|| प्रभा गणोरकर

अलीकडच्या काळात स्त्रियांनी, स्त्रीलेखकांनी आणि स्त्रीसमीक्षकांनी स्त्रीपात्राचे चित्रण करणाऱ्या पुरुष लेखकांची भरपूर खिल्ली उडवलेली आहे. पुरुष लेखकांना स्त्रियांचे चित्रण करताच येत नाही, स्त्री म्हणजे काय हे त्यांना कळलेलेच नसते. त्यांच्या शरीराची, पुरुषांना आकर्षित करणाऱ्या अंगोपांगांची ठरीव ठशाची चित्रणे ते करीत असतात. बायकांचा पोषाख, त्यांच्या सवयी, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि त्यांचे शरीर यांसंदर्भात ते अगदी अडाणी असतात. त्यामुळे ते करीत असलेली वर्णने अगदी हास्यास्पद असतात असे उद्गार एका स्त्रीने काढलेले आहेत आणि एकीने तर प्रिय पुरुष लेखकांना उद्देशून स्त्रियांसंबंधीच्या गोष्टींची एक यादीच दिलेली आहे! या नव्या दृष्टिकोनातून अलीकडच्या काळातले तरुण लेखक स्त्रियांची चित्रणे कशी करताहेत हे पाहणे मनोरंजक ठरेल. पण इथे तो विषय बाजूला सारून पुरुषलेखकांनी स्त्रीचित्रणाचे आव्हान कसे पेलले हे आपण पाहतो आहोत. पुरुष स्त्रीचित्रण करतात ते एकतर त्यांच्या निरीक्षणांवर आधारलेले असते. अनुभवांवर बेतलेले असते. जसे, हरिभाऊंची ‘यमू’ आणि तिची मामेसासू; काल्पनिक आणि रोमँटिक वृत्तीतून आलेली असते, जशी ‘गारंबीच्या बापू’तली राधा; कधी अवाच्या सवा असते, जशी ‘ऑक्टोपस’ची नायिका; आदर्श असते, जशी ‘श्यामची आई’; जसे लेखकाला स्त्रीने असावे असे वाटते तसे, जशी ‘कालिंदी’, किंवा वामन मल्हारांची ‘सुशीला’.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

जैनेंद्रकुमार यांची ‘सुनीता’ ही कादंबरी वाचताना त्यांनी केलेले सुनीताचे चित्रण स्त्रीचे उन्नयन करणारे आहे असे जाणवले. सुनीता श्रीकांतची पत्नी आहे. श्रीकांत वकिली करतो आहे. परंतु त्याला त्याचा मित्र हरिप्रसन्न याची नेहमी आठवण येत असते. हरिप्रसन्न कायम ताजा, चतुर. सगळ्यांच्या उपयोगी पडणारा. पण सध्या कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. लहान असतानाच तो घर सोडून पळून गेला होता. श्रीकांत मोकळ्या मनाचा, देखणा, तगडा, संपन्न स्थितीतला, धार्मिक वृत्तीचा, तर हरिप्रसन्न चतुर, हिशेबी, देणे-घेणे पक्के लक्षात ठेवणारा. श्रीकांत हरिप्रसन्नची नेहमी आठवण काढतो. कुठे असेल, काय करीत असेल, संसार थाटला की नाही त्याने? सुनीताशी तो त्याच्याविषयी बोललेला आहे. सुनीता सुंदर, सुशील, सुशिक्षित, लाखात एक अशी पत्नी आहे. श्रीकांत हरीची काळजी करीत असतो.

