प्रभा गणोरकर  prganorkar45@gmail.com

शरच्चंद्र चट्टोपाध्यायांची ‘परिणीता’ ही गाजलेली कादंबरी. स्त्रियांचे गूढ, अथांग मन, त्यांच्यात आढळणारी त्याग, सहनशीलता, संयम, समर्पण इत्यादी गुणवैशिष्टय़े ही त्यांच्या ‘परिणीता’मधल्या ललितामध्येही आहेत. ललिताच्या आत्मसमर्पणाची ही कथा..

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

स्त्रियांचे गूढ, अथांग मन, त्यांच्यात आढळणारी त्याग, सहनशीलता, संयम, समर्पण इत्यादी गुणवैशिष्टय़े चित्रित करणारा थोर बंगाली लेखक अशी शरच्चंद्र चट्टोपाध्यायांची ख्याती आहे. ‘परिणीता’ ही त्यांची गाजलेली कादंबरी, दोन वेळा चित्रपटरूपात पडद्यावर आली, पण चित्रपटांमध्ये या कादंबरीची तरलता आणि व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य कसे हरवून गेले ते मूळ कादंबरी वाचताना जाणवत राहते.

ललिता ही या कादंबरीची नायिका आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर ती मामांच्या आश्रयाने राहते आहे. मामा गुरुचरण परिस्थितीने गांजलेले आहेत. राहते घर त्यांनी शेजारीच राहणाऱ्या लक्षाधीश नवीनचंद्रांकडे गहाण ठेवले आहे. ललिता मामांकडे आली तेव्हा आठ वर्षांची होती. मामांना आता तिच्या लग्नाची काळजी लागली आहे. या गोड स्वभावाच्या विनयवती मुलीला चांगला पती मिळावा यासाठी त्यांचे मन तळमळते. ती मामांच्या घरचे सारे काम तर सांभाळतेच, नवीनचंद्रांच्या पत्नीचे, भुवनेश्वरीचे, तिच्यावाचून पान हलत नाही. त्यांचा मोठा मुलगा अविनाशचंद्र वकील आहे आणि धाकटा शेखर अटर्नी आहे. गुरुचरण आणि नवीनचंद्र यांची घरे अगदी जवळजवळ आहेत. दोन्ही घरांतल्या बायकांचे एकमेकींकडे जाणे-येणे सारखे सुरू असते.

शेखरसाठी मुली पाहणे सुरू आहे. एक स्थळ सापडलेही आहे. नवीनचंद्रांची नजर त्यातल्या पशांवर आहे. पण भुवनेश्वरीने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, शेखर स्वत: मुलगी पाहून पसंत करील तेव्हाच लग्न ठरेल. शेखरचे आईवर फार प्रेम आहे. तो तिच्या आज्ञेत आहे. ललिता इतकी घरोब्यातली आहे की ती शेखरच्या आईला मा म्हणते. गरज लागेल तेव्हा किल्ल्यांचा जुडगा घेऊन, शेखरचे कपाट उघडून पैसेही घेते. एकेदिवशी ललिता कपाट उघडून पैसे काढते आणि  शेखरला म्हणते, ‘दहा रुपये घेते आहे हं.’ वाचत पहुडलेला शेखर तिकडे फारसे लक्ष देत नाही. शेखरच्या संमतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही हे ललिताला कुणीही सांगितलेले नसले तरी तिचे तिला ठाऊक आहे. जाताना दरवाजाच्या आडून ती हळूच म्हणते, ‘‘आम्ही थिएटरला जातो आहोत सगळे.’’ शेखर विचारतो, ‘‘आम्ही म्हणजे कोण कोण?’’ ललिता म्हणते, ‘‘मी, अन्नाकाली, चारुबाला, तिचा भाऊ आणि चारुबालाचे मामा गिरीन्द्रबाबू. ते मुंगेरहून आले आहेत आणि आता इथेच राहून बी. ए. करणार आहेत.’’ ललिताकडून हे सारे ऐकून शेखर तिरकस स्वरात म्हणतो, ‘‘हं, तरीच. चारपाच दिवसांत इकडे फिरकली नाहीस. रोज पत्त्यांचा फड बसलेला असतो, नाही? आणि आता तर कपडेबिपडे बदलून अगदी तयार होऊन आली आहेस.’’ त्याचे बोलणे ऐकून ललिता भिते. चाचरत म्हणते, ‘‘मग जाऊ मी?’’ शेखर जा म्हणाला, पण ललिताचा मूडच जातो. चारुबाला ललिताची मत्रीण आहे. ते लोक ब्राह्मसमाजी आहे. ते कुटुंब शेखरच्या ओळखीचे आहे, पण गिरीन्द्रशी त्याचा परिचय नाही. तो बाँकेपूरला शिकत होता, कोलकात्याला फारसा येत नसे.

