची हाडे वर आलेली, हा असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार. या दोन मत्रिणींच्या चित्रणातही विरोधन्यास आहेच. यमूला रघुनाथरावासारखा बुद्धिमान, समंजस, प्रेमळ नवरा मिळाला आणि सासरी अतिशय सासूरवास असूनही नवऱ्याच्या प्रेमाचा परिसस्पर्श लाभून तिचे जीवन आनंदाने बहरून गेले. तर दुर्गीच्या आयुष्याचे तिच्या नवऱ्याने अगदी मातेरे करून टाकले. एकदा हा विद्रकल्याणी नवरा संतापाने विहिरीत उडी टाकतो. त्या वेळी दुर्गी गर्भारशी, अगदी टेकलेली, पण तशा नवऱ्याच्या मरणाच्या कल्पनेने ती हातपाय गाळते. कसाही, कितीही छळणारा असला तरी तिला वैधव्य नको असते. कारण तो जर मेला तर दुर्गीला तोंड काळे करून काळोखात बसावे लागले असते. त्या काळच्या विधवांच्या स्थितीचे, त्यांच्यावर आलेल्या केशवपनाच्या भीषण संकटाचे, दु:खाचे, अवहेलनेचे चित्र पुढे हरिभाऊंनी दाखवले आहे ते रघुनाथरावाचा अकस्मात मृत्यू होऊन यमूचे आयुष्य उद्ध्वस्त होते अशा कथाभागातून. वैधव्याच्या कल्पनेनेही दुर्गीच्या अंगावर काटा येतो कारण विधवांचे जगणे ती रोज बघत असते.

कादंबरीतील पात्रचित्रणाच्या दृष्टीनेही यमूपेक्षा दुर्गी हे पात्र अधिक कलात्मकतेने उभे केले गेले आहे. यमू ही नायिका आहे आणि लहानपणापासून अखेरीपर्यंत तिचे सविस्तर चित्रण आले आहे. वय वाढते, रघुनाथरावाच्या सहवासाने मुंबईत राहणे आहे. तिची समजही वाढते, पण तरीही तिच्यापेक्षा दुर्गी हे पात्र अधिक विकसित होत जाणारे आहे. आपल्या या छळवादी नवऱ्याच्या मृत्यूची कल्पनाही एकदा जिला सहन होत नाही, तीच दुर्गी नवऱ्याने चालवलेला छळ असह्य़ होऊन म्हणते, हे बघ यमे, एक मी तरी मेले पाहिजे.. नाही तर तिकडे तरी काही बरंवाईट झालं पाहिजे, त्याच्याखेरीज काही या हालातून सुटका नाही, समजलीस? नवऱ्याच्या छळाने हाडकातडे उरलेली दुर्गी यमूच्या घरी चार दिवस सुखाने घालवते. तोच यमूवर दु:खाचा कुठाराघात होतो. रक्ताच्या उलटय़ा होऊन रघुनाथचा मृत्यू होतो आणि सुखाच्या शिखरावरून यमू दु:खाच्या खाईत लोटली गेलेली दुर्गीला पाहावी लागते.

आजच्या काळात यमू आढळणार नाही. नवे कायदे आले, परिस्थितीनुसार समाज बदलला, विधवा पुनर्विवाह करून किंवा स्वत: मिळवत्या होऊन स्वाभिमानाने जगू लागल्या. पण दुर्गी मात्र कुठेही, आजही सापडते. बायको आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून, ती शिकली असली तरी ती आपल्या उपभोगासाठी, सेवेसाठी, मुले जन्माला घालण्यासाठी जन्मभर मिळालेली वस्तू म्हणून तिला फक्त वापरणारे, मारझोड करणारे नवरे आजही समाजात आढळतात. कायदे आहेत, पण ते कागदावर. कलमे आहेत, पण ती अमलात न आणण्यासाठी. अशा पुरुषप्रधान व्यवस्थेत हाल सहन करीत राहणाऱ्या, नवऱ्याचे घर हेच तिचे घर म्हणून ज्यांना माहेरीही थारा मिळू शकत नाही अशा असहाय, अगतिक अवस्थेत जगणाऱ्या स्त्रिया आजही शेजारी, गावात, नात्यांत, वृत्तपत्रे-मासिकांतून कथाकहाण्यांमधून आढळतात. आजही हजारो दुर्गी जन्मभर हालात तरी जगतात, मुलांसाठी दिवस काढतात, नाहीतर मुलांसह विहिरीत उडी घेतात.

प्रभा गणोरकर

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 4:55 am

Web Title: hari narayan apte story on women empowerment
Next Stories
1 लेखकांचे मनस्वी स्त्रीचित्रण
Just Now!
X