असहकार, सत्याग्रह अशा चळवळींत हरीला तुरुंगात जावे लागले होते. आता कुठे असेल तो, लग्न नाही, घरदार नाही, इथून तिथे भटकत राहणे यातच त्याचं आयुष्य चालू आहे, संसारात किती सुख असते, याची त्याला कल्पना तरी आहे का? असं जाणवून हरीला तो पत्र पाठवतो. पण ते परत येते. श्रीकांत-सुनीताच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. कधी कधी दैनंदिन जीवन कंटाळवाणे होते. एखाद्या वेळी दोघे नवराबायको एकाच खोलीत असतात आणि दोघांत काही बोलणे होत नाही. सुनीता सारखी घरकामात मग्न असते. झाडलोट, साफसफाई, स्वयंपाकपाणी, नवऱ्याची काळजी घेणे हे सारे यथास्थित सुरू आहे. पण कधीतरी वाटते, पाणी कुठेतरी अडले आहे. जगणे एकसुरी झाले आहे. घराची, मनाची दारे-खिडक्या उघडून बाहेरची मोकळी हवा आत आली पाहिजे. दसऱ्याच्या सुट्टीत कोठेतरी हिंडून यावे या विचाराने ती श्रीकांतकडे प्रवासाचा प्रस्ताव मांडते. प्रयागला कुंभमेळा आहे म्हणून तीर्थालाच जायचे ठरते. नदीत बसून संगमाकडे जाताना श्रीकांतला किनाऱ्यावर हरिप्रसन्न दिसलासे वाटते. पण ते परततात तेव्हा तो नाहीसा झालेला असतो. श्रीकांत त्याच्यासाठी एवढा अस्वस्थ का आहे हे सुनीताला समजत नाही. ती स्वत: खंबीर मनाची, सर्जनशील आहे. श्रीकांतला पत्नीसोबत संसार करणे आवडते. पण देश, राष्ट्र, सुधारणा, परिवर्तन या साऱ्यांसाठी पत्नीव्यतिरिक्त आणखी एखाद्या व्यक्तीची त्याला गरज आहे. हरिप्रसन्न दिल्लीला गेला आहे असे कळल्यावर तो सुनीतासह घरी परततो. दिल्लीत त्याचा शोध घेतो. पण व्यर्थ. त्या उभयतांचे जीवन परत त्याच सपाट दिनक्रमाच्या चाकोरीत फिरत राहते.

एके दिवशी हरिप्रसन्नची श्रीकांतशी गाठ पडते खरी. श्रीकांतच्या आग्रहाने तो त्याच्या घरी जातो. तेव्हा सुनीता पदर बांधून खोलीतली जाळीजळमटे काढत असते. तिला पाहून हरी उंबऱ्यातच अडखळतो. जरा वेळाने सावरतो. सुनीता आणि श्रीकांत त्याच्या जेवण्याखाण्याची तयारी करू लागतात. हरिप्रसन्न खोलीत हिंडत पुस्तके पाहू लागतो. कायद्याची पुस्तके आहेतच, पण शेलीचा कवितासंग्रहही आहे. त्यावर सुनीताचे नाव आहे. एका लहान पुस्तकावर संगीत विषयात पहिला क्रमांक मिळाल्याचा उल्लेख आहे. एका कोपऱ्यात गवसणी घातलेली सतार आहे, हार्मोनियम आहे, बर्नार्ड शॉचे एक पुस्तक आहे. त्यावर नाव लिहिलेले आहे सुनीता श्रीकांत. श्रीकांतशी बोलताना त्याला कळते की सुनीता झाडूपोछा, भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक हे सारे स्वत: करते. हरिप्रसन्नच्या आगमनाने श्रीकांत आणि सुनीता यांच्या जीवनात आनंदाची नवी लहर निर्माण झाली. श्रीकांतला पत्नीविषयी जणू नवे आकर्षण निर्माण झाले. सुनीताही मनातून उमलल्यासारखी झाली. हरिप्रसन्न हा त्या दोघांच्याही बोलण्याचा एक महत्त्वाचा विषय बनला. त्याला काहीतरी उद्योग मिळावा यासाठी सुनीताच्या बहिणीची गणिताची शिकवणी त्याला द्यायचे ठरते. त्याच्यासाठी फळे आणणे, जेवण बनवणे, त्याला घेऊन सिनेमाला जाणे अशा गोष्टींत ती दोघे रमून जातात. हरिप्रसन्न  सुनीताच्या वागण्याने, स्वभावाने, सहज झालेल्या स्पर्शाने मुग्ध झाला आहे. तिने जणू त्याला पकडून ठेवले आहे. सुनीता त्या काळातली स्त्री आहे, तिने स्वत:ला पत्नीच्या कर्तव्यांनी बांधून घेतले आहे. ती पतिव्रता आहे, श्रीकांतला हरिप्रसन्नला संसारी बनवायचे आहे, भटक्या, क्रांतिकारकांचा मार्ग स्वीकारलेल्या हरीला योग्य मार्गावर आणायची तिची मनीषा आहे. हरीच्या मनात आपल्याविषयी आकर्षण निर्माण झाले आहे हे सुनीताने ओळखलेले आहे. हरीशी ती हसून खेळकरपणे बोलते, त्याला आपल्या घरी राहण्याचा आग्रह करते, त्याला तिच्या बहिणीबद्दल जवळीक वाटावी यासाठी ती प्रयत्न करू लागते. हरिप्रसन्न साहसी वाटतो, पण भित्रा आहे हे तिला जाणवले आहे. त्याच्या बेचनीला लगाम घालण्यासाठी तिला काही पावले उचलायची आहेत. त्याच्या भटक्या आयुष्याबद्दलही तिला कुतूहल आणि सहानुभूती आहे. त्याला गृहस्थ, नात्यांमध्ये बांधलेला असा बनवण्याचे तिने ठरवले आहे. किंबहुना स्त्रीला ईश्वराने त्यासाठीच बनवले आहे असे तिला वाटते.