शेखर असं म्हणाल्यामुळे ललिता त्या दिवशी त्या साऱ्यांबरोबर जात नाही. चारुबालाच्या आईला पत्ते खेळणे आवडते, पण जिंकून द्यायला तिला ललिताच हवी असते. गिरीन्द्र आल्यापासून रोज पत्त्यांचे डाव पडत असतात. पण शेखरच्या चिडण्यामुळे ललिता पत्ते खेळायला जाणे टाळू लागते. दोन दिवस ती खेळायला जात नाही. खूप आग्रहाचे बोलावणे झाल्यावर गेली खरी, पण शेखरचा निरोप आल्याने लगेच तिथून निघून येते. गिरीन्द्रला मनोमन ललिता आवडू लागली आहे. बहिणीकडून त्याला शेखर, गुरुचरणची हलाखीची स्थिती, त्यांचे गहाण पडलेले घर हडपण्याचा नवीनबाबूंचा विचार, ललिताच्या लग्नाची त्यांना वाटणारी काळजी हे सारे कळून येते. गिरीन्द्र गुरुचरणदांना विश्वासात घेतो. नवीनबाबूंनी पशांचा तगादा लावल्यावर त्यांचे सारे कर्ज सव्याज फेडण्यासाठी मदतीचा हातही पुढे करतो. त्याच्या वागण्याने ललिताला त्याच्याबद्दल आपुलकीही वाटू लागते.

दरम्यान, शेखरच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने तो आईला हवापालटासाठी न्यायचे ठरवतो. तेव्हा ललिता सारी तयारी करून देते. शेखरसाठी तिने नवा कोटही शिववून घेते.  शेखरची थट्टामस्करी सुरू असते. ‘तुझे लग्न होईल तेव्हा माझे कसे होईल’ त्याने असे म्हटल्यावर ललिता लाजून तिथून निघून जाते. त्या दिवशी अन्नाकालीने आपल्या बाहुलीचे लग्न करायचे ठरवलेले असते. याचे कारण आजचा मुहूर्त चांगला आहे असे गुरुजींनी सांगितलेले असते. अन्नाकाली बाहुलीच्या लग्नासाठी झेंडूच्या फुलांच्या माळा करीत असते. शेखरला ती निमंत्रण द्यायला जाते तेव्हा शेखर तिला एक माळ घेऊन यायला सांगतो. लग्नाच्या धामधुमीत वेळ नाही, म्हणून काली ती माळ घेऊन जायला ललिताला सांगते. ललिता शेखरच्या खोलीत जाते तेव्हा तो काहीतरी लिहीत बसलेला असतो. त्याचे लक्ष वेधण्यासाठी हळूच जाऊन ती शेखरच्या गळ्यात ती माळ टाकते. तो दचकून म्हणतो, ‘‘काली!’’ मागे वळल्यावर त्याला दिसते ललिता. तेव्हा तो म्हणतो, ‘‘ललिता काय केलेस हे!’’ ललिता म्हणते, ‘‘काय झाले?’’ शेखर म्हणतो, ‘‘जा कालीला जाऊन विचार, आज रात्री गळ्यात माळ घालण्याने काय होते ते?’’ ललिता लाजून लाल होते आणि तेथून निघून जाते. शेखर तिला हाका मारीत राहतो. पण ती थांबत नाही. आपल्या खोलीत विचार करीत पडलेली असताना शेखरचा तिला निरोप येतो. ती त्याच्या खोलीत जाते, विचारते, ‘‘काय आहे?’’ तो म्हणतो, ‘‘तू काय केलेस ते कळले ना?’’ ती म्हणते, ‘‘मी काही केले नाही. ती माळ परत द्या तुम्ही.’’ शेखर म्हणाला, ‘‘जवळ ये. तू अर्धवट केलेले काम मी पूर्ण करतो.’’ ललिता रागावून तेथून निघते.  पण खाली जाण्याच्या ऐवजी गच्चीत उभी राहते. तिचे डोळे लाजेने व स्वाभिमानाने डबडबून येतात. का त्याने तिचा असा मर्मभेदीउपहास करावा? ती लहान आहे, क्षुद्र आहे. अनाथ आणि निराश्रय असल्यामुळे साऱ्यांची तिच्यावर माया आहे. शेखरची आणि त्याच्या आईचीदेखील. पण तिला आपले असे कुणीच नाही. तिचे मामा गरीब आहेत. शेखरच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत.

लवकरच त्याचे लग्न ठरेल.स्वत:च्या बरोबरीच्या लोकांकडून त्याचे वडील भरपूर पैसे वसूल करून घेतील. असे असताना शेखरने तिचा असा अपमान करावा? ती विचारात गढलेली असताना दचकून मागे वळते. शेखर त्याला घातलेली माळ परत तिच्या गळ्यात टाकतो. तिचा कंठ भरून येतो. ती रडव्या आवाजात म्हणते, ‘‘मला कुणी नाही. म्हणूनच तुम्ही माझा असा अपमान करता आहात ना?’’ तिचे बोलणे ऐकून शेखरला धक्का बसतो. ‘‘अपमान मी करतो आहे की तू? आजकाल तू जरा आगाऊपणा करत होतीस. परदेशी जाण्यापूर्वी मी जरा पायबंद घातला आहे.’’ ‘‘आता काय करू मी’’, तिने विचारले. शेखर हसला. क्षणभर थांबून त्याने तिला जवळ घेतले. तिच्या ओठांवर ओठ ठेवून तो म्हणाला, ‘‘मला काहीच सांगायचे नाही. तुझे तुलाच सारे कळेल. आता खाली जा आणि आईला नमस्कार कर.’’

हा प्रसंग या कादंबरीचा तोलिबदू आहे. यानंतर शेखर आईला घेऊन परदेशी जातो. तीनेक महिन्यांनी गुरुचरण ब्राह्मो समाजात प्रवेश करतात. हे कळल्यावर नवीनबाबू संतापाने अद्वातद्वा बोलतात. गुरुचरण त्यांच्या हातून निसटला होता. शेवटी ते मिस्त्रीला बोलावतात आणि दोन घरांच्यामध्ये एक मोठी िभत घालून येण्याजाण्याचा रस्ता बंद करून टाकतात. शेखर व त्याची आई परतल्यावर िभत पाहून त्यांना सर्व उमजते. संधी साधून शेखरची आई ललिताच्या घरी जाऊन येते. मामीशी झालेल्या बोलण्यावरून बहुधा ललिताचे लग्न गिरीन्द्रशी ठरते आहे असे त्यांना वाटले. शेखर भेटतो तेव्हा ललिता त्याला म्हणते, ‘‘माझे पत्र मिळाले नाही का? इकडचे सारे वर्तमान मी कळवले होते पत्रात.’’ शेखर म्हणाला, ‘‘पण मामांनी विकलेच ना तुला?’’ त्यावर ती म्हणते, ‘‘मामा कसे काय मला विकणार? माझे लग्न होण्यापूर्वीच त्यांनी पैसे घेतले होते. मला विकण्याचा अधिकार त्यांना कसा असेल? तो फक्त तुम्हाला आहे’’, असे म्हणून ती आत निघून जाते.