हरिप्रसन्नच्या क्रांतिकारी हालचालींना वेग येतो. त्यासाठी लागणारे धन श्रीकांतच्या सांगण्यावरून सुनीता त्याला देते. त्याच दरम्यान श्रीकांत तीन-चार दिवसांसाठी लखनौला जातो. तो हरीला सुनीतावर सोपवून जातो. सुनीता विकल होते. त्याने तिच्यावर विश्वास टाकलेला आहे. हरीचे आपल्यावर प्रेम आहे याचा नवा साक्षात्कार तिला होतो. आत काहीतरी उणावत होते, दुर्लक्षित होत होते ते तिच्या मनात पुन्हा भरून येते. ती हरिप्रसन्नला घरी राहू देते. त्याचे आतिथ्य करते. हरिप्रसन्न तिला आपल्या क्रांतीच्या मार्गावर ओढू पाहतो आहे. स्वातंत्र्ययुद्धाच्या राष्ट्रकर्मात तिने स्वत:ला झोकून द्यावे, क्रांतिकारकांच्या दलाला प्रेरणा देण्यासाठी आपल्या बरोबर यावे असे सांगतो. सुनीता ते मान्य करते. आपली नाव भरकटणार नाही या दृढ निश्चयाने ती त्याच्याबरोबर जायला तयार होते. तिने त्याच्याबरोबर जाऊ नये असे तिची बहीण तिला विनवते. पण सुनीताने हरिप्रसन्नबरोबर जायचे ठरवले आहे. रात्री नऊनंतर ती त्याच्याबरोबर जंगलाकडे निघते. त्यांची गाडी वळणावरून निघते त्या वेळी श्रीकांत परतल्याचे तिला दिसते. हरिप्रसन्न तिला दूर जंगलात घेऊन जातो. परंतु त्याला दूरवर चमकणाऱ्या लाल दिव्याने धोक्याची सूचना मिळते. मध्यरात्रीच्या अंधारात हरिप्रसन्न सुनीताच्या सहवासात खुळावला आहे. तो तिला जवळ घेतो. सुनीता विचलित झाली आहे का? क्षणभर झाली आहे. हरिप्रसन्न  तिच्यावरचे आपले प्रेम उघड करतो. सुनीताचे मन त्याच्याविषयीच्या दु:खाने भरून येते. जिथे ती येऊन पोचली होती तो मार्ग अनपेक्षित, विस्मयकारी, भयकारी होता. ती त्याच्यापासून दूर होते. तिचे मन ओळखून हरिप्रसन्न काही काळ दूर निघून जातो. पण त्याच्या हृदयात उठलेल्या वादळाने तो परत येतो. झोपलेल्या सुनीताच्या शरीरावरून हात फिरवतो. त्या वेळी सुनीता जणू ते आव्हान स्वीकारते. ती हळूहळू शरीरावरची वस्त्रे दूर करते. तिच्या या कृत्याने हरिप्रसन्न हतप्रभ होतो, पराजित होतो. तो डोळे झाकून घेतो. तो तिथून निघून जातो. पहाट होते त्या वेळी दूर जाऊन बसलेला हरिप्रसन्न तिला त्या विश्वाच्या दुबरेध ग्रंथात एखादा लहानसा अर्धविराम असावा, विश्वाच्या अनवरत प्रवाहातला एक थेंब असावा तसा दिसतो. त्याला ती म्हणते, ‘‘हरिबाबू पहाट झाली आहे. घरी जाऊ या.’’ परतताना सुनीता त्याने स्वत:ला जपावे असे म्हणत त्याला नमस्कार करून निरोप देते. श्रीकांत घरी येतो. नेहमीप्रमाणे सुनीता अंगण झाडत असते. तिच्याकडे पाहून श्रीकांतच्या मनात तिच्याविषयीचे प्रेम भरून येते. तिची विमलता, तिचे आत्मतेज त्याला जाणवते. तिच्याबद्दल क्षणभर मनात निर्माण झालेला संशय विरून जातो. समर्पणाने सुनीताने श्रीकांतला जिंकले होते आणि हरिप्रसन्नला हरवले होते.

prganorkar45@gmail.com