शेखरचे मन आंदोलित होऊ लागते. गिरीन्द्रबरोबर ललिताचे लग्न होऊ घातले आहे या विचाराने तो कुंठित होतो. ललिताला तो टाळू लागतो. दिवसामागून दिवस जातात. मामांची प्रकृती खालावल्याने त्यांना घेऊन गिरीन्द्रच्या गावी जायचे ठरते. ललिता अन्नाकालीला घेऊन शेखरचा निरोप घ्यायला येते. शेखरच्या कपाटाच्या किल्ल्या परत देते आणि काहीच न बोलता त्याच्या पाया पडून निघून जाते. तीन वर्षे उलटून जातात. शेखरचे वडील अचानक मृत्यू पावतात. त्यामुळे शेखरचे लग्न त्यांनी ठरवलेले असूनही वर्षभर थांबावे लागणार असते. ललिताचे काहीही वृत्त शेखरला कळत नाही. तिचे लग्न झाले का, ती कशी आहे हे कळावे असे त्याला वाटत राहते. एकेदिवशी कालीच्या आईचा निरोप येतो. तो त्यांना भेटायला जातो. वातावरण शोकाकुल असते. ललिता क्षणभर येते. खाली वाकून प्रणाम करते. त्याच्या आईची वास्तपुस्त करते. कालीच्या आईने गिरीन्द्रचा आमचे जावईबापू असा उल्लेख केल्याने ललिताचे त्याच्याशी लग्न झाले आहे असा त्याचा पक्का समज होतो. तो तिच्याशी बोलणे टाळतो. काही दिवसांनी गिरीन्द्र त्याला भेटायला येतो, म्हणतो, गुरुचरणचे हे रिकामे घर आता तुम्ही घेतले तर बरे म्हणून ताईने तुमच्याशी बोलायला मला पाठवले आहे. शेखर विचारतो, ‘‘कोण ताई?’’ गिरीन्द्र म्हणतो, ‘‘ललिताताई.’’ शेखर विस्मित होऊन बघत राहतो. नंतर एकाएकी विचारतो, ‘‘माफ करा गिरीन्द्रबाबू, तुमचे लग्न ललिताशी झाले नाही का?’’ गिरीन्द्र म्हणतो, ‘‘नाही. माझे कालीशी झाले आहे. गुरुचरणबाबूंच्या मृत्यूनंतर ललिताताईंनी मला सांगितले की त्यांचे लग्न आधीच झालेले आहे, आणि त्यांचे पती जिवंत आहेत.’’ गिरीन्द्रचे बोलणे ऐकता ऐकता शेखरच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते.

दुपारी ललिता शेखरच्या आईजवळ बसून शेखरच्या लग्नाच्या कपडय़ालत्त्यांविषयी बोलत असते. शेखर म्हणतो, ‘‘आई, समजा मी हे लग्न केलेच नाही तर?’’ आई म्हणते, ‘‘हे पाहा, लग्न म्हणजे काही पोरखेळ आहे का?’’ त्यावर शेखर म्हणतो, ‘‘पोरखेळ नाही, म्हणूनच सांगतो आहे.’’ शेखरची आई चिडून म्हणते, ‘‘परत मला काशीला पाठवून दे, सोबत ललितालाही घेऊन जाते.’’ शेखर म्हणतो, ‘‘तीच तुला सर्व सांगेल. आज चार वर्षे उलटून गेली आहेत, ती तुझी सून आहे.’’ ललिताकडून सारे ऐकून घेत असताना आनंदाने भुवनेश्वरीचे डोळे वाहू लागतात. आपले सारे दागिने पेटीतून काढून ती एकेक ललिताला चढवते आणि म्हणते, , ‘‘थांब जरा, अविनाशला जाऊन सांगते. लग्नातली नवरी बदलली आहे.’’

chaturang@expressindia.com